व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नकारात्मक भावनांवर कशी मात कराल?

नकारात्मक भावनांवर कशी मात कराल?

नकारात्मक भावनांवर कशी मात कराल?

तुमच्या मनात कधी नकारात्मक भावना आल्यात का? त्यात विचारण्यासारखे काय आहे, असे तुम्हाला वाटेल. कारण, सर्वांच्याच मनात नकारात्मक भावना येतात. आर्थिक चणचण, हिंसक वातावरण व घोर अन्याय या गोष्टी तर सर्वसामान्य बनल्या आहेत. त्यामुळे असंख्य लोक दुःखात बुडून गेले आहेत; त्यांना अपराध्यासारखे व कुचकामी असल्यासारखे वाटते.

पण मनात अशा भावना येणे घातक असू शकते. यामुळे आपला आत्मविश्‍वास खचून जाऊ शकतो, तर्क करण्याची आपली शक्‍ती कमकुवत होऊ शकते व आपला आनंद नाहीसा होऊ शकतो. बायबल म्हणते: “संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्‍ती अल्प होय.” (नीतिसूत्रे २४:१०) या त्रस्त जगात जगण्यासाठी आपल्याला शक्‍ती व बळ हवे. त्यामुळे, आपल्या मनात येणाऱ्‍या नकारात्मक भावनांवर आपण नियंत्रण ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. *

मनात येणाऱ्‍या नकारात्मक भावनांवर मात करण्यासाठी आपण कोणती ठोस पावले उचलू शकतो, त्याबद्दल बायबलमध्ये काही मार्गदर्शन दिले आहे. ज्याने आपल्याला जीवन दिले व ते आतापर्यंत टिकवून ठेवले आहे त्या यहोवा देवाची अशी इच्छा आहे, की आपण निराश किंवा आशाहीन होऊन हार मानू नये. (स्तोत्र ३६:९) नकारात्मक भावनांवर मात करण्याकरता, देवाचे वचन आपल्याला तीन मार्गांनी मदत करते. या मार्गांची आता आपण चर्चा करू या.

देव तुमच्याबद्दल आस्था दाखवतो ही जाणीव बाळगा

काही लोकांना वाटते, की मानवाच्या भावनांचा विचार करायला देवाला कोठे वेळ आहे; त्याच्याकडे इतर पुष्कळ गोष्टी आहेत. तुम्हालाही असेच वाटते का? खरे तर बायबलमध्ये आपल्याला असे आश्‍वासन देण्यात आले आहे, की आपल्या निर्माणकर्त्याला आपल्या भावनांची काळजी वाटते. स्तोत्रकर्त्याने याविषयी असे म्हटले: “परमेश्‍वर भग्नहृदयी लोकांच्या सन्‍निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो.” (स्तोत्र ३४:१८) आपण संकटात असतो तेव्हा सर्वशक्‍तिमान विश्‍वाचा शासक आपल्या जवळ असतो, ही गोष्ट किती दिलासा देणारी आहे, नाही का?

देव भावनाशून्य किंवा आपल्यापासून दूर नाही. “देव प्रीति आहे,” असे बायबल म्हणते. (१ योहान ४:८) तो लोकांवर प्रेम करतो आणि ज्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात त्यांना पाहून त्याला अतिशय वाईट वाटते. जसे की, सुमारे ३,५०० वर्षांपूर्वी प्राचीन इस्राएल लोक ईजिप्तमध्ये [मिसर] दास होते तेव्हा त्याने असे म्हटले: “मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ति मी खरोखर पाहिली आहे; त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे; त्यांचे क्लेश मी जाणून आहे; त्यांस मिसरांच्या हातातून सोडवावे, . . . म्हणून मी उतरलो आहे.”—निर्गम ३:७, ८.

आपली जडण-घडण देवाला माहीत आहे. कारण, ‘त्यानेच आपल्याला उत्पन्‍न केले आहे.’ (स्तोत्र १००:३) त्यामुळे, आपल्या बरोबरचे लोक आपल्याला समजू शकत नाहीत असे जेव्हा आपल्याला वाटते तेव्हाही आपण ही खात्री बाळगू शकतो, की देवाला आपल्या भावना कळतात. बायबलमध्ये म्हटले आहे: “मानवासारखे परमेश्‍वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्‍वर हृदय पाहतो.” (१ शमुवेल १६:७) आपल्या अगदी अंतरिक भावनाही त्याच्यापासून लपलेल्या नाहीत.

यहोवाला आपले दोष व आपल्या उणिवा देखील दिसतात. पण आपला हा प्रेमळ निर्माणकर्ता क्षमाशील आहे म्हणून आपण किती आभारी आहोत. देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेल्या बायबलच्या एका लेखकाचे नाव होते दावीद. त्याने असे म्हटले: “जसा बाप आपल्या मुलांवर ममता करितो, तसा परमेश्‍वर आपले भय धरणाऱ्‍यांवर ममता करितो. कारण तो आमची प्रकृति जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो.” (स्तोत्र १०३:१३, १४) कदाचित आपल्याला स्वतःचे दोषच दिसतील, पण देवाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आपण जर आपल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप केला तर तो आपल्यातील दोषांकडे दुर्लक्ष करून चांगल्या गुणांकडे पाहील.—स्तोत्र १३९:१-३, २३, २४.

म्हणून, आपल्या मनात जेव्हा, आपण कुचकामी असल्याच्या भावना येतात तेव्हा आपण त्या लगेच मनातून काढून टाकायचा प्रयत्न केला पाहिजे. देव आपल्याला कोणत्या नजरेतून बघतो, या गोष्टीची आपण आठवण ठेवली पाहिजे.—१ योहान ३:२०.

देवाबरोबर सख्य जोडा

देव आपल्याला ज्या नजरेतून पाहतो त्या नजरेतून आपण स्वतःकडे बघितले तर आपल्याला काय फायदा होईल? नकारात्मक भावनांवर मात करण्यासाठी आपल्याला जे दुसरे पाऊल उचलावे लागेल ते आपण सहजरीत्या उचलू शकू. अर्थात देवाबरोबर आपण सख्य जोडू शकू. पण हे खरोखरच शक्य आहे का?

होय, कारण यहोवा हा प्रेमळ पिता आहे. त्याच्याबरोबर सख्य जोडण्यास आपल्याला मदत करण्यासाठी तो आतुर आहे. बायबलमध्ये आपल्याला असा आग्रह करण्यात आला आहे: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.” (याकोब ४:८) विचार करा: आपण कमजोर व पापी असताना देखील या विश्‍वाच्या शासकाबरोबर सख्य जोडू शकतो!

यहोवाशी आपली ओळख घडावी म्हणून त्याने बायबलमध्ये स्वतःबद्दलची माहिती दिली आहे. बायबलचे नियमित वाचन करून आपण यहोवाच्या लोभस गुणांविषयी अधिक शिकू शकतो. * शिकलेल्या गोष्टींवर मनन केल्यास आपल्याला यहोवाच्या जवळ आल्यासारखे वाटेल. आपल्याला आणखी स्पष्टरीत्या कळेल, की तो एक प्रेमळ व करुणामय पिता आहे.

बायबलमधून वाचलेल्या गोष्टींवर मनन केल्याने आपल्याला आणखी पुष्कळ फायदे होतात. आपल्या स्वर्गीय पित्याचे विचार आपल्या मनात व हृदयात उतरवण्याद्वारे आपण त्याच्या जवळ येतो. यहोवाचे हे विचार, आपल्या व्यक्‍तिमत्वात सुधार करतात, आपल्याला सांत्वन व मार्गदर्शन देतात. आपल्या मनात जेव्हा अस्वस्थ करणारे विचार किंवा भावना येतात तेव्हा खासकरून आपण बायबलचे अधिक वाचन करणे महत्त्वाचे आहे. स्तोत्रकर्त्याने याबद्दल असे म्हटले: “माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करिते.” (स्तोत्र ९४:१९) बायबलमधील देवाचे विचार खरोखरच खूप सांत्वनदायक ठरू शकतात. बायबलमधला सत्याचा संदेश आपण जर नम्र मनाने स्वीकारला तर आपल्या मनातील नकारात्मक भावना जाऊन त्याऐवजी देवाने दिलेले सांत्वन व शांती मिळाल्याचे आपल्याला जाणवेल. मुलाला दुखापत झाल्यावर त्याच्या जखमेवर मायेने फुंकर घालणाऱ्‍या किंवा त्याला शांत करणाऱ्‍या एका प्रेमळ पालकाप्रमाणे यहोवा देव आपले सांत्वन करतो.

देवाचा जिवलग मित्र बनण्यात आणखी एक गोष्ट गोवलेली आहे. ती म्हणजे, त्याच्याबरोबर नेहमी बोलणे. “आपण [देवाच्या] इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल,” अशी हमी बायबल आपल्याला देते. (१ योहान ५:१४) आपल्या मनात कोणतीही भीती असली, कोणतीही चिंता असली तरी आपण देवाला प्रार्थना करून त्याला मदत मागू शकतो. यहोवापुढे मन मोकळे केल्याने आपले मन शांत होते. बायबलमधील पौल नावाच्या एका प्रेषिताने लिहिले: “सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.”—फिलिप्पैकर ४:६, ७.

तुम्ही जर नित्य नियमाने, बायबल वाचन, मनन व वैयक्‍तिक प्रार्थना हा कार्यक्रम चालू ठेवला तर तुम्हाला नक्की जाणवेल, की स्वर्गीय पित्याबरोबरचा तुमचा नातेसंबंध घट्ट होत आहे. या घट्ट नातेसंबंधामुळे तुम्ही नकारात्मक भावनांवर सहजरीत्या मात करू शकाल. आणखी कशाने तुम्हाला मदत होऊ शकेल?

भवितव्यातील पक्क्या आशेवर लक्ष केंद्रित करा

आपण जीवनातल्या कठीणातल्या कठीण परिस्थितीत असलो तरी, चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित ठेवू शकतो. ते कसे? देव आपल्याला भवितव्याविषयी एक पक्की आशा देतो. प्रेषित पेत्राने या विलक्षण आशेचे मोजक्याच शब्दांत वर्णन केले: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्‍यांची [देवाच्या] वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” (२ पेत्र ३:१३) या वचनाचा काय अर्थ होतो?

या वचनातील “नवे आकाश” खरे तर एका सरकारला अर्थात देवाच्या स्वर्गीय राज्याला सूचित करते. येशू ख्रिस्त या राज्याचा राजा आहे. “नवी पृथ्वी” म्हणजे, देवाची संमती मिळालेला नवीन मानवी समाज जो या पृथ्वीवर राहील. ‘नव्या आकाशाच्या’ राज्याखाली, पृथ्वीवरील नवा समाज, मनातील नकारात्मक भावना आणणाऱ्‍या सर्व गोष्टींपासून मुक्‍त होईल. बायबल अशी खात्री देते, की देव या नव्या समाजातील विश्‍वासू मानवांच्या “डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट” राहणार नाही.—प्रकटीकरण २१:४.

बायबलमधील हे शब्द आल्हाददायक व उत्तेजनदायक आहेत, ही तुमची खात्री पटेल. म्हणूनच तर खऱ्‍या ख्रिश्‍चनांना देवाने भवितव्यासाठी दिलेल्या आशा “धन्य” किंवा आनंदाच्या आहेत, असे बायबलमध्ये म्हटले आहे. (तीत २:१३) मानवाच्या भवितव्याबद्दल देवाने दिलेल्या वचनांवर तसेच ही वचने विश्‍वासयोग्य व खात्रीलायक का आहेत त्याच्या कारणांवर जर आपण मन एकाग्र केले तर आपल्या मनातील नकारात्मक विचार निघून जातील.—फिलिप्पैकर ४:८.

बायबल आपल्या तारणाच्या आशेची तुलना शिरस्त्राण किंवा हेल्मेटबरोबर करते. (१ थेस्सलनीकाकर ५:८) प्राचीन काळांत, कोणत्याही सैनिकाची हेल्मेट घातल्याशिवाय युद्धात लढायला जायची हिंमत होत नसे. त्याला माहीत होते, की हेल्मेट घातले तरच त्याच्या डोक्यावर लागणारे मार, वर्मी लागणार नाहीत आणि जळत्या बाणांमुळे त्याला इजा होणार नाही. हेल्मेटमुळे जसे डोके सुरक्षित राहते तसेच आशेमुळे आपले विचार सुरक्षित राहतात. आशादायक असलेले विचार मनात घोळत ठेवल्यास, नकारात्मक व भीतीदायक विचारांना जागा उरणार नाही.

तेव्हा, नकारात्मक विचारांवर तुम्ही मात करू शकता! तुम्हाला ते जमू शकते! देव तुमच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतो यावर विचार करा, त्याच्याशी सख्य जोडा आणि भवितव्याबद्दल असलेल्या आशेवर आपले लक्ष केंद्रित करा. आणि मग तुम्ही तो दिवस पाहाल जेव्हा सर्व नकारात्मक भावना कायमच्या निघून गेलेल्या असतील!—स्तोत्र ३७:२९. (w१०-E १०/०१)

[तळटीपा]

^ ज्यांना दीर्घकाळापासून किंवा जास्त प्रमाणात डिप्रेशनचा त्रास आहे ते एखाद्या योग्य डॉक्टरकडे जाऊ शकतात.—मत्तय ९:१२.

^ १ जानेवारी २०१० च्या टेहळणी बुरूज अंकात पृष्ठ २३ वर, बायबल वाचनासाठी एक अतिशय सुटसुटीत व फायदेकारक आराखडा दिलेला आहे.

[९ पानांवरील चित्राचे श्रेय]

“त्यांचे क्लेश मी जाणून आहे” निर्गम ३:७, ८

[१० पानांवरील चित्राचे श्रेय]

“माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करिते.” स्तोत्र ९४:१९

[११ पानांवरील चित्राचे श्रेय]

“सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार . . . राखील.” फिलिप्पैकर ४:७

[१०, ११ पानांवरील चौकट/चित्र]

यहोवा देवाबद्दलची सांत्वनदायक वचने

“दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर.” —निर्गम ३४:६.

“परमेश्‍वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करितो.” —२ इतिहास १६:९.

“परमेश्‍वर भग्नहृदयी लोकांच्या सन्‍निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो.”—स्तोत्र ३४:१८.

“हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस.”—स्तोत्र ८६:५.

“परमेश्‍वर सगळ्यांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.” —स्तोत्र १४५:९.

“मी परमेश्‍वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, भिऊ नको, मी तुला साहाय्य करितो.”—यशया ४१:१३.

“जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो.”—२ करिंथकर १:३.

“ज्या कशाविषयी आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरविते त्याविषयी आपण स्वतःच्या मनाला त्याच्यासमोर उमेद देऊ; कारण आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्व काही कळते.”—१ योहान ३:१९, २०.

[१२ पानांवरील चौकट/चित्रे]

ते नकारात्मक विचारांवर यशस्वीरीत्या मात करत आहेत

“माझे वडील दारू पितात व त्यांनी मला खूप त्रास दिला आहे. खूप दिवसांपासून माझ्या मनात, मी निरुपयोगी आहे, अशा भावना होत्या. पण यहोवाच्या साक्षीदारांबरोबर जेव्हा मी बायबलचा अभ्यास करू लागले तेव्हा याच पृथ्वीवरील अनंतकाळच्या जीवनाबद्दल देवाने दिलेल्या वचनाविषयी मी शिकले. या आशेने मी खूप आनंदित झाले. तेव्हापासून बायबल वाचन माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मी नेहमी स्वतःजवळ बायबल बाळगते. माझ्या मनात नकारात्मक विचार येतात तेव्हा मी लगेच बायबल उघडते आणि त्यातील सांत्वनदायक वचने वाचते. देवाच्या लोभस गुणांबद्दल वाचल्यावर मला ही खात्री मिळते, की त्याच्या नजरेत मी मौल्यवान आहे.”—केटिआ, ३३ वर्षांची महिला. *

“मला दारूचे, गांजा ओढण्याचे, कोकेन व क्रॅक कोकेन घेण्याचे, सरस हुंगण्याचे व्यसन जडले होते. माझ्याजवळ जे काही होते ते सर्व मी गमावून बसलो होतो व अक्षरशः भिकारी बनलो. यहोवाच्या साक्षीदारांनी मला बायबल अभ्यास करण्याविषयी विचारले तेव्हा मी तयार झालो आणि यामुळं माझं जीवन पार बदललं. मी देवाबरोबर निकटचा नातेसंबंध जोडू शकलो. अजूनही माझ्या मनात अधूनमधून अपराधीपणाच्या व निरुपयोगीपणाच्या भावना येतात. पण मी देवाच्या करुणेवर व प्रेमळ-दयेवर विश्‍वास ठेवायला शिकलो आहे. माझ्या मनात येणाऱ्‍या नकारात्मक विचारांवर मात करायला देव मला जरूर शक्‍ती देत राहील, अशी माझी खात्री आहे. मला बायबलमधील सत्य समजले ही माझ्या जीवनात घडलेली सर्वात उत्तम गोष्ट आहे.”—रेनाटो, ३७ वर्षांचा पुरुष.

“लहानपणापासूनच मी माझ्या मोठ्या भावाबरोबर स्वतःची बरोबरी करायचे. मी स्वतःला खूप कमी लेखायचे. अजूनही मला असुरक्षित वाटतं, माझ्या क्षमतांची मला इतकी खात्री वाटत नाही. पण मी हार मानणार नाही. मी यहोवाला याविषयी कळकळीनं प्रार्थना केली आहे व त्यानंही मला, माझ्या मनात येणाऱ्‍या अपुऱ्‍यापणाच्या भावनांवर मात करायला शक्‍ती दिली. खरंच देवाला आपली किती काळजी आहे, तो आपल्यावर किती प्रेम करतो!”—रॉबर्टा, ४५ वर्षांची महिला.

[तळटीप]

^ काही नावे बदलण्यात आली आहेत.