व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तो आपला देव परमेश्‍वर यास शरण गेला”

“तो आपला देव परमेश्‍वर यास शरण गेला”

देवाच्या जवळ या

“तो आपला देव परमेश्‍वर यास शरण गेला”

लहानपणापासून देवाच्या मार्गावर चालत असलेला एक मनुष्य जेव्हा या मार्गावरून भरकटला तेव्हा त्याने म्हटले, “मी किती कुचकामी आहे.” जेव्हा त्याने पुन्हा देवाच्या मार्गावर चालण्याकरता पावले उचलली तेव्हा देव त्याला कधीच माफ करणार नाही अशी त्याला भीती वाटत होती. पण या पश्‍चात्तापी मनुष्याने जेव्हा बायबलमधील २ इतिहास ३३:१-१७ वचनांतील मनश्‍शेचा अहवाल वाचला तेव्हा त्याला आशा मिळाली. आधी केलेल्या पापांमुळे तुम्हाला कधी कुचकामी असल्यासारखे वाटत असेल तर मनश्‍शेच्या उदाहरणावरून तुम्हालाही सांत्वन मिळू शकते.

मनश्‍शेचे संगोपन देवाची भक्‍ती करणाऱ्‍या घरात झाले होते. मनश्‍शेचे वडील यहूदाच्या अनेक प्रख्यात राजांपैकी एक होते. देवाने चमत्कारीकरित्या त्याच्या वडिलांचे आयुष्य वाढवल्यानंतर तीन वर्षांनी मनश्‍शेचा जन्म झाला होता. (२ राजे २०:१-११) त्यामुळे मनश्‍शे हा देवाच्या कृपेमुळेच झाला होता असे समजून त्याने त्याच्या मनात खऱ्‍या उपासनेबद्दल आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण, खऱ्‍या देवाची उपासना करणाऱ्‍या पालकांच्या उदाहरणानुसार त्यांची मुलेदेखील चालतीलच असे नाही. मनश्‍शेच्या बाबतीत असेच झाले होते.

मनश्‍शेच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा तो कदाचित बारा वर्षांचा असावा. दुःखाची गोष्ट म्हणजे “परमेश्‍वराच्या दृष्टीने जे वाईट ते मनश्‍शेने केले.” (वचन १, २) ज्यांना खऱ्‍या देवाच्या उपासनेप्रती कदर नव्हती अशा सल्लागारांचा प्रभाव या तरुण राजावर पडला असावा का? बायबल तसे काही सांगत नाही. बायबल आपल्याला एवढेच सांगते की मनश्‍शे हा मूर्तिपूजा व क्रूर कामे करण्यात खूपच सरसावला. त्याने खोट्या दैवतांसाठी वेद्या उभ्या केल्या, स्वतःच्या मुलांचा बळी दिला, भूतविद्या करू लागला, जेरुसलेम येथील यहोवाच्या मंदिरात एक कोरीव मूर्ती उभी केली. चमत्कारीकरित्या त्याचा जन्म घडवून आणणाऱ्‍या देवाने त्याला त्याच्या वाईट कृत्यांबद्दल वारंवार इशारा दिला, पण मनश्‍शे इतका हट्टी झाला होता की त्याने या इशाऱ्‍यांकडे दुर्लक्ष केले.—वचन ३-१०.

शेवटी, यहोवाने मनश्‍शेला बेड्या घालून बॅबिलोनला नेऊ दिले. या बंदिवासात असताना मनश्‍शेला त्याच्या वागण्यावर विचार करण्याची संधी मिळाली. आता त्याला कळाले का, की त्याच्या दुर्बळ व निर्जीव मूर्त्यांमध्ये त्याचे संरक्षण करण्याचे सामर्थ्य नाही? लहानपणी त्याच्या वडिलांनी शिकवलेल्या देवाच्या मार्गांबद्दल तो विचार करू लागला का? याविषयी आपल्याला काही माहीत नाही पण मनश्‍शेने त्याचा दृष्टिकोन मात्र बदलला. अहवाल सांगतो: “तो आपला देव परमेश्‍वर यास शरण गेला . . . [तो] देवासमोर फार दीन झाला, त्याने त्याची प्रार्थना केली.” (वचन १२, १३) पण, इतकी वाईट पातके करणाऱ्‍या व्यक्‍तीला देव खरोखरच क्षमा करेल का?

मनश्‍शेने मनापासून केलेला पश्‍चात्ताप पाहून यहोवाला फार आनंद झाला. देवाने त्याच्या दयेची भीक ऐकली आणि त्याला “पुनः यरुशलेमेत आणून त्याचे राज्य त्यास दिले.” (वचन १३) त्याने खरा पश्‍चात्ताप केला आहे हे दाखवण्यासाठी त्याने त्याच्या वागण्यात सुधारणा केली. त्याच्या राज्यातून त्याने मूर्तिपूजा काढून टाकली. आणि त्याच्या लोकांना यहोवाची “उपासना” करण्याचा आर्जव केला.—वचन १५-१७.

आधी केलेल्या पापांबद्दल देवाची क्षमा मिळण्यास मी पात्र नाही, मी कुचकामी आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर मनश्‍शेचे उदाहरण लक्षात ठेवा. हा अहवाल देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेल्या पुस्तकात आहे. (रोमकर १५:४) यहोवा आपल्याला सांगू इच्छितो की तो “क्षमाशील” आहे. (स्तो. ८६:५) पातक्याने कोणते पाप केले होते ते नव्हे तर त्याने पश्‍चात्ताप केला होता की नाही हे यहोवाला महत्त्वाचे वाटते. पाप करणारा जेव्हा पश्‍चात्तापी अंतःकरणाने प्रार्थना करतो, चुकीचा मार्ग सोडून देतो आणि जे बरोबर आहे ते करण्याचा निश्‍चयपूर्वक प्रयत्न करतो तेव्हा मनश्‍शेप्रमाणे तोही ‘यहोवाला शरण’ जाऊ शकतो.—यशया १:१८; ५५:६, ७. (w११-E ०१/०१)