व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आदाम आणि हव्वा पाप करतील हे देवाला माहीत होते का?

आदाम आणि हव्वा पाप करतील हे देवाला माहीत होते का?

आदाम आणि हव्वा पाप करतील हे देवाला माहीत होते का?

पुष्कळ लोकांना या प्रश्‍नाचे उत्तर खरोखरच माहीत करून घ्यायचे आहे. देवाने या जगातील दुष्टाई अद्याप का राहू दिली आहे, या प्रश्‍नाचे उत्तर जेव्हा आपण लोकांना देत असतो तेव्हा, पहिल्या मानवी जोडप्याने एदेन बागेत पाप केल्याचा विषय निघतोच. ‘देवाला सर्व काही माहीत आहे’ तेव्हा, आदाम आणि हव्वा पाप करणार आहेत हेही त्याला माहीत असलेच पाहिजे, असा निष्कर्ष काहीजण काढतील.

पण, पहिले मानवी जोडपे पाप करणार आहे, हे देवाला खरोखरच आधीपासून माहीत असते तर त्यावरून काय सूचित होईल? त्यावरून हेच सूचित होईल, की तो अतिशय क्रूर, अन्यायी व फसवा आहे. पहिल्या मानवांचा शेवट वाईटच होणार आहे हे त्याला माहीत असूनही तसे घडू देणे किती क्रूरपणाचे आहे, असे काहींना वाटेल. संपूर्ण मानवी इतिहासात ज्या ज्या वाईट गोष्टी घडल्या, मानवांना जे जे दुःख सहन करावे लागले त्यास देवच जबाबदार आहे, किंवा निदान भागीदार आहे, असेच काहींना वाटेल. आणि काहींना तर आपला निर्माणकर्ता मूर्खही वाटेल.

पण शास्त्रवचनांमध्ये यहोवाचे जे वर्णन दिले आहे त्याजशी वरील वर्णन जुळते का? या प्रश्‍नाचे उत्तर मिळण्याकरता आपण, देवाने निर्माण केलेल्या गोष्टींबद्दल व त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाबद्दल बायबल काय म्हणते त्याचे परीक्षण करून पाहू या.

“सर्व फार चांगले आहे”

देवाने निर्माण केलेल्या गोष्टींबद्दलचे आणि पृथ्वीवरील पहिल्या मानवांना बनवल्यानंतरचे वर्णन दिल्यानंतर बायबलमधील उत्पत्तिच्या पुस्तकात म्हटले आहे: “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.” (उत्पत्ति १:३१) देवाने आदाम आणि हव्वेला परिपूर्ण असे निर्माण केले, पृथ्वीवरील वातावरणात जगण्यास ते अगदी फिट होते. त्यांच्या घडणेत कसलीही खोट नव्हती. त्यांची निर्मिती ‘फार चांगली’ असल्यामुळे, योग्य वर्तनाची अपेक्षा पूर्ण करण्यास ते सक्षम होते. ‘देवाच्या प्रतिरूपात’ त्यांना निर्माण करण्यात आले होते. (उत्पत्ति १:२७) म्हणजेच, देवाकडे असलेली बुद्धी, एकनिष्ठ प्रेम, न्याय व चांगुलपणा यासारखे गुण, काही प्रमाणात दाखवण्याची क्षमता त्यांच्यात होती. या गुणांमुळे ते योग्य निर्णय घेऊ शकत होते ज्यामुळे त्यांचा फायदा होणार होता आणि त्यांच्या स्वर्गीय पित्याला आनंद होणार होता.

या परिपूर्ण व हुशार पहिल्या मानवी जोडप्याला यहोवाने इच्छा स्वातंत्र्य अर्थात निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले होते. म्हणजे, नेहमी देवाला आवडेल अशाच पद्धतीने कार्य करण्यास, अर्थात एका रोबोटप्रमाणे त्यांना बनवण्यात आले नव्हते. जरा विचार करा. तुम्हाला काय आवडले असते—नावापुरते दिलेले बक्षीस की हृदयातून प्रेरित होऊन दिलेले बक्षीस? उत्तर तुम्हाला माहीत आहे. आदाम आणि हव्वेने जर त्यांच्या हृदयापासून देवाच्या आज्ञेचे पालन करण्याची निवड केली असती तर देवाला त्यांची ही आज्ञाधारकता खूप मोलाची वाटली असती. निवड करण्याची क्षमता असल्यामुळे, पहिले मानवी जोडपे प्रेमाने प्रवृत्त होऊन यहोवाच्या आज्ञेचे पालन करू शकत होते.—अनुवाद ३०:१९, २०.

नीतिमान, न्यायी व चांगला

बायबलमध्ये यहोवाच्या गुणांबद्दल सांगितले आहे. हे गुण त्याच्याठायी असल्यामुळे त्याच्याकडून पाप होणे शक्य नाही. स्तोत्र ३३:५ मध्ये म्हटले आहे, की यहोवाला “नीति व न्याय ही प्रिय आहेत.” म्हणूनच याकोब १:१३ नुसार त्याला “वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहांत पाडीत नाही.” देव न्यायी असल्यामुळे व त्याला आदामाची काळजी असल्यामुळेच तर त्याने त्याला अशी ताकीद दिली: “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (उत्पत्ति २:१६, १७) अनंतकाळचे जीवन आणि मृत्यू या दोन्हींपैकी काहीतरी एक निवडण्याचे स्वातंत्र्य आदाम व हव्वेला देण्यात आले होते. एखाद्या विशिष्ट पापाचा परिणाम वाईट होणार आहे हे माहीत असूनही यहोवा जर शांत राहिला असता तर तो दांभिक नसता का? यहोवाला “नीति व न्याय ही प्रिय” असल्यामुळे, जी गोष्ट अस्तित्वातच नाही त्या गोष्टीची निवड करण्यास त्याने सांगितलेच नसते.

यहोवाचे चांगुलपणही थोर आहे. (स्तोत्र ३१:१९) देवाच्या चांगुलपणाविषयी बोलताना येशूने म्हटले: “आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल, असा तुमच्यात कोण माणूस आहे? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषेकरून चांगल्या देणग्या देईल?” (मत्तय ७:९-११) देव, त्याने निर्माण केलेल्या मानवांना “चांगल्या देणग्या” देतो. मानवाला ज्या प्रकारे निर्माण करण्यात आले होते व त्याला ज्या नंदनवनात ठेवण्यात आले होते त्यावरून देवाचा चांगुलपणा दिसून येतो. इतका चांगला व प्रेमळ सर्वसत्ताधारी देव इतका क्रूर होऊ शकतो का, की आधी तो त्यांना नंदनवनासारखी सुरेख जागा राहायला देतो आणि नंतर मग ती त्यांच्याकडून हिरावून घेतो? मुळीच नाही. मानवाने जे बंड केले त्यास आपला नीतिमान व चांगला निर्माणकर्ता जबाबदार नाही.

“एकच ज्ञानी देव”

यहोवा “एकच ज्ञानी देव” आहे असेही बायबलमध्ये सांगण्यात आले आहे. (रोमकर १६:२५-२७) देवाबरोबर स्वर्गात असलेल्या देवदूतांनी देवाची ही असीम बुद्धी अनेक गोष्टींत पाहिली. यहोवाने जेव्हा पृथ्वीवरील प्राण्यांची निर्मिती केली तेव्हा या देवदूतांनी “जयजयकार केला.” (ईयोब ३८:४-७) या बुद्धिमान आत्मिक प्राण्यांनी, एदेन बागेत देवाने आदाम आणि हव्वेला कसे बनवले होते ते आवडीने पाहिले होते. तर मग, ज्याने या भय-प्रेरक विश्‍वाची, डोळ्यांचे पारणे फिटेल अशा गोष्टींची पृथ्वीवर निर्मिती केली होती तो सर्वज्ञानी देव, या देवदूतांसमोर, अशा दोन अनोख्या मानवांची निर्मिती करेल का, की जे कालांतराने पापच करणार होते? असफल ठरणाऱ्‍या गोष्टीची योजना करणे तर्काला न पटणारे आहे.

तरीपण काहीजण म्हणतील, ‘पण मग सर्वज्ञानी देवाला, आदाम आणि हव्वा पाप करणार आहे हे माहीत न होणे कसे शक्य आहे?’ यहोवाकडे असीम बुद्धी असल्यामुळे, “आरंभीच शेवट” कळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, हे कबूल आहे. (यशया ४६:९, १०) तरीपण या क्षमतेचा त्याला नेहमीच वापर करण्याची गरज नाही. तसे तर त्याच्याजवळ अमर्याद शक्‍ती देखील आहे. मग तो सतत आपल्या शक्‍तीचे प्रदर्शन करतो का? तसेच, शेवट माहीत करण्याची क्षमता त्याच्याजवळ आहे मग याचा असा अर्थ होत नाही, की त्याने या क्षमतेचा नेहमीच वापर केला पाहिजे. या क्षमतेचा केव्हा उपयोग करायचा हे तो सुज्ञपणे ठरवतो. योग्य वेळी व आवश्‍यकता असते तेव्हाच तो या क्षमतेचा उपयोग करतो.

पुढे काय होणार आहे हे जाणून घ्यायच्या क्षमतेचा वापर करायचा किंवा नाही हे समजण्यासाठी आपण एका उदाहरणाचा विचार करू या. आधुनिक तंत्रज्ञानाने बरीच प्रगती केली आहे. आपण एखाद्या खेळाच्या सामन्याचे रेकॉर्डिंग करून ठेवू शकतो आणि नंतर आपल्याला हवे तेव्हा तो सामना कोणी जिंकला हे आधीच माहीत करून घेण्याकरता शेवटची काही मिनिटे पाहण्याचा पर्याय आपल्याजवळ असतो. पण त्यासाठी आपल्याला पहिल्यापासून संपूर्ण सामना पाहण्याची गरज नाही. आणि जरी आपण संपूर्ण सामना सुरुवातीपासून पाहायचा ठरवला तरी आपल्याला कोणी नावे ठेवेल का? नाही, कारण ती आपली निवड आहे. तसेच, आदाम व हव्वा पाप करतील किंवा नाही हे आधीच न पाहण्याची निर्माणकर्त्याने निवड केली. त्याने थांबून राहणे पसंत केले आणि घटना घडू दिल्या. पृथ्वीवरील त्याची मुले त्याच्या आज्ञांचे पालन करतील किंवा नाही हे पाहण्याची त्याने निवड केली.

यहोवाकडे असीम बुद्धी आहे. आणि आधी उल्लेख केल्याप्रमाणे त्याने मानवांना एका रोबोट प्रमाणे, म्हणजे त्याला जसे हवे तसे वागवण्याकरता बनवले नाही. तर त्याने त्यांना इच्छा स्वातंत्र्य अर्थात निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले. योग्य निवड करून ते यहोवावरील त्यांचे प्रेम, कृतज्ञता व आज्ञाधारकता व्यक्‍त करून, स्वतःही आनंदी होऊ शकत होते आणि त्यांचा स्वर्गीय पिता यहोवा यालाही आनंदित करू शकत होते.—नीतिसूत्रे २७:११; यशया ४८:१८.

पुढे काय होणार आहे हे जाणून घ्यायच्या क्षमतेचा देवाने अनेक प्रसंगी उपयोग न केल्याची अनेक उदाहरणे बायबलमध्ये आहेत. जसे की, विश्‍वासू अब्राहामाने जेव्हा आपल्या पुत्राचे बलिदान करण्याची तयारी दाखवली तेव्हा यहोवाने त्याला म्हटले: “तू आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलासहि माझ्यापासून राखून ठेविले नाही, यावरुन तू देवाला भिऊन चालणारा आहेस हे मला कळले.” (उत्पत्ति २२:१२) दुसरीकडे पाहता, काही लोकांच्या वाईट वर्तनामुळे देवाला “दु:ख” झाले होते. पुढे काय होणार आहे हे जर त्याला आधीच माहीत असते तर त्याला दुःख झाले असते का?—स्तोत्र ७८:४०, ४१; १ राजे ११:९, १०.

त्यामुळे आपण पूर्ण आत्मविश्‍वासाने असा निष्कर्ष काढू शकतो, की आपले पहिले पालक पाप करणार आहेत हे माहीत करून घेण्यासाठी आपल्या सर्वज्ञानी देवाने, पुढे काय होणार आहे हे जाणून घ्यायच्या त्याच्या क्षमतेचा उपयोग केला नाही. तो इतका मूर्ख नाही, की पुढे काय होणार आहे हे माहीत असूनही त्याने आदाम आणि हव्वेला एका विचित्र जीवनासाठी बनवावे.

“देव प्रीति आहे”

देवाचा शत्रू असलेल्या सैतानामुळे एदेन बागेतील बंडाळीस सुरुवात झाली. या बंडाळीमुळे वाईट परिणाम घडू लागले; शिवाय मानवांवर पाप आणि मृत्यू ओढवला. अशा प्रकारे सैतान “मनुष्यघातक” बनला. “तो लबाड व लबाडीचा बाप” असल्याचेही सिद्ध झाले. (योहान ८:४४) खरेतर सैतानाचेच हेतू वाईट आहेत; पण चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात त्याप्रमाणे तो त्याचे हेतू वाईट असतात असा आळ यहोवावर घालतो. मानवांच्या पापांचा दोष यहोवावर ढकलणे हे त्यालाच चांगले शोभते.

आदाम आणि हव्वा पाप करणार आहेत हे आधीच यहोवाने का माहीत करून घेतले नाही त्यामागे एक मोठे कारण आहे. ते आहे यहोवाचे प्रेम. प्रेम हा देवाचा सर्वात प्रमुख गुण आहे. “देव प्रीति आहे,” असे १ योहान ४:८ मध्ये म्हटले आहे. प्रेम नेहमी, नकारात्मक नव्हे तर सकारात्मक कार्य करते. प्रेम नेहमी इतरांचे भले इच्छिते. यहोवा देवाचे आदाम व हव्वेवर प्रेम असल्यामुळेच तर त्याला त्यांचे भले झालेले पाहायचे होते.

देवाच्या पृथ्वीवरील मुलांपुढे, चुकीची निवड करण्याचा पर्याय होता. पण, आपला प्रेमळ देव निराशावादी नव्हता किंवा त्याने बनवलेल्या परिपूर्ण जोडप्यावर त्याने संशय घेतला नाही. जीवनात त्यांना जे काही हवे होते ते त्याने त्यांना दिले होते आणि जे त्यांना माहीत व्हायला हवे होते तेही त्याने त्यांना कळवले होते. म्हणून, तो त्यांच्याकडून बंडाळीची नव्हे तर प्रेमाने प्रवृत्त होऊन त्याच्या आज्ञांचे पालन करण्याची अपेक्षा करत होता. आदाम आणि हव्वेकडे एकनिष्ठ राहण्याची कुवत आहे, हे यहोवाला माहीत होते. अब्राहाम, ईयोब, दानीएल व देवाच्या आणखी अनेक सेवकांनी अपरिपूर्ण असूनही हे सिद्ध करून दाखवले.

“देवाला . . . सर्व शक्य आहे” असे येशूने म्हटले. (मत्तय १९:२६) हे वचन वाचून आपल्याला किती सांत्वन मिळते, नाही का? यहोवा प्रेमळ आहे तसेच तो न्यायी, बुद्धिमान व शक्‍तिमान असल्यामुळे आपल्याला ही खात्री देतो, की त्याच्या ठरलेल्या वेळी तो पाप आणि मृत्यूचे सर्व परिणाम काढून टाकेल.—प्रकटीकरण २१:३-५.

पहिले मानवी जोडपे पाप करेल, हे यहोवाला आधीपासूनच माहीत नव्हते हे स्पष्ट झाले आहे. आदाम व हव्वेने आपली आज्ञा तोडली आणि यामुळे त्यांना खूप दुःख भोगावे लागत आहे हे पाहून यहोवाला अतिशय वाईट वाटते; पण त्याला हे माहीत होते, की यामुळे पृथ्वी व तिच्यावरील आज्ञाधारक मानवांसाठी असलेल्या त्याच्या उद्देशात जो तात्पुरता खंड पडला होता तो तसाच राहणार नव्हता. हा उद्देश काय आहे आणि या भव्य उद्देशाची पूर्णता झाल्यामुळे तुम्हाला कोणता फायदा होणार आहे याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी आहे का? * (w११-E ०१/०१)

[तळटीप]

^ पृथ्वीसाठी देवाचा काय उद्देश आहे याबद्दलची अधिक माहिती हवी असेल तर यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ३ पाहा.

[१२ पानांवरील संक्षिप्त आशय]

एका ठराविक कार्यासाठी बनवलेल्या रोबोटप्रमाणे यहोवाने पहिल्या मानवांना निर्माण केले नाही

[१३ पानांवरील संक्षिप्त आशय]

आदाम आणि हव्वा यांच्यात आपल्याशी एकनिष्ठ राहण्याची कुवत होती, हे देवाला माहीत होते