व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा आपल्याला निवड करण्याची संधी देतो

यहोवा आपल्याला निवड करण्याची संधी देतो

देवाच्या जवळ या

यहोवा आपल्याला निवड करण्याची संधी देतो

अनुवाद ३०:११-२०

“मी यहोवाला विश्‍वासू राहू शकणार नाही, अशी भीती मला उगीचच वाटायची.” असे उद्‌गार एका ख्रिस्ती स्त्रीने काढले. लहानपणी तिला आलेल्या वाईट अनुभवांमुळे ती पुढे कधीच यशस्वी होऊ शकणार नाही, अशी तिच्या मनात भीती होती. हे खरे आहे का? आपण खरोखरच परिस्थितीचे गुलाम आहोत का? नाही. यहोवाने आपल्याला इच्छा स्वातंत्र्याची देणगी दिली आहे. यामुळे आपल्या जीवनाचा उपयोग कसा करायचा हे आपण निवडू शकतो. आपण योग्य निर्णय घ्यावेत अशी यहोवाची इच्छा आहे व आपण हे कसे करू शकतो याविषयी त्याचे वचन बायबल आपल्याला सांगते. अनुवादाच्या ३० व्या अध्यायात यहोवाने मोशेद्वारे जे सांगितले त्यावर आपण जरा विचार करूया.

देव आपल्याकडून काय अपेक्षितो हे समजून घेणे व त्याप्रमाणे वागणे खरोखरच कठीण आहे का? * मोशेने म्हटले: “ही जी आज्ञा मी तुला आज देत आहे ती तुला अवघड नाही व ती तुझ्या आवाक्याबाहेर नाही.” (वचन ११) यहोवा आपल्याकडून अशक्य गोष्टींची अपेक्षा करत नाही. त्याच्या अपेक्षा रास्त व पूर्ण करता येण्याजोग्या आहेत. त्या काय आहेत हे आपण जाणून घेऊ शकतो. देव आपल्याकडून काय अपेक्षा करतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला “स्वर्गात” अथवा “समुद्रापलीकडे” जाण्याची गरज नाही. (वचन १२, १३) आपण जीवन कसे जगले पाहिजे हे बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगते.—मीखा ६:८.

पण यहोवा आपल्यावर त्याच्या आज्ञा पाळण्याची सक्‍ती करत नाही. मोशेने म्हटले: “जीवन व सुख, आणि मरण व दुःख, ही आज मी तुझ्यापुढे ठेवली आहेत.” (वचन १५) आपण जीवन किंवा मरण, चांगली किंवा वाईट निवड करू शकतो. आपण देवाची उपासना करण्याची, त्याच्या आज्ञा पाळण्याची निवड करून आशीर्वाद मिळवू शकतो किंवा त्याच्या आज्ञांचे पालन न करता होणाऱ्‍या परिणामांना सामोरे जाण्याचे निवडू शकतो. शेवटी निवड आपली आहे.—वचन १६-१८; गलतीकर ६:७, ८.

आपण जी निवड करतो तिचा यहोवावर काही परिणाम होतो का? अर्थात! देवाच्या प्रेरणेने मोशेने असे म्हटले: “तू जीवन निवडून घे.” (वचन १९) आपण जीवन कसे निवडू शकतो? मोशेने हेही सांगितले. तो म्हणाला: ‘आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर प्रीति करून, त्याची वाणी ऐकून व त्याला धरून राहून’ आपण जीवन निवडू शकतो. (वचन २०) आपले जर यहोवावर प्रेम असेल तर आपण आज्ञाधारकपणे त्याचे म्हणणे ऐकू आणि काहीही झाले तरी त्याच्याशी जडून राहू. असे करण्याद्वारे आपण जीवन निवडतो. आपण केलेल्या निवडीमुळे आपले सध्याचे जीवन सर्वोत्तम बनते आणि भवितव्यात आपल्याला देवाच्या येणाऱ्‍या नवीन जगात सदासर्वदा जिवंत राहण्याची आशा ही मिळते.—२ पेत्र ३:११-१३; १ योहान ५:३.

देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या मोशेच्या शब्दांतून आपल्याला एक सांत्वनदायक सत्य कळते. या दुष्ट जगात तुम्हाला कितीही वाईट अनुभव आला असला तरी याचा अर्थ तुम्ही परिस्थितीचे गुलाम आहात किंवा तुम्ही जीवनात कधीच यशस्वी होणार नाही, असा मुळीच होत नाही. यहोवाने तुम्हाला इच्छा स्वातंत्र्याची देणगी देण्याद्वारे सन्मानित केले आहे. होय, तुम्ही यहोवावर प्रेम करण्याची, त्याच्या आज्ञा पाळण्याची व त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याची निवड करू शकता. ही निवड तुम्ही केली तर यहोवा तुमच्या प्रयत्नांना नक्कीच आशीर्वादित करेल.

यहोवावर प्रेम करण्याची व त्याची सेवा करण्याची आपण निवड करू शकतो, हे सत्य समजल्यावर लेखाच्या सुरुवातीला उल्लेखण्यात आलेल्या स्त्रीला खूप सांत्वन मिळाले. ती म्हणते: “माझं यहोवावर खूप प्रेम आहे. पण काही प्रसंगी ही महत्त्वाची गोष्ट मी विसरून गेले होते. पण माझं यहोवावर प्रेम असल्यामुळेच मी विश्‍वासू राहू शकते.” यहोवाच्या मदतीने तुम्हीही विश्‍वासू राहू शकाल. (w०९-E ११/०१)

[तळटीप]

^ परि. 5 याच अंकातील पृष्ठ १६ वरील “देवाच्या जवळ या—यहोवा आपल्याकडून काय मागतो?” हा लेख पाहा.