व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शेमने दोन जगांतील दुष्टपणा पाहिला होता

शेमने दोन जगांतील दुष्टपणा पाहिला होता

आपल्या मुलांना शिकवा

शेमने दोन जगांतील दुष्टपणा पाहिला होता

नोहाचा पुत्र शेम याला, एका जगाच्या विनाशातून वाचून दुसऱ्‍या जगात जगण्याची संधी मिळाली. शेम ज्या जगात आधी राहिला होता त्या जगाचा नाश का करण्यात आला हे तुला माहीत आहे का? आणि, पहिल्या जगाच्या नाशातून तो व त्याचे कुटुंब वाचून दुसऱ्‍या जगात कसे काय जिवंत राहिले बरे?— * चला बघूया.

शेम तरुण होता तेव्हा “पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार” होती, असे बायबलमध्ये सांगण्यात आले आहे. लोकांच्या मनात येणारे सर्व विचार ‘केवळ एकसारखे वाईटच’ होते. मग देवाने काय केले माहीत आहे?— त्याने जलप्रलयाद्वारे दुष्ट लोकांच्या जगाचा नाश केला. प्रेषित पेत्राने याविषयी असे लिहिले: “तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला.”—उत्पत्ति ६:५; २ पेत्र ३:६.

देवाने त्या जगाचा नाश का केला हे तुला कळालं का?— तेव्हा लोक खूप दुष्ट होते व त्यांचे विचार नेहमी “वाईटच” होते. येशूने पण याविषयी सांगितले. त्याने म्हटले, की “जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात . . . लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत” ते असेच वागत राहिले.—मत्तय २४:३७-३९.

हे सर्व लोक का वाहून गेले?— कारण या लोकांनी, शेमचा पिता नोहा त्यांना जे सांगत होता त्याच्याकडे लक्ष दिले नाही. नोहा “नीतिमत्त्वाचा उपदेशक” होता. देवाने नोहाला एक मोठे जहाज बांधायला सांगितले जेणेकरून तो आणि त्याचे कुटुंब या जहाजात सुखरूप राहू शकतील. नोहाने देवाची ही आज्ञा मानली. नोहाबरोबर फक्‍त त्याची बायको, त्याचे तीन मुलगे—शेम, हाम व याफेथ—यांनी व त्यांच्या तीन बायकांनी देवाची आज्ञा मानली. बाकीचे लोक आपल्याच मर्जीनुसार वागत राहिले. म्हणून ते वाहून गेले.—२ पेत्र २:५; १ पेत्र ३:२०.

जलप्रलयाच्या सुमारे एका वर्षानंतर, शेम आपल्या कुटुंबासहित जहाजातून बाहेर कोरड्या जमिनीवर आला. सर्व दुष्ट लोक वाहून गेले होते. पण परिस्थिती अशीच राहिली नाही. शेमचा भाऊ हाम याचा मुलगा कनान याने एक अतिशय वाईट गोष्ट केली. त्यामुळे नोहाने त्याला असे म्हटले: “कनान शापित होईल.” हामचा नातू निम्रोद, हा सुद्धा खूप वाईट होता. त्याने खरा देव यहोवा याचा विरोध केला व लोकांना, बाबेलचा बुरूज म्हटला जाणारा एक उंच बुरूज बांधायला सांगितला. असे करून हे लोक स्वतःचे नाव मोठे करू इच्छित होते. शेमला आणि नोहाला हे ऐकून कसे वाटले असेल?—उत्पत्ति ९:२५; १०:६-१०; ११:४, ५.

त्यांना वाईट वाटले. यहोवालासुद्धा खूप वाईट वाटले. यहोवाने काय केले माहीत आहे?— त्याने लोकांच्या भाषेत गोंधळ केला. यामुळे, हा काय बोलतो ते त्याला समजत नव्हते आणि तो काय बोलतोय ते ह्‍याला समजत नव्हते. यामुळे लोकांनी त्या बुरुजाचे बांधकाम अर्ध्यातच सोडून दिले आणि एकसारखी भाषा बोलणाऱ्‍या लोकांचे गट बनले आणि ते वेगवेगळ्या दिशेने पांगले. (उत्पत्ति ११:६-९) पण यहोवाने शेम व त्याच्या कुटुंबाची भाषा बदलली नाही. त्यामुळे ते एकत्र राहून देवाची सेवा करण्यास एकमेकांना मदत करू शकले. शेमने किती वर्ष यहोवाची सेवा केली माहीत आहे?—

तो ६०० वर्ष जगला. जलप्रलयाआधी ९८ वर्ष आणि जलप्रलयानंतर ५०२ वर्ष तो जगला. त्यानेसुद्धा नोहाला जहाज बांधायला मदत केली असेल व येणाऱ्‍या जलप्रलयाविषयी लोकांना सांगितले असेल, असे आपण म्हणू शकतो. पण जलप्रलयानंतर तो जे ५०० पेक्षा अधिक वर्ष जगला त्या काळात त्याने काय केले असावे बरे?— नोहाने यहोवाविषयी बोलताना त्याला “शेमाचा देव” असे म्हटले. म्हणजे, शेमने मरेपर्यंत यहोवाची सेवा केली व घरातील इतरांनाही असे करण्यास मदत केली असावी. शेमच्या घराण्यातूनच अब्राहाम, सारा व इसहाक हे जन्माला आले.—उत्पत्ति ९:२६; ११:१०-३१; २१:१-३.

आता आजच्या जगाचा विचार करा. आजचे जगही शेमच्या दिवसांतील जगाप्रमाणे वाईटच बनत चालले आहे. या जगाचे काय होणार आहे?— बायबलमध्ये म्हटले आहे, की हे जग ‘नाहीसे’ होणार आहे. पण त्याच वचनात पुढे असेही वचन दिले आहे, की “देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” याचा अर्थ, आपण जर देवाच्या इच्छेप्रमाणे वागत राहिलो तर या दुष्ट जगाच्या नाशातून वाचून देवाच्या नवीन जगात जाणाऱ्‍यांपैकी आपणही एक असू. आणि मग देवाच्या मदतीने आपण या पृथ्वीवर नेहमीसाठी आनंदी राहू.—१ योहान २:१७; स्तोत्र ३७:२९; यशया ६५:१७. (w०९-E १०/०१)

[तळटीप]

^ परि. 3 तुम्ही हा लेख आपल्या मुलाला वाचून दाखवत असाल तर, लेखात काही वाक्यांच्या पुढे जेव्हा एक छोटीशी रेघ तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्ही तेथे थांबून तुमच्या मुलाला काय वाटते ते विचारायचे आहे.

प्रश्‍न:

❍ शेम आधी कोणत्या जगात राहात होता आणि कोणत्या दोन कारणांमुळे देवाने त्या जगाचा नाश केला?

❍ शेम किती वर्ष जगला व तो कसा होता?

❍ आपण राहत असलेल्या जगाचे लवकरच काय होणार आहे?

❍ या जगाच्या नाशातून वाचायचे असेल तर आपण काय केले पाहिजे?