व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाला त्याच्या नावाने ओळखणे कठीण का आहे?

देवाला त्याच्या नावाने ओळखणे कठीण का आहे?

देवाला त्याच्या नावाने ओळखणे कठीण का आहे?

यहोवाला तुम्ही त्याच्या नावाने ओळखू नये व त्याच्याशी जवळीक साधून त्याचा मित्र बनू नये म्हणून कोणाचा तरी खूप आटापिटा चालला आहे. कोण आहे हा दुष्ट शत्रू? बायबल त्याच्याविषयी असे सांगते: “विश्‍वास न ठेवणाऱ्‍या लोकांची मने ह्‍या युगाच्या दैवताने अंधळी केली आहेत.” आजच्या या अभक्‍त जगाचे दैवत आहे सैतान. “देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश” तुमच्या अंतःकरणावर पडू नये म्हणून तो तुम्हाला अंधारात ठेवू पाहतोय. तुम्ही यहोवाला त्याच्या नावाने ओळखू नये अशी सैतानाची इच्छा आहे. तो लोकांची मने अंधळी कशी करत आहे?—२ करिंथकर ४:४-६.

लोकांनी यहोवाला त्याच्या नावाने ओळखू नये म्हणून सैतान खोट्या धर्माचा उपयोग करतो. जसे की, प्राचीन काळच्या काही यहुद्यांनी देवाने त्याच्या आत्म्याच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेल्या वचनाकडे मुद्दामहून दुर्लक्ष केले आणि त्याऐवजी अशी प्रथा आचरण्यास सुरुवात केली ज्यात, देवाच्या नावाचा वापर करण्याचे टाळले जाऊ लागले. आपल्या सामान्य युगाच्या पहिल्या काही शतकांपर्यंत, सभास्थानांमध्ये पवित्र शास्त्रवचनांचे वाचन करणाऱ्‍या यहुद्यांना अशी सूचना देण्यात आली होती, की पवित्र शास्त्रवचनाचे वाचन करत असताना जर देवाचे नाव आले तर त्यांनी ते नाव उच्चारू नये, त्याऐवजी अधोनाय अर्थात “प्रभू” असे घालून वाचावे. साहजिकच या प्रथेमुळे लोकांना देवाची ओळख घडली नाही व ते त्याच्याबरोबर जवळीक साधू शकले नाहीत. देवाबरोबर निकटचा संबंध जोडल्याने जे फायदे मिळतात ते त्यांना मिळाले नाहीत. पण मग येशूने काय केले? यहोवाला त्याच्या नावाने ओळखण्याविषयी त्याचा दृष्टिकोन काय होता?

येशू व त्याच्या अनुयायांनी देवाचे नाव लोकांना सांगितले

येशूने आपल्या पित्याला प्रार्थना करताना असे म्हटले: “मी तुझे नाव त्यांस कळविले आहे आणि कळवीन.” (योहान १७:२६) येशूने इब्री शास्त्रवचनांचे अनेकदा वाचन केले, त्यांचा उल्लेख केला किंवा त्यातला काही भाग समजावून सांगितला. आणि जेव्हा जेव्हा हे महत्त्वपूर्ण नाव वाचण्यात आले असेल तेव्हा तेव्हा त्याने ते उच्चारले असावे यात तीळमात्रही शंका नाही. प्राचीन काळातील सर्व संदेष्ट्यांप्रमाणे येशूनेही देवाच्या नावाचा अगदी मुक्‍तपणे उपयोग केला असावा. येशूच्या सेवेदरम्यान जर कोणा यहुद्याने देवाच्या नावाचा उच्चार करण्याचे टाळले असेल तर येशूने त्या काळातील प्रथा पाळली नसावी. “तुम्ही आपल्या संप्रदायेकरून देवाचे वचन रद्द केले आहे,” असे बोलून येशूने त्याच्या काळातल्या धार्मिक नेत्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.—मत्तय १५:६.

येशूचा मृत्यू होऊन त्याला पुन्हा जिवंत केल्यानंतर, त्याचे विश्‍वासू अनुयायी देवाचे नाव लोकांना सांगत राहिले. (“पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी देवाच्या नावाचा वापर केला का?” हा चौकोन पाहा.) ज्या दिवशी ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाली अगदी त्या दिवशी म्हणजे, सा.यु. ३३ च्या पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रेषित पेत्राने योएलच्या भविष्यवाणीचा उल्लेख करत यहुदी व यहुदी मतानुसारी यांना असे म्हटले: “जो कोणी प्रभूचे [समासात, “यहोवाचे”] नाव घेऊन त्याला हाक मारील तो तारला जाईल.” (प्रेषितांची कृत्ये २:२१, पं.र.भा.; योएल २:३२) आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी अनेक राष्ट्रांतील लोकांना, यहोवाला त्याच्या नावाने ओळखण्यास मदत केली. त्यामुळे, जेरुसलेममध्ये भरलेल्या प्रेषितांच्या व वडिलांच्या एका सभेत शिष्य याकोबाने असे म्हटले: “परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट . . . घेतली.”—प्रेषितांची कृत्ये १५:१४.

तरीसुद्धा देवाच्या नावाचा विरोध करणाऱ्‍या शत्रूने हार मानली नाही. प्रेषितांच्या मृत्यूनंतर लगेच सैतान आपल्या कामाला लागला. त्याने धर्मत्यागाचे निदण पेरायला सुरुवात केली. (मत्तय १३:३८, ३९; २ पेत्र २:१) जसे की, तथाकथित ख्रिस्ती लेखक जस्टीन मार्टरचा जन्म, प्रेषितांपैकी ज्याचा मृत्यू सर्वात शेवटी झाला त्या प्रेषित योहानाच्या काळादरम्यान झाला होता. तरीपण, जस्टीनने आपल्या लिखाणांमध्ये वारंवार असा उल्लेख केला, की सर्व गोष्टी पुरवणाऱ्‍या देवाला, ‘विशेष नाम नाही.’

धर्मत्यागी ख्रिश्‍चनांनी जेव्हा ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या नकला तयार केल्या तेव्हा त्यांनी वचनांतून यहोवाचे नाव गाळून टाकले व त्याऐवजी कायरिओस हा ग्रीक शब्द त्या जागी घातला ज्याचा अर्थ “प्रभू” असा होतो. इब्री शास्त्रवचनांच्या बाबतीतही काही वेगळे झाले नाही. देवाचे नाव मोठ्याने वाचावे लागत नसल्यामुळे, धर्मत्यागी यहुदी शास्त्र्यांनी आपल्या शास्त्रवचनांमध्ये १३० पेक्षा अधिक वेळा देवाच्या नावाऐवजी अधोनाय हा शब्द टाकला. सा.यु. ४०५ मध्ये, जेरोमने लॅटिन भाषेत बायबलचे प्रभावकारी भाषांतर पूर्ण केले. त्याच भाषांतराला पुढे वल्गेट भाषांतर म्हणून संबोधले जाऊ लागले ज्यातूनही देवाचे वैयक्‍तिक नाव वगळण्यात आले.

देवाचे नाव काढून टाकण्याचा आधुनिक दिवसांत प्रयत्न

आज बायबल विद्वानांना याची जाणीव आहे, की मूळ भाषेच्या बायबलमध्ये यहोवाचे वैयक्‍तिक नाव सुमारे ७,००० वेळा आले आहे. त्यामुळे, कॅथलिक जेरुसलेम बायबल, कॅथलिक लोकांचे स्पॅनिश भाषेतील ला बिब्लिया लॅटिनोअमेरिका आणि स्पॅनिश भाषेतील रेना व्हॅलेरा यांसारख्या प्रसिद्ध भाषांतरांमध्ये देवाचे वैयक्‍तिक नाव मुक्‍तपणे वापरले आहे. काही भाषांतरांमध्ये देवाचे नाव “याव्हे” या रूपात आहे.

पण दुःखाची गोष्ट अशी आहे, की बायबलचे भाषांतर करण्यासाठी भांडवल पुरवणारे अनेक चर्चेस, भाषांतरांमधून देवाचे नाव वगळण्याचा दबाव विद्वानांवर आणतात. जसे की, व्हॅटिकनने कॅथलिक बिशपांच्या परिषदांच्या अध्यक्षांना जून २९, २००८ तारखेच्या पाठवलेल्या पत्रात असे म्हटले होते: “अलिकडच्या वर्षांत, इस्राएलच्या देवाचे विशेष नाम वापरण्याची पद्धत हळूहळू रुढ होऊ लागली आहे.” त्या पत्रात अशी स्पष्ट सूचना देण्यात आली की: “देवाच्या नावाचा . . . वापर किंवा उच्चारही करण्यात येऊ नये.” शिवाय, त्यात असेही म्हटले होते, की “बायबल वचनांचा आधुनिक भाषांत अनुवाद करतेवेळी, . . . देवाच्या नावाऐवजी अधोनाय/कायरियोस यांचा समान अर्थ देणारा ‘प्रभू’ हा शब्द वापरावा.” व्हॅटिकनकडून मिळालेल्या या सूचनेवरून स्पष्ट होते, की देवाचे नाव काढून टाकण्याचा व्हॅटिकनचा प्रयत्न चालला आहे.

प्रोटेस्टंट लोकांनीही यहोवाच्या नावाचा काही कमी निरादर केलेला नाही. सन १९७८ मध्ये प्रोटेस्टंटांचे न्यू इंटरनॅशनल व्हर्शन इंग्रजीत प्रकाशित झाले. त्यांच्या एका प्रवक्त्याने असे लिहिले: “यहोवा हे देवाचे अतुलनीय नाव आहे आणि आपण ते वापरायला हवे होते. पण, या भाषांतराकरता आम्ही १० कोटी ४८ लाख ५० हजार रूपये ओतले आहेत; त्यामुळे आम्ही जर, उदाहरणार्थ, स्तोत्र २३ चे भाषांतर ‘याव्हे आमचा मेंढपाळ आहे’ असे केले तर आमचे सर्व पैसे पाण्यात जातील.”

यासोबतच, चर्चेसने लॅटिन अमेरिकन लोकांना देवाचे नाव जाणून घेण्यापासून वंचित ठेवले आहे. युनायटेड बायबल सोसायटीजचे (युबीएस) भाषांतर सल्लागार स्टीवन वोट असे लिहितात: “लॅटिन अमेरिकन प्रोटेस्टंट लोकांमध्ये चाललेल्या वादाच्या विषयांपैकी एक विषय म्हणजे जेहोवा या नावाचा वापर करायचा की नाही, हा आहे. . . . आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, आजकाल वाढत चाललेले नव-पेंटेकॉस्टल चर्च म्हणते, . . . की त्यांना १९६० ची रेना व्हॅलेरा आवृत्ती हवी आहे, पण त्यात जेहोवाचे नाव नकोय. जेहोवाऐवजी सेनोर [प्रभू] वापरलेले बायबल त्यांना हवे आहे.” वोट म्हणाले, की सुरुवातीला युबीएसने त्यांची ही मागणी फेटाळली पण नंतर, “जेहोवा हा शब्द काढून” रेना व्हॅलेराची आवृत्ती प्रकाशित केली.

देवाच्या लिखित वचनातून त्याचे नाव काढून त्याऐवजी “प्रभू” घातल्याने वाचकांना खऱ्‍या देवाची ओळख होत नाही. शिवाय यामुळे वाचक गोंधळूनही जातात. जसे की, वाचकांना समजत नाही, की “प्रभू” हा शब्द यहोवाला लागू होतो की त्याचा पुत्र येशूला. त्यामुळे, प्रेषित पेत्राने, “परमेश्‍वराने माझ्या प्रभूला [मृतांतून पुन्हा उठवण्यात आलेल्या येशूला] सांगितले की, . . . ‘तू माझ्या उजवीकडे बसून राहा’” या दाविदाच्या उद्‌गारांचा उल्लेख ज्या वचनात केला त्या वचनाचे भाषांतर काही भाषांमध्ये जसे की मराठीत पंडिता रमाबाई भाषांतरामध्ये: “प्रभूने माझ्या प्रभूला म्हटले,” असे केले आहे. (प्रेषितांची कृत्ये २:३४) तसेच, “याव्हे आणि ख्रिस्ती धर्मसिद्धांताचा देव” (इंग्रजी) असे शीर्षक असलेल्या निबंधात डेव्हीड क्लाईन्स म्हणतात: “ख्रिस्ती लोकांना याव्हेचा विसर पडल्यामुळे, ख्रिस्तावरच लक्ष केंद्रित करण्याकडे त्यांचा कल गेला.” याच कारणास्तव, चर्चला जाणाऱ्‍या बहुतेकांना माहीत नाही की येशूने पृथ्वीवर असताना ज्या देवाला प्रार्थना केली होती त्याचे नाव यहोवा असे आहे.

खऱ्‍या देवाविषयी लोकांना अंधारात ठेवण्याकरता सैतानाने बरेच प्रयत्न केले आहेत. असे असले तरीही तुम्ही यहोवाशी जवळीक साधू शकता.

यहोवाला तुम्ही नावाने ओळखू शकता

सैतानाने देवाच्या नावावर खूप हल्ले केले आहेत आणि यासाठी तो खोट्या धर्माचा अगदी चतुराईने उपयोग करून घेत आहे. पण, जे लोक सार्वभौम प्रभू यहोवा याच्याबद्दलचे व विश्‍वासू मानवांकरता असलेल्या त्याच्या अद्‌भुत उद्देशांबद्दलचे सत्य जाणून घेऊ इच्छितात त्यांना ती माहिती देण्यापासून स्वर्गातील अथवा पृथ्वीवरील कोणतीही शक्‍ती त्याला आडकाठी करू शकत नाही.

बायबलच्या अभ्यासाद्वारे तुम्ही यहोवा देवाशी जवळीक कशी साधू शकता हे तुम्हाला शिकवायला यहोवाच्या साक्षीदारांना आनंद वाटेल. येशूने देवाबद्दल असे म्हटले होते: “मी तुझे नाव त्यांस कळविले आहे.” (योहान १७:२६) यहोवाचे साक्षीदार याबाबतीत येशूचे अनुकरण करतात. मानवजातीवर आशीर्वादांचा वर्षाव करण्याकरता यहोवाने निभावलेल्या विविध भूमिकांविषयीची माहिती देणाऱ्‍या बायबलमधील वचनांवर तुम्ही मनन कराल तेव्हा तुम्हाला त्याच्या उदात्त व्यक्‍तिमत्त्वाचे सुंदर पैलू समजतील.

विश्‍वासू कुलपिता ईयोब ‘देवाबरोबर मैत्री’ करू शकला; तुम्हीही तसेच करू शकता. (ईयोब २९:४, पं.र.भा.) बायबलचे ज्ञान घेण्याद्वारे तुम्ही यहोवाला त्याच्या नावाने ओळखू शकता. हे ज्ञान घेतल्यावर तुमची ही खात्री पटेल, की यहोवा, “मी जे होईन ते मी होईन” या त्याच्या नावाच्या अर्थानुरूप निश्‍चित कार्य करेल. (निर्गम ३:१४, NW) होय, मानवजातीला त्याने दिलेली सर्व अभिवचने तो जरूर पूर्ण करेल! (w१०-E ०७/०१)

[१८ पानांवरील चौकट/चित्रे]

पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी देवाच्या नावाचा वापर केला का?

सा.यु. च्या पहिल्या शतकात येशूच्या प्रेषितांच्या काळादरम्यान अनेक देशांत ख्रिस्ती मंडळ्या स्थापन झाल्या. या मडंळ्यांचे सदस्य शास्त्रवचनांचा अभ्यास करण्यासाठी नियमितरीत्या एकत्र जमत असत. या आरंभीच्या ख्रिश्‍चनांना, शास्त्रवचनांच्या प्रतींमध्ये यहोवाचे नाव आढळले का?

ग्रीक भाषा तेव्हा आंतरराष्ट्रीय भाषा बनल्यामुळे अनेक मंडळ्या ग्रीक सेप्टुआजिंटचा उपयोग करत असत. ग्रीक सेप्टुआजिंट हे इब्री शास्त्रवचनांचे भाषांतर असून ते सा.यु.पू. दुसऱ्‍या शतकात पूर्ण झाले होते. काही विद्वानांचा असा दावा आहे, की सेप्टुआजिंटचे पहिल्यांदा भाषांतर झाले तेव्हापासूनच त्यातून देवाचे नाव वगळून त्याऐवजी “प्रभू” या शब्दासाठी असलेला ग्रीक शब्द कायरियोस घालण्यात आला होता. पण हे बरोबर नाही, हे वस्तुस्थितीवरून कळते.

येथे दाखवण्यात आलेल्या गुंडाळ्यांचे तुकडे सा.यु.पू. पहिल्या शतकातील ग्रीक सेप्टुआजिंटमधील भागांचे आहेत. त्यात स्पष्टपणे चार इब्री अक्षरांतील יהוה (YHWH) हे नाव किंवा यहोवाच्या नावाचे संक्षिप्त रूप ग्रीक भाषेत लिहिल्याचे दिसते. प्राध्यापक जॉर्ज हॉवर्ड यांनी असे लिहिले: “आमच्याकडे ख्रिस्तापूर्वीच्या ग्रीक सेप्टुआजिंट बायबलच्या तीन वेगवेगळ्या प्रती आहेत व त्यातल्या एकाही प्रतीत, यहोवाच्या नावाच्या संक्षिप्त रुपाचे भाषांतर कायरियोस असे करण्यात आलेले नाही तर, इब्री भाषेत जसे आहे तसेच ते नाव टाकण्यात आले आहे. त्यामुळे आपण हे अगदी खात्रीने म्हणू शकतो, की नवीन करारात वर्णन केलेल्या काळाच्या आधी, दरम्यान व नंतर, शास्त्रवचनांच्या ग्रीक वचनांमध्ये . . . देवाचे नाव लिहिण्याची यहुद्यांची प्रथा होती.”—बिब्लिकल आर्कियोलॉजी रिव्ह्यू.

येशूच्या प्रेषितांनी व शिष्यांनी, देवाच्या प्रेरणेने त्यांनी लिहिलेल्या लिखाणांमध्ये देवाच्या नावाचा वापर केला का? प्राध्यापक हॉवर्ड याबाबत असे म्हणतात: “नवीन करारात वर्णन केलेल्या मंडळीने जर देवाच्या नावाचे इब्री रूप असलेल्या सेप्टुआजिंटचा वापर केला, तर नवीन कराराचे लिखाण केलेल्या लेखकांनी निश्‍चित्तच देवाच्या नावाच्या संक्षिप्त रुपाचा आपल्या लिखाणांमध्ये समावेश केला असावा.”

त्यामुळे आपण निर्विवादपणे असा निष्कर्ष काढू शकतो की पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना इब्री शास्त्रवचनांच्या भाषांतरांमध्ये व ग्रीक शास्त्रवचनांच्या त्यांच्या प्रतींमध्ये देवाचे नाव वाचायला मिळाले.

[चित्राचे श्रेय]

सर्व छायाचित्रे: Société Royale de Papyrologie du Caire

[१७, १८ पानांवरील चित्र]

मृत समुद्राच्या परिसरात सापडलेल्या यशयाच्या ग्रंथाच्या गुंडाळीत आढळलेले यहोवाचे नाव

[चित्राचे श्रेय]

Shrine of the Book, Photo © The Israel Museum, Jerusalem

[१९ पानांवरील चित्र]

चर्चेसने यहुदी परंपरेमुळे किंवा आपल्या लाभाकरता बायबलमधून देवाचे नाव काढून टाकले

[२० पानांवरील चित्र]

येशूने देवाचे नाव लोकांना जाहीर करण्यात उदाहरण मांडले