व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावर खरोखर कोण राज्य करत आहे?

जगावर खरोखर कोण राज्य करत आहे?

जगावर खरोखर कोण राज्य करत आहे?

संघटित गुन्हेगारीच्या म्होरक्यांना तुम्ही कदाचित कधी भेटला नसाल. याचा अर्थ ते अस्तित्वात नाहीत असा होतो का? गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख, स्वतःची ओळख लपवण्यात किंवा तुरुंगात राहूनही इतर गुंडांकरवी आपला कारभार चालवण्यात पटाईत असतात. तरीही, अंमली पदार्थांसाठी होणारे झगडे, वेश्‍याव्यवसाय, आणि मानवी तस्करी यांसारख्या अनेक काळ्या धंद्यांबद्दलच्या वर्तमानपत्रातील बातम्या आपल्याला अशा गुंडांच्या भ्रष्ट करणाऱ्‍या प्रभावाची, त्यांच्या कार्यांच्या भयंकर परिणामांची व त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. त्यांच्या वागणुकीमुळे मानवी समाजावर होत असलेल्या हानीवरून आपल्याला कळते की हे गुंड अस्तित्वात आहेत.

सैतान एक खरी आत्मिक व्यक्‍ती आहे असे देवाचे वचन, बायबल सांगते. तो अशा एका शक्‍तिशाली टोळीप्रमुखाप्रमाणे आहे जो “खोटी महत्कृत्ये” व “अनीतिजनक कपट” यांच्याद्वारे कसेही करून आपली इच्छा पूर्ण करून घेतो. खरे पाहता, तो “तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो,” असे बायबल सांगते. (२ थेस्सलनीकाकर २:९, १०; २ करिंथकर ११:१४) सैतानाच्या कार्यांमुळे मानवजातीची होत असलेली हानी यावरून आपल्याला कळते की तो अस्तित्वात आहे. तरीही एक अदृश्‍य, दुष्ट आत्मिक व्यक्‍ती अस्तित्वात आहे यावर विश्‍वास ठेवणे अनेकांना कठीण वाटते. सैतानाबद्दल बायबल काय म्हणते ते जाणून घेण्यापूर्वी आपण आधी हे पाहू या की सैतान खरोखरच एक व्यक्‍ती आहे या वस्तुस्थितीवर विश्‍वास करण्यापासून रोखणाऱ्‍या काही चुकीच्या धारणा व समजुती कोणत्या आहेत.

“देव जर प्रेमळ आहे तर मग त्याने सैतानाला कसे काय बनवले?” बायबल जर म्हणते की देव चांगला आणि परिपूर्ण आहे, तर मग, त्याने एका दुष्ट, वाईट, मत्सरी व्यक्‍तीची निर्मिती करणे तर्काला न पटणारे आहे. खरे पाहता, बायबलमध्ये असा कोठेही उल्लेख नाही की देवाने अशा व्यक्‍तीला बनवले. याउलट, बायबल देवाविषयी असे म्हणते: “तो दुर्ग आहे; त्याची कृति परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्‍वसनीय देव आहे; त्याच्याठायी अनीति नाही; तो न्यायी व सरळ आहे.”—अनुवाद ३२:४; स्तोत्र ५:४.

विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की देवाने निर्माण केलेली परिपूर्ण व्यक्‍ती जे बरोबर आहे त्याच्या उलट वागू शकते का? देवाने मानवांना रोबोटप्रमाणे बनवले नाही तर त्यांना इच्छा स्वातंत्र्य दिले अर्थात स्वतःहून निवड करण्याची योग्यता त्यांना दिली. म्हणून, एक परिपूर्ण, हुशार व्यक्‍ती चांगले किंवा वाईट काम करण्याची निवड करू शकते. खरे पाहता, इच्छा स्वातंत्र्य दिलेल्या बुद्धिमान प्राण्यांची कार्येच केवळ, मग ते मानवप्राणी असोत अथवा आत्मिक प्राणी असोत, नैतिकरीत्या बरोबर किंवा चूक ठरवली जाऊ शकत होती.

तसे आहे तर मग देव, एकीकडे त्याने निर्माण केलेल्या मानव व आत्मिक प्राण्यांना नैतिक स्वातंत्र्य देतो आणि दुसरीकडे ते निवड करत असलेले वाईट कृत्य करण्यापासून त्यांना अडवतो असे होऊ शकत नाही. सैतानाने त्याच्या इच्छा स्वातंत्र्याचा गैरफायदा कसा घेतला त्याबद्दल सांगताना येशूने म्हटले: “तो सत्यात टिकला नाही.” (योहान ८:४४) यावरून स्पष्ट कळते की सैतान एकेकाळी परिपूर्ण आत्मिक व्यक्‍ती होता, जो “सत्यात” होता. * यहोवा देवाने मानव व आत्मिक प्राण्यांना इच्छा स्वातंत्र्य दिले कारण तो त्यांच्यावर प्रेम करतो व त्याचा त्यांच्यावर विश्‍वास आहे.—पृष्ठ ६ वरील  “परिपूर्ण मानव परिपूर्णता गमावू शकतो का?” ही चौकट पाहा.

“सैतान देवाचा सेवक आहे” ही कल्पना बायबलच्या ईयोब नावाच्या पुस्तकात आहे असे काहींना वाटते. सैतान “पृथ्वीवर इकडेतिकडे हिंडून फिरून” आला, या बायबलमधील वाक्यावर एका बायबल भाष्यकाराने असे म्हटले, की सैतान हा त्या प्राचीन पर्शियन गुप्तहेरांप्रमाणे आहे जे आपल्या राजाला माहिती पुरवण्याकरता सगळीकडे फिरायचे. (ईयोब १:७) पण मग जर सैतान खरोखरच देवाचा गुप्तहेर असता तर त्याने देवाला, तो “पृथ्वीवर इकडेतिकडे हिंडून फिरून” आला आहे असे सांगायची काय गरज होती? ईयोबाच्या पुस्तकात सैतानाची खरी ओळख त्याच्या नावाने करून देण्यात आली आहे. सैतान या शब्दाचा अर्थ “विरोधक” असा होत असल्यामुळे खरे तर तो देवाचा दोस्त नव्हे तर त्याचा प्रमुख वैरी आहे. (ईयोब १:६) असे आहे तर मग, सैतान देवाचा सेवक आहे ही कल्पना मुळात आली कोठून?

इ.स. पहिल्या शतकाच्या सुरुवातीला यहुद्यांच्या बनावटी पुस्तकांत, सैतान देवाशी हुज्जत घालत आहे पण त्याचबरोबर त्याच्या इच्छेच्या अधीनही आहे असे वर्णन करण्यात आले आहे. इतिहासकार, जे. बी. रस्सल यांनी त्यांच्या मेफिस्टोफेलेस या पुस्तकात असे वर्णन केले आहे की, प्रोटेस्टंट धर्म सुधारक मार्टिन ल्यूथर यांनी सैतानाला देवाच्या हातातले हत्यार, म्हणजे “आपल्या बागेची मशागत करण्यासाठी तो उपयोगात आणत असलेला विळा किंवा फावडे म्हटले आहे.” यामागची कल्पना अशी की, ‘फावड्याला निदणाची कापणी करण्यात आनंद वाटतो,’ व ते देवाच्या शक्‍तिशाली हातातच राहून त्याची इच्छा पूर्ण करते असे रस्सल पुढे म्हणतात. ल्यूथरची ही शिकवण, फ्रेंच तत्त्वज्ञानी जॉन कॅल्विन यांनी स्वीकारली असली तरी न्यायाची जाणीव बाळगणाऱ्‍या अनेकांना ती पटली नाही. एक प्रेमळ देव वाईट कृत्ये घडण्यास अनुमती कशी देऊ शकतो व ती वाईट कृत्ये घडण्याची इच्छा तरी कशी बाळगू शकतो? (याकोब १:१३) या अशा धारणांमुळे, आणि विसाव्या शतकात घडलेल्या भीतीदायक घटनांमुळे, पुष्कळ लोक देव आणि सैतान हे दोघेही अस्तित्वात नाहीत असा विश्‍वास करू लागले आहेत.

“सैतान ही कोणी खरी व्यक्‍ती नाही तर देवाचा दुर्गुण आहे” सैतान ही खरी व्यक्‍ती नसून देवाचाच दुर्गुण आहे असे जर आपण धरून चाललो तर बायबलमधील काही उतारे आपल्याला समजणार नाहीत. जसे की, ईयोब २:३-६ या उताऱ्‍यात देव कोणाशी बोलत होता? तो ईयोबाच्या दुर्गुणाशी बोलत होता की स्वतःच्या दुर्गुणाशी? तसेच, देव एका क्षणी ईयोबाच्या सद्‌गुणाची वाहवा करत होता आणि दुसऱ्‍याच क्षणी तो त्याच्यातल्या दुर्गुणाला ईयोबाची परीक्षा घेऊ देत होता का? देवाबद्दल असे बोलणे हे “त्याच्या ठायी अन्याय मुळीच नाही” असे बोलण्यासारखे नव्हे तर तो एक विकृत देव आहे असे बोलण्यासारखे आहे. (स्तोत्र ९२:१५) पण या उलट, देवाने “आपला हात पुढे करून” ईयोबाची हानीसुद्धा केली नाही. यावरून स्पष्ट होते की, सैतान हा देवाचा दुर्गुण नसून ती एक खरीखुरी आत्मिक व्यक्‍ती आहे जिने स्वतःला देवाचा शत्रू बनवले.

जगावर नेमके कोण राज्य करत आहे?

सैतान अस्तित्वात आहे ही कल्पना आता जुनी झाली आहे असे अनेकांना वाटते. पण, सैतान अस्तित्वात नाही असे जर ते मानत असतील तर आज दुष्टाईने इतका कहर का माजवला आहे, त्याचे समाधानकारक उत्तर त्यांना मिळणार नाही. खरे पाहता, सैतान अस्तित्वात असल्याची कल्पना नाकारून अनेक लोकांनी देवाला आणि सर्व प्रकारच्या नैतिक दर्जांना धुडकावले आहे.

एकोणीसाव्या शतकातील शार्ल-पायर बोडलेयर या कवीने असे लिहिले: “सैतानाची सर्वात धूर्त चलाखी म्हणजे तो अस्तित्वात नाही, अशी लोकांना खात्री करून देणे.” सैतानाने स्वतःची ओळख लपवून खरे तर देवाच्या अस्तित्वाविषयी शंका निर्माण केल्या आहेत. जर सैतान अस्तित्वात नाही तर मग देव या सर्व दुष्टाईला कारणीभूत ठरणार नाही का? आणि लोकांनी असाच विश्‍वास करावा हेच तर सैतानाला हवे आहे, नाही का?

गुन्हेगारांच्या म्होरक्याप्रमाणे, सैतान आपले हेतू साध्य करण्यासाठी आपली ओळख लपवतो. त्याचा हेतू काय आहे? याचे उत्तर बायबल देते: “विश्‍वास न ठेवणाऱ्‍या लोकांची मने ह्‍या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.”—२ करिंथकर ४:४.

पण, एक महत्त्वाचा प्रश्‍न उरतो. दुष्टाई व दुःख यास कारणीभूत असलेल्या या अज्ञात सूत्रधाराचे देव काय करणार आहे? याबद्दल पुढील लेखात चर्चा केली जाईल. (w११-E ०९/०१)

[तळटीप]

^ परि. 6 देवाने सैतानाच्या बंडाळीचा लगेचच अंत का केला नाही हे समजण्याकरता, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील ११ वा अध्याय पाहा.

[२५ पानांवरील संक्षिप्त आशय]

सैतान देवाचा सेवक आहे की त्याचा विरोधक?

[२६ पानांवरील चौकट/चित्र]

 परिपूर्ण मानव परिपूर्णता गमावू शकतो का?

देवाने त्याच्या बुद्धिमान प्राण्यांना परिपूर्ण बनवले होते तरीसुद्धा त्यांना काही मर्यादा होत्या. आदामाला परिपूर्ण असे निर्माण केले होते तरी देवाने त्याच्यावर काही मर्यादा घातल्या होत्या ज्यांचे पालन त्याला करावे लागणार होते. जसे की, त्याने माती, वाळू किंवा लाकूड खाल्ले असते तर त्याचे दुष्परिणाम त्याला भोगावेच लागले असते. जर त्याने गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचे उल्लंघन करून उंच डोंगरावरून खाली उडी मारली असती तर तो गंभीर जखमी झाला असता किंवा मेला असता.

त्याचप्रमाणे, परिपूर्ण प्राणी मग ते मानव असोत अथवा आत्मिक असोत त्यांनी देवाने घालून दिलेल्या नैतिक मर्यांदाचे उल्लंघन केले असते तर त्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागणार होते. म्हणजेच, जेव्हा एक बुद्धिमान प्राणी त्याच्या इच्छा स्वातंत्र्याचा गैरवापर करतो तेव्हा तो सहजपणे चुका करून पापात पडू शकतो.—उत्पत्ति १:२९; मत्तय ४:४.