व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘हे परमेश्‍वरा तू मला ओळखतोस’

‘हे परमेश्‍वरा तू मला ओळखतोस’

देवाच्या जवळ या

‘हे परमेश्‍वरा तू मला ओळखतोस’

“आपली काळजी कोणी करत नाही किंवा आपल्याला कोणी समजून घेत नाही ह्‍यापेक्षा दुसरे कोणतेही ओझे मोठे असू शकत नाही,” असे आर्थर एच. स्टेनबॅक या लेखकाने म्हटले. तुम्हालाही कधी असे जाणवले आहे का? तुमची कोणीही काळजी घेत नाही किंवा तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात त्याची कोणाला जाणीव नाही किंवा तुम्हाला कोणी समजून घेत नाही, तुमच्या भावनांची कोणी कदर करत नाही असे तुम्हाला कधी वाटले आहे का? असे असल्यास, तुम्हाला या गोष्टीतून सांत्वन मिळेल: यहोवा त्याच्या उपासकांची इतकी काळजी घेतो की, त्यांच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्‍या घडामोडींचीदेखील तो दखल घेतो. दाविदाच्या १३९ व्या स्तोत्रातील शब्द आपल्याला या सत्याची हमी देतात.

दाविदाला खात्री होती की देव त्याच्यात आवड घेत आहे; म्हणूनच तो म्हणाला: ‘हे परमेश्‍वरा, तू मला पारखले आहे, तू मला ओळखतोस.’ (वचन १) दाविदाने याठिकाणी सुरेख शब्दचित्र रेखाटले आहे. ‘पारखणे’ या हिब्रू क्रियापदाचा अर्थ कच्चे धातू मिळवण्यासाठी खोदकाम करणे (ईयोब २८:३), एखाद्या देशाची पाहणी करणे (शास्ते १८:२) किंवा एखाद्या कायदेशीर खटल्याच्या वस्तुस्थितींचे बारकाईने परीक्षण करणे (अनुवाद १३:१४) असा होऊ शकतो. होय, यहोवा आपल्याला चांगल्या प्रकारे जाणतो. “मला,” या सर्वनामाचा उपयोग करून दावीद असे सांगतो की देव त्याच्या प्रत्येक उपासकामध्ये व्यक्‍तिगत रीत्या आवड घेतो. तो त्यांचे बारकाईने परीक्षण करतो आणि प्रत्येकाला व्यक्‍तिशः ओळखतो.

देव किती बारकाईने परीक्षण करतो त्याबद्दल दावीद आणखी सविस्तरपणे असे सांगतो: “माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस.” (वचन २) यहोवा ‘दूर’ अर्थात स्वर्गात आहे. तरीसुद्धा आपण दिवसाच्या शेवटी बसतो म्हणजे थकून-भागून घरी येतो आणि दुसऱ्‍या दिवशी सकाळी दिवसभराच्या कामासाठी उठतो याची त्याला जाणीव आहे. त्याला आपले विचार, इच्छा आणि हेतू काय आहेत हे माहीत आहे. यहोवा अशा बारीकसारीक गोष्टींचे परीक्षण करतो याची दाविदाला भीती वाटत होती का? नाही, उलट यात त्याला आनंद वाटत होता. (वचन २३) असे का?

देव त्याच्या उपासकांचे बारकाईने निरीक्षण का करतो यामागे त्याचा एक चांगला हेतू आहे हे दाविदाला माहीत होते. या हेतूचा दाविदाने उल्लेख करत म्हटले: “तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस. आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे.” (वचन ३) आपले दररोजचे ‘वर्तनक्रम’ म्हणजे, आपल्या चुका त्याचबरोबर आपली चांगली कामेही यहोवाला दिसतात. मग तो आपले लक्ष कशावर केंद्रित करतो, चांगल्या की वाईट कामावर? एक शेतकरी जसा मौल्यवान धान्य मिळवण्यासाठी सर्व भूसा पाखडून काढतो तसेच ‘बारकाईने पाहणे’ असे भाषांतरीत केलेल्या हिब्रू वाक्यांशाचा अर्थ, “चाळणे” किंवा “पाखडणे” असा होऊ शकतो. “माहिती” असणे असे भाषांतरीत केलेल्या हिब्रू शब्दाचा अर्थ “जतन करणे” असा होऊ शकतो. यहोवाचे उपासक दररोज जे बोलतात आणि जे काही करतात त्यातल्या चांगल्या गोष्टींना तो मौल्यवान समजतो. का? कारण, त्याच्या गौरवाकरता ते करत असलेल्या प्रयत्नांची तो कदर करतो.

स्तोत्र १३९ आपल्याला शिकवते की यहोवा आपल्या उपासकांची मनापासून काळजी घेतो. तो दररोज त्यांचे बारकाईने निरीक्षण करतो आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून असतो. ते ज्या समस्यांना सामोरे जातात त्या त्याला माहीत आहे आणि या समस्यांमुळे त्यांच्या मनात होणाऱ्‍या वेदना व दुःख त्यालाही जाणवते. अशा काळजीवाहू देवाची उपासना करण्यास तुम्ही प्रवृत्त होता का? होत असल्यास मग, तुम्ही खात्री बाळगू शकता की यहोवा ‘तुमचे कार्य व त्याच्यावर दाखवलेली प्रीती’ तो कधीही विसरणार नाही.—इब्री लोकांस ६:१०. (w११-E ०९/०१)