मी किती दान दिले पाहिजे?
वाचक विचारतात
मी किती दान दिले पाहिजे?
“संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.” (२ करिंथकर ९:७) हे शब्द, जगातील कोट्यवधी लोकांच्या परिचयाचे आहेत. परंतु, चर्चला जाणाऱ्या काहींना कदाचित वाटेल, की त्यांनी काहीही झाले तरी दान दिलेच पाहिजे. म्हणजे, दान देण्याची त्यांची ऐपत नसली तरीसुद्धा त्यांनी दानपेटीत दान टाकलेच पाहिजे. खरे तर, दानपेटीत अमूक एक ठराविक रक्कम टाकली पाहिजे, असे अनेक धर्मात अपेक्षिले जाते. या प्रथेला दशमांश देणे असे म्हणतात; दशमांश म्हणजे आपल्या मिळकतीतला दहावा हिस्सा चर्चला देणे.
दानपेटीत आपण अमूक एक ठराविक रक्कम टाकली पाहिजे, असा बायबलमध्ये खरोखरच नियम वगैरे आहे का? आणि समजा, मला दान टाकण्याची इच्छा असेल तर मी किती दिले पाहिजे?
बायबल काळात अपेक्षित असलेले व ऐच्छिक दान
इस्राएल राष्ट्राने किती दान दिले पाहिजे अशी देव अपेक्षा करतो त्याबद्दलच्या स्पष्ट सूचना बायबलमध्ये आहेत. (लेवीय २७:३०-३२; गणना १८:२१, २४; अनुवाद १२:४-७, ११, १७, १८; १४:२२-२७) परंतु या मागण्या अवाजवी नव्हत्या. यहोवाने इस्राएल लोकांना असे वचन दिले होते, की जर त्यांनी त्याच्या या आज्ञेचे पालन केले तर तो त्यांच्या राष्ट्राची “अभिवृद्धी” करेल.—अनुवाद २८:१, २, ११, १२.
इतर प्रसंगी, इस्राएली लोक त्यांना वाटेल तितके ऐच्छिक दान करू शकत होते. जसे की, राजा दाविदाने जेव्हा यहोवासाठी मंदिर बांधण्याचे ठरवले तेव्हा त्याच्या प्रजेने “पाच हजार किक्कार सोने” दान दिले. * (१ इतिहास २९:७) येशूने पृथ्वीवर असताना जे पाहिले त्याच्याशी याची तुलना करा. त्याने ‘एका दरिद्री विधवेला मंदिराच्या दानपेटीत दोन टोल्या टाकताना पाहिले.’ या दोन टोल्या म्हणजे नेमकी किती रक्कम? एक दिवसाच्या मजुरीची १.५ टक्के रक्कम. तरीपण येशूने म्हटले, की ही लहानशी रक्कमही स्वीकारयोग्य होती.—लूक २१:१-४.
दानपेटीत ठराविक रक्कम टाकण्याची ख्रिश्चनांकडून अपेक्षा केली जाते का?
इस्राएल लोकांना दिलेल्या नियमशास्त्र कराराचे आज ख्रिश्चनांना पालन करावे लागत नाही. त्यामुळे, एक ठराविक रक्कम दानपेटीत टाकण्याची त्यांच्याकडून अपेक्षा केली जात नाही. पण खऱ्या ख्रिस्ती मंडळीतल्या ख्रिश्चनांना दानपेटीत दान टाकण्यास खूप आनंद होतो. स्वतः येशू ख्रिस्ताने म्हटले होते: “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे.”—प्रेषितांची कृत्ये २०:३५.
ऐच्छिक दानांकरवीच यहोवाचे साक्षीदार त्यांचे जगव्याप्त प्रचाराचे कार्य करतात. या दानाचा, तुम्ही वाचत असलेल्या नियतकालिकासारखी इतर प्रकाशने छापण्याकरता, राज्य सभागृह म्हटल्या जाणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांची उपासना स्थळे बांधण्याकरता व त्यांची देखभाल करण्याकरता उपयोग केला जातो. यांपैकी कुठलीही रक्कम कोणाला पगार म्हणून दिली जात नाही. जे लोक स्वतःहून शिष्य बनवण्याच्या कार्यात पूर्ण वेळ कार्य करतात त्यांना, वाहतुकीचा खर्च व इतर किरकोळ खर्च म्हणून काही रक्कम दिली जाते. पण ती पगार म्हणून दिली जात नाही. व हे स्वयंसेवक ही रक्कम स्वतःहून मागत नाहीत. वास्तविक पाहता, यहोवाच्या बहुतेक साक्षीदारांना त्यांच्या प्रचार कार्यासाठी कोणतेही आर्थिक साहाय्य मिळत नाही. उलट, त्यांच्यातील बहुतेक जण, प्रेषित पौलाप्रमाणे स्वतःचा भार उचलण्याकरता नोकरी करतात. प्रेषित पौल तंबू बनवण्याचे काम करत असे.—२ करिंथकर ११:९; १ थेस्सलनीकाकर २:९.
यहोवाचे साक्षीदार करत असलेल्या कार्याला हातभार लावायची जर कोणाची इच्छा असेल तर त्यांनी किती दान दिले पाहिजे? “प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो,” असे प्रेषित पौलाने लिहिले.—२ करिंथकर ८:१२; ९:७. (w०९ ०८/०१)
[तळटीप]
^ परि. 7 २००८ साली, २८.३५ ग्रॅम सोन्याची सरासरी किंमत ४१,८०८ रूपये होती. म्हणजे, दाविदाने जितके सोने दान म्हणून दिले होते त्याची किंमत, अंदाजे २,३०,१५,३०,४०,००० रूपये इतकी होती.