व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगाचा अंत याबद्दल लोकांचे काय मत आहे?

जगाचा अंत याबद्दल लोकांचे काय मत आहे?

जगाचा अंत याबद्दल लोकांचे काय मत आहे?

येशू जैतुनांच्या डोंगरावर बसला असताना त्याच्या शिष्यांनी त्याला येऊन विचारले: “आम्हाला सांगा की या गोष्टी कधी होतील? तुम्ही परत येण्याचा आणि जगाचा शेवट होण्याचा काळ जवळ आला आहे हे आम्ही कोणत्या घटनांवरून ओळखावे?”—मत्तय २४:३, इझी टू रीड व्हर्शन.

‘जगाचा अंत’ हे ऐकल्यावर तुमच्या मनात कोणते चित्र उभे राहते? बहुधा एका मोठ्या विनाशाचे चित्र तुमच्या मनात येत असावे. काहींना असे वाटते, की बायबलमध्ये उल्लेखित “हर्मगिदोन” किंवा इंग्रजीत ज्याला आर्मगेडन असे म्हटले जाते हा शब्द अशाच घटनेला सूचित करतो. (प्रकटीकरण १६:१६) बायबलमध्ये हा शब्द फक्‍त एकदाच आढळत असला, तरी प्रसारमाध्यमे व धर्मगुरू अगदी सर्रासपणे आर्मगेडन हा शब्द वापरतात.

जगाचा अंत किंवा आर्मगेडन याविषयी सर्वसामान्यपणे जे म्हटले जाते आणि त्याविषयी बायबल जे म्हणते ते एकच आहे का? याचे उत्तर जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. का? कारण जगाचा अंत याविषयीचे सत्य जाणून घेतल्याने तुम्ही अनावश्‍यक भीतीपासून मुक्‍त होऊ शकता, भविष्याकडे अधिक आशेने पाहू शकता आणि देवाबद्दलच्या तुमच्या विचारसरणीवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो.

पुढील तीन प्रश्‍न विचारात घ्या, आणि जगाचा अंत किंवा आर्मगेडन याविषयी असलेल्या प्रचलित धारणा आणि त्याविषयी असलेली बायबलची शिकवण यांची तुलना करा.

१. आर्मगेडन एक मानव-निर्मित आपत्ती आहे का?

पत्रकार व संशोधक सहसा, मानवांनी घडवून आणलेल्या आपत्तींचे वर्णन करण्यासाठी “आर्मगेडन” या शब्दाचा उपयोग करतात. उदाहरणार्थ, पहिले व दुसरे विश्‍वयुद्ध यांचे वर्णन आर्मगेडन असे करण्यात आले आहे. त्या दोन युद्धांनंतर, मानवजातीला अशी भीती होती की अमेरिका व सोव्हिएत संघ एकमेकांवर आण्विक शस्त्रांचा मारा करतील. या संभाव्य संघर्षाला प्रसारमाध्यमांनी “आण्विक आर्मगेडन” असे म्हटले. तसेच, प्रदूषणामुळे पृथ्वीच्या हवामानात एकाएकी मोठे बदल घडून येतील अशी भीती बाळगणारे संशोधक “हवामान बदलाचे आर्मगेडन” येण्याची शक्यता वर्तवतात.

लोकांच्या धारणा काय आहेत? पृथ्वीचे व पृथ्वीवरील जीवसृष्टीचे भविष्य पूर्णपणे मानवांच्या हातात आहे. जगातील सरकारांनी विचारशीलपणे पावले उचलली नाहीत, तर पृथ्वीला कायमस्वरूपी नुकसान पोहचेल.

बायबल काय शिकवते? देव मानवांना पृथ्वीचा नाश करू देणार नाही. बायबल आपल्याला याचे आश्‍वासन देते, की यहोवाने * पृथ्वी “निर्जन राहावी म्हणून उत्पन्‍न केली नाही,” तर त्यावर “लोकवस्ती व्हावी” म्हणून ती घडवली. (यशया ४५:१८) मानवांच्या हाती पृथ्वी पूर्णपणे नष्ट होऊ देण्याऐवजी देव, “पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश” करेल.—प्रकटीकरण ११:१८.

२. आर्मगेडन एक नैसर्गिक आपत्ती आहे का?

पत्रकार काही वेळा, एखाद्या भयंकर नैसर्गिक आपत्तीचे वर्णन करण्यासाठी “आर्मगेडन” या शब्दाचा उपयोग करतात. उदाहरणार्थ, २०१० मध्ये एका वृत्ताने हैटीत झालेल्या भूकंपाचे वर्णन “हैटीतील ‘आर्मगेडन’” असे केले. त्या देशाला हादरून टाकणाऱ्‍या प्रलयकारी भूकंपात झालेले लोकांचे हाल, जीवित व वित्तहानी याविषयी ते वृत्त बोलत होते. वार्ताहार व चित्रपट-निर्माते, केवळ घडून गेलेल्या घटनांच्या संदर्भातच नव्हे, तर भविष्यात घडण्याची भीती असलेल्या घटनांच्या संदर्भातही या शब्दाचा प्रयोग करतात. उदाहरणार्थ, पृथ्वीवर येऊन आदळणाऱ्‍या लघुग्रहामुळे होणाऱ्‍या कल्पित परिणामांचे वर्णन करण्यासाठी त्यांनी “आर्मगेडन” हा शब्द वापरला आहे.

लोकांच्या धारणा काय आहेत? आर्मगेडन हा आकस्मिकपणे घडून येणारा विनाश असून त्यात सर्वांचेच, अगदी निरपराध लोकांचेही बळी जातात. त्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्ही फारसे काही करू शकत नाही.

बायबल काय शिकवते? आर्मगेडन ही सर्वच लोकांचा जीव घेणारी अनियोजित घटना नाही. तर ती एक पूर्वनियोजित घटना असून त्यात केवळ दुष्टांचा नायनाट केला जाईल. बायबल असे अभिवचन देते, की लवकरच “दुर्जन नाहीसा होईल; तू त्याचे ठिकाण शोधशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही.”—स्तोत्र ३७:१०.

३. आर्मगेडनमध्ये देव पृथ्वीचा नाश करेल का?

अनेक धार्मिक लोकांचा असा विश्‍वास आहे की धर्म-अधर्माची एक शेवटची लढाई होईल आणि त्यात आपल्या पृथ्वीग्रहाचा नाश होईल. प्रिन्सटन सर्वे रिसर्च असोशिएट्‌सद्वारे अमेरिकेत घेतलेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले, की सर्वेक्षण घेतलेल्या लोकांपैकी ४० टक्के लोकांचा असा विश्‍वास आहे, की “आर्मगेडनच्या युद्धात” जगाचा अंत होईल.

लोकांच्या धारणा काय आहेत? मानवांना सदासर्वकाळ पृथ्वीवर जीवन जगण्यासाठी बनवण्यात आले नव्हते; तसेच, पृथ्वीदेखील कायम टिकून राहण्यासाठी बनवण्यात आली नव्हती. सर्व मानवांनी एका विशिष्ट वेळी मरावे या हेतूने देवाने त्यांची निर्मिती केली होती.

बायबल काय शिकवते? बायबल स्पष्टपणे सांगते, की देवाने पृथ्वीची रचना अशी केली आहे, की “ती कधीही ढळणार नाही.” (स्तोत्र १०४:५) आणि पृथ्वीवरील रहिवाशांबद्दल बायबल म्हणते: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.”—स्तोत्र ३७:२९.

तर मग स्पष्टच आहे, की जगाचा अंत किंवा आर्मगेडन याविषयी ज्या अनेक प्रचलित धारणा आहेत त्या बायबलच्या अगदी विरुद्ध आहेत. तर मग, आर्मगेडन याबद्दलचे सत्य काय? (w१२-E ०२/०१)

[तळटीप]

^ परि. 9 बायबलनुसार यहोवा हे देवाचे वैयक्‍तिक नाव आहे.