रहस्य २ इतरांशी बरोबरी करण्याचा मोह आवरा
रहस्य २ इतरांशी बरोबरी करण्याचा मोह आवरा
बायबल काय शिकवते? “आपण शिकस्तीचा प्रयत्न करीत आहोत, याबद्दल प्रत्येकाने खात्री करून घ्यावी, कारण मगच त्याला उत्तम प्रकारे काम केल्याचे व्यक्तिगत समाधान मिळेल, आणि स्वतःची दुसऱ्याशी तुलना करण्याची त्याला गरज वाटणार नाही.”—गलतीकर ६:४, सुबोध भाषांतर.
समस्या? इतरांशी बरोबरी करण्याची आपली सर्वांची प्रवृत्ती असते. ज्यांच्याजवळ आपल्यापेक्षा कमी आहे अशांबरोबर किंवा मग आपल्यापेक्षा धडधाकट, श्रीमंत किंवा अधिक निपुण असलेल्यांबरोबर आपण स्वतःची बरोबरी करून पाहतोच. यामागे कोणताही हेतू असला तरी फायदा मात्र काही होत नाही. एखाद्या व्यक्तीजवळच्या मालमत्तेवरून किंवा मग तिच्या क्षमतांवरून तिची योग्यता ठरते, असा चुकीचा ग्रह आपण करून घेतो. आपण कदाचित, इतरांमध्ये द्वेष भाव किंवा स्पर्धात्मक मनोवृत्ती चेतवू.—उपदेशक ४:४.
तुम्ही काय करू शकता? देव तुमच्याकडे ज्या नजरेतून पाहतो त्या नजरेतून स्वतःकडे पाहा. योग्यता ठरवण्याच्या बाबतीत त्याच्या दृष्टिकोनाचा परिणाम तुमच्या दृष्टिकोनावर होऊ द्या. “मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो.” (१ शमुवेल १६:७) यहोवा इतर मानवांबरोबर तुमची तुलना करून नव्हे तर तुमच्या हृदयात काय आहे ते पाहून, तुमच्या विचारांचे, भावनांचे व हेतुंचे परीक्षण करून तुमची योग्यता मापतो. (इब्री लोकांस ४:१२, १३) यहोवाला तुमच्या मर्यादा कळतात व तुम्हालाही त्यांची जाणीव असली पाहिजे, असे त्याला वाटते. इतरांशी तुलना करून तुम्ही जर स्वतःची योग्यता मापण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही एकतर गर्विष्ठ बनाल किंवा मग कधीच समाधानी बनणार नाही. तेव्हा, आपण सर्वच बाबतीत सरस ठरू शकत नाही ही गोष्ट नम्रपणे मान्य करा.—नीतिसूत्रे ११:२.
देवाच्या नजरेत योग्यता मिळवायची असेल तर तुम्ही नेमके काय केले पाहिजे? मीखा नावाच्या एका संदेष्ट्याला देवाने असे लिहिण्यास प्रेरित केले: “हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे; नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यांवाचून परमेश्वर तुजजवळ काय मागतो?” (मीखा ६:८) तुम्ही जर या सल्ल्यानुसार वागलात तर देव तुमची काळजी घेईल. (१ पेत्र ५:६, ७) यापेक्षा आणखी मोठे समाधान असू शकेल का? (w१०-E ११/०१)
[५ पानांवरील चित्र]
यहोवा आपल्या हृदयाचे परीक्षण करून आपली योग्यता मापतो