तो “परमेश्वरासमोर वाढत गेला”
त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा
तो “परमेश्वरासमोर वाढत गेला”
आधुनिक कॅलेंडरप्रमाणे तो, मे किंवा जूनचा महिना होता. सगळीकडे कोरड पडली होती. शेतांतील गव्हाची कणसे सोनेरी झाल्यामुळे कापणीस तयार होती. अनेक दशकांपासून यहोवाचा संदेष्टा व शास्ता म्हणून विश्वासूपणे सेवा करणाऱ्या शमुवेलाच्या सांगण्यावरून संपूर्ण राष्ट्र, गिलगाल येथे जमले होते. शमुवेल त्यांचे चेहरे न्याहाळत होता. लोकांमध्ये शांतता पसरली होती. शमुवेल जे काही बोलणार होता ते त्यांच्या हृदयाला भिडणे आवश्यक होते. तो तसे बोलू शकला का?
आपण किती बिकट परिस्थितीत आहोत हे लोकांना कळत नव्हते. त्यांच्यावर राज्य करण्याकरता त्यांना एक मानवी राजा हवा आहे म्हणून ते हट्ट करत होते. ही मागणी करण्याद्वारे ते, त्यांचा देव यहोवा आणि त्याचा संदेष्टा यांचा घोर अपमान करत होते, हे त्यांना कळत नव्हते. असा हट्ट करून वास्तविकतेत ते त्यांचा राजा असलेल्या यहोवाला नाकारत होते! त्यांना पश्चात्ताप करण्यास प्रवृत्त करण्याची शमुवेलाची जबाबदारी होती. हे तो कसे करणार होता?
शमुवेलाने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला: “मी तर वृद्ध झालो असून माझे केस पिकले आहेत.” शमुवेल खरोखरच म्हातारा असल्यामुळे लोक त्याचे बोलणे ऐकण्याची शक्यता होती. तो पुढे म्हणाला: “मी बाळपणापासून आजवर तुम्हासमोर वागलो वर्तलो आहे.” (१ शमुवेल ११:१४, १५; १२:२) शमुवेल म्हातारा झाला असला तरी, तो त्याचे बालपण विसरला नव्हता. बालपणाच्या आठवणी त्याच्या मनात अजूनही ताज्या होत्या. लहानपणी त्याने घेतलेल्या निर्णयांमुळे तो इतकी वर्षे विश्वासू राहून यहोवाची सेवा करू शकला होता.
शमुवेल ज्या वातावरणात लहानाचा मोठा झाला होता ते वातावरण पोषक नव्हते. त्याच्या आजूबाजूला असे लोक होते ज्यांनी यहोवाला सोडले होते, ते बेईमान झाले होते. त्यामुळे शमुवेलाला वारंवार त्याचा विश्वास मजबूत करावा लागला होता. आज आपणही अशाच एका अविश्वासू व भ्रष्ट जगात राहत आहोत. त्यामुळे आपल्यालाही आपला विश्वास मजबूत करणे कधीकधी जड जाते. पण शमुवेलाने त्याच्या अगदी बालपणापासूनच आपल्यासमोर एक उत्तम उदाहरण मांडले ज्याचे आपण अनुकरण करू शकतो.
‘बाळपणापासूनच तो परमेश्वराची सेवा करू लागला’
शमुवेलाचे बालपण इतरांसारखे नव्हते. त्याचे दूध सुटल्यावर लगेचच, म्हणजे कदाचित तो चार वर्षांचा होता तेव्हापासून, रामा येथील त्याच्या घरापासून ३० किलोमीटर दूर असलेल्या शिलो मधील यहोवाच्या पवित्र निवासमंडपात त्याची सेवा सुरू झाली. एलकाना व हन्ना या त्याच्या आईवडिलांनी त्यांच्या या मुलाला एका खास सेवेसाठी यहोवाला समर्पित करून त्याला आमरण नाजीर बनवले. * एलकाना व हन्ना यांना शमुवेल नको होता म्हणून त्यांनी त्याला इतक्या कोवळ्या वयातच त्यांच्यापासून दूर केले होते का?
बिलकुल नाही. शिलो येथे आपल्या मुलाची देखभाल केली जाईल हे त्यांना माहीत होते. शिलो येथील निवासमंडपातील कारभार महायाजक एली पाहायचा व शमुवेल त्याच्याबरोबरच सेवा करणार होता. निवासमंडपात अनेक स्त्रियाही होत्या ज्या अगदी शिस्तबद्धपणे सेवा करत होत्या.—निर्गम ३८:८.
आणि शमुवेलला शिलोला पाठवल्यानंतर, हन्ना व एलकाना त्याला पूर्णपणे विसरून गेले होते, असे नाही. कसे विसरतील ते त्यांच्या या ज्येष्ठ पुत्राला? तो तर त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर होता! हन्नाने देवाला अशी प्रार्थना केली होती, की जर देवाने तिला एक पुत्र दिला तर ती त्याला त्याच्या सेवेसाठी वाहून देईल. दरवर्षी जेव्हा हन्ना शमुवेलाला भेटायला यायची तेव्हा ती त्याच्यासाठी बिनबाह्याचा नवीन अंगरखा आणायची; निवासमंडपात सेवा
करत असताना त्याला हा अंगरखा घालावा लागत असे. दर वर्षी आपल्या आईवडिलांना पाहून शमुवेलाला देखील आनंद होत असावा. या अनोख्या ठिकाणी राहून यहोवाची सेवा करणे हा एक बहुमान आहे, असे त्याचे आईवडील त्याला शिकवत असावेत. त्यांच्या या प्रेमळ उत्तेजनामुळे व मार्गदर्शनामुळेच तर तो या सेवेत टिकून राहिला.एलकाना व हन्नाकडून आजचे पालक बरेच काही शिकू शकतात. आज बहुतेक पालक, आध्यात्मिक गरजांकडे दुर्लक्ष करून भौतिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात व त्यानुसार आपल्या मुलांचे संगोपन करतात. पण शमुवेलाच्या आईवडिलांनी आध्यात्मिक गोष्टींना प्रथम स्थान दिले. त्यामुळेच तर त्यांचा मुलगा, यहोवाची कड घेणारा मनुष्य बनला होता.—नीतिसूत्रे २२:६.
कल्पना करा: शिलोला चहुबाजूंनी घेरणाऱ्या डोंगरदऱ्यांत खेळत-बागडत शमुवेल लहानाचा मोठा झाला असावा. डोंगरकड्यावरून तो जेव्हा खाली गावाकडे व दरीकडे पाहत असावा तेव्हा यहोवाचे निवासमंडप पाहून त्याचे ऊर आनंदाने व गर्वाने फुगत असावे. यहोवाचे हे निवासमंडप एक पवित्र ठिकाण होते. * मोशेच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ ४०० वर्षांपूर्वीचे हे निवासमंडप, संपूर्ण जगाकरता यहोवाच्या शुद्ध उपासनेचे एकमेव केंद्र होते.
शमुवेलाला, लहानपणापासूनच निवासमंडप आवडायचे. त्याने नंतर लिहिलेल्या अहवालात असे म्हटले आहे: “शमुवेल बाळ सणाचे एफोद धारण करून परमेश्वराची सेवा करीत असे.” (१ शमुवेल २:१८) शमुवेलाच्या त्या बिनबाह्याच्या साध्याशा कपड्यावरून कळते, की तो निवासमंडपात सेवा करणाऱ्या याजकांना मदत करत होता. शमुवेल हा याजक वर्गातला नव्हता. तरीपण त्याला सकाळी, अंगणातील निवासमंडपाचे दार उघडणे, वृद्ध एलीचे हवे-नको ते पाहणे यांसारखी कामे देण्यात आली होती. त्याला मिळालेली कामे तो बहुमान समजून करत होता. पण हळूहळू त्याच्या प्रामाणिक मनाला काहीतरी खटकत होते. यहोवाच्या या पवित्र स्थानात काहीतरी वाईट घडत होते.
अशुद्ध वातावरणात राहूनही तो शुद्ध राहिला
शमुवेल अगदी बालपणापासूनच दुष्टाई व भ्रष्टाचार पाहत होता. एलीला हफनी व फिनहास नावाचे दोन पुत्र होते. त्यांच्याविषयी शमुवेल असे लिहितो: “एलीचे पुत्र अधम होते; त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती.” (१ शमुवेल २:१२) वचनात सांगितले आहे, की हफनी व फिनहास “अधम” होते कारण त्यांना देवाची ओळख नव्हती. मूळ इब्री भाषेत, “अधम” असे ज्याचे भाषांतर करण्यात आले आहे त्या शब्दाचा अक्षरशः अर्थ “नालायक” असाही होऊ शकतो. एलीचे दोन्ही पुत्र नालायक होते कारण त्यांना यहोवाबद्दल तीळमात्रही आदर नव्हता. त्याचे धार्मिक दर्जे व आज्ञा ते राजरोसपणे मोडत होते. त्यांच्या याच मनोवृत्तीमुळे तर ते इतर पापे करण्यास निर्ढावले होते.
मंदिरात याजकांची काय कामे आहेत, निवासमंडपात त्यांनी बलिदाने कशी अर्पण करावीत, याबद्दल देवाने त्याच्या नियमशास्त्रात स्पष्ट आज्ञा दिल्या होत्या. अशा स्पष्ट आज्ञा देण्यामागे चांगले कारण होते. ते म्हणजे, लोकांना देवाच्या नजरेत शुद्ध राहता यावे, त्याचे आशीर्वाद व त्याचे मार्गदर्शन मिळण्यास पात्र व्हावे म्हणून त्यांच्या पापांच्या क्षमेला ही बलिदाने चित्रित करत होती. पण, हफनी व फिनहास यांनी त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या इतर याजकांना या बलिदानांचा घोर अनादर करण्यास प्रवृत्त केले. *
कल्पना करा तरुण शमुवेल, देवाच्या निवासमंडपात चाललेला हा गैरप्रकार थक्क होऊन पाहत असेल. निवासमंडपात गेल्यावर आपल्याला देवाच्या दोन गोष्टी ऐकायला मिळतील, आपल्याला बळ मिळेल अशा भाबड्या आशेने आलेल्या कितीतरी गरीब, नम्र व जुलूमाने पीडित लोकांना, मंदिरात येऊन निराश, उदास व अपमानित झालेले शमुवेलाने पाहिले असेल. आणि लैंगिक नैतिकतेच्या बाबतीत असलेले यहोवाचे नियम हफनी व फिनहास धुडकावत आहेत हे पाहूनही शमुवेलाला कसे वाटले असेल, याचा विचार करा. निवासमंडपात सेवा करणाऱ्या काही स्त्रियांबरोबर हफनी व फिनहास यांचे अनैतिक संबंध होते. (१ शमुवेल २:२२) एली काहीतरी करेल असे त्याला वाटत होते.
या वाढत्या समस्येला आळा घालणे एलीच्या हातात होते. महायाजक असल्यामुळे निवासमंडपात जे काही होत होते त्यास १ शमुवेल २:२३-२५) त्याच्या मुलांना कडक शिक्षा देण्याची गरज होती. कारण, मृत्यूदंड मिळण्यास पात्र असलेली पातके ते करत होते!
तोच जबाबदार होता. शिवाय, पिता या नात्याने आपल्या मुलांना सुधारण्याचे त्याचे कर्तव्य होते. कारण, हफनी व फिनहास हे स्वतःची आणि देशांतील इतर असंख्य लोकांची हानी करत होते. पण एलीने तर स्वतःच्या तोंडाला कुलूप लावले होते. पिता व महायाजक यानात्याने त्याची जबाबदारी पार पाडण्यात तो पूर्णपणे कमी पडला. त्याने त्याच्या मुलांना फक्त वरवर हटकले. (एलीच्या घराण्याचे अपराध शिगेला पोचले तेव्हा यहोवाने एका निनावी संदेष्ट्याला अर्थात ‘देवाच्या एका मनुष्याला’ एलीच्या घराण्यावर न्यायदंडाची कडक घोषणा करण्याकरता पाठवले. यहोवा एलीस म्हणाला: ‘तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर करीत आहेस.’ नंतर देवाने असे भाकीत केले, की एलीचे दोन्ही पुत्र एकाच दिवशी मरण पावतील आणि एलीच्या कुटुंबावर संकट कोसळेल, याजकवर्गात असण्याचा त्यांचा बहुमान त्यांच्याकडून हिरावून घेण्यात येईल. एवढा कडक इशारा देऊनही एलीच्या कुटुंबावर काही फरक पडला का? अहवालात तर तसे काहीही सांगण्यात आलेले नाही.—१ शमुवेल २:२७–३:१.
हा सर्व भ्रष्टाचार पाहून शमुवेलाच्या बालमनावर काय परिणाम झाला असेल? एली आणि त्याच्या पुत्रांबद्दलच्या या दुःखद अहवालात अधूनमधून आपल्याला, शमुवेलाच्या वाढीच्या, प्रगतीच्या आनंददायक गोष्टी वाचायला मिळतात. आठवते का, १ शमुवेल २:१८ मध्ये आपण काय वाचले होते? तेथे म्हटले आहे, की शमुवेल ‘बाळपणापासूनच परमेश्वराची सेवा विश्वासूपणे करीत’ होता. या कोवळ्या वयापासूनच त्याने देवाच्या सेवेला आपल्या जीवनात केंद्रस्थानी ठेवले होते. त्याच अध्यायाच्या २१ व्या वचनात शमुवेलाविषयी आणखी काहीतरी सांगितले आहे जे वाचून आपल्याला खूप आनंद मिळू शकतो. तेथे म्हटले आहे: “शमुवेल बाळ परमेश्वरासमोर वाढत गेला.” तो जसजसा मोठा होत गेला तसतसा यहोवाबरोबरचा त्याचा नातेसंबंध वाढत गेला. यहोवाबरोबरची अशी जवळीकच कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचारापासून आपले संरक्षण करू शकते.
महायाजक आणि त्याचे पुत्र इतक्या सहजासहजी पाप करतात तर मीपण माझ्या मनास येईल तसे वागू शकतो, असा तर्क शमुवेल करू शकला असता. पण त्याने तसे केले नाही. म्हणून आपणही इतरजण, तसेच मोठ्या पदावर असलेले लोकही वाईट गोष्टी करतात तेव्हा आपल्याला करायला काय हरकत आहे, असा विचार करू नये. आज अनेक तरुण जन शमुवेलाप्रमाणे वागतात; त्यांच्या आजूबाजूला वाईट कृत्ये करणारे लोक असले तरीही ते यहोवाबरोबर जवळचा नातेसंबंध जोडून “परमेश्वरासमोर वाढत” जातात.
शमुवेलाच्या सत्कृत्याचा त्याला काही फायदा झाला का? त्याच्याविषयी बायबलमध्ये असे म्हटले आहे: “इकडे शमुवेल बाळ हा वाढत गेला; परमेश्वर व मानव त्याच्यावर प्रसन्न होते.” (१ शमुवेल २:२६) होय, शमुवेलावर सर्वजण म्हणजे निदान असे लोक खूष होते ज्यांना त्याच्या परिस्थितीची पूर्णपणे जाण होती. स्वतः यहोवाला तो आवडत असे कारण तो विश्वासूपणे आपले काम करत होता. शमुवेलाला ही खात्री होती, की शिलोत चालणारी ही दुष्टाई यहोवा आज नाही तर उद्या नक्कीच काढून टाकेल; पण केव्हा काढेल, हा प्रश्न कदाचित त्याच्या मनात असावा.
“बोल तुझा दास ऐकत आहे”
एके रात्री जे काही घडले त्यावरून शमुवेलाला त्याच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असावीत. तांबडे फुटायला अद्याप वेळ असल्यामुळे अजूनही अंधारच होता. मंडपात लावलेल्या मोठ्या दिव्याची वात अजूनही जळत होती. त्या निरव शांत वातावरणात, कोणीतरी त्याला हाक मारत असल्यासारखे वाटले. त्याला वाटले कदाचित एली असावा; कारण एली आता खूप म्हातारा झाला होता, त्याची दृष्टीही जवळजवळ गेल्यातच जमा होती. शमुवेल उठला आणि एलीकडे “धावत” गेला. एलीला काहीतरी हवे असेल म्हणून पायात चपला न घालताच लगबगीने जाणारा शमुवेल तुमच्या डोळ्यांपुढे आला का? एली इतकी पातके करत होता तरीपण तो यहोवाचा महायाजक असल्यामुळे शमुवेल त्याच्याशी आदराने व दयाळुपणे वागत होता. मनाला किती भिडणारी ही गोष्ट आहे ना?—१ शमुवेल ३:२-५.
“काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारिली,” असे विचारत शमुवेलाने एलीला उठवले. पण एली त्याला म्हणाला, मी नाही तुला बोलवले, जा जाऊन झोप. शमुवेल झोपायला गेल्यावर पुन्हा त्याला हाक ऐकू आली. असे आणखी दोनदा झाले. शेवटी एलीला नेमके काय घडत आहे, हे कळले. आजकाल यहोवा आपल्या लोकांना दृष्टांत किंवा संदेष्ट्यांकरवी संदेश देत नव्हता. त्याचे कारण उघड होते. पण एलीला समजले, की यहोवाने पुन्हा बोलायला सुरुवात केली होती; आणि तेही या मुलाद्वारे! एलीने मग शमुवेलाला जाऊन झोपण्यास सांगितले व पुन्हा त्याला तशी हाक ऐकू आली तर त्याने योग्यरीतीने कसे उत्तर द्यावे ते सांगितले. शमुवेलाने त्याचे ऐकले. थोड्याच वेळात त्याला अशी हाक ऐकू आली: “शमुवेला, शमुवेला!” आणि शमुवेलाने उत्तर दिले: “बोल, तुझा दास ऐकत आहे.”—१ शमुवेल ३:१, ५-१०.
यहोवाला त्याची वाणी ऐकणारा सेवक सरतेशेवटी शिलोत मिळाला होता. शमुवेलाने शेवटपर्यंत यहोवाचे ऐकले. तुम्हीही ऐकता का? आज आपल्याला रात्रीच्या वेळी स्वर्गातून आवाज ऐकू येण्याची वाट पाहायची गरज नाही. कारण आज आपल्याजवळ देवाची वाणी नेहमी आहे. ही वाणी, त्याचे संपूर्ण वचन बायबल यात आहे. बायबलचे वाचन करून आपण जितके यहोवाचे ऐकू व त्याला प्रतिसाद देऊ तितका आपला विश्वास वाढेल. शमुवेलाच्या बाबतीत असेच होते.
शिलोत शमुवेलाला यहोवाचा आवाज ऐकू आला ती रात्र शमुवेलाच्या जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण रात्र होती. कारण तेव्हापासून त्याची यहोवाबरोबरची जवळीक वाढत गेली; तो यहोवाचा संदेष्टा व प्रवक्ता बनला. यहोवाने दिलेला संदेश एलीला सांगायला सुरुवातीला शमुवेलाला भीती वाटत होती. कारण, एलीच्या कुटुंबाविरुद्ध केलेली भविष्यवाणी लवकरच खरी ठरणार असल्याची ती शेवटली घोषणा होती. तरीपण शमुवेलाने आपले सर्व धैर्य एकवटून एलीला तो संदेश दिला. आणि एलीने देखील देवाचा हा संदेश नम्रपणे स्वीकारला. त्यानंतर थोड्याच दिवसांत, यहोवाने जे काही म्हटले होते ते सर्व पूर्ण झाले. इस्राएल राष्ट्र पलिष्ट्यांविरुद्ध लढायला गेले आणि हफनी व फिनहास एकाच दिवशी मरण पावले. यहोवाच्या पवित्र कराराचा कोश शत्रूंनी हस्तगत केला हे ऐकून एली जागीच मरण पावला.—१ शमुवेल ३:१०-१८; ४:१-१८.
पण, शमुवेल एक विश्वासू संदेष्टा म्हणून नावाजला जाऊ लागला. अहवालात म्हटले आहे, की “परमेश्वर त्याच्यासमागमे असे” व पुढे असेही म्हटले आहे, की शमुवेलाने केलेली एकही भविष्यवाणी यहोवाने असफल ठरू दिली नाही.—१ शमुवेल ३:१९.
‘शमुवेलाने परमेश्वराला प्रार्थना केली’
पण मग, इस्राएल लोकांनी शमुवेलाला आपला नेता स्वीकारून ते आध्यात्मिक मनोवृत्तीचे व विश्वासू लोक बनले का? नाही. काही काळानंतर ते म्हणू लागले, की आमचा न्यायइंसाफ करायला आम्हाला संदेष्टा नको तर एक राजा हवा आहे. आजूबाजूच्या राष्ट्रांप्रमाणे त्यांनाही एक मानवी राजा हवा होता जो त्यांच्यावर राज्य करेल. यहोवाच्या सांगण्यावरून शमुवेलाने लोकांचा हा हट्ट पूर्ण केला. पण असा हट्ट करून ते एका मानवाला नव्हे तर खुद्द यहोवाला झिडकारून किती मोठे पाप करत होते हे शमुवेलाला त्यांना सांगावे लागणार होते. आणि
म्हणूनच त्याने संपूर्ण इस्राएल राष्ट्राला गिलगाल येथे जमा व्हायला सांगितले होते.सर्व इस्राएली गिलगालमध्ये जमले आहेत अशी कल्पना करा. वातावरण तंग आहे. वृद्ध शमुवेल लोकांना, तो यहोवाशी कसा एकनिष्ठ राहिला त्याची आठवण करून देतो. त्यानंतर मग, ‘शमुवेलाने परमेश्वराला प्रार्थना केली,’ असे अहवालात म्हटले आहे. त्याने, मेघगर्जना करून पर्जन्यवृष्टी करावी अशी प्रार्थना केली.—१ शमुवेल १२:१७, १८.
गडगडाट आणि पाऊस? आणि तोही ऐन उन्हाळ्यात? पूर्वी कधी असे झाले नव्हते! लोकांच्या मनात शंका आली असली किंवा त्यांनी शमुवेलाची थट्टा केली असली तरी, ती जास्त वेळ टिकली नाही. कारण अचानक आभाळ भरून आले. सुसाट्याचा वारा वाहू लागला आणि गव्हाच्या शेतांना झोडपू लागला. कानठळ्या बसतील इतक्या मोठ्या आवाजात वीजा कडाडू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. लोकांची काय अवस्था झाली? “सर्व लोकांस परमेश्वराची व शमुवेलाची दहशत बसली.” त्यांनी किती मोठे दुष्कर्म केले होते याची त्यांना जाणीव झाली.—१ शमुवेल १२:१८, १९.
शमुवेलाने नव्हे तर त्याचा देव यहोवा याने, इस्राएल लोकांचे निगरगट्ट हृदय पिघळवले होते. शमुवेलाने बालपणापासून वृद्धापकाळापर्यंत यहोवावर भरवसा ठेवला होता. याबद्दल यहोवाने त्याला प्रतिफळही दिले. आजही यहोवा बदललेला नाही. जे शमुवेलासारखा विश्वास दाखवतात त्यांना तो सोडत नाही; तो त्यांच्या पाठीशी उभा राहतो. (w१०-E १०/०१)
[तळटीपा]
^ नाजीर म्हणून राहणे म्हणजे परमेश्वराला वाहून घेण्याचा विशेष नवस. हा नवस करणाऱ्यांना, मद्यपान करणे किंवा वस्तारा फिरवणे निषिद्ध होते. बहुतेक लोक असा नवस काही काळापुरतेच करायचे. पण फार कमी लोक, जसे की शमशोन, शमुवेल व बाप्तिस्मा करणारा योहान हे त्यांच्या जन्मभर नाजीर राहिले.
^ हे पवित्र स्थान समकोनी आकाराचे होते. खरे तर लाकडी सांगाड्यावर उभारलेला तो एक मोठा तंबूच होता. पण ते सर्वात उत्तम साहित्यांनी, जसे की, तहशाच्या (सील नावाच्या प्राण्याच्या) कातडीने, सुरेख नक्षीकाम केलेल्या कापडाने, व सोन्या-चांदीचा मुलामा दिलेल्या महागड्या लाकडांनी बनवलेले होते. एका समकोनी अंगणात हे निवासमंडप होते. आणि अंगणात अर्पणांकरता एक सुरेख वेदी होती. नंतर, याजकांच्या वापरासाठी, निवासमंडपाच्या शेजारी आणखी खोल्या बांधण्यात आल्या. अशीच एक खोली शमुवेलाची होती जेथे तो झोपत असे.
^ या अहवालात, घोर अनादराच्या दोन कृत्यांविषयी सांगितले आहे. एकतर, यज्ञ केलेल्या प्राण्याच्या शरीराचा कोणता हिस्सा याजकांना खाण्यासाठी द्यावा हे नियमशास्त्रात स्पष्टपणे सांगितले होते. (अनुवाद १८:३) पण निवासमंडपातील दुष्ट याजकांनी एक वेगळीच प्रथा सुरू केली होती. ते त्यांच्या सेवकांना, मांस शिजत असलेल्या मोठ्या भांड्यातून त्यांना हवे असलेले चांगले तुकडे त्रिशूळाने काढण्यास सांगत असत. आणि दुसरी गोष्ट, लोक जेव्हा यज्ञासाठी वेदीवर मांस जाळण्यासाठी आणत असत तेव्हा हे दुष्ट याजक त्यांच्या एखाद्या सेवकाला यज्ञ करणाऱ्याला दरडावून, यहोवाला प्राण्याची चरबी वाहण्याआधीच कच्चे मांस देण्यास सांगत असत.—लेवीय ३:३-५; १ शमुवेल २:१३-१७.
[१७ पानांवरील चित्र]
शमुवेलाला सुरुवातीला भीती वाटली होती; तरीपण त्याने सर्व धैर्य एकवटून एलीला यहोवाच्या न्यायदंडाचा संदेश सांगितला
[१८ पानांवरील चित्र]
शमुवेलाने पूर्ण विश्वासाने प्रार्थना केली, आणि यहोवाने मेघगर्जना करून त्याच्या प्रार्थनेचे उत्तर दिले