व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूने देवाच्या राज्याविषयी काय शिकवले?

येशूने देवाच्या राज्याविषयी काय शिकवले?

येशूने देवाच्या राज्याविषयी काय शिकवले?

येशू “देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता.”—लूक ८:१.

आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्‍या गोष्टींबद्दल किंवा आपल्या आवडत्या गोष्टींबद्दल बोलायला आपल्याला आवडते. जे ‘अंतःकरणात भरलेले असते तेच मुखावाटे निघते,’ असे येशूने एकदा म्हटले होते. (मत्तय १२:३४) आपल्या सेवेदरम्यान येशू ज्या गोष्टींबद्दल जास्त बोलला त्यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो, की देवाचे राज्य हा विषय त्याला अधिक महत्त्वाचा वाटत होता.

देवाचे राज्य काय आहे? राज्य म्हटले की त्याचा एक राजा असतो. अशाच प्रकारे, देवाचे राज्य हे यहोवा देवाने स्थापन केलेली एक राज्यसत्ता किंवा सरकार आहे. आणि या राज्याविषयी येशूने खूपकाही सांगितले; हा त्याच्या संदेशाचा मुख्य विषय होता. या राज्याचा चार शुभवर्तमानांमध्ये ११० पेक्षा अधिक वेळा उल्लेख आला आहे. पण येशूने फक्‍त राज्याविषयीची शिकवणच दिली नाही तर त्याच्या कार्यांद्वारेही त्याने, देवाचे राज्य काय करेल हे शिकवले.

या राज्याचा राजा कोण असेल? देवाच्या राज्याचा राजा लोकांच्या मतदानावरून ठरवलेला नाही. तर देवाने स्वतःच त्याची निवड केली आहे. देवाने आपल्याला राजा म्हणून निवडल्याचे येशूने लोकांना शिक्षण देताना सांगितले.

येशूला तो प्रतिज्ञात मशीहा म्हणून एका अविनाशी राज्यावर शासन करेल याविषयी बायबलमधील भविष्यवाण्यांत भाकीत करण्यात आल्याचे माहीत होते. (२ शमुवेल ७:१२-१४; दानीएल ७:१३, १४; मत्तय २६:६३, ६४) येशूने, तो भाकीत करण्यात आलेला मशीहा असल्याचे उघडपणे सांगितल्याचे आठवा. अशा रीतीने, येशूने तो देवाच्या राज्याचा नियुक्‍त राजा असल्याची कबुली दिली. (योहान ४:२५, २६) म्हणूनच तर, त्याने “माझे राज्य” या वाक्प्रचाराचा अनेकदा उल्लेख केला.—योहान १८:३६.

येशूने त्याच्यासोबत इतर जण देखील राज्य करतील असेही शिकवले. (लूक २२:२८-३०) यांची संख्या मर्यादित असल्यामुळे त्याने त्यांना ‘लहान कळप’ असे म्हटले. त्याने त्यांना म्हटले: “तुम्हास ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” (लूक १२:३२) बायबलमधील शेवटचे पुस्तक, ख्रिस्तासोबत राज्य करण्याचा विशेषाधिकार मिळालेल्यांची एकूण संख्या १,४४,००० इतकी असल्याचे दाखवते.—प्रकटीकरण ५:९, १०; १४:१.

हे राज्य कोठून शासन करेल? “माझे राज्य ह्‍या जगाचे नाही,” असे येशूने पंतय पिलात या रोमी शासकाला म्हटले होते. (योहान १८:३६) ख्रिस्ताच्या अधिकाराखाली असलेले देवाचे राज्य मानवांकरवी चालवले जाणार नाही. येशूने अनेकदा देवाच्या राज्याचा उल्लेख “स्वर्गाचे राज्य” असा केला. * (मत्तय ४:१७; ५:३, १०, १९, २०) यावरून, देवाचे राज्य एक स्वर्गीय सरकार आहे, हे स्पष्ट होते.

पृथ्वीवर घालवलेल्या काळानंतर आपण पुन्हा स्वर्गात जाऊ हे येशूला चांगल्या प्रकारे माहीत होते. त्याच्यासोबत राज्य करणाऱ्‍यांसाठी मार्ग मोकळा करण्याकरता, “मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो,” असे त्याने त्यांना म्हटले.—योहान १४:२, ३.

हे राज्य काय साध्य करेल? येशूने त्याच्या श्रोत्यांना देवाकडे अशा प्रकारे प्रार्थना करण्यास शिकवले: “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्तय ६:९, १०) स्वर्गात आता देवाची इच्छा पूर्ण होत आहे. आणि याच राज्याकरवी देवाच्या पृथ्वीसंबंधी असलेल्या उद्देशाची पूर्णता होईल. या उद्देशाची पूर्णता करण्याकरता, ते राज्य पृथ्वीवर विलक्षण बदल घडवून आणेल.

हे राज्य पृथ्वीवर कोणता बदल घडवून आणेल? वाईट कृत्य आचरीत राहणाऱ्‍या सर्व निगरगट्ट लोकांचा देवाचे राज्य नाश करेल, असे येशूने शिकवले. (मत्तय २५:३१-३४, ४६) याचा अर्थ, सर्व प्रकारचा भ्रष्टाचार आणि दुष्टाईचा अंत. या पृथ्वीवर “सौम्य,” नीतिमान, दयाळू, “अंतःकरणाचे शुद्ध” आणि “शांति करणारे” लोकच राहतील, असे येशूने शिकवले.—मत्तय ५:५-९.

पण मग या विश्‍वासू लोकांना अशाच प्रदूषित पृथ्वीवर राहावे लागेल का? नाही. देवाच्या राज्यात पृथ्वीला सुंदर बनवण्यात येईल, अशी खातरी येशूने दिली. येशूच्या शेजारील वधस्तंभावर खिळण्यात आलेल्या एका मनुष्याने त्याला म्हटले, “येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.” तेव्हा येशूने त्याला म्हटले, “मी तुला आज खचित सांगतो, की तू माझ्याबरोबर नंदनवनात असशील.” (लूक २३:४२, ४३, NW) होय, देवाचे राज्य या पृथ्वीचे एका नंदनवनात रूपांतर करेल. तेव्हा ती एदेन बागेसारखीच सुंदर दिसेल.

देवाचे राज्य मानवजातीसाठी आणखी काय करेल? देवाचे राज्य मानवजातीसाठी काय करेल त्याचे केवळ आश्‍वासनच येशूने दिले नाही. तर ते प्रत्यक्षात काय करेल हेही त्याने दाखवले. येशूने अनेक चमत्कार करून लोकांना बरे केले. हे चमत्कार छोट्या प्रमाणात करण्याद्वारे त्याने दाखवून दिले की भविष्यात देवाच्या राज्यात तो शासन करू लागेल तेव्हा मोठ्या प्रमाणात चमत्कार करेल. येशूविषयी शुभवर्तमानाचा प्रेरित अहवाल सांगतो: “येशू यहूदी लोकांच्या सभास्थानात सुवार्तेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत गालीलभर फिरला.”—मत्तय ४:२३.

येशूने वेगवेगळ्या प्रकारची आजार-दुखणी बरी केली. त्याने ‘जन्मापासूनच अंधळे असलेल्यांचे डोळे उघडले.’ (योहान ९:१-७, ३२, ३३) किळसवाण्या आजाराने पीडित असलेल्या एका कुष्ठरोग्याला त्याने हळूवार स्पर्श करून बरे केले. (मार्क १:४०-४२) एका ‘बहिऱ्‍या व तोतऱ्‍या माणसाला’ त्याच्याकडे आणले गेले तेव्हा “बहिऱ्‍यांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याची शक्‍ती” देण्यास तो समर्थ असल्याचे त्याने दाखवले.—मार्क ७:३१-३७.

देवाने निवडलेल्या राजाकडे मरण पावलेल्या लोकांना जिवंत करण्याची देखील शक्‍ती आहे. येशूने तीन वेगवेगळ्या प्रसंगी मृतांना पुन्हा जिवंत केल्याचे बायबलमध्ये लिखित करण्यात आले आहे. जसे की, एके प्रसंगी त्याने एका विधवेच्या एकुलत्या एका मुलाला पुन्हा जिवंत केले, दुसऱ्‍या प्रसंगी एका बारा वर्षांच्या मुलीला तर तिसऱ्‍या प्रसंगी त्याचा जिवलग मित्र, लाजर याला पुन्हा जिवंत केले.—लूक ७:११-१५; ८:४१-५५; योहान ११:३८-४४.

देवाच्या राज्यात राहणाऱ्‍यांसमोर किती उज्ज्वल भविष्य आहे याचे वर्णन करताना, येशूने प्रेषित योहानाकरवी असे भाकीत केले: “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटीकरण १:१; २१:३, ४) दुःखामुळे येणारे अश्रू, यातना आणि मृत्यू देखील नसलेल्या जगाची कल्पना करा! तेव्हा मग, जशी स्वर्गात देवाची इच्छा पूर्ण होत आहे तशीच पृथ्वीवरही व्हावी ही येशूने शिकवलेली प्रार्थना पूर्ण होईल.

देवाचे राज्य कधी येईल? येशूने शिकवले, की त्याच्या स्वर्गीय शासनाचा आरंभ त्याची “उपस्थिती” म्हटलेल्या काळात होईल. त्याच्या उपस्थितीच्या काळात त्याच्या स्वर्गीय शासनाचा आरंभ केव्हा होईल, हे समजण्यासाठी त्याने एक सविस्तर भविष्यवाणी केली. या काळात, जगभर अनेक त्रासांना सुरुवात होईल, ज्यात युद्धे, दुष्काळ, भूकंप, मऱ्‍या, अनीतित वाढ यांचाही समावेश होतो. (मत्तय २४:३, NW, ७-१२; लूक २१:१०, ११) येशूने भाकीत केलेली ही व इतर अनेक चिन्हलक्षणे विशेषकरून १९१४ पासून स्पष्टपणे दिसू लागली आहेत; याच वर्षी पहिले महायुद्ध पेटले होते आणि याच वर्षापासून येशूने स्वर्गात राज्य करण्यास सुरुवात केली. हे राज्य लवकरच पृथ्वीवर शासन करण्यास सुरू करेल आणि पृथ्वीवर देवाची इच्छा पूर्ण होईल. *

देवाचे राज्य आल्याने तुम्हाला स्वतःला काय फायदा होईल? हे, तुम्ही येशूच्या संदेशाला कसा प्रतिसाद द्याल यावर सर्वस्वी अवलंबून आहे. (w१०-E ०४/०१)

[तळटीपा]

^ परि. 8 “स्वर्गाचे राज्य” हा वाक्प्रचार मत्तयाच्या शुभवर्तमानात सुमारे ३० वेळा आढळतो.

^ परि. 17 देवाचे राज्य लवकरच येणार आहे, हे आपल्याला कसे कळते याविषयीच्या अधिक माहितीकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील “आपण ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत का?” हा अध्याय ९ पाहा.