देवाला आपली काळजी आहे हे आपल्याला कसे कळते?
देवाला आपली काळजी आहे हे आपल्याला कसे कळते?
जर देवाचे आपल्यावर प्रेम आहे तर मग आज एवढे दु:ख का आहे? हा एक जुना पण महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्यावर लोक अनेक शतकांपासून विचार करीत आले आहेत. तुमचे एखाद्यावर प्रेम असेल तर त्या व्यक्तीने दुःख भोगावे असे तुम्हाला नक्कीच वाटणार नाही, उलट ती व्यक्ती एखाद्या अडचणीत असेल तर तुम्ही तिला मदत करण्याचाच प्रयत्न कराल, नाही का? म्हणूनच आज जगात जे दुःख आहे ते पाहता देवाला आपली काळजी आहे हे मान्य करणे अनेकांना कठीण वाटते. त्यामुळे देवाचे खरोखर आपल्यावर प्रेम आहे, त्याला आपली काळजी वाटते याचे पुरावे आधी पडताळून बघणे आवश्यक आहे.
निर्मिती—देवाच्या प्रेमाचा पुरावा
यहोवा देव “आकाश, पृथ्वी, समुद्र ह्यांचा व त्यांच्यात जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्नकर्ता” आहे. (प्रेषितांची कृत्ये ४:२४) यहोवाने बनवलेल्या सर्व गोष्टींवर आपण मनन करतो तेव्हा त्याला नक्कीच आपली काळजी आहे या निष्कर्षावर आपण येतो. उदाहरणार्थ, तुम्हाला ज्यामुळे आनंद होतो अशा गोष्टींबद्दल विचार करा. तुम्हाला चांगले-चांगले खायला आवडते का? आपण जिवंत राहावे म्हणून यहोवा आपल्याला एकाच प्रकारचे अन्न पुरवू शकला असता. पण आपल्या जीभेचे लाड पुरवण्याकरता त्याने तऱ्हे-तऱ्हेचे अन्न-पदार्थ पुरविले आहेत. यहोवाने आपले जीवन आनंदी व रोचक बनवण्यासाठी पृथ्वीला नाना प्रकारच्या झाडांनी, रंगीबेरंगी फुलांनी व डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या निर्सगाने नटवले आहे.
आपल्याला ज्या प्रकारे बनवण्यात आले आहे त्याकडे लक्ष द्या. आपली विनोदबुद्धी, संगीताचा आनंद लुटण्याची आपली कुवत, सौंदर्याची पारख करण्याची आपली क्षमता, जीवन जगण्यासाठी आवश्यकच आहे असे नाही. पण ह्या सर्व देवाकडून मिळालेल्या देणग्या आहेत ज्या आपले जीवन समृद्ध बनवतात. इतरांसोबतचा नातेसंबंध विचारात घ्या. आपल्या प्रेमळ मित्रांची सोबत व प्रिय जनांचे आलिंगन नकोसे वाटेल असा आपल्यात कोणी आहे का? नाही, कारण प्रेम करण्याची क्षमता आपल्याला प्रेमळ देवाकडून मिळालेली देणगीच आहे! ज्याअर्थी देवाने मानवांना प्रेम दाखवण्याच्या क्षमतेसह निर्माण केले आहे त्याअर्थी हा गुण त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग नक्कीच असला पाहिजे.
बायबल—देवाच्या प्रेमाची खातरी
देव प्रेम आहे असे बायबल सांगते. (१ योहान ४:८) त्याचे प्रेम फक्त त्याच्या निर्मितीतूनच नव्हे तर त्याचे प्रेरित वचन बायबल यामध्ये सांगितलेल्या गोष्टींमधून देखील दिसून येते. उदाहरणार्थ, बायबल चांगले आरोग्य कसे राखता येईल याबद्दलचे मार्गदर्शन देते. ते सर्व गोष्टीत संयम बाळगण्याचे प्रोत्साहन देते आणि दारूबाजी, खादाडपणा यांबद्दल इशाराही देते.—१ करिंथकर ६:९, १०.
आपण इतरांशी कसे वागावे याबद्दल सुज्ञ सल्लाही बायबल देते. एकमेकांवर प्रेम करून इतरांना आदराने, सन्मानाने व दयाळूपणे वागवावे असा आग्रह ते करते. (मत्तय ७:१२) स्वार्थी भावना, चहाडी, द्वेष, जारकर्म व खून यांसारखे दुःखद परिणाम ज्याच्यामुळे घडू शकतात असे आचरण व वृत्ती यांचा ते निषेध करते. बायबलमधील सल्ल्याप्रमाणे जर प्रत्येकाने वागण्याचा प्रयत्न केला तर या जगातील दुःख काही प्रमाणात नक्कीच कमी होईल.
पण देवाने आपल्या प्रेमाचा यापेक्षाही मोठा पुरावा दिला आहे. त्याने मानवजातीला पाप आणि मृत्युतून सोडवण्यासाठी आपल्या प्रिय पुत्राचे बलिदान दिले. योहान ३:१६ म्हणते: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” अशा रितीने यहोवाने मृत्यू व सर्व प्रकारच्या दुःखांचा कायमस्वरूपी अंत करण्याची आधीच व्यवस्था केली आहे.—१ योहान ३:८.
यहोवाचे आपल्यावर प्रेम आहे, याचे अनेक पुरावे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर मग आपल्याला होणारे दुःख पाहून तो नक्कीच आनंदी होत नाही. दुःख नाहीसे करण्यासाठी तो कार्य करील. देव दुःख नेमके कसे काढून टाकेल हे बायबल आपल्याला सांगते. याविषयी आपण तर्क-वितर्क करण्याची गरज नाही. (w०९-E १२/०१)
[४ पानांवरील चित्र]
प्रेम करण्याची क्षमता आपल्याला आपल्या प्रेमळ देवाकडून मिळाली आहे