व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला माहीत होते का?

तुम्हाला माहीत होते का?

तुम्हाला माहीत होते का?

येशू एक ऐतिहासिक व्यक्‍ती असल्याचा बायबलव्यतिरिक्‍त आणखी काय पुरावा आहे?

येशू पृथ्वीवर होता त्या काळाच्या आसपास हयात असलेल्या अनेक लेखकांनी त्याचा खास उल्लेख केला. या लेखकांपैकी एक कर्नेलियस टॅसिटस होता ज्याने रोमच्या सम्राटांविषयीचा इतिहास लिहिला. सा.यु. ६४ मध्ये आग लागल्यामुळे रोम कसे उद्‌ध्वस्त झाले होते त्याविषयी लिहिताना टॅसिटसने म्हटले की सम्राट निरोने ही आग लावल्याची अफवा त्या वेळी पसरली होती. पण आग लावल्याचा दोष निरोने ख्रिस्ती म्हणणाऱ्‍या एका समूहावर टाकला असे टॅसिटसने म्हटले. त्याने पुढे लिहिले: “या समूहाला ख्रिस्ती हे नाव ज्याच्यावरून पडले त्या ख्रिस्तुसला [ख्रिस्ताला] टायबेरियसच्या शासनकाळात पाँटियस पायलट या अधिकाऱ्‍याने वधस्तंभावर खिळले.”—ॲनल्स,  XV, ४४.

फ्लेवियस जोसिफस या यहुदी इतिहासकाराने देखील येशूचा उल्लेख केला. सुमारे सा.यु. ६२ मध्ये जुडियाचा रोमी राज्यपाल फेस्टसचा मृत्यू आणि त्याच्या नंतर अधिकार पदावर आलेला अल्बिनस याच्या काळादरम्यान घडलेल्या घटनांविषयी सांगताना जोसिफस म्हणतो की अनॅनस (अननस) या प्रमुख याजकाने “सन्हेद्रिनच्या न्यायाधीशांची एक सभा बोलावली. आणि त्यांच्यासमोर ख्रिस्त म्हटलेल्या येशूच्या भावाला म्हणजे याकोबाला आणि इतरांना आणले.”—ज्यूईश अँटिक्विटीज,  XX, २०० (ix, १). (w१०-E ०४/०१)

येशूला ख्रिस्त का म्हटले?

शुभवर्तमान अहवालांत म्हटले आहे, की गब्रिएल देवदूताने मरीयेला, तू गर्भवती राहशील असे दर्शन देऊन सांगितले व त्याने तिला असेही म्हटले की तुला पुत्र होईल व तू त्याचे नाव येशू ठेव. (लूक १:३१) बायबल लिहिले त्या काळात, येशू हे नाव यहुदी लोकांमध्ये सर्वसामान्य होते. यहुदी इतिहासकार जोसिफस याने बायबलमध्ये उल्लेख केलेल्या लोकांव्यतिरिक्‍त अशा आणखी १२ लोकांविषयी लिहिले ज्यांचे नाव देखील येशू असे होते. मरीयेच्या पुत्राला “नासरेथकर” असे म्हटले जायचे; यामुळे लोक येशूला, तो नासरेथहून आला होता, असे ओळखायचे. (मार्क १०:४७) पण त्याला “ख्रिस्त” किंवा येशू ख्रिस्त म्हणूनही ओळखले जायचे. (मत्तय १६:१६) ख्रिस्त या शब्दाचा काय अर्थ होतो?

मराठीतला “ख्रिस्त” हा शब्द, ख्रिस्तोस या ग्रीक शब्दातून आला आहे. आणि तो मशीऑख (मशीहा) या इब्री शब्दाच्या तुल्य आहे. दोन्ही शब्दांचा अर्थ, “अभिषिक्‍त जण” असा होतो. येशूच्या आधी इतरांसाठीसुद्धा हा शब्द अगदी उचित रीतीने वापरण्यात आला होता. जसे की, मोशे, अहरोन व राजा दावीद या सर्वांना अभिषिक्‍त असे संबोधण्यात आले होते. म्हणजे, देवाने दिलेल्या विशिष्ट जबाबदाऱ्‍या सांभाळण्यासाठी व अधिकारासाठी त्यांना नियुक्‍त करण्यात आले होते. (लेवीय ४:३; ८:१२; २ शमुवेल २२:५१; इब्री लोकांस ११:२४-२६) प्रतिज्ञात मशीहा येशू, यहोवाचा प्रमुख प्रतिनिधी होता. म्हणूनच येशूला अगदी उचित रीत्या ‘ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र’ हे नाव मिळाले.—मत्तय १६:१६; दानीएल ९:२५. (w१०-E ०४/०१)

[१५ पानांवरील चित्र]

फ्लेवियस जोसिफसचे एक कलाकाराने कोरलेले चित्र