व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाची संघटना आहे का?

देवाची संघटना आहे का?

देवाची संघटना आहे का?

देवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टीत आपल्याला सुव्यवस्था दिसून येते. उदाहरणार्थ, आकाशात दिसणारे कोट्यवधी तारे एका प्रचंड गटाचे घटक आहेत. यांना आकाशगंगा म्हटले जाते. या आकाशगंगा आणि त्यांच्यामध्ये असलेले तारे व ग्रह अवकाशात शिस्तीने भ्रमण करत असतात. उदाहरणार्थ, आपला पृथ्वी ग्रह दर वर्षी, बरोबर ३६५ दिवस, ५ तास, ४८ मिनिटे व ४५.५१ सेकंदांच्या कालावधीत, आपल्या सर्वात जवळच्या ताऱ्‍याभोवती अर्थात सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालतो. शिस्तीचे व सुव्यवस्थेचे किती हे सुरेख उदाहरण!—१ करिंथकर १४:३३.

पण अशी शिस्त फक्‍त दृश्‍य सृष्टीतच दिसून येत नाही तर, स्वर्गातही देवाचे दूत शिस्तीने सेवा करतात असे बायबलमध्ये सांगितलेले आहे. निर्माणकर्त्याच्या उद्देशानुसार ते सेवा करत आहेत. संदेष्टा दानीएल याने एक दृष्टांत पाहिला. देवाच्या स्वर्गीय दरबारात प्रचंड संख्येत देवदूत असल्याचे त्याने पाहिले. “हजारो हजार त्याची सेवा करीत होते, आणि दहा हजार गुणित दहा हजार त्याच्यासमोर उभे राहिले होते.” (दानीएल ७:९, १०, पं.र.भा.) इतक्या प्रचंड संख्येच्या देवदूतांना अर्थात दहा कोटीपेक्षा अधिक असलेल्या देवदूतांना, पृथ्वीवरील आपल्या सेवकांना मदत करण्याकरता देव त्यांना जेव्हा सांगतो तेव्हा त्याच्या निर्देशनांचे पालन करण्याकरता किती शिस्तीची गरज असेल!—स्तोत्र ९१:११.

सर्वोच्च देव यहोवा शिस्त पाळणारा असला तरीसुद्धा तो थंड किंवा कडक नाही. तर, प्रेमळ व आनंदी देव आहे. त्याला आपल्या सृष्टीच्या हिताची काळजी आहे. (१ तीमथ्य १:११; १ पेत्र ५:७) हे आपल्याला, प्राचीन इस्राएल राष्ट्राशी व पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांशी तो ज्या प्रकारे वागला त्यावरून कळते.

प्राचीन इस्राएल—सुसंघटित राष्ट्र

प्राचीन इस्राएल लोकांना खऱ्‍या उपासनेस संघटित करण्याकरता यहोवा देवाने मोशेचा उपयोग केला. सीनायच्या रानातून प्रवास करत असताना त्यांनी जेव्हा तळ ठोकला होता त्यावर आपण थोडा विचार करू या. प्रत्येक कुटुंबाला हवे तिथे आपला तंबू उभारण्याची परवानगी दिली असती तर, किती गोंधळ माजला असता याचा आपण विचार करू शकतो. पण तसे झाले नाही. कारण यहोवाने, प्रत्येक वंशाने आपली छावणी कोठे उभी करायची याबद्दल स्पष्ट सूचना दिल्या होत्या. (गणना २:१-३४) एवढेच नव्हे तर, मोशेला दिलेल्या नियमशास्त्रात आरोग्याच्या बाबतीत आणि स्वच्छतेच्या बाबतीतही जसे की, मानवी विष्ठेची विल्हेवाट लावण्यासंबंधी स्पष्ट नियम होते.—अनुवाद २३:१२, १३.

इस्राएल राष्ट्र जेव्हा देवाने वचन दिलेल्या प्रदेशात राहायला गेले तेव्हा ते अनेक मार्गांनी अतिशय सुसंघटित होते. या राष्ट्राची १२ वशांमध्ये विभागणी करण्यात आली होती आणि प्रत्येक वंशाला ठराविक जमीन देण्यात आली होती. मोशेद्वारे यहोवा देवाने इस्राएल राष्ट्राला दिलेल्या नियमशास्त्रात जीवनाच्या प्रत्येक पैलूवर, जसे की, उपासना, विवाह, कुटुंब, शिक्षण, व्यापार, आहार, शेती, प्राण्यांची काळजी घेणे वगैरे बाबतीत नियम होते. * काही नियम अगदीच स्पष्ट व सविस्तर असले तरीसुद्धा या सर्व नियमांवरून यहोवाला त्याच्या लोकांची किती काळजी होती, हे दिसून येत होते. शिवाय या नियमांचे पालन केल्याने त्यांनाच आनंद होणार होता. यहोवाने केलेल्या या प्रेमळ व्यवस्थेनुसार वागल्याने इस्राएल लोकांवर यहोवाचा खास अनुग्रह होता.—स्तोत्र १४७:१९, २०.

मोशे एक सर्वगुणसंपन्‍न नेता होता. तरीपण, त्याचे यश-अपयश हे नेतृत्व करण्याच्या त्याच्या कौशल्यावर नव्हे तर देवाने घालून दिलेल्या व्यवस्थेशी तो कितपत एकनिष्ठ राहील यावर अवलंबून होते. जसे की, रानातून जाताना कोणत्या मार्गाने जायचे हे मोशेने कसे ठरवले? यहोवाने त्याला मार्गदर्शित केले; दिवसा मेघस्तंभाद्वारे तर रात्री अग्निस्तंभाद्वारे. (निर्गम १३:२१, २२) यहोवाने जरी मानवांचा उपयोग केला असला तरी, व्यवस्था मात्र त्याने स्वतः केली आणि आपल्या लोकांना मार्गदर्शन दिले. पहिल्या शतकातही तो असे करत असे.

आरंभीचे ख्रिस्ती—सुसंघटित होते

पहिल्या शतकात, प्रेषितांनी व शिष्यांनी आवेशाने प्रचार कार्य केल्यामुळे, आशिया व युरोपच्या अनेक भागांत ख्रिस्ती मंडळ्यांची स्थापना झाली. या मंडळ्या वेगवेगळ्या ठिकाणी असल्या तरी, त्या एक-एकट्या किंवा स्वतंत्र गटासारख्या नव्हत्या. तर त्या सुसंघटित होत्या. आणि प्रेषितांच्या प्रेमळ देखरेखीमुळे मंडळीतल्या बंधुभगिनींना फायदा झाला. जसे की, तीत नावाच्या एका बांधवाला प्रेषित पौलाने क्रेत येथे, ‘अपुऱ्‍या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करण्यास’ पाठवले. (तीत १:५) काही बांधवांकडे, ‘इतरांना एकत्रित कार्य करण्यास गोळा करण्याची’ कला होती; दुसऱ्‍या शब्दांत ते उत्तम “व्यवस्थापक” होते, असे पौलाने करिंथ मंडळीला लिहिले. (१ करिंथकर १२:२८, सुबोध भाषांतर; मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर) पण असे एकत्रितपणे कार्य कोणामुळे शक्य झाले? ‘देवाने जोडल्यामुळे’ किंवा ‘जुळवल्यामुळे’ हे सर्व बांधव असे एकत्रितपणे कार्य करू शकले, असे पौलाने म्हटले.—१ करिंथकर १२:२४, सुबोध भाषांतर; मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर.

ख्रिस्ती मंडळीत, देखरेख करण्यास ज्यांना नेमण्यात आले होते त्यांनी त्यांच्या सहबांधवांवर धनीपण गाजवले नाही. तर ते त्यांचे “साहाय्यकारी” होते. तेही देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार वागत होते आणि त्यांना ‘कळपासमोर एक कित्ता’ व्हायचे होते. (२ करिंथकर १:२४; १ पेत्र ५:२, ३) कोणताही मानव किंवा अपरिपूर्ण पुरुषांचा गट नव्हे तर मेलेल्यांतून जिवंत झालेला येशू ख्रिस्त “मंडळीचे मस्तक” आहे.—इफिसकर ५:२३.

करिंथ मंडळीतील वडील जेव्हा, इतर मंडळ्यांतील वडील करत असलेल्या कार्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य करत होते तेव्हा पौलाने त्यांना पत्राद्वारे असे लिहिले: “देवाच्या वचनाचा उगम तुमच्यापासून झाला काय? अथवा ते केवळ तुमच्याकडे आले काय?” (१ करिंथकर १४:३६) पौलाने त्यांना असा प्रश्‍न विचारला तेव्हा तो त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा करत नव्हता. तर तो त्यांना, त्यांच्या विचारसरणीत सुधारणा करण्यास मदत करत होता व हे दाखवून देत होता, की त्यांनी स्वतंत्रपणे कार्य करू नये. मंडळ्यांतील वडिलांनी जेव्हा प्रेषितांकडून आलेल्या मार्गदर्शनाचे पालन केले तेव्हा मंडळ्यांची भरभराट झाली.—प्रेषितांची कृत्ये १६:४, ५.

देवाचे प्रेम दिसून येते

आज देवाची संघटना वगैरे आहे का? पुष्कळ लोकांना, कोणत्याही धार्मिक संघटनेशी संलग्न राहायला आवडत नाही. पण, बायबलमधील पुराव्यांवरून कळते, की देवाने आपले उद्देश पूर्ण करण्याकरता नेहमी आपल्या संघटनेचा उपयोग केला. प्राचीन इस्राएल राष्ट्रातील त्याच्या उपासकांना व आरंभीच्या ख्रिश्‍चनांना त्यांच्या उपासनेत त्याने संघटित केले.

तेव्हा, पहिल्यासारखे आजही देव आपल्या लोकांना मार्गदर्शन पुरवत असावा असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही का? आपल्या उपासकांना शिस्तबद्ध व एकतेत चालण्याचे मार्गदर्शन देऊन यहोवा दाखवून देतो की तो त्यांच्यावर प्रेम करतो. मानवजातीबद्दलचा आपला उद्देश पूर्ण करण्याकरता यहोवा आज त्याच्या संघटनेचा उपयोग करीत आहे. पण ही संघटना आपण कशी ओळखू शकतो? पुढे काही तत्त्वे दिली आहेत ज्यांच्या आधारावर तुम्ही ही संघटना ओळखू शकाल.

खरे ख्रिस्ती एक महत्त्वाचे काम करण्यासाठी संघटित आहेत. (मत्तय २४:१४; १ तीमथ्य २:३, ४) येशूने आपल्या अनुयायांना सर्व राष्ट्रांना देवाच्या राज्याची आनंदाची बातमी सांगण्याची आज्ञा दिली. आणि आंतरराष्ट्रीय संघटनेविना हे काम पूर्ण करणे शक्यच नव्हते. उदाहरणार्थ, तुम्हाला जर फक्‍त एकाच व्यक्‍तीला जेवण द्यायचे असेल तर ते तुम्ही सहजरीत्या करू शकाल. पण जर तुम्हाला हजारो नव्हे कोट्यवधी लोकांना जेवण द्यायचे असेल तर तुम्हाला शिस्तबद्ध लोकांची मदत घ्यावी लागेल जे एकत्रितपणे कार्य करतील. खरे ख्रिस्ती त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी, “खांद्याला खांदा लावून” किंवा एकमेकांना सहकार्य देऊन “एकचित्ताने” पूर्ण करतात. (सफन्या ३:९) एका संयुक्‍त, एकविचारी संघटनेविना, हे बहुराष्ट्रीय, बहुभाषिक, बहुवांशिक कार्य पूर्ण होणे शक्य आहे का? मुळीच नाही.

खरे ख्रिस्ती एकमेकांना आधार व उत्तेजन देण्यास संघटित आहेत. एका मनुष्याने जर एकट्याच्या हिंमतीवर डोंगर चढायचा प्रयत्न केला तर तो, त्याला हवा तसा डोंगर चढू शकतो. शिवाय, ज्यांना डोंगर चढण्याचा अनुभव नाही अशांकडे त्याला लक्ष देण्याची गरज नाही. पण, समजा डोंगर चढताना त्याचा अपघात झाला किंवा तो अडचणीत सापडला तर त्याला मदत करायला कोणी नसल्यामुळे त्याच्या जीवावरही बेतू शकते. म्हणजे स्वतःला इतरांपासून दूर करणे शहाणपण नव्हे. (नीतिसूत्रे १८:१) येशूने दिलेली आज्ञा पूर्ण करण्याकरता ख्रिश्‍चनांनी एकमेकांना मदत करणे व आधार देणे अत्यंत गरजेचे आहे. (मत्तय २८:१९, २०) हार न मानता हे कार्य चालू ठेवण्याकरता बायबलमधील आवश्‍यक सूचना, प्रशिक्षण व उत्तेजन ख्रिस्ती मंडळीत दिले जाते. पण समजा सूचना व उपासना यांसाठी अशा सुसंघटित ख्रिस्ती सभाच नसल्या, तर यहोवाच्या मार्गांचे शिक्षण आपल्याला कोठे मिळू शकेल?—इब्री लोकांस १०:२४, २५.

खरे ख्रिस्ती देवाची सेवा ऐक्याने करण्यास सुसंघटित आहेत. येशूची मेंढरे त्याचा आवाज ऐकतात त्यामुळे त्याच्या नेतृत्वाखाली ते “एक कळप” बनतात. (योहान १०:१६) ते स्वतंत्र चर्चेसमध्ये किंवा गटांमध्ये विखुरलेले नाहीत किंवा शिकवणींच्या बाबतीत त्यांच्यात फूटी नाहीत. तर त्या “सर्वांचे बोलणे सारखे” आहे. (१ करिंथकर १:१०) आपल्याला ऐक्य हवे असेल तर आपल्यात शिस्त हवी आणि शिस्त हवी तर संघटना हवी. संयुक्‍त बंधूसमाजावरच देवाचे आशीर्वाद असू शकतात.—स्तोत्र १३३:१, ३.

देवावर प्रेम असल्यामुळे व बायबलमधील सत्ये आवडत असल्यामुळे कोट्यवधी लोक अशा संघटनेकडे आकर्षित झाले आहेत जी वर सांगितलेल्या गोष्टी व बायबलमधील इतर तत्त्वे पूर्ण करते. संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार सुसंघटित व संयुक्‍त होऊन देवाची इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करतात. आणि त्यांना देवाने दिलेल्या या अभिवचनाची खात्री आहे: “मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन. मी त्यांचा देव होईन, व ते माझे लोक होतील.” (२ करिंथकर ६:१६) तुम्ही जर यहोवाच्या संघटनेचा भाग बनून त्याची उपासना केली तर तुम्हाला हा अद्‌भुत आशीर्वाद मिळू शकतो. (w११-E ०६/०१)

[तळटीप]

^ यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले, इन्साईट ऑन द स्क्रिप्चर्स व्हॉल्यूम २, पृष्ठे २१४-२२० पाहा.

[१३ पानावरील चित्र]

इस्राएल लोकांची छावणी शिस्तबद्ध होती

[पृष्ठे १४, १५ वरील चित्रे]

संपूर्ण जगात प्रचार कार्य करण्यासाठी शिस्तीची गरज आहे

घरोघरचे सेवा कार्य

विपत्तीच्या वेळचे मदत कार्य

संमेलने

उपासना स्थळांचे बांधकाम