का करतात लोक वाईट कामे?
का करतात लोक वाईट कामे?
एका गोष्टीवर फार कमी लोकांचे दुमत होते; ती ही, की आपण सर्वच अपरिपूर्ण आहोत आणि त्यामुळे चुका करतो व अशा काही गोष्टी करतो ज्यांचा नंतर आपल्याला पस्तावा होतो. हे खरे असले तरीपण, आज जवळजवळ दररोजच आपण प्रत्यक्ष किंवा प्रसारमाध्यमाद्वारे ऐकत असलेल्या किंवा पाहत असलेल्या लहान-मोठ्या वाईट गोष्टी, वर दिलेल्या कारणामुळेच घडत आहेत का?
अपरिपूर्ण असल्यामुळे लोकांच्या हातून चुका होत असल्या तरी, अशा काही नैतिक मर्यादा आहेत ज्या आपण कधीच ओलांडू नयेत व वाईट गोष्टींपासून आपण दूर राहिले पाहिजे. तसेच, पुष्कळ लोक मान्य करतील, की खऱ्या नसलेल्या एखाद्या गोष्टीविषयी अजाणतेत बोलून जाण्यात व मुद्दामहून खोटे बोलण्यात तसेच अपघाताने एखाद्याला इजा करण्यात व कट रचून हत्या करण्यात खूप फरक आहे. तरीपण, साधे-सुधे दिसणारे लोकच मानवजातीला काळीमा फासणारी कृत्ये करतात. का करतात लोक वाईट कामे?
बायबल याचे कारण सांगते. अमुक गोष्टी वाईट असल्याचे माहीत असूनही लोक त्या का आचरतात त्याची मुख्य कारणे बायबलमध्ये दिली आहेत. चला आपण त्यांचे परीक्षण करून पाहू या.
▪ “जुलूम केल्याने शहाणा वेडा बनतो.”—उपदेशक ७:७.
बायबल हे कबूल करते, की कधीकधी लोक, परिस्थितीमुळे अशी कामे करून बसतात जी कदाचित त्यांनी एरवी केली नसती. काही जण तर, त्यांच्यावर आलेल्या संकटावर किंवा झालेल्या अन्यायावर उपाय म्हणून गुन्हे करतात. “बहुतेकदा असे होते की एक व्यक्ती, बदलता न येणाऱ्या राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीला कंटाळून दहशतवादी बनते,” असे ग्रामीण दहशतवाद (इंग्रजी) नावाच्या एका पुस्तकात म्हटले आहे.
▪ “द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे.”—१ तीमथ्य ६:१०.
प्रत्येक माणसाची एक किंमत असते, अशी एक म्हण आहे. म्हणजे, पैसे पाहिले की भल्या-भल्यांचे डोळे फिरतात. पैशाची गोष्ट येते तेव्हा सहसा मैत्रिपूर्ण व दयाळू वाटणारे लोक निवडुंगासारखे काटेरी व निर्दयी बनतात. धमकी देऊन पैसे लुटणे, फसवणूक, अपहरण, हत्या यासारखी काळी कृत्ये पैशाच्या हव्यासापायीच तर होतात, नाही का?
▪ “दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही म्हणून मानवपुत्राचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत होते.”—उपदेशक ८:११.
या वचनातून आपल्याला मानवाची प्रवृत्ती दिसून येते. आपल्याकडे कोणीही पाहत नाहीए, तेव्हा आपण काहीही करू शकतो, ही मानवाची प्रवृत्ती आहे. रस्त्यावर बेभान होऊन गाड्या पळवणे, परीक्षांच्या वेळी कॉपी करणे, सार्वजनिक निधीतून पैसे चोरणे आणि याहूनही घृणास्पद कामे लोक करतात. जेव्हा कायदा ढीला असतो किंवा पकडले जाण्याची भीती नसते तेव्हा, सहसा नियमांचे पालन करणाऱ्या लोकांनासुद्धा, त्यांनी कधी केली नसती अशी कामे करण्याचे धैर्य मिळते. “गुन्हेगार किती सहीसलामत सुटतात हे पाहून सर्वसाधारण नागरिक, अघोर गुन्हे करायला धजतात,” असे वाद आणि वस्तुस्थिती (इंग्रजी) नावाच्या एका मासिकात म्हटले आहे.
▪ “प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते.” —याकोब १:१४, १५.
सर्व मानवांच्या मनात वाईट विचार येऊ शकतात. वाईट गोष्टी करण्याच्या असंख्य सूचना आपल्याला मिळत असतात किंवा असंख्य दबाव आपल्यावर दररोज येत असतात. बायबल लिहिले त्या काळांत ख्रिश्चनांना असे सांगण्यात आले होते: “मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही.” (१ करिंथकर १०:१३) असे असले तरीसुद्धा, आपण जी निवड करू अर्थात, मनात आलेला वाईट विचार लगेच झटकून टाकायचा की तो मनात घोळत ठेवून वाढू द्यायचा, यावरच आपल्या निवडींचा परिणाम निर्भर आहे. देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेल्या याकोबाच्या पत्रातील हे वचन अशी ताकीद देते, की मनात आलेला वाईट विचार अर्थात वासना आपण वाढू दिली तर ती आपल्याला पाप करायला नक्कीच प्रवृत्त करते.
▪ “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.”—नीतिसूत्रे १३:२०.
आपल्या सोबत्यांचा आपल्यावर—चांगला अथवा वाईट—प्रभाव पडतो, या गोष्टीला आपण क्षुल्लक लेखता कामा नये. म्हणूनच लोक, अशा गोष्टी करून बसतात ज्या करायची त्यांची मुळीच इच्छा नव्हती. साथीदारांच्या दबावामुळे किंवा बहुतेक लोक म्हणतात त्याप्रमाणे, ते वाईट लोकांच्या संगतीत पडले आणि नको त्या गोष्टी करून बसले. बायबलमध्ये, ‘मूर्ख’ असे जे म्हटले आहे ते, बुद्धीची कमी असलेल्यांबद्दल नव्हे तर देवाच्या वचनातील सुज्ञ सल्ल्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना उद्देशून म्हटले आहे. आपण तरुण असो वा वृद्ध, जर बायबलमधील स्तरांनुसार वागणारे मित्र आपण निवडले नाही तर आपल्याला “कष्ट” सोसावे लागतील.
बायबलमधील ही आणि इतर वचने अगदी मोजक्याच शब्दांत, साधेसुधे दिसणारे लोक वाईट नव्हे धक्कादायक कामे का करतात त्याचे कारण सांगतात. लोकांना घृणास्पद कामे करण्यास प्रवृत्त करणारी कारणे समजून घेतल्याने आपल्याला फायदा होतो खरा पण मग परिस्थितीत काही बदल होण्याची आशा आहे का? होय आहे. लोक वाईट कृत्ये का करतात याची बायबलमध्ये फक्त कारणेच दिली नाहीत तर अशी कृत्ये पुन्हा कधीच आचरली जाणार नाहीत अशी वचनेही ते देते. कोणती अभिवचने आहेत ती? जगात होणारी सर्व वाईट कृत्ये खरोखरच थांबतील का? पुढील लेखात या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. (w१०-E ०९/०१)