व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गिलादातील मलम बरे करणारा मलम

गिलादातील मलम बरे करणारा मलम

गिलादातील मलम बरे करणारा मलम

बायबलमधील उत्पत्ति नावाच्या पुस्तकात योसेफ नावाच्या एका मनुष्याचा अहवाल आहे जो पुष्कळ लोकांना माहीत आहे. योसेफाच्या भावांनी त्याला, ईजिप्टला जाणाऱ्‍या काही इश्‍माएली व्यापाऱ्‍यांना विकून टाकले. व्यापाऱ्‍यांचा हा काफिला गिलादहून आला होता आणि त्यांच्या उंटांवर ऊद व इतर सामान लादले होते व ते हे सर्व ईजिप्टला घेऊन चाललेले होते. (उत्पत्ति ३७:२५) या लहानशाच अहवालावरून आपल्याला कळते, की प्राचीन मध्यपूर्वेत गिलादातील ऊद किंवा मलम याला खूप मागणी होती कारण त्यात काही खास औषधी गुण होते.

पण, सा.यु.पू. सहाव्या शतकात संदेष्टा यिर्मया याने अगदी व्याकूळ होऊन असे विचारले: “गिलादात मलम नाही काय?” (यिर्मया ८:२२) यिर्मयाने असा प्रश्‍न का विचारला? हा कसला मलम होता? जखम बरी करण्यासाठी आज अशा मलमाचा उपयोग केला जातो का?

बायबल काळातील मलम

बायबलचे लिखाण झाले त्या काळात, बालसम नावाच्या एका मलमाचा लोक सर्रास वापर करायचे. वेगवेगळ्या प्रकारच्या झाडा-झुडपांच्या फांद्यांवरून पाझरणाऱ्‍या एका सुंगधी, तेलकट व चिकट पदार्थाला बालसम म्हटले जायचे. बालसम तेलाचा उपयोग सहसा, धूप व अत्तरांसाठी केला जायचा. प्राचीन काळच्या मध्य पूर्वेतील श्रीमंत लोक या तेलाचा उपयोग करायचे. ईजिप्टच्या दास्यत्वातून बाहेर आल्यानंतर थोड्या दिवसांतच इस्राएल लोकांनी, अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुंगधी धूप बनवण्यासाठी बालसमचा उपयोग करण्यास सुरुवात केली. (निर्गम २५:६; ३५:८) राजा शलमोन याला भेटायला आलेल्या शेबाच्या राणीने आणलेल्या उंची नजराण्यांपैकी एक सुगंधी द्रव्य अर्थात बालसम तेल होते. (१ राजे १०:२, १०) पर्शियाचा राजा अहश्‍वेरोश याच्याजवळ जाण्याआधी, एस्तेरचे सौंदर्य खुलवण्याकरता ‘सहा महिन्यांपर्यंत’ बालसमच्या या ‘सुगंधी द्रव्याने’ तिला मसाज करण्यात आला होता.—एस्तेर १:१; २:१२.

बालसम तेल मध्य पूर्वेतील विविध भागातून येत असे; पण, गिलादाचे बालसम अर्थात गिलादाचे मलम प्रतिज्ञात देशातून, यार्देन नदीच्या पूर्वेकडील भागात असलेल्या गिलादातून येत असे. कुलपिता याकोबाने बालसमला “देशात उत्पन्‍न होणारे मोलवान पदार्थ” असे संबोधून ते नजराणा म्हणून ईजिप्टला पाठवले. (उत्पत्ति ४३:११) संदेष्टा यहेज्केलने, यहूदा व इस्राएल देशातले लोक सोर देशाशी असलेल्या व्यापारात ज्या वस्तू पाठवायचे त्यांत त्याने बालसम ऊदाचा उल्लेख केला. (यहेज्केल २७:१७) बालसममध्ये काही खास औषधीय गुणधर्म असतात हे सर्वज्ञात होते. प्राचीन काळच्या लिखाणांत पुष्कळदा, बालसम मलमाने जखमा लगेच बऱ्‍या होतात असा उल्लेख आढळतो.

एका रोगी राष्ट्रासाठी बालसम मलम

“गिलादात मलम नाही काय?” असा प्रश्‍न यिर्मयाने का विचारला? याचे उत्तर मिळण्याकरता आपल्याला, त्याच्या दिवसांत इस्राएल राष्ट्राची काय अवस्था होती त्याचे परीक्षण करून पाहावे लागेल. संदेष्टा यशयाने याचे आधी, आध्यात्मिक अर्थाने त्यांच्या रोगट अवस्थेचे वर्णन केले होते: “पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत काहीच धड नाही; जखमा, चेंचरलेले व पुवळलेले घाय आहेत; ते कोणी पिळून काढीत नाही, त्यांवर कोणी पट्टी बांधीत नाही.” (यशया १:६) आपली दयनीय स्थिती पाहून त्यावर उपाय शोधण्याऐवजी इस्राएल राष्ट्र हूडपणे वागत होते. ते इतक्या पुढेपर्यंत गेले होते, की यिर्मया त्यांच्याबद्दल फक्‍त विलाप करू शकत होता. तो त्यांच्याविषयी असे म्हणाला: “परमेश्‍वराचे वचन ते धिक्कारितात; त्यांच्यात शहाणपण कोठचे असणार!” पण ते जर यहोवाकडे पुन्हा वळाले असते तर यहोवाने त्यांना बरे केले असते. म्हणून यिर्मयाने “गिलादात मलम नाही काय?” असा प्रश्‍न विचारला होता. यिर्मयाचा हा प्रश्‍न विचार करायला लावणारा आहे, नाही का?—यिर्मया ८:९.

आजचे जग “जखमा, चेंचरलेले व पुवळलेले घाय” यांनी भरले आहे. लोक आज, दारिद्र्‌य, अन्याय, स्वार्थीपणा, निर्दयीपणा यांनी पीडित आहेत कारण देवाबद्दलचे आणि शेजाऱ्‍यांबद्दलचे त्यांचे प्रेम थंड झाले आहे. (मत्तय २४:१२; २ तीमथ्य ३:१-५) जात, वंश किंवा वय यांमुळे पुष्कळ लोकांना दुर्लक्षित वाटते. उपासमार, रोगराई, युद्धे व मृत्यू लोकांच्या दुःखात आणखी भर घालत आहे. पीडित लोकांना झालेल्या भावनिक व आध्यात्मिक जखमांवर लावण्याकरता ‘गिलादातील मलम’ शिल्लक आहे किंवा नाही, असा अनेक प्रामाणिक मनाच्या लोकांना यिर्मयाप्रमाणे प्रश्‍न पडतो.

जखम भरून काढणारी आनंदाची बातमी

येशूच्या दिवसांतील नम्र लोकांच्या मनातही हाच प्रश्‍न रेंगाळत होता. पण त्यांना त्याचे उत्तर मिळाले. सा.यु. ३० वर्षाच्या सुरुवातीला नाझरेथ येथील एका सभास्थानात, येशूने यशयाच्या ग्रंथातून एक उतारा वाचला: “दीनांस शुभवृत्त सांगण्यास परमेश्‍वराने मला अभिषेक केला आहे; भग्न हृदयी जनास पट्टी बांधावी” म्हणून मला पाठविले आहे. (यशया ६१:१) येशूने हे शब्द स्वतःला लागू केले. लोकांना एक सांत्वनदायक संदेश देण्याकरता मला मशिहा म्हणून पाठवण्यात आले असल्याचे त्याने म्हटले.—लूक ४:१६-२१.

येशूने त्याच्या सेवेदरम्यान देवाच्या राज्याची चांगली बातमी लोकांना सांगितली. (मत्तय ४:१७) डोंगरावरील प्रवचनात त्याने पीडित लोकांना त्यांची परिस्थिती बदलेल असे वचन देत म्हटले: “जे तुम्ही आता रडता ते तुम्ही धन्य; कारण तुम्ही हसाल.” (लूक ६:२१) देवाचे राज्य येणार आहे हा आशादायक संदेश देऊन येशूने ‘भग्न हृदयी जनांस पट्टी बांधली.’

येशूच्या दिवसांप्रमाणे आपल्या दिवसांतही, ‘राज्याच्या सुवार्तेमुळे’ आपल्याला दिलासा मिळतो. (मत्तय ६:१०; ९:३५) रॉजर आणि लिल्यान यांच्याबाबतीत असेच झाले. जानेवारी १९६१ साली त्यांनी अनंतकाळ जिवंत राहण्याबद्दल देवाने दिलेल्या अभिवचनाविषयी पहिल्यांदा ऐकले तेव्हा, जळजळणाऱ्‍या जखमेवर मलम लावल्यावर जसे थंड वाटते तसे त्यांना वाटले. लिल्यान म्हणते: “मी जे शिकत होते ते मला इतकं आवडलं, की मी स्वयंपाकघरात अक्षरशः आनंदाने उड्या मारल्या.” रॉजर तेव्हा गेल्या दहा वर्षांपासून आजारी होते, त्यांना लकवा मारला होता. ते म्हणतात: “पुनरुत्थानाची आशा आणि सर्व दुःखांचा व आजारांचा अंत होईल ही आशा यांबद्दल ऐकून मला खूप आनंद वाटला व जगण्याचा हुरूप आला.”—प्रकटीकरण २१:४.

सन १९७० मध्ये त्यांच्या ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्यावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. पण ते त्यांच्या दुःखात पार बुडून गेले नाहीत. यहोवा ‘भग्नहृदयी जनांना बरे करतो; तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो’ हे त्यांनी स्वतः अनुभवले. (स्तोत्र १४७:३) त्यांच्या आशेने त्यांना दिलासा दिला. आता जवळजवळ ५० वर्षांपासून, येणाऱ्‍या देवाच्या राज्याच्या चांगल्या बातमीमुळे त्यांना मनःशांती व समाधान लाभले आहे.

भविष्यात पूर्णपणे रोगमुक्‍त

मग आज “गिलादात मलम” आहे का? होय, आज आध्यात्मिक बालसम मलम आहे. देवाच्या राज्याची चांगली बातमी ऐकून मिळणारे सांत्वन व आशा ही भग्न हृदयावर लावलेल्या मलमासारखी आहे. तुम्हाला हा मलम लावून बरे व्हायचे आहे का? मग तुम्हाला फक्‍त खुल्या मनाने देवाच्या वचनातील सांत्वनदायक संदेश स्वीकारून त्यानुसार जीवन व्यतीत करावे लागेल. लाखो लोकांनी असे केव्हाच केले आहे.

हा बालसम मलम, भविष्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्‍या रोगमुक्‍तीची केवळ एक झलक आहे. फार लवकर यहोवा देव ‘राष्ट्रांना असे आरोग्य’ देईल की ते सदा सर्वकाळ ह्‍या पृथ्वीवर जिवंत राहतील. त्यावेळेला, “‘मी रोगी आहे,’ असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” म्हणजे, आजही “गिलादात मलम” आहे!—प्रकटीकरण २२:२; यशया ३३:२४. (w१०-E ०६/०१)

[२७ पानांवरील चित्र]

देवाच्या राज्याची चांगली बातमी ऐकल्यामुळे आज व्याकूळ झालेल्या पुष्कळ लोकांची वेदना शमत आहे