येशूबद्दल लिहिणारे
आपल्या मुलांना शिकवा
येशूबद्दल लिहिणारे
तुम्हाला एकत्र मिळून येशूबद्दल वाचायला आवडते का?— * बायबलमधले एकही पुस्तक येशूने लिहिले नाही, हे ऐकून काही लोकांना खूप आश्चर्य वाटते. पण, बायबलचे आठ लेखक आपल्याला येशूबद्दल खूप काही सांगतात. हे सर्व जण, येशू पृथ्वीवर असताना जिवंत होते आणि ते आपल्याला त्याच्या शिकवणींबद्दल सांगतात. तुम्हाला त्यांची नावे माहीत आहेत का?— चौघांची नावे, मत्तय, मार्क, लूक व योहान ही आहेत. आणि उरलेल्या चौघांची नावे पेत्र, याकोब, यहुदा व पौल अशी आहेत. या लेखकांबद्दल तुम्हाला आणखी माहिती हवी आहे का?—
सर्वात आधी आपण, येशूच्या १२ प्रेषितांपैकी असलेल्या तीन लेखकांबद्दल बोलू या. तुम्हाला त्यांची नावे माहीत आहेत का?— पेत्र, योहान व मत्तय. पेत्राने सहख्रिश्चनांना दोन पत्रे लिहिली. येशूने काय-काय केले व म्हटले त्याविषयी त्याने त्यांना सांगितले. तुम्ही तुमच्या बायबलमधून २ पेत्र १:१६-१८ ही वचने काढा आणि यहोवा देवाने स्वर्गातून येशूविषयी काय म्हटले त्याचे वर्णन पेत्राने कसे केले ते वाचा.—मत्तय १७:५.
प्रेषित योहानाने बायबलमधील पाच पुस्तके लिहिली. येशूने आपल्या शिष्यांबरोबर केलेल्या शेवटल्या भोजनाच्या वेळी तो येशूच्या बाजूला बसला होता. आणि येशू मरण पावला तेव्हाही तो तेथे होता. (योहान १३:२३-२६; १९:२६) येशूच्या जीवनाबद्दल असलेल्या शुभवर्तमान अहवालांपैकीचा एक अहवाल योहानाने लिहिला. तसेच येशूने त्याला दिलेला प्रकटीकरणाचा अहवाल आणि स्वतःच्या नावाची तीन पत्रेसुद्धा लिहिली. (प्रकटीकरण १:१) येशूचा प्रेषित झालेला तिसरा बायबल लेखक होता, मत्तय. शिष्य बनण्याआधी तो जकात गोळा करणारा होता.
बायबलचे आणखी दोन लेखक येशूला आधीपासूनच ओळखायचे. कारण ते त्याचे सावत्र भाऊ होते. ते येशूपेक्षा लहान होते आणि योसेफ व मरीयेची मुले होते. (मत्तय १३:५५) सुरुवातीला ते येशूचे शिष्य नव्हते. येशूला उत्साहाने प्रचार करताना पाहून त्यांना तर वाटायचे, की येशूला वेड लागले आहे. (मार्क ३:२१) त्यांची नावे काय होती माहीत आहे?— एकाचे नाव होते, याकोब. त्याने बायबलमधले याकोब नावाचे पुस्तक लिहिले. आणि दुसऱ्याचे नाव होते, यहुदा. त्याने बायबलमधले यहुदा हे पुस्तक लिहिले.—यहूदा १.
येशूबद्दल लिहिणारे आणखी दोघे जण होते, मार्क आणि लूक. मार्कची आई मरीया हिचे जेरुसलेममध्ये खूप मोठे घर होते. आरंभीचे ख्रिस्ती येथे प्रार्थनेसाठी एकत्र जमायचे. या जमणाऱ्यांपैकी एक प्रेषित पेत्र होता. (प्रेषितांची कृत्ये १२:११, १२) खूप वर्षांपूर्वी येशूने आपल्या प्रेषितांबरोबर वल्हांडणाचे शेवटले भोजन केल्यानंतर तो आणि त्याचे प्रेषित जेव्हा गेथशेमाने बागेत गेले तेव्हा मार्कही कदाचित त्यांच्या मागे गेला असावा. आणि येशूला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा रोमी सैनिकांनी मार्कलाही धरले पण तो त्यांच्या हातून सुटला. तो त्याच्या अंगावरचे कपडे त्यांच्या हातात सोडून उघडाच पळून गेला.—मार्क १४:५१, ५२.
लूक एक शिकलेला डॉक्टर होता. येशूच्या मृत्यूनंतर तो शिष्य बनला असावा. येशूच्या जीवनाचा त्याने कसून अभ्यास केला आणि मग त्याबद्दलचा स्पष्ट, अचूक अहवाल लिहिला. नंतर लूक, प्रेषित पौलाचा सहप्रवासी बनला व बायबलमधील प्रेषितांची कृत्ये नावाचे पुस्तकही लिहिले.—लूक १:१-३; प्रेषितांची कृत्ये १:१.
पौल हा येशूबद्दल लिहिणारा आठवा लेखक होता. प्रसिद्ध वकील गमालिएल याच्याकडून त्याने शिक्षण घेतले होते. परुशी म्हणून लहानाचा मोठा झालेला पौल पूर्वी शौल होता. तो येशूच्या शिष्यांचा द्वेष करायचा आणि त्यांना ठार मारण्यातही त्याने भाग घेतला होता. (प्रेषितांची कृत्ये ७:५८–८:३; २२:१-५; २६:४, ५) हा पौल येशूबद्दलचे सत्य कसे शिकला माहीत आहे?—
पौल एकदा येशूच्या शिष्यांना पकडण्यासाठी दिमिष्कला चालला होता. अचानक स्वर्गातून आलेल्या एका लख्ख प्रकाशामुळे तो आंधळा झाला. आणि त्याने एक आवाजही ऐकला: “शौला, शौला, माझा छळ का करितोस?” येशू त्याच्याशी बोलत होता! त्याने पौलाला दिमिष्कला जायला सांगितले. आणि मग येशूने हनन्या नावाच्या एका शिष्याला पौलाबरोबर जाऊन बोलायला सांगितले आणि यानंतर पौल येशूचा शिष्य बनला. (प्रेषितांची कृत्ये ९:१-१८) पौलाने मग बायबलमधील १४ पुस्तकांचे लिखाण केले; जसे की रोमकरांस पत्र या पुस्तकापासून ते इब्री लोकांस पत्र.
येशूबद्दलची माहिती देणारी बायबलमधील पुस्तके तुम्ही वाचायला सुरु केली आहेत का, किंवा कोणी तुम्हाला वाचून दाखवत आहे का?— तुम्ही तुमच्या जीवनात एक सर्वात उत्तम काम करू शकता. ते म्हणजे, तुम्ही आतापासूनच म्हणजे लहानपणापासूनच बायबल येशूबद्दल जे सांगते ते शिकू शकता. (w१०-E ०६/०१)
[तळटीप]
^ परि. 3 तुम्ही हा लेख आपल्या मुलाला वाचून दाखवत असाल तर, लेखात काही वाक्यांच्या पुढे जेव्हा एक छोटीशी रेघ तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्ही तेथे थांबून तुमच्या मुलाला काय वाटते ते विचारायचे आहे.
प्रश्न:
▪ येशूचे कोणते प्रेषित बायबल लेखक बनले?
▪ बायबलचे कोणते दोन लेखक येशूचे सावत्र भाऊ होते?
▪ मार्क येशूला का ओळखत असावा पण, लूक येशूला का ओळखत नसावा?
▪ पौल येशूचा शिष्य कसा बनला?
[२९ पानांवरील चित्रे]
यहुदा
मार्क
पेत्र
मत्तय
पौल
याकोब
लूक
योहान