इफ्ताहाच्या मुलीसारखं मला बनायचं होतं
इफ्ताहाच्या मुलीसारखं मला बनायचं होतं
जोएना सोन्स यांच्याद्वारे कथित
मी किशोरवयीन होते तेव्हाच माझ्या मनात इफ्ताहाच्या मुलीसारखं बनण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. माझ्या मनात काय होतं आणि मी तिच्यासारखी कशी बनले ते मी तुम्हाला सांगते.
मुंबई इथं १९५६ साली भरलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या एका संमेलनात मी पहिल्यांदा उपस्थित राहिले. तिथंच माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्या संमेलनात इफ्ताहाच्या मुलीवर एक भाषण देण्यात आलं होतं आणि या भाषणाचा माझ्या मनावर खोलपर्यंत प्रभाव पडला.
तुम्ही कदाचित बायबलमध्ये इफ्ताहाच्या मुलीबद्दल वाचलं असेल. ती किशोरावस्थेत होती तेव्हाच तिनं लग्न न करण्याचं ठरवलं होतं. यामुळं तिच्या वडिलांना त्यांनी दिलेली एक शपथ पूर्ण करता आली. इफ्ताहाच्या या मुलीनं, अविवाहित राहून यहोवाच्या घरात किंवा निवासमंडपात मरेपर्यंत सेवा केली.—शास्ते ११:२८-४०.
मला इफ्ताहाच्या मुलीसारखं बनायचं होतं. पण माझ्यासमोर एक मोठी समस्या होती. भारतात त्या काळी, एका मुलीनं अविवाहित राहणं हे संस्कृतीच्या विरुद्ध जाण्यासारखं मानलं जायचं.
माझं कुटुंब
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील उडुपी या शहरात राहणाऱ्या बेंजमिन व मार्सलिना सोन्स यांना झालेल्या सहा मुलांपैकी मी पाचवी होते. आमची मातृभाषा तुळू आहे. जवळजवळ २० लाख लोक ही भाषा बोलतात. पण, उडुपीतील बहुतेक लोकांप्रमाणं आमचंही शिक्षण कन्नड भाषेतच झालं.
या भागात राहणारे लोक, विवाह आणि मुलं यांना खूप महत्त्व देतात. लहानाची मोठी होत असताना, मला कधीच, तुळूमध्ये लोकांनी, अविवाहित असल्यामुळं, एकाकीपणामुळं किंवा घरच्यांची आठवण येत असल्यामुळं उदास आहे, असं म्हटल्याचं आठवत नाही. जणू काय त्या परिस्थिती अस्तित्वातच नव्हत्या. कारण आमच्या घरात माझे आजी-आजोबा, काका, मामा, आत्या, मावश्या आणि या सर्वांची मुलं असा मोठा गोतावळा राहत होता.
आमची संस्कृती मातृप्रधान असल्यामुळं, मुलं ही आईच्या कुटुंबाचा भाग आहेत असं मानलं जायचं. आईकडून वंशावळ काढली जायची आणि मुलींना वारशातला मोठा हिस्सा मिळायचा. काही तुळू संस्कृतींमध्ये तर मुलीचं लग्न झाल्यावरही ती आपल्या नवऱ्यासोबत आपल्या आईच्या घरी राहू शकत होती.
पण आमचं कुटुंब ख्रिश्चन बनल्यामुळं आमच्या घरातलं वातावरण थोडं वेगळं होतं. दररोज संध्याकाळी माझे आजोबा घरी कौटुंबिक उपासना घ्यायचे. ते प्रार्थना करायचे आणि तुळू भाषेतल्या बायबलमधून एखादा भाग मोठ्यानं वाचायचे. ते जेव्हा जेव्हा त्यांचं पत्रावळ्या झालेलं बायबल, आम्हाला त्यातून काहीतरी वाचून दाखवण्यासाठी उघडायचे तेव्हा तेव्हा आम्हाला ते जणू काय आमच्यासमोर दागिन्यांची पेटी उघडत आहेत असं वाटायचं. आम्हाला सर्वांना ते खूप आवडायचं. मला स्तोत्र २३:१ या वचनाचं कुतूहल वाटायचं. तिथं म्हटलं आहे: “यहोवा माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही.” ‘हा यहोवा कोण आहे, आणि त्याला मेंढपाळ का म्हटलं आहे?’ असा प्रश्न माझ्या मनात यायचा.
माझ्या डोळ्यांवरून “खपल्या” पडल्या
दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक मंदी आल्यामुळं आम्ही उडुपीपासून सुमारे ९०० किलोमीटर दूर असलेल्या मुंबई येथे राहायला आलो. तेथे, १९४५ साली दोन यहोवाचे साक्षीदार माझ्या वडिलांना भेटायला आले आणि त्यांनी त्यांना बायबलवर आधारित एक पुस्तिका दिली. कोरड्या जमिनीवर पावसाचा वर्षाव होतो तेव्हा ती जमीन जशी ते पाणी जणू काय गटागटा पिऊन घेते तसे माझ्या वडिलांनी त्या पुस्तिकेतील संदेश वाचून काढला आणि कन्नड बोलणाऱ्या इतरांना
तो संदेश उत्साहानं सांगू लागले. १९५० सालच्या सुरुवातीपर्यंत तर, मुंबईमध्ये असलेल्या एका लहानशा अभ्यास गटाची कन्नड भाषेतील पहिली मंडळी झाली होती.आईबाबांनी आम्हा मुलांमध्ये बायबल वाचनाची गोडी निर्माण केली होती आणि उत्तम शिक्षक होण्याचं त्यांनी आम्हाला उत्तेजन दिलं. दररोज ते आमच्यासोबत प्रार्थना करण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी संधी शोधायचे. (अनुवाद ६:६, ७; २ तीमथ्य ३:१४-१६) बायबल वाचताना असंच एकदा मला जणू, माझ्या डोळ्यांवरच्या खपल्या पडल्यासारखं वाटलं. यहोवा आपल्या उपासकांना मार्गदर्शन देतो, त्यांना आध्यात्मिक अन्न देतो आणि त्यांचं संरक्षण करतो म्हणून त्याची तुलना एका मेंढपाळाशी केली आहे हे मला समजलं.—स्तोत्र २३:१-६; ८३:१८.
यहोवानं माझा हात धरला आहे
मुंबईमध्ये १९५६ साली झालेलं अधिवेशन मी कधीही विसरणार नाही कारण त्या अधिवेशनानंतर काही काळातच माझा बाप्तिस्मा झाला होता. सहा महिन्यांनंतर मीदेखील माझा मोठा भाऊ प्रभाकर याच्यासारखं पूर्ण वेळेची सुवार्तिक बनले. मला लोकांना बायबलमधली सत्ये सांगायची उत्सुकता असायची, पण भीतीमुळं माझ्या तोंडून शब्द फुटायचे नाहीत. मी बोलताना अडखळायचे आणि माझा आवाज कापरा व्हायचा. ‘मी हे काम फक्त यहोवाच्या मदतीनंच करू शकते,’ असं मी स्वतःला सांगायचे.
यहोवानं मला कॅनडाचे होमर व रूथ मॅके या मिशनरी जोडप्याच्या रुपात मदत पाठवली. यु.एस.ए., न्यू यॉर्क येथे १९४७ साली झालेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या मिशनरी प्रशालेला हे मिशनरी जोडपं उपस्थित राहिलं होतं. मी जेव्हा माझ्या सेवेतील पहिली पावलं घेतली तेव्हा या जोडप्यानं जणू काय माझा हात धरला. रूथ वेळोवेळी माझ्याबरोबर घरोघरच्या सेवेत सुवार्ता कशी सादर करायची त्याची तालीम करायची. तिनं माझी नस ओळखली होती. माझे थरथरते हात आपल्या हातात घेऊन ती मला म्हणायची: “ठीक आहे जोएना, काळजी करू नकोस. चल पुढच्या घरी जाऊ या.” तिच्या त्या प्रेमळ आवाजानं मला धीर यायचा.
एकदा मला सांगण्यात आलं, की एलिझबेथ चक्रनारायण नावाची एक वृद्ध अनुभवी बायबल शिक्षिका सेवेमध्ये तुझी सोबतीण असेल. माझ्या मनात प्रश्न: ‘या बहिणीबरोबर मी कशी काय राहेन? ती माझ्यापेक्षा वयानं किती मोठी आहे.’ पण खरं तर ती खूप चांगली बहीण निघाली. मला अशीच सोबतीण हवी होती.
“खरंतर आपण कधीच एकटे नसतो”
आम्हा दोघींना मिळालेली पहिली नेमणूक, मुंबईपासून ४०० किलोमीटर दूर असलेले औरंगाबाद या ऐतिहासिक शहरात होती. जवळजवळ दहा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात आम्ही फक्त दोघीच साक्षीदार होतो, हे आम्हा दोघींना लगेच जाणवलं. आणि त्यातल्या त्यात मला, त्या शहरात मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी मराठी भाषा शिकावी लागली.
कधीकधी मला खूप एकटं पडल्यासारखं वाटायचं, आणि मी आईविना पोर असल्याप्रमाणे रडायचे. पण एलिझबेथच्या आवाजात, आईच्या आवाजात असतो तसा गोडवा होता. ती मला प्रोत्साहन द्यायची. ती मला म्हणायची: “आपल्याला कधीकधी एकटं वाटू शकतं हे खरं आहे, पण माहीतए, खरंतर आपण कधीच एकटे नसतो. तू तुझ्या मित्र-मैत्रिणींपासून, कुटुंबापासून दूर असशील, पण यहोवा नेहमी तुझ्याजवळ आहे. त्याला आपला मित्र बनव आणि बघ तुझा एकटेपणा कुठल्या कुठं पळून जाईल.” आजही मी तिनं दिलेला तो सल्ला माझ्या मनाच्या कप्प्यात जपून ठेवलाय.
कधीकधी आमच्याजवळ बससाठी पैसे नसायचे तेव्हा आम्ही दररोज, धूळ मातीच्या रस्त्यावरून, गर्मी असो वा थंडी जवळजवळ २० किलोमीटर चालायचो. उन्हाळ्यात तिथं ४० डिग्रीपर्यंत उष्णता वाढायची. पावसाळ्यात कित्येक महिन्यांपर्यंत काही भागात चिखल राहायचा. पण हवामानापेक्षा आम्हाला तिथल्या लोकांच्या सांस्कृतिक दृष्टिकोनाचा जास्त त्रास व्हायचा.
स्त्रिया पुरुषांशी चारचौघांत बोलायच्या नाहीत; ते पुरुष त्यांचे कोणी नातेवाईक असतील तरच. आणि स्त्रिया पुरुषांना शिकवायच्या नाहीत. त्यामुळं लोकांनी आमची थट्टा केली,
आम्हाला बरं-वाईट म्हटलं. पहिल्या सहा महिन्यांपर्यंत साप्ताहिक बायबल सभांसाठी आम्ही दोघीच होतो. हळूहळू मग आस्थेवाईक लोक सभांना येऊ लागले. मग आमचा एक लहानसा गट तयार झाला आणि त्यातील काही जण आमच्याबरोबर सेवेत येऊ लागले.“आपलं हुन्नर वाढवत राहा”
अडीच वर्षांनंतर आम्हाला पुन्हा मुंबईला नेमण्यात आलं. तिथं एलिझबेथनं प्रचार कार्य सुरू ठेवलं, आणि मला मात्र माझ्या वडिलांना मदत करायला सांगण्यात आलं. तेव्हा माझे वडीलच एकटे, कन्नड भाषेच्या प्रकाशनांचं भाषांतर करत होते. शिवाय मंडळीतही त्यांना भरपूर जबाबदाऱ्या होत्या. त्यामुळं मी जेव्हा त्यांच्याबरोबर काम करायला गेले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला.
माझ्या आईबाबांनी १९६६ मध्ये उडुपीला आमच्या पूर्वीच्या घरी पुन्हा जायचं ठरवलं. मुंबई सोडताना बाबा मला म्हणाले: “आपलं हुन्नर वाढवत राहा मुली. सोप्या आणि स्पष्ट शब्दांत भाषांतर कर. फाजील आत्मविश्वास बाळगू नकोस, आणि नेहमी नम्र राहा. यहोवावर अवलंबून राहा.” हा त्यांचा शेवटला सल्ला होता, कारण उडुपीला गेल्यानंतर काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. आजही मी माझ्या भाषांतराच्या कामात, बाबांनी दिलेल्या सल्ल्याचं पालन करण्याचा प्रयत्न करत आहे.
“तुला संसार, मुलं-बाळं नकोत का?”
भारतातील परंपरेनुसार येथील पालक आपल्या मुलांची लहान वयातच लग्नं लावून देतात आणि कुटुंब वाढवण्याचं उत्तेजन देतात. मी तर अविवाहित होते. त्यामुळं लोक मला सारखं विचारायचे, “तुला संसार, मुलं-बाळं नकोत का? म्हातारी झाल्यावर कोण तुझी काळजी घेईल? तुला एकटं वाटणार नाही का?”
लोक असं मला सारखंसारखं बोलून दाखवत असल्यामुळं मी कधीकधी खूप निराश व्हायचे. मी लोकांसमोर कधी माझ्या भावना बोलून दाखवल्या नाहीत, पण एकांतात यहोवापुढं माझं मन मोकळं करायचे. मी अविवाहित असल्यामुळं माझ्या जीवनात काहीतरी उणे आहे, असं त्याला वाटत नाही या जाणिवेनं मला सांत्वन दिलं. मन विचलित न करता त्याची सेवा करत राहण्याचा माझा निश्चय पुन्हा एकदा दृढ करण्यासाठी मी इफ्ताहाच्या मुलीचा आणि येशूचा विचार केला. दोघंही अविवाहित होते आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यात त्यांनी स्वतःला झोकून दिलं.—योहान ४:३४.
यहोवाकडून एक देणगी
एलिझबेथ आणि मी जवळजवळ ५० वर्षांपर्यंत खूप जवळच्या मैत्रिणी होतो. २००५ साली, वयाच्या ९८ व्या वर्षी तिचा मृत्यू झाला. तिच्या शेवटच्या काही वर्षांत तिची दृष्टी कमी झाल्यामुळं तिला बायबल वाचता येत नसायचं, तेव्हा ती दिवसातला बहुतेक वेळ यहोवाला खूप वेळपर्यंत प्रार्थना करण्यात घालवत असे. कधीकधी मला वाटायचं, की ती खोलीत कुणाबरोबर तरी कुठल्यातरी वचनाची चर्चा करतेय; मी पाहायला जायचे तेव्हा ती यहोवाबरोबर बोलत असायची. यहोवा तिला खूप खरा वाटायचा. ती जणू काय त्याच्या सान्निध्यात आहे, अशा प्रकारे तिनं तिचं जीवन व्यतीत केलं. इफ्ताहाच्या मुलीनं केलं त्याप्रमाणं यहोवाची सेवा अविरतपणे करण्याचं गमक मी तिच्याकडून शिकले आहे. माझ्या तरुणपणात आणि माझ्यासमोर आलेल्या सर्व समस्यांमध्ये मला प्रशिक्षित करण्यासाठी व उत्तेजन देण्यासाठी यहोवानं, वयानं मोठी व अनुभवी बहीण दिल्याबद्दल मी त्याचे खूप आभार मानते.—उपदेशक ४:९, १०.
इफ्ताहाच्या मुलीप्रमाणं मलासुद्धा यहोवाची सेवा करताना अनेक आशीर्वाद लाभले आहेत. अविवाहित राहिल्यामुळं व बायबलच्या सल्ल्याचं पालन केल्यामुळं मी अतिशय सुखी जीवन जगले आहे व “प्रभूची सेवा एकाग्रतेने” करू शकले आहे.—१ करिंथकर ७:३५. (w११-E १२/०१)
[२८ पानांवरील चित्र]
मुंबईत १९५० च्या दशकात बाबा जाहीर भाषण देत असताना
[२८ पानांवरील चित्र]
एलिझबेथचा मृत्यू होण्याआधी तिच्यासोबत काढलेला फोटो
[२९ पानांवरील चित्र]
मुंबईत १९६० साली, एका बायबल भाषणाची जाहिरात करताना
[२९ पानांवरील चित्र]
आमच्या भाषांतर कार्यालयात माझ्यासोबत काम करणारे