तुमची आध्यात्मिक गरज भागवा
रहस्य ५
तुमची आध्यात्मिक गरज भागवा
बायबल काय शिकवते? “जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात तेच धन्य.”—लूक ११:२८.
समस्या? जगात हजारो धर्म आहेत. यांपैकी बहुतेक, आध्यात्मिक गरजा भागवण्याचे परस्परविरोधी मार्ग सुचवतात. कोणता धर्म सत्याची शिकवण देतो व देवाला संतुष्ट करणारा आहे हे तुम्ही कसे शोधून काढू शकता? जगातील काही नामवंत लेखक असे म्हणतात, की देवावर विश्वास ठेवणे, त्याची भक्ती करणे हे सगळे तर्काला न पटणारे आहे; एवढेच नव्हे तर हानीकारक आहे. अशाच एका नामवंत नास्तिकाच्या विचारांचा सारांश, मॅक्लिनच्या मासिकात छापून आला होता. त्यात म्हटले होते, की ‘आपण जे काही पाहू शकतो, ऐकू शकतो, आपल्याला ज्याची जाणीव होते व विज्ञानाद्वारे सिद्ध करता येते त्याच्या पलिकडेही जीवनात आणखी बरेच काही आहे, अशी जी शिकवण ख्रिस्ती धर्मात आहे त्या शिकवणीमुळे माणसाला समाधान मिळत नाही; उलट अशा शिकवणींमुळेच तर माणूस हिंसक कृत्ये करण्यास प्रवृत्त होतो.’
तुम्ही काय करू शकता? देव अस्तित्वात आहे या पुराव्याचे परीक्षण करून बघा. (रोमकर १:२०; इब्री लोकांस ३:४) आपण येथे का आहोत?, मृत्यूनंतरही माणूस जिवंत राहतो का?, आज जगात इतके दुःख का आहे?, देव माझ्याकडून काय अपेक्षा करतो? यांसारख्या जीवनातल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यापासून तुम्हाला कोणी परावृत्त करत असेल तर हार मानू नका. कारण या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावरच तुम्ही जीवनात कायमचे संतुष्ट होऊ शकाल.
पण, इतरजण सांगत असलेल्या गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमच्या तर्कशक्तीचा उपयोग करून देवाला जे स्वीकारयोग्य आहे ते “समजून घ्यावे” असे उत्तेजन बायबलमध्ये दिले आहे. (रोमकर १२:१, २) आणि तुमचे हे प्रयत्न वाया जाणार नाहीत. तुम्ही जर बायबलचा अभ्यास करण्यासाठी वेळ काढलात, त्यातील व्यावहारिक सल्ल्याचे पालन केले तर तुम्ही जीवनात येणाऱ्या समस्या टाळू शकाल, चिंता कमी करू शकाल व जीवनातला आनंद वाढवू शकाल. ही भूलथाप नाही. सर्व संस्कृतीच्या व समाजाच्या लाखो लोकांना, देव आणि त्याचे उद्देश यांबद्दलचे सत्य शिकून घेतल्यामुळे फायदा झाला आहे.
बायबलमधील सुज्ञ सल्ल्याचे जसजसे तुम्ही पालन करीत राहाल तसतसे देवाबद्दलची तुमची श्रद्धा आणखी गहिरी होईल. तेव्हा, यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करण्याचे आमंत्रण स्वीकारा. असे केल्यास तुम्हालाही प्रेषित पौलाने जे म्हटले ते पटेल. त्याने असे लिहिले: “चित्तसमाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे.”—१ तीमथ्य ६:६. (w१०-E ११/०१)
[८ पानांवरील चित्र]
देवाला जे स्वीकारयोग्य आहे ते समजून घ्या