घरखर्च चालवणे
कौटुंबिक सौख्यानंदाच्या गुरुकिल्ल्या
घरखर्च चालवणे
तो: “माझी बायको लॉरा * फालतू खर्च करते, निदान अशा गोष्टींवर पैसा खर्च करते ज्या आम्हाला खरोखरच लागत नाहीत, असं मला वाटतं. तिला पैसे कसे वाचवायचे तेच कळत नाही. त्यामुळे मग जेव्हा अचानक काही खर्च निघतो तेव्हा हातात पैसे नसतात. मी हे नेहमीच म्हणतो, की तिच्याकडे पैसे असले तर ती ते उडवतेच!”
ती: “कदाचित मी काटकसरी नसेन, पण महिन्याचा खर्च, सामानसुमान, घरातला खर्च यात किती पैसे जातात हे माझ्या नवऱ्याला कळत नाही. घरात दिवसभर तो नसतो, मी असते. काय हवयं, काय नकोय, ते मलाच पाहावं लागतं. मी खर्च केला तरी तो बडबड करणार, हे मला माहीत आहे. पण गरजेच्या गोष्टींसाठी मला पैसे खर्च करावेच लागतात.”
पैसा. हा एक सर्वात अवघड विषय आहे ज्यावर बऱ्याच जोडप्यांना शांतपणे चर्चा करणे कदाचित कठीण वाटेल. म्हणूनच तर तो, नवरा-बायकोत होणाऱ्या कलहांमध्ये सहसा सर्वात वरच्या क्रमांकावर आहे.
पैशाबद्दल असंतुलित दृष्टिकोन बाळगणाऱ्या पतीपत्नीला तणाव, झगडे, मानसिक व आध्यात्मिक हानी सहन करावी लागते. (१ तीमथ्य ६:९, १०) पैशाचे वाद सोडवू न शकणाऱ्या पतीपत्नीला, जास्त वेळ काम करावे लागते. याचा परिणाम ते त्यांच्या मुलांना तसेच एकमेकांना भावनिक व आध्यात्मिक आधार देण्यात उणे पडतात. पैशाविषयी योग्य दृष्टिकोन बाळगण्यास ते आपल्या मुलांना शिकवू शकत नाहीत.
बायबल असे मान्य करते, की ‘पैसा आश्रय देणारा आहे.’ (उपदेशक ७:१२) पण, तुम्ही तो कसा खर्च करायचा आणि त्याविषयी आपल्या जोडीदाराशी कसे बोलायचे हे शिकलात तरच तुमच्या विवाहाला तो आश्रय देणारा ठरू शकतो. * पैशाचा विषय निघतो तेव्हा तेव्हा भांडण्याऐवजी त्यावर शांतपणे चर्चा केल्याने खरे तर वैवाहिक बंधन आणखी मजबूत होऊ शकते.
पण पैशावरून विवाहात इतकी भांडणे का होतात? आणि पैशाबद्दलच्या तुमच्या चर्चांमुळे, तुमच्यात भांडणे होण्याऐवजी समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
समस्या
सहसा, पैशावरून होणारे वाद हे खरे तर पैशाबद्दल नसतात तर विश्वास किंवा मनात असलेल्या भीतीमुळे होतात. जसे की, ‘माझ्या बायकोने मला, तिने खर्च केलेल्या पै न पैचा हिशेब दिला पाहिजे,’ अशी मागणी करणाऱ्या नवऱ्याला खरे तर आपल्या बायकोवर हा भरवसा नसतो, की ती घरखर्च यशस्वीपणे चालवू शकते. आणि ‘माझ्या नवऱ्याला काटकसर जमत नाही,’ अशी तक्रार करणाऱ्या बायकोच्या मनात खरे तर ही भीती असते, की पुढेमागे काही झालेच तर इतका पैसा कोठून उभा करायचा.
आणखी एक कारण आहे ज्यावरून पतीपत्नीत पैशावरून भांडणे होतात. ते म्हणजे, त्या दोघांचे विविध परिस्थितीत झालेले संगोपन. लग्नाला आठ वर्षे झालेले मॅथ्यू म्हणतात, “माझी बायको अशा कुटुंबात लहानाची मोठी झाली जिथे पैशाचा मुळीच अपव्यय होत नसे. मला जशी भीती वाटत असते, तशी तिला वाटत नाही. माझे वडील दारू प्यायचे, सतत सिगारेट ओढायचे आणि खूप दिवसांपर्यंत त्यांना काम नव्हतं. पुष्कळदा असं झालं, की आम्हाला दररोज लागणाऱ्या गोष्टीसुद्धा आम्हाला मिळायच्या नाहीत. त्यामुळे कर्ज म्हटलं, की माझ्या अंगावर काटाच येतो. या भीतीमुळे काही वेळा, पैशावरून माझ्या बायकोबरोबर मी विनाकारणच भांडतो.” तुमच्या
दोघांत वादाचे काहीही कारण असले तरी, पैशामुळे तुम्ही तुमच्या विवाहात कलह निर्माण होऊ न देता, आपल्या कुटुंबाला हातभार लावण्याकरता त्याचा उपयोग कसा करू शकता?यशाच्या चार गुरुकिल्ल्या
बायबल ही आर्थिक व्यवहारांची पोथी नसली तरीसुद्धा पैशांविषयी त्यात दिलेल्या व्यावहारिक सल्ल्याचे एखाद्या जोडप्याने पालन केल्यास, पैशावरून त्यांच्यात होणाऱ्या कुरबुरी ते टाळू शकतात. तेव्हा, या सल्ल्यावर विचार करायला आणि खाली दिलेल्या सूचनांचे पालन करून पाहायला काय हरकत आहे?
१. पैशाचा विषय निघतो तेव्हा शांतीने बोलण्यास शिका. “चांगली मसलत घेणाऱ्यांजवळ ज्ञान असते.” (नीतिसूत्रे १३:१०) तुमचे संगोपन ज्या वातावरणात झाले आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला इतरांची मसलत घेण्यास, विशेषकरून पैशाबद्दल आपल्या जोडीदाराशी बोलण्यास जड जात असेल. तरीपण, या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करायला शिकण्यातच सुज्ञपणा आहे. उदाहरणार्थ, पैशाबद्दल तुमच्या आईवडिलांच्या दृष्टिकोनाचा परिणाम तुमच्याही मनावर कसा झाला आहे, हे तुम्ही तुमच्या जोडीदाराला सांगू शकता, नाही का? तसेच, तुमच्या जोडीदाराचे संगोपन ज्या वातावरणात झाले होते त्याचा, तिच्यावर/त्याच्यावर कसा परिणाम झाला आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करा.
पैशाच्या संबंधाने जोपर्यंत तुमच्यात समस्या निर्माण होत नाहीत तोपर्यंत तो विषय काढायची गरज नाही, असा विचार करू नका. बायबलच्या एका लेखकाने असे विचारले: “पूर्वसंकेत केल्याशिवाय [“वेळ ठरवल्याशिवाय,” NW] दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय?” (आमोस ३:३) या वचनातील तत्त्व तुम्ही कसे लागू करू शकता? पैशाबद्दल बोलण्याकरता एक विशिष्ट वेळ ठरवून, ज्यामुळे गैरसमज होऊ शकतात असे वाद तुम्ही टाळू शकता.
हे करून पाहा: कुटुंबाच्या खर्चाविषयी बोलण्यासाठी एक वेळ ठरवा. जसे की, दर महिन्याचा पहिला दिवस किंवा दर आठवड्यातला एक ठराविक दिवस. ही चर्चा, १५ मिनिटे किंवा त्याहूनही कमी वेळेची तुम्ही ठेवू शकता. आणि अशी वेळ निवडा जेव्हा तुम्ही दोघेही निवांत असाल. विशिष्ट वेळी जसे की, जेवायला बसल्यावर किंवा मुलांबरोबर निवांत बसलेले असताना पैशाविषयी बोलण्याचे टाळा.
२. पगाराबद्दल कोणता दृष्टिकोन बाळगायचा ते दोघे मिळून ठरवा. “आदर करण्यात एकमेकांस थोर माना.” (रोमकर १२:१०, पं.र.भा.) तुम्ही कमावणारे एकटेच असाल तर तुमचा पगार हा केवळ तुमचा नसून संपूर्ण कुटुंबाचा आहे असा विचार करून आपल्या जोडीदाराचा आदर करा.—१ तीमथ्य ५:८.
तुम्ही दोघे कमावते असाल तर, तुमचा पगार किती आहे आणि तुमचे कोणत्या गोष्टीवर जास्त पैसे खर्च होतात, किंवा तुम्हाला काही कर्ज फेडावे लागत आहे, हे आपल्या जोडीदारापासून लपवून न ठेवण्याद्वारे तुम्ही एकमेकांचा आदर करू शकता. वर सांगितल्यापैकी कोणतीही गोष्ट तुम्ही तुमच्या जोडीदारापासून लपवून ठेवलीत तर याचा अर्थ असा होईल, की तुम्हाला तुमच्या जोडीदारावर भरवसा नाही आणि यामुळे तुमच्या दोघांतला नातेसंबंध बिघडू शकतो. पण याचा अर्थ असा होत नाही, की तुम्ही किरकोळ खर्च सुद्धा तुमच्या जोडीदाराला विचारूनच केला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला मोठ्या खर्चाविषयी सांगता तेव्हा तुम्ही दाखवून देता, की तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या मताची किंमत वाटते.
हे करून पाहा: शंभर-दीडशे रूपये किंवा एखाद्या ठराविक रकमेपर्यंतच्या खर्चाबद्दल तुम्हाला तुमच्या जोडीदाराला विचारायची गरज नाही, हे आपापसांत ठरवा. पण यापेक्षा अधिक पैसे तुम्हाला खर्च करायचे असतील तर त्याविषयी आपल्या जोडीदाराशी चर्चा करा.
३. तुमच्या योजना कागदावर मांडा. “काळजीपूर्वक केलेल्या योजनांमुळे फायदा होतो.” (नीतिसूत्रे २१:५, ईजी टू रीड व्हर्शन) भविष्याची काळजीपूर्वक योजना करण्याचा आणि आपले कष्ट वाया न घालवण्याचा एक मार्ग म्हणजे, कुटुंबाचे बजेट तयार करणे. लग्नाला पाच वर्षे पूर्ण झालेल्या नीना यांनी म्हटले: “तुमचा पगार किती आहे व तुमचा खर्च किती असतो हे जेव्हा तुम्ही कागदावर लिहिता तेव्हा खरे म्हणजे तुमचे डोळे उघडतात. आपण कागदावर जेव्हा आपला सगळा खर्च लिहून काढतो तेव्हा आपल्याला आपल्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज येतो.”
बजेट बनवण्याची पद्धत क्लिष्ट असण्याची गरज नाही. लग्नाला २६ वर्षे झालेले व दोन मुले असलेले डारेन म्हणतात: “सुरुवातीला आम्ही, वेगवेगळ्या पाकिटांमध्ये, आठवड्याच्या खर्चासाठी पैसे ठेवायचो. जसे की, महिन्याच्या सामानाचं पाकीट, मनोरंजनासाठी पाकीट, एवढेच नव्हे तर
केस कापायच्या पैशाचेसुद्धा वेगळे पाकीट होते. एका पाकिटातले पैसे कमी पडले तर आम्ही दुसऱ्या पाकिटातले पैसे काढायचो. पण मग ज्या पाकिटातून पैसे काढले त्यात आम्ही पैसे हातात आल्याबरोबर लगेच घालायचो.” तुम्ही जर क्वचितच रोख रक्कम देऊन कोणतेही बिल भरत असाल, तर तुम्ही त्याचे नियोजन करणे व किती पैसे भरले त्याची नोंद ठेवणे महत्त्वाचे आहे.हे करून पाहा: ज्या खर्चांची ठरलेली रक्कम असते ते सर्व खर्च लिहून ठेवा. तुमच्या पगारातला किती पैसा तुम्ही साठवणार आहात यावरही चर्चा करा. त्यानंतर, ज्या खर्चांमध्ये बदल होतात जसे की, धान्य-धुन्य, वीजेचे व फोनचे बिल यांची यादी करा. आणि मग अनेक महिने, तुम्ही खर्च केलेल्या पैशांचे रेकॉर्ड ठेवा. गरज असेल तर आपल्या जीवनशैलीतही जरा फेरबदल करा जेणेकरून तुम्ही कर्जात बुडणार नाही.
४. कोण काय करेल ते ठरवा. “एकापेक्षा दोन माणसे बरी. दोन माणसे एकत्र काम करीत असली तर त्यांना त्यापासून अधिक मिळते.” (उपदेशक ४:९, १०, ईजी टू रीड व्हर्शन) काही कुटुंबात, पती पैशांचे व्यवहार सांभाळतो तर इतर कुटुंबात पत्नी हे व्यवहार अगदी कुशलपणे सांभाळते. (नीतिसूत्रे ३१:१०-२८) पण बहुतेक कुटुंबात, पतीपत्नी दोघे मिळून ही जबाबदारी सांभाळण्याचे ठरवतात. लग्न होऊन २१ वर्षे झालेले मार्यो म्हणतात: “माझी बायको, बिले आणि किरकोळ खर्च बघते. आणि टॅक्स, कारचं पेमेंट, घरभाडं यासारखे बाहेरचे खर्च मी बघतो. आम्ही एकमेकांना याविषयी सांगत राहतो व पार्टनरसारखं काम करतो.” आर्थिक व्यवहार सांभाळण्याची तुमची कोणतीही पद्धत असली तरी, कळीचा मुद्दा हा आहे की तुम्ही एकत्र मिळून कार्य केले पाहिजे.
हे करून पाहा: प्रत्येकाच्या बलस्थानांचा व कमतरतांचा विचार केल्यानंतर, अमूक जबाबदारी कोण सांभाळणार त्यावर चर्चा करा. एक-दोन महिन्यानंतर ठरवलेल्या व्यवस्थेची उजळणी करा. काही बदल करावा लागत असेल तर तो करण्यास तयार असा. तुमचा जोडीदार करत असलेल्या कामांची, जसे की बिल भरणे किंवा बाजारहाट करणे, यांची कदर करण्याकरता अधूनमधून आपसात कामांची अदलाबदल करा.
पैशाच्या चर्चांतून नेमके काय निष्पन्न झाले पाहिजे
पैशांच्या चर्चेमुळे तुमच्यातील प्रेम कमी होता कामा नये. लिआला ही गोष्ट पटते. तिच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. ती म्हणते: “आम्ही दोघंही, पैशाविषयी अगदी खुल्या व प्रामाणिक मनानं चर्चा करण्यास शिकलो. यामुळं, आम्ही एकत्र मिळून कार्य करतो आणि आमच्यातलं प्रेमही वाढलं आहे.”
नवरा-बायको जेव्हा पैसा कसा खर्च केला पाहिजे यावर चर्चा करतात तेव्हा ते एकमेकांना आपल्या आशा, आपली स्वप्ने सांगत असतात आणि विवाहाशी वचनबद्ध राहण्याची इच्छा व्यक्त करत असतात. मोठी खरेदी करण्याआधी एकमेकांशी सल्ला मसलत करून ते एकमेकांच्या मतांचा व भावनांचा आदर करतात. न विचारता ठराविक रक्कम खर्च करण्याची ते एकमेकांना मुभा देऊन एकमेकांवरचा भरवसा व्यक्त करतात. प्रेमळ नातेसंबंधाचे हेच तर मुख्य घटक आहेत. असा नातेसंबंध पैशापेक्षा कैक पटीने मोलाचा आहे. मग त्याबद्दल वाद कशाला हवेत? (w०९ ०८/०१)
[तळटीपा]
^ परि. 3 नावे बदलण्यात आली आहेत.
^ परि. 7 बायबलमध्ये सांगितले आहे, की “पति पत्नीचे मस्तक आहे.” त्यामुळे, कुटुंबाच्या खर्चाची जबाबदारी आणि आपल्या पत्नीला प्रेमळ व निःस्वार्थपणे वागवण्याचे कर्तव्य हे प्रामुख्याने त्याचे आहे.—इफिसकर ५:२३, २५.
स्वतःला विचारा . . .
▪ आम्ही दोघांनी अलिकडेच पैशाबद्दल शांतपणे बसून केव्हा चर्चा केली होती?
▪ कुटुंबाचा गाडा ओढत असलेल्या माझ्या जोडीदाराबद्दल मला कदर वाटते हे मी माझ्या बोलण्याद्वारे व कार्याद्वारे कसे दाखवू शकतो?
[२० पानांवरील चित्र]
तुम्हाला काय महत्त्वाचे वाटते—पैसा की तुमचा विवाह?