वैवाहिक सोबत्यापैकी एक जण आजारी असतो तेव्हा
कौटुंबिक सौख्यानंदाच्या गुरुकिल्ल्या
वैवाहिक सोबत्यापैकी एक जण आजारी असतो तेव्हा
मला क्रॉनिक फटीग सिन्ड्रोम * हा विकार झाल्याचे निदान करण्यात आल्यामुळे, आमचं घर आता फक्त त्यांच्याच एकट्याच्या पगारावर चाललं आहे. पण मला ते खर्चाविषयी काही सांगत नाहीत. मला ते असं अंधारात का ठेवतात? मला वाटतं आमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. आणि हे जर मला कळालं तर मी टेन्शन घेईन, असं त्यांना वाटतं म्हणून कदाचित ते मला सांगत नसावेत. पण खरं तर मला याचाच राग येतो.—नंदा. *
विवाहात समस्या येऊ शकतात. पण वैवाहिक जोडीदारापैकी एकाला जेव्हा दीर्घकाळचा आजार जडतो आणि दुसरा जोडीदार निरोगी असतो तेव्हा समस्या वाढू शकतात. * तुम्हाला देखील तुमच्या आजारी सोबत्याची काळजी घ्यावी लागत आहे का? असल्यास, पुढे दिलेल्या प्रश्नांमुळे तुम्हीही चिंतातूर होता का, जसे की, ‘माझ्या सोबत्याची तब्येत आणखीनच बिघडत जात असेल तर? माझ्या सोबत्याची काळजी घेण्यासोबतच, नोकरी सांभाळून स्वयंपाक, साफसफाई ही सर्व कामं मी किती दिवस करू शकेन? हे सर्व, माझ्या जोडीदाराऐवजी माझ्या बाबतीत घडायला हवं होतं, असं मला का वाटतं?’
पण तुम्ही स्वतःच आजारी असाल तर तुमच्या मनात पुढील प्रश्न येतील. जसे की ‘स्वतःची कामं स्वतःला करता येत नसल्यामुळे माझ्या मनात येणाऱ्या कमीपणाच्या भावनांवर मी मात कशी करू शकते/शकतो? माझ्या आजारपणाचा माझ्या सोबत्याला राग येतो का? आम्ही दोघांनी मिळून घालवलेले ते आनंदाचे दिवस संपलेत का?’
दुःखाची गोष्ट म्हणजे काही जोडप्यांनी, आजारी सोबत्याला सांभाळण्याचा ताण सहन करता आला नाही म्हणून घटस्फोट घेतला आहे. पण याचा अर्थ असा होत नाही, की आता तुमचाही विवाह कोलमडण्याच्याच बेतात आहे.
विवाह जोडीदारापैकी एकाला दीर्घकाळचा आजार झालेला असूनही अनेक जोडप्यांचा विवाह टिकून आहे व ते अधिक आनंदी बनले आहेत. योशिआकी आणि काजूको यांचे उदाहरण घ्या. पाठीच्या कण्याला इजा झाल्यामुळे, योशिआकी यांना मदतीशिवाय थोडीसुद्धा हालचाल करता येत नाही. त्यांची पत्नी काजूको म्हणते: “ह्यांना मला सगळ्याच गोष्टींसाठी मदत करावी लागते. त्यांची काळजी
घेता घेता माझीही मान, खांदे व हात दुखतात. व हाडांच्या दवाखान्यात मलाही जावं लागतं. काळजी घेणं हे सोपं काम नाही, हे मला सारखं सारखं जाणवतं.” काजूकोला इतका त्रास सहन करावा लागत असूनही त्या म्हणतात: “पण आम्ही नवरा-बायको एकमेकांच्या आणखीनच जवळ आलो आहोत.”अशा परिस्थितीतील जोडपी आनंद कसा मिळवू शकतात? आपल्या विवाहात आनंदी व समाधानी असलेली जोडपी, त्यांच्यापैकी एकावर आलेले आजारपण हे फक्त एकावरच नव्हे तर दोघांवर आले आहे, असा विचार करतात. कारण, एक जण आजारी पडला तर दुसऱ्यावरही वेगवेगळ्या मार्गांनी गंभीर परिणाम होतात. पतीपत्नी एकमेकांवर किती अवलंबून असतात त्याचे वर्णन उत्पत्ति २:२४ मध्ये करण्यात आले आहे. तेथे असे म्हटले आहे: “पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.” त्यामुळे, जोडीदारापैकी एक जण आजारी पडतो तेव्हा दोघांनी मिळून त्यांच्यासमोर आलेल्या परिस्थितीला तोंड दिले पाहिजे.
शिवाय जी जोडपी, त्यांच्यावर आलेली परिस्थिती स्वीकारून त्यानुसार जगण्याचे प्रभावी मार्ग शिकतात, त्यांच्यातील संबंध टिकून राहतात, असे अभ्यासातून दिसून आले आहे. नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याकरता त्यांनी शिकलेली कौशल्ये, नेहमीच उपयुक्त ठरलेल्या बायबलमधील सल्ल्यानुसार आहेत. पुढे दिलेल्या तीन सल्ल्यांवर विचार करा.
एकमेकांचा विचार करा
उपदेशक ४:९ मध्ये म्हटले आहे: “एकट्यापेक्षा दोघे बरे.” का? कारण “त्यांतला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल,” असे १० व्या वचनात म्हटले आहे. तुमच्या जोडीदाराची तुम्हाला कदर आहे हे बोलून दाखवण्याद्वारे तुम्ही त्याला उठण्याकरता ‘हात देता’ का?
एकमेकांना प्रत्यक्षात मदत करण्याकरता तुम्ही मार्ग शोधू शकता का? याँग यांच्या पत्नीला अर्धांगवायू झाला आहे. ते म्हणतात: “मी प्रत्येक वेळी माझ्या बायकोचा विचार करतो. मला जेव्हा तहान लागते तेव्हा, माझ्या बायकोलाही तहान लागली असेल असा मी विचार करतो. मला जर बागेत एक फेरफटका मारून यावसं वाटलं तर, ‘तुलाही यायचं का?’ असं मी तिला विचारतो. आम्ही दोघं मिळून दुःख सहन करतो आणि परिस्थितीचा सामना करतो.”
आता, समजा तुम्ही आजारी आहात आणि तुमचा सोबती तुमची काळजी घेतोय. तुमची तब्येत आणखी बिघडणार नाही याची काळजी घेऊन तुम्ही स्वतः काही गोष्टी करू शकता का? असे केल्याने तुमचा स्वाभिमान वाढेल आणि तुमच्या सोबत्यालाही तुमची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेता येईल.
तुमच्या जोडीदाराला तुम्ही चांगल्या प्रकारे मदत करू शकता असे गृहीत धरण्याऐवजी, काय केल्याने त्याला/तिला मदत होऊ शकेल हे त्याला/तिलाच विचारणे योग्य ठरणार नाही का? लेखाच्या सुरुवातीला उल्लेखण्यात आलेल्या नंदाने सरतेशेवटी आपल्या नवऱ्याला, तो कुटुंबाच्या खर्चाविषयी तिला काहीच सांगत नसल्यामुळे तिला कसे वाटत होते हे सांगितले. तेव्हापासून तिचा नवरा तिला, अगदी बारीक-सारीक खर्चांविषयी देखील सांगू लागला आहे.
हे करून पाहा: तुमच्या मते तुमचा जोडीदार तुमची सध्याची परिस्थिती आणखी सोपी कशी करू शकतो त्याची एक यादी करा आणि तुमच्या जोडीदारालाही अशी यादी तयार करायला सांगा. मग यादींची अदलाबदल करा. यादींतील प्रत्यक्षात अंमलात आणता येऊ शकतील असे एक-दोन मुद्दे तुम्ही दोघेही निवडू शकता.
संतुलित आराखडा ठेवा
“सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो,” असे सुज्ञ राजा शलमोन याने लिहिले. (उपदेशक ३:१) दीर्घकाळच्या आजारपणामुळे कुटुंबाच्या नित्यक्रमात व्यत्यय येत असल्यामुळे संतुलित आराखडा टिकवून ठेवणे कदाचित कठीण बनू शकते. तरीसुद्धा निदान थोडेतरी संतुलन तुम्ही कसे राखू शकता?
सतत आजारपणाचीच चिंता करण्यापेक्षा किंवा त्यातच गुंतून राहण्यापेक्षा अधूनमधून काहीतरी वेगळे करा. निरोगी असताना तुम्ही ज्या गोष्टी करत होता त्या आत्ताही तुम्हाला करायला जमतील का? नाहीतर, तुम्ही काही तरी नवीन असे करू शकता का? जसे की, एकमेकांना वाचून दाखवण्यासारखे सोपे काम किंवा मग एखादी नवीन भाषा
शिकण्याचे आव्हान. आजार असतानाही तुम्ही ज्या गोष्टी करू शकता त्या एकत्र मिळून केल्याने पतीपत्नी या नात्याने असलेला तुमचा नातेसंबंध मजबूत होईल व तुमचा आनंद वाढेल.संतुलन राखण्यास मदत करणारी आणखी एक गोष्ट आहे, इतरांबरोबर संगती करणे. नीतिसूत्रे १८:१ मध्ये बायबल असे म्हणते: “जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवू पाहतो, व त्याला सगळ्या सुज्ञतेचा संताप येतो.” जो फटकून राहतो त्याच्या मनावर वाईट परिणाम होतात, असे वचनात म्हटलेले तुम्हाला समजले का? पण अधूनमधून इतरांबरोबर संगती केल्याने तुम्हाला बरे वाटेल, तुमच्या मनाला तरतरी येईल. तुम्ही तुमच्या घरी कोणाला बोलवू शकता का?
कधीकधी, आजारी सोबत्याची काळजी घेणाऱ्याला संतुलन कसे राखायचे तेच कळत नाही. ते कदाचित स्वतःवर खूप काम ओढवून घेतात. यामुळे हळूहळू त्यांना थकवा जाणवू लागतो आणि त्यांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ लागतो. आणि मग कालांतराने, आपल्या प्रिय सोबत्याची काळजी घेण्याकरता आपल्यात ताकत उरली नाही असे त्यांना वाटू लागते. यास्तव, तुम्ही जर दीर्घकाळापासून आजारी असलेल्या सोबत्याची काळजी घेत असाल तर स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. जोम टिकवून ठेवण्यासाठी नेहमी स्वतःसाठी काही वेळ बाजूला ठेवा. * काही पतींना, आपल्या मित्रांना आपल्या चिंता बोलून आपले मन हलके करणे फायदेकारक वाटले आहे तर काही पत्नींना आपल्या मैत्रिणींना आपल्या मनातील चिंता सांगून मनावरील ओझे कमी करण्यास मदत मिळाली आहे.
हे करून पाहा: तुमच्या सोबत्याची काळजी घेताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते ते एका कागदावर लिहा. आणि मग या अडचणी तुम्ही कशा दूर करू शकता किंवा मग त्यांच्यावर मात कशी करू शकता तेही लिहा. सारखी सारखी त्यांची उजळणी करण्याऐवजी ‘परिस्थिती सुधारण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता?’ असे स्वतःला विचारा.
सकारात्मक दृष्टिकोन टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा
बायबलमध्ये म्हटले आहे: “ह्या दिवसांपेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, याचे कारण काय आहे, असे तू म्हणू नको.” (उपदेशक ७:१०, पं.र.भा.) आजारपण नसते तर आपले आयुष्य कसे असते यावर विचार करत बसू नका. या जगात आपण पूर्णपणे आनंदी होऊ शकत नाही, हे लक्षात असू द्या. परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारा आणि तिचा उत्तमरीत्या उपयोग करण्याचा शक्य तितका प्रयत्न करा.
तुम्हाला आणि तुमच्या सोबत्याला कशाने मदत मिळू शकते? तुम्हाला मिळालेल्या आशीर्वादांची चर्चा करा. तुमच्या तब्येतीत थोडी जरी सुधारणा झाली तरी आनंद माना. पुढेही आणखी काही चांगले घडेल अशी आशा ठेवा आणि तुम्ही दोघे मिळून साध्य करू शकाल अशी ध्येये ठेवा.
शोजी व अकिको यांनी वर दिलेला सल्ला अनुसरला आणि त्यांना याचे चांगले परिणाम मिळाले. अकिकोला फायब्रोमाल्जिया हा आजार असल्याचे निदान करण्यात आल्यानंतर त्यांना ख्रिस्ती सेवेतील त्यांची पूर्ण वेळेची नेमणूक सोडावी लागली. ते निराश झाले का? हो, निराश झाले. पण अशाच परिस्थितीत असलेल्यांना शोजी असा सल्ला देतात: “ज्या गोष्टी तुम्ही इथून पुढे करू शकणार नाही त्यांचा विचार करून निरुत्साहित होऊ नका. तर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. एक ना एक दिवस तुम्हा दोघांना तुमचा नेहमीचा नित्यक्रम पुन्हा सुरू करता येईल अशी आशा असली तरी, आत्ता तुमचे जीवन जसे आहे त्यावर मन केंद्रित करा. माझ्या बाबतीत पाहायचे झाले तर, मी माझं लक्ष माझ्या बायकोवर आणि तिला मदत करण्यावर केंद्रित केलं आहे.” हा व्यावहारिक सल्ला, तुमचा सोबती आजारी असेल तर त्याची चांगली काळजी घेण्यास तुम्हालाही मदत करू शकतो. (w०९-E ११/०१)
[तळटीपा]
^ परि. 3 हा आजार झालेल्यांना दीर्घकाळचा थकवा जाणवतो, त्यांचे स्नायू कमजोर होतात, त्यांना नैराश्य येते आणि त्यांची सतत झोपमोड होत असते.
^ परि. 3 काही नावे बदलण्यात आली आहेत.
^ परि. 4 या लेखात, अशा जोडप्यांच्या परिस्थितीची चर्चा करण्यात आली आहे ज्यांच्यापैकी एकाला दीर्घकाळचा शारीरिक आजार जडला आहे. परंतु, अपघातामुळे शारीरिक अपंगत्व आलेल्या अथवा डिप्रेशन सारख्या मानसिक आजाराचा सामना करणाऱ्या जोडप्यांना देखील पुढील माहितीचा अवलंब केल्याने उपयोग होऊ शकतो.
^ परि. 20 तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही अधूनमधून वैद्यकीय तज्ज्ञांकडून किंवा सामाजिक संस्थांकडून मदत उपलब्ध असेल तर ती घेऊ शकता.
स्वतःला विचारा . . .
मला आणि माझ्या सोबत्याला आत्ता कशाची जास्त गरज आहे?
▪ आजाराबद्दल जास्त बोलायची
▪ आजाराबद्दल कमी बोलायची
▪ जास्त चिंता न करायची
▪ एकमेकांचा जास्त विचार करायची
▪ आजारपण असतानाही करू शकत असलेल्या गोष्टी एकत्र मिळून करायची
▪ इतरांबरोबर संगती करायची
▪ दोघांनी ध्येये ठेवायची
[११ पानांवरील चित्र]
जीवनात संतुलन राखता यावे म्हणून तुम्ही दोघं मिळून एखादा छंद जोपासू शकता का?