व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू पृथ्वीवर कोठून आला?

येशू पृथ्वीवर कोठून आला?

येशू पृथ्वीवर कोठून आला?

“[पिलात] पुन्हा सरकार वाड्यात जाऊन येशूला म्हणाला, ‘तू कोठला आहेस?’ परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही.”—योहान १९:९.

येशू रोमी गव्हर्नर पंतय पिलात याच्यासमोर उभा होता. त्याची चौकशी चालली होती. या चौकशीवर त्याचे जीवन-मरण अवलंबून होते. त्यावेळेस, पंतय पिलाताने त्याला हा प्रश्‍न विचारला होता. येशू इस्राएलच्या कोणत्या भागातून आला होता, हे पिलाताला माहीत होते. (लूक २३:६, ७) येशू साधा-सुधा माणूस नव्हता हेही त्याला माहीत होते. पृथ्वीवर येण्याआधी येशू जिवंत असावा, असा प्रश्‍न पिलाताच्या मनात होता का? या मूर्तिपूजक शासकाला सत्य समजल्यावर ते त्याने स्वीकारून त्यानुसार कार्य केले असते का? माहीत नाही. पण येशूने मात्र त्याला काहीच उत्तर दिले नाही. पिलाताला खरे तर सत्य व न्याय याच्यापेक्षा स्वतःचे पद राखण्याची जास्त काळजी लागली होती, हे नंतर स्पष्ट झाले.—मत्तय २७:११-२६.

येशू पृथ्वीवर कोठून आला होता, हे खरोखर जे जाणू इच्छितात, त्यांना ते सहज माहीत होऊ शकते. येशू ख्रिस्ताच्या उगमाबद्दलची स्पष्ट माहिती बायबलमध्ये दिलेली आहे. खालील माहिती पाहा.

त्याचा जन्म कोठे झाला होता? आता ज्याला इ.स.पू. २ म्हटले जाते त्या वर्षाच्या शरद ऋतुत, बेथलेहेमातील एका लहानशा यहुदी गावात अतिशय हलाखीच्या परिस्थितीत येशूचा जन्म झाला होता. औगुस्त कैसर याने त्याच वेळी नावनिशी करण्याचा हुकूम काढला होता. त्यामुळे, “गरोदर” असलेल्या मरीयेला तिचे दिवस भरत आले होते तरीसुद्धा आपला पती योसेफ याच्याबरोबर, योसेफाचे पूर्वज ज्या गावात होते त्या गावाला म्हणजे बेथलेहेमाला जावे लागले होते. वेगवेगळ्या गावांतून पुष्कळ लोक तेथे नावनिशी करायला आल्यामुळे योसेफ व मरीयेला राहायला जागा मिळाली नाही. मरीयेचे दिवस पूर्ण होत आल्यामुळे त्यांना एका तबेल्यात आसरा घ्यावा लागला. येथेच येशूचा जन्म झाला व त्याला गव्हाणीत ठेवण्यात आले.—लूक २:१-७.

अनेक शतकांआधी, बायबलमधील एका भविष्यवाणीत, येशूचा जन्म कोणत्या स्थळी होईल त्याचे भाकीत करण्यात आले होते. तेथे असे म्हटले होते: “हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुजमधून एक जण निघेल, तो मजसाठी इस्राएलाचा शास्ता होईल.” * (मीखा ५:२) बेथलेहेम हे खूप लहानसे गाव असल्यामुळे, यहुदाच्या हद्दीत असलेल्या शहरांच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. तरीपण या लहान गावाला एक मोठा बहुमान मिळाला होता. वचन दिलेला मशिहा किंवा ख्रिस्त या लहानशा गावातून, अर्थात बेथलेहेमातून येणार होता.—मत्तय २:३-६; योहान ७:४०-४२.

येशू लहानाचा मोठा कोठे झाला? ईजिप्तमध्ये काही काळ राहिल्यानंतर, येशूचे कुटुंब, जेरुसलेमच्या उत्तरेपासून जवळजवळ १०० किलोमीटर दूर असलेल्या गालील प्रांतातील नासरेथ नावाच्या शहरात राहायला गेले. त्या वेळी येशूला अजून तीन वर्षं पूर्ण झाले नव्हते. हा भाग अतिशय सुंदर होता. तेथे, शेतकरी, मेंढपाळ, मच्छीमार आपापला धंदा करून पोट भरत होते. अशातच, येशूचे संगोपन बेताचीच परिस्थिती असलेल्या एका मोठ्या कुटुंबात झाले.—मत्तय १३:५५, ५६.

मशिहाला “नासोरी म्हणतील” असे बायबलमधील एका भविष्यवाणीत अनेक शतकांआधी भाकीत करण्यात आले होते. शुभवर्तमान लेखक मत्तय म्हणतो, की येशूचे कुटुंब ‘नासरेथ नावाच्या गावी जाऊन राहिले; अशासाठी की, ‘त्याला नासोरी म्हणतील’ हे जे संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.’ (मत्तय २:१९-२३) नासोरीचा अर्थ, “धुमारा” अर्थात कोंब या इब्री शब्दाशी जुळतो. मत्तय खरे तर, यशयाने केलेल्या भविष्यवाणीचा उल्लेख करत होता. “इशायाच्या बुंधाला धुमारा फुटेल,” अर्थात दाविदाचा बाप इशाया याच्या वंशातून मशिहा येईल, असे यशयाने भविष्यवाणीत म्हटले होते. (यशया ११:१) आणि येशू खरोखरच, इशायाचा पुत्र दावीद याच्या वंशातून आला होता.—मत्तय १:६, १६; लूक ३:२३, ३१, ३२.

येशू पृथ्वीवर येण्याआधी कोठे होता? बेथलेहेमातील तबेल्यात जन्म होण्याआधी येशू जिवंत होता, अशी बायबलची शिकवण आहे. आधी उल्लेखण्यात आलेल्या मीखाच्या भविष्यवाणीत पुढे म्हटले आहे, की येशूचा “उद्‌भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.” (मीखा ५:२) पृथ्वीवर मानव म्हणून जन्म होण्याआधी येशू स्वर्गात एक आत्मिक प्राणी म्हणून जिवंत होता. तेथे तो देवाचा ज्येष्ठ पुत्र होता. येशूनेच स्वतः असे म्हटले होते, की तो ‘स्वर्गातून उतरला आहे.’ (योहान ६:३८; ८:२३) पण हे कसे शक्य झाले?

यहोवा देवाने आपल्या पवित्र आत्म्याद्वारे एक चमत्कार केला. * त्याने, त्याच्या स्वर्गीय पुत्राचे जीवन, यहुदी कुमारी मरीया हिच्या गर्भाशयात स्थलांतरीत केले. यामुळे येशूचा परिपूर्ण मानव म्हणून जन्म होऊ शकला. असा चमत्कार करणे सर्वशक्‍तिमान देवाला सहज शक्य आहे. या चमत्काराविषयी मरीयेला समजावून सांगताना एका देवदूताने म्हटले, ‘देवाला काहीच अशक्य नाही.’—लूक १:३०-३५, ३७.

येशू कोठून आला फक्‍त इतकेच बायबल आपल्याला सांगत नाही. तर, मत्तय, मार्क, लूक व योहान या बायबलमधील चार शुभवर्तमानांत येशूने त्याच्या जीवनकाळात काय काय केले त्याचा तपशीलदेखील दिला आहे. (w११-E ०४/०१)

[तळटीपा]

^ एफ्राथा (किंवा एफ्राथ) हे बेथलेहेमाचे पूर्वीचे नाव आहे.—उत्पत्ति ३५:१९.

^ बायबलमध्ये देवाचे नाव यहोवा असे दिले आहे.