पुन्हा कधीही येणार नाहीत विपत्ती!
पुन्हा कधीही येणार नाहीत विपत्ती!
“लवकरच असा काळ येत आहे ज्यानंतर पुन्हा कधीही विपत्ती येणार नाहीत,” असे जर कोणी तुम्हाला सांगितले तर तुम्ही काय म्हणाल? कदाचित तुम्ही असे उत्तर द्याल, “स्वप्न पाहताय की काय? विपत्ती येणार नाहीत असं होऊच शकत नाही.” किंवा तुम्ही मनातल्या मनात विचार कराल, ‘मला वेडा समजतोय की काय, विपत्ती येणार नाहीत हे कसं शक्य आहे?’
नैसर्गिक विपत्ती जीवनातील एक अटळ वस्तुस्थिती आहे असे वाटत असले, तरीही हे बदलणार आहे असे मानण्याकरता आपल्याजवळ कारण आहे. अर्थात, हा बदल मानवांच्या प्रयत्नांद्वारे येणार नाही. नैसर्गिक घडामोडींवर नियंत्रण करणे किंवा त्या बदलणे तर दूरच, पण या घडामोडी का व कशा घडतात हेसुद्धा मानव पूर्णपणे समजू शकत नाहीत. प्राचीन इस्राएलाचा शलमोन राजा त्याच्या कुशाग्र बुद्धीसाठी नावाजलेला होता. त्याने लिहिले: “भूतलावर जो काही उद्योग चालला आहे त्याचे तत्त्व मनुष्याला कळत नाही; शिवाय मनुष्याने परिश्रम करून त्याचा शोध केला तरी त्याचा थांग लागत नाही; ज्ञानी पुरुष म्हणेल की मी ते शोधून काढीन; तर त्यालाही त्याचा थांग लागावयाचा नाही.”—उपदेशक ८:१७.
जर मानव नैसर्गिक विपत्तींना आळा घालू शकत नाहीत, तर मग कोण घालू शकतो? बायबल सांगते की आपला निर्माणकर्ता हा बदल घडवून आणेल. पृथ्वीच्या वातावरणाशी संबंधित असलेले विविध चक्र, उदाहरणार्थ जलचक्र त्यानेच अस्तित्वात आणले. (उपदेशक १:७) शिवाय माणसांमध्ये आणि देवामध्ये असलेला एक फार मोठा फरक हा आहे की देवाजवळ अमर्याद सामर्थ्य आहे. संदेष्टा यिर्मयाने हे सत्य पुढील शब्दांत व्यक्त केले: “अहा प्रभू परमेश्वरा! पाहा, तू आपल्या महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या बाहूने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली; तुला अवघड असे काही नाही.” (यिर्मया ३२:१७) देवानेच ही पृथ्वी व सर्व नैसर्गिक शक्ती घडवल्या असल्यामुळे, लोकांना पृथ्वीवर शांतीने व सुरक्षिततेत राहता यावे म्हणून पृथ्वीचा संभाळ कशा प्रकारे केला जावा हे साहजिकच त्यालाच माहीत आहे.—स्तोत्र ३७:११; ११५:१६.
तर मग, देव पृथ्वीची परिस्थिती कशा प्रकारे बदलेल? तुम्हाला आठवत असेल, या लेखमालिकेतील दुसऱ्या लेखात उल्लेख करण्यात आले होते की आज पृथ्वीवर घडत असलेल्या भयानक घडामोडी खरे तर ‘युगाच्या समाप्तीच्या चिन्हाचा’ भाग आहेत. येशूने म्हटले: “या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की, देवाचे राज्य जवळ आले आहे.” (मत्तय २४:३; लूक २१:३१) देवाचे राज्य म्हणजेच देवाने अस्तित्वात आणलेले एक स्वर्गीय सरकार, पृथ्वीवर हे मोठे बदल घडवून आणेल व नैसर्गिक शक्तींवरही नियंत्रण करेल. हे सर्व करण्याचे यहोवा देवाजवळ सामर्थ्य असूनही त्याने हे कार्य करण्याची जबाबदारी आपल्या पुत्रावर सोपवली आहे. त्याच्याविषयी संदेष्टा दानीएलाने म्हटले: “सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक, यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली; त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे; त्याचे राज्य अविनाशी आहे.”—दानीएल ७:१४.
या पृथ्वीला राहण्याचे एक आनंददायक स्थान बनवण्याकरता जे काही बदल करण्याची गरज आहे, ते बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याला देण्यात आले आहे. दोन हजार वर्षांपूर्वी येशू पृथ्वीवर असताना त्याने नैसर्गिक शक्तींवर नियंत्रण करण्याचे आपले सामर्थ्य काही प्रमाणात दाखवले होते. एकदा तो आपल्या शिष्यांसोबत गालील समुद्रात नावेतून प्रवास करत असताना “जोराच्या वाऱ्याने वादळ आले आणि लाटा नावेवर आदळू लागल्या व ती पाण्याने भरू लागली.” हे पाहून त्याचे शिष्य घाबरले. आता आपले काही खरे नाही असे वाटून त्यांनी येशूला याविषयी सांगितले. येशूने काय केले? त्याने फक्त “वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हणाला, शांत हो, स्तब्ध राहा. मग वारा थांबला व तेथे मोठी शांती पसरली.” शिष्य फार आश्चर्यचकित झाले आणि ते विचारू लागले: “हा आहे तरी कोण, की वारा आणि समुद्रदेखील त्याचे ऐकतात.”—मार्क ४:३७-४१, ईझी टू रीड.
आता तर येशूला स्वर्गात गौरविण्यात आले आहे आणि त्याला मोठे सामर्थ्य व अधिकार बहाल करण्यात आला आहे. लोकांना या पृथ्वीवर शांती व सुरक्षिततेत जगता यावे म्हणून सर्व आवश्यक बदल करण्याची जबाबदारीच नव्हे तर क्षमतादेखील देवाच्या राज्याचा राजा या नात्याने येशूजवळ आहे.
पण, आपण आधी पाहिल्याप्रमाणे सध्याच्या बऱ्याच समस्या आणि विपत्तींसाठी मानवच जबाबदार आहेत. बऱ्याच विपत्ती स्वार्थी व लोभी मानवांच्या गैरकारभारामुळे घडून येतात किंवा जास्त विनाशकारक बनतात. सातत्याने अशी स्वार्थी वृत्ती दाखवणाऱ्या आणि स्वतःमध्ये बदल करण्यास तयार नसलेल्या लोकांच्या बाबतीत देवाचे राज्य काय करेल? बायबल सांगते की प्रभू येशू “आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रगट होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.” तो “पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश” करेल.—२ थेस्सलनीकाकर १:७, ८; प्रकटीकरण ११:१८.
त्यानंतर, “राजांचा राजा” येशू ख्रिस्त पृथ्वीच्या सर्व नैसर्गिक तत्त्वांवर पूर्ण नियंत्रण करेल. (प्रकटीकरण १९:१६) त्याच्या प्रजाजनांना पुढे कोणत्याही प्रकारच्या विपत्तींना तोंड द्यावे लागणार नाही याची तो खात्री करेल. हवामानावर प्रभाव पाडणाऱ्या नैसर्गिक तत्त्वांवर नियंत्रण करण्यासाठी तो आपल्या सामर्थ्याचा वापर करेल, जेणेकरून हवामानाचे व ऋतूंचे चक्र मानवांसाठी हितकारक ठरतील. परिणामस्वरूप, यहोवा देवाने फार पूर्वी आपल्या लोकांना दिलेले हे वचन वास्तवात उतरेल: “योग्य काळी तुमच्याकरता मी पाऊस पाडीन, जमीन आपला उपज देईल व मळ्यातील झाडे आपआपली फळे देतील.” (लेवीय २६:४) लोक घरे बांधतील आणि एखाद्या विपत्तीत ते जमीनदोस्त होण्याची त्यांना भीती राहणार नाही: “ते घरे बांधून त्यांत राहतील. द्राक्षाचे मळे लावून त्यांचे फळ खातील.”—यशया ६५:२१.
तुम्ही काय केले पाहिजे?
इतर अनेक लोकांप्रमाणे, नक्कीच तुम्हालादेखील विनाशकारक विपत्तींची भीती नसलेल्या जगात राहण्याची कल्पना हवीहवीशी वाटत असेल. पण अशा जगात राहण्याकरता तुम्हाला काय करावे लागेल? “जे देवाला ओळखत नाहीत” आणि जे “सुवार्ता मानीत नाहीत” ते त्या विपत्तींपासून मुक्त झालेल्या जगात राहण्यास पात्र ठरणार नाहीत. त्याअर्थी, देवाबद्दल शिकून घेणे आणि पृथ्वीवर राज्य करण्यासाठी त्याने केलेल्या व्यवस्थेला आपला पाठिंबा देणे गरजेचे आहे. देवाची अशी इच्छा आहे की आपण त्याला जाणून घ्यावे आणि त्याच्या पुत्राद्वारे त्याने स्थापन केलेल्या राज्याविषयीची सुवार्ता आपण स्वीकारावी.
असे करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास करणे. देवाच्या राज्यातील सुरक्षित वातावरणात राहण्यास पात्र ठरण्याकरता आपण काय केले पाहिजे हे बायबलमध्ये सांगितले आहे. तर मग, बायबल काय शिकवते हे जाणून घेण्यास मदत करण्याची तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांना विनंती का करू नये? ते तुमची मदत करण्यास सदैव तयार आहेत. एक गोष्ट मात्र निश्चित. जर तुम्ही देवाला जाणून घेण्याचा आणि सुवार्ता स्वीकारण्याचा आपल्याकडून प्रयत्न केला, तर नीतिसूत्रे १:३३ यातील शब्द तुमच्याबाबतीत खरे ठरतील: “जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो, आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो.” (w११-E १२/०१)