व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कोण करू शकतो उलगडा भविष्यवाण्यांचा?

कोण करू शकतो उलगडा भविष्यवाण्यांचा?

कोण करू शकतो उलगडा भविष्यवाण्यांचा?

गॉर्डियनची गाठ. थोर सिकंदरच्या काळात हे सर्वात मोठे गूढ समजले जायचे. ही गुंतागुंतीची गाठ जो कोणी सोडवेल तो सर्वात बुद्धिमान आणि विजयशाली असेल अशी लोकांची धारणा होती. * असे म्हणतात की सिकंदरने हे गूढ उकलले, तेही त्याच्या तलवारीच्या एकाच वाराने.

आजवर अनेक ज्ञानवंतांनी फक्‍त गुंतागुंतीच्या गाठींसारखे असलेले गूढ प्रश्‍न सोडवण्याचाच नव्हे तर कोडी उकलण्याचा, भाकितांचा उलगडा करण्याचा, इतकेच काय, भविष्य वर्तवण्याचाही प्रयत्न केला आहे.

पण, बहुतेक वेळा त्यांचे हे प्रयत्न फसले. उदाहरणार्थ, राजा बेलशस्सरने दिलेल्या एका मोठ्या मेजवानीच्या वेळी राजमहालाच्या भिंतीवर चमत्कारिकपणे दिसलेल्या हस्ताक्षरांचा अर्थ बॅबिलोनच्या ज्ञानी पुरुषांना सांगता आला नाही. यहोवा देवाचा एक वृद्ध संदेष्टा दानीएल, जो “कोडी उकलण्याकरता” नावाजलेला होता, त्यालाच केवळ या भविष्यसूचक संदेशाचा उलगडा करणे शक्य झाले. (दानीएल ५:१२) बॅबिलोनी साम्राज्याच्या अंताविषयीची ती भविष्यवाणी त्याच रात्री पूर्ण झाली!—दानीएल ५:१, ४-८, २५-३०.

भविष्यवाणी म्हणजे काय?

भविष्यवाणी या शब्दाची व्याख्या, प्रकट केलेले भविष्य किंवा घडण्याअगोदरच नमूद केलेल्या घटना अशा प्रकारे करण्यात आली आहे. खरी भविष्यवाणी म्हणजे लेखी स्वरूपातील किंवा विदित केलेला देवप्रेरित संदेश किंवा देवाच्या इच्छेचे व उद्देशाचे प्रकटीकरण. बायबलमध्ये मशीहाच्या प्रकट होण्याविषयीच्या तसेच त्याची ओळख पटवून देणाऱ्‍या, “युगाच्या समाप्तीविषयीच्या” तसेच, देवाकडील न्यायसंदेश घोषित करणाऱ्‍या भविष्यवाण्या आढळतात.—मत्तय २४:३; दानीएल ९:२५.

आजच्या काळातील “ज्ञानी पुरुष” म्हणजेच विज्ञान, अर्थशास्त्र, आरोग्य, राजकारण, पर्यावरण आणि अशा इतर अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ भविष्य वर्तवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी केलेल्या भाकितांना प्रसारमाध्यमांत भरपूर प्रसिद्धी दिली जात असली आणि जनतेकडूनही त्यांना उत्स्‌फूर्त प्रतिसाद मिळत असला, तरीसुद्धा ही भाकिते निव्वळ मर्यादित माहितीवर आधारित असलेले अंदाज व वैयक्‍तिक मते असतात. शिवाय, यांपैकी प्रत्येक मतामागे असंख्य विरोधी मते आणि प्रतिवादही व्यक्‍त केले जातात. तेव्हा, भविष्य वर्तवण्याचा व्यवसाय तसा धोक्याचाच म्हणावा लागेल.

खऱ्‍या भविष्यवाणीचा उगम

तर मग खऱ्‍या भविष्यवाण्यांचा उगम काय आहे आणि त्यांचा उलगडा कोण करू शकतो? प्रेषित पेत्राने लिहिले: “शास्त्रांतील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही.” (२ पेत्र १:२०) “उलगडा” याकरता असलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ “निरसन, उघड करणे” असा असून “जे पूर्वी बांधलेले होते ते सैल करणे किंवा उकलणे” अशी कल्पना त्यात गोवलेली आहे. म्हणूनच की काय, ईझी टू रीड या मराठी भाषांतरात पेत्राच्या शब्दांचे पुढीलप्रमाणे भाषांतर केले आहे: “पवित्र शास्त्रातील कोणतेही भविष्यवचन कोणाही मनुष्याच्या बुद्धीने उकलत नाही.”

दोरीच्या साहाय्याने गुंतागुंतीची गाठ बांधणाऱ्‍या खलाशाचे चित्र डोळ्यांसमोर उभे करा. ती गाठ पाहिल्यावर तुमच्या-आमच्यासारख्यांना त्या गाठीत दोरीचे पेड तर दिसतात, पण ते सोडवायचे कसे हे कळत नाही. त्याच प्रकारे भविष्याला आकार देणाऱ्‍या सध्याच्या घडामोडी कसे वळण घेत आहेत याचे निरीक्षण लोक करू शकतात, पण एखादी जटिल गाठ जशी सोडवता येत नाही तसेच भविष्य नेमके कसे असेल हे त्यांना सांगता येत नाही.

प्राचीन काळातील दानीएलासारख्या देवप्रेरित संदेष्ट्यांनी आपल्या काळातील घडामोडींचे वैयक्‍तिक रीत्या निरीक्षण करून त्याच्या आधारावर भविष्यवाणी करण्याद्वारे भविष्याची जटिल गाठ सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. जर त्यांनी अशा रीतीने भविष्याला वळण देण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांचे भविष्यवाद हे त्यांच्या स्वतःच्या कल्पनांवर आधारित असल्याचे सिद्ध झाले असते. ते केवळ मानवी अंदाज किंवा एका अपरिपूर्ण पायावर उभारलेले भाकीत ठरले असते. त्याऐवजी पेत्राने खुलासा केल्याप्रमाणे: “संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.”—२ पेत्र १:२१.

“उलगडा करून सांगणे हे देवाचे काम”

सुमारे ३,७०० वर्षांपूर्वी, दोन माणसे ईजिप्टमधील एका तुरुंगात कैद होते. दोघांनाही पेचात पाडणारे स्वप्न पडले. देशातील ज्ञानी पुरुषांना विचारता येत नसल्यामुळे त्यांनी तुरुंगातील योसेफ नावाच्या आणखी एका कैद्याला आपली समस्या सांगितली: “काल रात्री आम्हा दोघांनाही स्वप्ने पडली. पण आम्हाला त्याचा अर्थ सांगणारा येथे कोणीच नाही.” योसेफ देवाचा सेवक होता. आपल्याला ती स्वप्ने सांगावीत असे त्याने या माणसांना प्रोत्साहन दिले. तो म्हणाला: “स्वप्नांचा उलगडा करून सांगणे हे देवाचे काम नाही का?” (उत्पत्ती ४०:८, सुबोधभाषांतर) ज्या प्रकारे अनुभवी खलाशी गुंतागुंतीच्या गाठी सोडवू शकतो त्याच प्रकारे भविष्यवाण्यांचा उलगडा केवळ यहोवा देवच करू शकतो. कारण, मुळात त्या भविष्यवाण्या स्वतः यहोवानेच केल्या आहेत. म्हणूनच आपण केवळ यहोवाकडून त्यांचा उलगडा होण्याची अपेक्षा करू शकतो. तेव्हा, योसेफाने देवाला श्रेय दिले हे अगदी योग्य होते.

तर मग, “उलगडा करून सांगणे हे देवाचे काम” आहे असे आपण का म्हणू शकतो? बऱ्‍याच मार्गांनी या गोष्टीचा आपल्याला प्रत्यय येतो. काही गाठी कशा सोडवाव्यात हे खलाशाने समजावून सांगितल्यावर त्या सोडवणे आपल्याला सोपे जाते. त्याच प्रकारे बायबलमध्ये काही भविष्यवाण्यांसोबतच त्यांच्या पूर्णतेचा अहवालही देण्यात आला आहे. अशा भविष्यवाण्यांचा अर्थ समजून घेणे आपल्याला सोपे जाते.—उत्पत्ती १८:१४; २१:२.

काही भविष्यवाण्यांचा अर्थ उलगडून सांगणे त्यांच्या संदर्भाचे परीक्षण केल्यानंतरच शक्य होते. दानीएल संदेष्ट्याला “दोन शिंगांच्या एका एडक्याचा” भविष्यसूचक दृष्टान्त झाला. या एडक्याला “डोळ्यांच्या मधोमध एक ठळक शिंग” असलेल्या “बकऱ्‍याने” धडक मारून जमिनीवर पाडले. संदर्भ पाहिल्यास आपल्याला कळते की दोन शिंगे असलेला एडका हा “मेदय व पारसाच्या राजांना” आणि बकरा हा “ग्रीसच्या राजाला” सूचित करतो. (दानीएल ८:३-८, २०-२२) २०० वर्षांपेक्षा जास्त काळानंतर “मोठे शिंग” म्हणजेच थोर सिकंदर याने पर्शियावर विजय मिळवण्यास सुरुवात केली. यहुदी इतिहासकार जोसिफस असा दावा करतो की सिकंदर जेरूसलेमच्या परिसरात लढाई करण्यास आला तेव्हा वरील भविष्यवाणी त्याला दाखवण्यात आली आणि ती त्याच्याविषयीच असल्याचे त्याने मान्यदेखील केले.

“उलगडा करून सांगणे हे देवाचे काम” आहे असे आपण आणखी एका अर्थाने म्हणू शकतो. यहोवा देवाचा विश्‍वासू सेवक योसेफ हा पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामुळेच त्याच्यासोबतच्या दोन कैद्यांनी सांगितलेल्या गोंधळविणाऱ्‍या स्वप्नांचा अर्थ सांगू शकला. (उत्पत्ती ४१:३८) आजही जेव्हा देवाच्या सेवकांना एखाद्या भविष्यवाणीचा नेमका अर्थ समजत नाही तेव्हा ते देवाचा पवित्र आत्मा मिळावा अशी प्रार्थना करतात आणि मग देवाच्या प्रेरित वचनाचा परिश्रमपूर्वक अभ्यास व परीक्षण करतात. देवाच्या मार्गदर्शनाने त्यांना अशी शास्त्रवचने शोधण्यास मदत मिळते ज्यांमुळे काही भविष्यवाण्यांचा अर्थ स्पष्ट होतो. हा उलगडा चमत्कारिक रीत्या कोणत्याही माणसाद्वारे होत नाही. तर तो देवाकडून होतो कारण त्याच्या पवित्र आत्म्यामुळे आणि त्याच्या वचनामुळेच त्या भविष्यवाणीचा अर्थ स्पष्ट होतो. बायबलमधील भविष्यवाण्यांचा उलगडा बायबलच्या बाहेरील, मानवी भविष्यवाद्यांनी केलेल्या भाकितांवरून होत नाही.—प्रेषितांची कृत्ये १५:१२-२१.

“उलगडा करून सांगणे हे देवाचे काम” आहे याचा हाही एक अर्थ आहे, की पृथ्वीवरील त्याच्या सेवकांना एखाद्या भविष्यवाणीचा उलगडा केव्हा होईल हे तोच ठरवतो आणि त्यानुसार त्यांना मार्गदर्शित करतो. एखाद्या भविष्यवाणीचा अर्थ तिची पूर्णता होण्याअगोदर, ती होत असताना किंवा ती झाल्यानंतर स्पष्ट होऊ शकतो. देवानेच या भविष्यावाण्यांची गाठ बांधली असल्यामुळे योग्य वेळी, म्हणजेच त्याच्या नियुक्‍त वेळी तोच ती सोडवेलही.

योसेफ आणि दोन कैद्यांच्या अहवालात, स्वप्नांची पूर्णता होण्याच्या तीन दिवसांअगोदर योसेफाने त्यांचा अर्थ उलगडून सांगितला. (उत्पत्ती ४०:१३, १९) नंतर, फारोच्या स्वप्नांचा अर्थ सांगण्याकरता योसेफाला शक्‍तिशाली फारोपुढे हजर करण्यात आले तेव्हा सुकाळाची सात वर्षे सुरू होण्याच्या बेतातच होती. देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने योसेफाने फारोच्या स्वप्नांचा अर्थ स्पष्ट केला आणि त्यामुळे भाकीत करण्यात आलेल्या सुकाळात भरपूर अन्‍नधान्य साठवण्याची व्यवस्था करणे शक्य झाले.—उत्पत्ती ४१:२९, ३९, ४०.

अशाही काही भविष्यवाण्या आहेत, ज्यांचा अर्थ त्यांची पूर्णता झाल्यानंतरच देवाच्या सेवकांना स्पष्टपणे समजतो. येशूच्या जीवनातील कित्येक घटनांविषयी त्याचा जन्म होण्याच्या अनेक शतकांपूर्वीच भाकीत करण्यात आले होते. पण ही गोष्ट त्याच्या पुनरुत्थानानंतरच त्याच्या शिष्यांना पूर्णपणे उमगली. (स्तोत्र २२:१८; ३४:२०; योहान १९:२४, ३६) शेवटी, दानीएल १२:४ यात सांगितल्यानुसार काही भविष्यवाण्या “अंतसमयापर्यंत मुद्रित करून ठेवल्या” जाणार होत्या आणि तेव्हाच या भविष्यवाण्यांसंबंधी “ज्ञानवृद्धि होईल” असे दानीएलाने म्हटले. आज आपण त्या भविष्यवाण्यांची पूर्णता होण्याच्या काळात राहात आहोत.

बायबलमधील भविष्यवाण्यांचा तुमच्याशी असलेला संबंध

योसेफ व दानीएल यांनी त्यांच्या काळातील राजांपुढे उभे राहून विविध राष्ट्रांवर व साम्राज्यांवर प्रभाव पाडणारे भविष्यसूचक संदेश घोषित केले. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी त्यांच्या काळातील लोकांना भविष्यवाण्या करणारा देव यहोवा, याच्या वतीने संदेश दिले आणि ज्यांनी त्यांच्या या संदेशांना योग्य प्रतिसाद दिला त्यांना यामुळे मोठा फायदा झाला.

आज यहोवाचे साक्षीदार सबंध जगात एक भविष्यसूचक संदेश अर्थात देवाच्या राज्याची सुवार्ता घोषित करत आहेत. तसेच, “युगाच्या समाप्तीविषयी” येशूने केलेली भविष्यवाणी सध्याच्या काळात पूर्ण होत आहे हेदेखील ते लोकांना सांगत आहेत. (मत्तय २४:३, १४) त्या भविष्यवाणीत काय सांगितले आहे आणि त्याचा तुमच्यावर कसा प्रभाव पडणार आहे हे तुम्हाला माहीत आहे का? बायबलमधील सर्वात अद्‌भुत भविष्यवाण्यांपैकी एक असलेल्या या भविष्यवाणीचा अर्थ समजून घेण्यास तुम्हाला मदत करायला यहोवाच्या साक्षीदारांना आनंदच वाटेल. (w११-E १२/०१)

[तळटीप]

^ परि. 2 ग्रीक आख्यायिकेनुसार फ्रिजीयाची राजधानी गॉर्डियम येथे, त्या शहराचा संस्थापक गॉर्डियस याचा रथ अतिशय गुंतागुंतीच्या गाठीने एका खांबाला बांधला होता. आशियाच्या भावी विजेत्यालाच ही गाठ सोडवता येणार होती.

[१२, १३ पानांवरील चित्रे]

भविष्यवाण्यांचा उलगडा करताना योसेफ व दानीएल या दोघांनीही देवाला श्रेय दिले