आम्हाला परत तुझ्याजवळ येऊ दे
देवाच्या जवळ या
आम्हाला परत तुझ्याजवळ येऊ दे
तुम्ही पूर्वी यहोवाची सेवा करत होता का? आता पुन्हा त्याची सेवा करण्याचा कदाचित तुम्ही विचार केलाही असेल, पण यहोवा आपला स्वीकार करेल की नाही ही भीती कदाचित तुमच्या मनात असेल. तेव्हा, कृपया हा आणि यानंतरचा लेख काळजीपूर्वक वाचण्याचा प्रयत्न करा, कारण हे दोन्ही लेख खास तुम्हाला लक्षात ठेवून तयार करण्यात आले आहेत.
“यहोवा बापा, मी तुझं मन खूप दुखावलंय, कृपा करून मला माफ कर आणि मला पुन्हा तुझ्याजवळ येऊ दे,” अशी एका स्त्रीने कळकळीने प्रार्थना केली. लहानपणी तिला जे ख्रिस्ती संस्कार मिळाले होते त्यांपासून ती भरकटली होती. तिच्याबद्दल तुम्हाला कळवळा वाटतो का? ‘जे लोक पूर्वी देवाची सेवा करत होते त्यांच्याबद्दल देवाला नेमकं कसं वाटतं? त्याला कधी त्यांची आठवण येते का? त्यांनी परत त्याच्याजवळ यावं असं त्याला वाटतं का?’ असे प्रश्न बहुधा तुमच्या मनात येत असावेत. या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपण यिर्मयाने लिहिलेल्या शब्दांचे बारकाईने परीक्षण करू या. त्यातून जी उत्तरे मिळतील त्यामुळे तुमचे अंतःकरण नक्कीच भरून येईल.—यिर्मया ३१:१८-२० वाचा.
यिर्मयाने कोणत्या पार्श्वभूमीवर हे शब्द लिहिले होते ते विचारात घ्या. इ.स.पू. ७४० मध्ये म्हणजे यिर्मयाच्या काळाच्या कितीतरी दशकांपूर्वी यहोवाने इस्राएलच्या दहा-वंशीय राज्याला अश्शूरच्या बंदिवासात जाऊ दिले. * इस्राएल लोक यहोवाविरुद्ध गंभीर पाप करत होते आणि संदेष्ट्यांद्वारे यहोवा वारंवार जे इशारे देत होता त्यांकडे ते दुर्लक्ष करत होते. त्यामुळे त्यांना ताडन करण्यासाठी यहोवाने त्यांच्यावर हे संकट येऊ दिले होते. (२ राजे १७:५-१८) आपल्या देवापासून व मायदेशापासून दूर बंदिवासात असताना त्यांनी जे हाल सोसले त्यामुळे त्यांची मनोवृत्ती बदलली का? यहोवा त्यांना विसरला का? तो पुन्हा कधी त्यांचा स्वीकार करून त्यांना आपल्या मायदेशी परत आणणार होता का?
“मी . . . पश्चात्ताप केला”
बंदिवासात असताना इस्राएल लोक भानावर आले आणि पश्चात्ताप करण्यास प्रवृत्त झाले. त्यांनी मनापासून केलेला पश्चात्ताप यहोवाच्या नजरेतून सुटला नाही. यहोवाने बंदिवासात असलेल्या या इस्राएल लोकांच्या—ज्यांना सामूहिक रीत्या एफ्राईम असे म्हटले आहे—मनोवृत्तीचे व भावनांचे कशा प्रकारे वर्णन केले त्याकडे लक्ष द्या.
“मी एफ्राईमास खरोखर असा विलाप करताना ऐकले आहे,” असे यहोवा म्हणतो. (वचन १८) इस्राएल लोकांना आपल्या पापी जीवनक्रमाचे जे परिणाम भोगावे लागले त्याबद्दल त्यांनी शोक केला तेव्हा यहोवाने तो ऐकला. या ठिकाणी “विलाप” करणे असे जे म्हटले आहे त्याचा अर्थ “अतीव दुःखाने मान हालवणे” असाही होऊ शकतो असे एका विद्वानाने म्हटले. त्या लोकांची अवस्था वाट चुकलेल्या मुलासारखी झाली होती जो स्वतःहून ओढवून घेतलेल्या हालअपेष्टांचा विचार करून दुःखाने व घरच्या ओढीने मान हालवतो. (लूक १५:११-१७) इस्राएल लोक विलाप करताना यहोवाला काय म्हणत होते?
“बेबंद वासरासारखा जो मी त्या मला तू शिक्षा केली.” (वचन १८) इस्राएल लोकांनी कबूल केले, की ते शिक्षेस पात्र आहेत. कारण ते एका बेबंद वासरासारखे वागले होते. एका संदर्भग्रंथानुसार, इस्राएल लोकांनी स्वतःची तुलना जुंपलेल्या बैलाशी केली; तो जर सुरुवातीलाच उधळला नसता तर त्याला पराणीचा मार बसला नसता.”
“तू मला वळव म्हणजे मी वळेन; कारण हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस.” (वचन १८) इस्राएल लोकांनी खरी नम्रता दाखवली आणि त्यांनी देवाचा धावा केला. ते चुकीच्या मार्गावर भरकटले होते; पण आता भानावर आल्यानंतर पुन्हा देवाची कृपापसंती मिळवण्यासाठी त्याला याचना करू लागले. एका भाषांतरानुसार ते म्हणत होते: “मला परत तुझ्याकडे येऊ दे कारण तूच प्रभू माझा देव आहेस.”—कॉमन लँग्वेज भाषांतर.
“मी वळल्यावर पश्चात्ताप केला; . . . मी लज्जित व फजीत झालो आहे.” (वचन १९) इस्राएल लोकांनी यहोवाविरुद्ध पाप केले आणि त्याबद्दल त्यांना मनस्वी खेद झाला. त्यांनी आपले पाप पदरी घेतले आणि आपला अपराध कबूल केला. आपण लज्जित व फजीत झालो आहोत हे दाखवण्यासाठी ते जणू आपले उर बडवू लागले.—लूक १५:१८, १९, २१.
इस्राएल लोकांनी मनापासून पश्चात्ताप केला. त्यांनी मनापासून खेद केला, देवाजवळ आपले पाप कबूल केले आणि आपल्या वाईट मार्गांपासून ते वळाले. त्यांचा पश्चात्ताप पाहून देवाच्या अंतःकरणाला पाझर फुटला का? त्याने त्यांचा स्वीकार करून त्यांना परत आपल्या मायदेशी आणले का?
“मी त्याच्यावर दया करीनच करीन”
इस्राएल लोकांबद्दल यहोवाला एक विशेष जवळीक होती. त्याने म्हटले: “मी इस्राएलास पिता झालो आहे व एफ्राईम माझा प्रथम जन्मलेला आहे.” (यिर्मया ३१:९) कोणता प्रेमळ पिता मनापासून पश्चात्ताप करणाऱ्या आपल्या मुलाला नाकारेल? इस्राएल लोकांचा पिता या नात्याने यहोवाला त्यांच्याबद्दल कसे वाटले त्याकडे लक्ष द्या.
“एफ्राईम माझा प्रिय पुत्र आहे ना? तो माझा लाडका मुलगा आहे ना? मी वारंवार त्याच्याविरुद्ध बोलतो तरी मी त्याची आठवण करतच असतो.” (वचन २०) किती हृदयस्पर्शी शब्द आहेत हे! एका ठाम पण प्रेमळ पालकाप्रमाणे देवाला आपल्या मुलांविरुद्ध बोलावे लागले, त्यांच्या पापी मार्गांबद्दल त्यांना वारंवार ताकीद द्यावी लागली. पण, त्यांनी जाणूनबुजून त्यांकडे दुर्लक्ष केले तेव्हा त्याने त्यांना बंदिवासात जाऊ दिले आणि अशा प्रकारे त्यांना आपला मायदेश सोडण्यास भाग पाडले. पण, त्याला जरी त्यांना शिक्षा करावी लागली तरी तो त्यांना विसरून गेला नाही. त्यांना विसरून जाणे त्याला शक्यच नव्हते. एक प्रेमळ पिता कधीच आपल्या मुलांना विसरू शकत नाही. तर मग, इस्राएल लोकांनी मनापासून पश्चात्ताप केला तेव्हा यहोवाला कसे वाटले?
“माझी आतडी त्याच्यासाठी कळवळतात; * मी त्याच्यावर दया करीनच करीन, असे परमेश्वर म्हणतो.” (वचन २०) यहोवाला आपल्या मुलांची अनावर ओढ लागली. त्यांनी मनापासून केलेला पश्चात्ताप पाहून त्याचे अंतःकरण पिळवटून आले आणि त्यांनी आपल्याकडे परत यावे असे उत्कटपणे त्याला वाटले. येशूने उधळ्या पुत्राचा जो दाखला दिला त्यातील पित्याप्रमाणेच यहोवाला त्यांचा “कळवळा आला” आणि आपल्या मुलांचा पुन्हा स्वीकार करण्यास, त्यांना आपल्या मायदेशी परत आणण्यास तो आतुर होता.—लूक १५:२०.
“यहोवा बापा . . . मला पुन्हा तुझ्याजवळ येऊ दे”
यिर्मया ३१:१८-२० यातील शब्दांतून आपल्याला यहोवाच्या कोमल करुणेची व दयेची झलक मिळते. जे एके काळी त्याची सेवा करत होते अशांना तो कधीच विसरत नाही. त्यांना जर पुन्हा त्याच्याकडे यायचे असेल तर काय? देव “क्षमाशील” आहे, तो आपल्याला क्षमा करण्यास सदैव तयार आहे. (स्तोत्र ८६:५) जे मनापासून पश्चात्ताप करून त्याच्याकडे परत येतात अशांकडे तो कधीच पाठ फिरवत नाही. (स्तोत्र ५१:१७) उलट, तो त्यांना जवळ करतो.—लूक १५:२२-२४.
लेखाच्या सुरुवातीला ज्या स्त्रीचा उल्लेख करण्यात आला होता तिने यहोवाकडे परतण्याचे पाऊल उचलले आणि ती यहोवाच्या साक्षीदारांच्या एका स्थानिक मंडळीत गेली. सुरुवातीला तिला तिच्याच नकारार्थी भावनांवर मात करावी लागली. ती आठवून सांगते: “मला स्वतःबद्दल खूप कमीपणा वाटायचा.” पण, मंडळीतल्या वडिलांनी तिला दिलासा दिला आणि पुन्हा आध्यात्मिक रीत्या दृढ होण्यास मदत केली. आज ती कृतज्ञपूर्वक अंतःकरणाने म्हणते: “यहोवानं मला त्याच्याजवळ येऊ दिलं त्यामुळे मी खूप आनंदी आहे!”
तुम्ही जर पूर्वी यहोवाची सेवा करत होता आणि आता पुन्हा त्याची सेवा करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या एखाद्या स्थानिक मंडळीला भेट द्यावी असे उत्तेजन आम्ही तुम्हाला देतो. एक व्यक्ती पश्चात्ताप करून यहोवाकडे वळते आणि “मला परत तुझ्याकडे येऊ दे” असे म्हणते तेव्हा तो नक्कीच करुणेने आणि दयेने प्रतिसाद देईल याची खातरी तुम्ही बाळगू शकता. (w१२-E ०४/०१)
[तळटीपा]
^ परि. 5 अनेक शतकांपूर्वी म्हणजे इ.स.पू. ९९७ मध्ये इस्राएल लोकांचे दोन राज्यात विभाजन करण्यात आले होते. त्यांपैकी एक, दक्षिणेकडील यहूदाचे दोन-वंशीय राज्य होते; तर दुसरे, उत्तरेकडील इस्राएलचे दहा-वंशीय राज्य. या दहा वंशांपैकी एफ्राईम हा सगळ्यात प्रमुख वंश असल्यामुळे या दहा-वंशीय राज्याला एफ्राईम असेही म्हटले आहे.
^ परि. 16 या ठिकाणी आतडी कळवळण्याचे जे शब्दचित्र वापरण्यात आले आहे त्याचे स्पष्टीकरण बायबल अनुवादकासाठी असलेले एक मार्गदर्शक पुस्तक अशा प्रकारे देते: “यहुदी लोक शरीरातील आंतरिक भागाला भावनांचे केंद्रस्थान समजायचे.”