अख्ख्या जगाला बदलणारा मनुष्य
अख्ख्या जगाला बदलणारा मनुष्य
या पृथ्वीवर कोट्यवधी लोक होऊन गेले. वाळूवर न टिकणाऱ्या पावलांच्या खुणांप्रमाणेच बहुतेक लोकांचे नामोनिशाण उरले नाही. पण फार कमी लोकांनी इतिहासात आपली छाप पाडली; आणि कदाचित तुमच्या दररोजच्या जीवनावरही!
तुम्ही सकाळी उठता, दिवे लावता आणि कामाला जाण्यासाठी आवरायला लागता. प्रवासात वाचण्याकरता तुम्ही घरातून निघण्याआधी टेबलावर पडलेले मासिक किंवा पुस्तक पटकन उचलता. तुम्ही आठवणीने डॉक्टरांनी सांगितलेली अँटीबायोटिक घेता. तुमचा दिवस सुरू होतो न होतो तोच, काही नामवंत लोकांनी लावलेल्या शोधांचा फायदा तुम्हाला होऊ लागतो.
मायकल फॅरडे १७९१ मध्ये जन्म झालेल्या या इंग्रज भौतिक शास्त्रज्ञाने इलेक्ट्रिक मोटार व डायनामो यांचा शोध लावला. त्याच्या शोधांमुळे, मानवांच्या वापरासाठी मोठ्या प्रमाणावर वीज उपलब्ध झाली.
त्साइ लुन चीनच्या सम्राटाच्या दरबारात काम करणाऱ्या या अधिकाऱ्याने, सा.यु. १०५ च्या सुमारास कागद बनवण्याच्या प्रक्रियेचा शोध लावला ज्यामुळे कागदाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाले.
योहानस गुटनबर्ग १४५० सालाच्या सुमारास या जर्मन संशोधकाने चल खिळ्यांच्या साहाय्याने सर्वात पहिल्या छपाई यंत्राचा शोध लावला. या छपाई यंत्रामुळे, स्वस्तात छापकाम करणे शक्य झाले. यामुळे, नानाविध विषयांवर मुबलक माहिती मोठ्या प्रमाणावर मिळणे शक्य झाले.
अलेक्झॅन्डर फ्लेमिंग १९२८ साली या स्कॉटलंडच्या संशोधकाने एक अँटीबायोटिक तयार केले ज्याला त्याने पेनिसिलीन नाव दिले. जिवाणूंच्या संसर्गामुळे होणाऱ्या रोगांवरील उपचाराकरता आता अँटीबायोटिकचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.
काही लोकांच्या शोधांमुळे किंवा त्यांनी नवनवीन गोष्टी सुरू केल्यामुळे कोट्यवधी लोकांना, विशिष्ट लाभ घेणे किंवा चांगले आरोग्य राखणे शक्य झाले आहे.
पण, एक असा मनुष्य आहे जो या सर्वांपेक्षा खूप वेगळा आहे. कुठलाही वैज्ञानिक शोध लावला म्हणून त्याची ख्याती नाही. तर, गरीब घरातून आलेल्या या मनुष्याने जवळजवळ २,००० वर्षांपूर्वी, एक आशादायक व सांत्वनदायक संदेश दिला. संपूर्ण पृथ्वीवरील लोकांच्या जीवनावर त्याच्या संदेशाचा किती प्रभाव पडला आहे हे जर तुम्ही पाहिले तर तुमची देखील खात्री पटेल, की या मनुष्याने खरोखरच अख्ख्या जगाला बदलले!
हा मनुष्य येशू ख्रिस्त होता. कोणता संदेश त्याने दिला? आणि या संदेशाचा तुमच्या जीवनावर कोणता प्रभाव पडू शकतो? (w१०-E ०४/०१)