व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तो हट्टी होता पण शेवटी त्याने ऐकले

तो हट्टी होता पण शेवटी त्याने ऐकले

आपल्या मुलांना शिकवा

तो हट्टी होता पण शेवटी त्याने ऐकले

तू कधी हट्टीपणा केला आणि कोणाचे ऐकले नाही असे झाले आहे का? * कदाचित तू टीव्हीवर असा एखादा कार्यक्रम पाहिला असेल जो पाहण्यास तुझ्या आईवडिलांनी मनाई केली होती. तू त्यांचे ऐकले नाहीस याबद्दल तुला नंतर खूप वाईट वाटले असेल. आज आपण अशा एका व्यक्‍तीबद्दल जाणून घेणार आहोत जी सुरुवातीला ऐकण्यास तयार नव्हती, ती म्हणजे नामान. नामानाला आपला हट्टी स्वभाव सोडण्यास कशी मदत मिळाली ते आपण पाहू या.

अशी कल्पना करा की आपण तीन हजार वर्षांपूर्वीच्या काळात जगत आहोत. नामान अरामी सैन्याचा प्रमुख सेनापती आहे. तो त्याच्या सैनिकांवर हुकूम सोडतो आणि त्याचे सैनिक त्याचे ऐकतातही. पण, नामानाला एक भयंकर त्वचारोग म्हणजे कोड होतो. या रोगामुळे तो खरेच खूप किळसवाणा दिसू लागतो आणि कदाचित त्याला खूप वेदनाही होत असतील.

नामानाच्या बायकोकडे, इस्राएलची एक लहान मुलगी दासी म्हणून काम करते. ती लहान मुलगी एकदा, इस्राएलमध्ये राहणाऱ्‍या अलीशाबद्दल नामानाच्या बायकोला सांगते. अलीशा नामानाला बरे करू शकतो असे ती सांगते. हे ऐकताच नामान लगेच अलीशाला भेटायला जाण्याची तयारी करतो. तो आपल्यासोबत बऱ्‍याच भेटवस्तू घेतो व आपल्या सैनिकांबरोबर इस्राएल देशात जाण्यास निघतो. तो इस्राएलमध्ये का आला आहे हे सांगण्यासाठी तो इस्राएलाच्या राजाकडे जातो.

अलीशा नामानाबद्दल ऐकतो आणि नामानाला त्याच्याकडे पाठवावे असा निरोप राजाला पाठवतो. पण नामान अलीशाच्या घराजवळ पोहचतो, तेव्हा अलीशा एका संदेशवाहकाला बाहेर पाठवतो आणि नामानाने सात वेळा यार्देन नदीत डुबकी मारावी असे त्याला सांगायला लावतो. असे केल्याने नामान बरा होईल असे अलीशा म्हणतो. तुला काय वाटते हे ऐकून नामानाला कसे वाटले असेल?

नामानाला खूप राग येतो. तो हट्टाला पेटतो आणि देवाच्या संदेष्ट्याचे म्हणणे ऐकत नाही. तो त्याच्या सैनिकांना म्हणतो की आपल्या देशात डुबकी मारण्यासाठी चांगल्या नद्या नाहीत काय? नामान तेथे एक क्षणही थांबायला तयार नाही. पण तुला माहीत आहे त्याचे सैनिक त्याला काय विचारतात?— अलीशा संदेष्ट्याने जर तुम्हाला एखादी कठीण गोष्ट करायला सांगितली असती तर ती तुम्ही केली नसती का? त्याने तर तुम्हाला एक साधीशी गोष्ट करायला सांगितली आहे, मग ती करायला काय हरकत आहे?

नामान त्याच्या सैनिकांचे बोलणे ऐकतो आणि सहा वेळा नदीत डुबकी मारतो. तो जेव्हा सातव्यांदा पाण्यात डुबकी मारून बाहेर येतो तेव्हा तो आश्‍चर्यचकित होतो कारण त्याचे कोड पूर्णपणे निघून गेलेले असते, आणि तो निरोगी होतो! तो लगेचच, अलीशाचे आभार मानण्यासाठी सुमारे ३० मैलांचा (४८ किलोमीटर) प्रवास करून अलीशाच्या घरी जातो. तो अलीशाला महागड्या भेटवस्तू देतो पण अलीशा संदेष्टा त्या भेटवस्तू घेत नाही.

मग, नामान अलीशाला काहीतरी मागतो. तुला माहीत आहे तो काय मागतो?— तो अलीशाला म्हणतो की मला माझ्या घरी घेऊन जाण्यासाठी दोन जनावरांवर वाहून नेता येईल इतकी माती दे. तुला काय वाटते तो माती का मागतो?— देवाच्या लोकांच्या देशाची, इस्राएलची माती नामानाला हवी आहे कारण त्याला या मातीवर देवाला बलिदान अर्पण करायचे आहे. त्यानंतर तो यहोवाला सोडून दुसऱ्‍या कोणाचीही उपासना न करण्याचे वचन देतो! नामान आपला हट्टी स्वभाव सोडून देतो आणि खऱ्‍या देवाचे ऐकू लागतो.

तू नामानासारखा कसा वागू शकतो?— जर तू हट्टी असशील तर नामानाप्रमाणे तू तुझा स्वभाव बदलू शकतोस. इतरांचे ऐकण्याद्वारे तू तुझा हट्टी स्वभाव सोडून देऊ शकतोस. (w१२-E ०६/०१)

तुझ्या बायबलमधून वाच

२ राजे ५:१-१९

लूक ४:२७

[तळटीप]

^ परि. 3 तुम्ही हा लेख आपल्या मुलाला वाचून दाखवत असाल तर, जेव्हा वाक्यांच्या पुढे एक छोटीशी रेघ तुम्हाला दिसते तेव्हा तेथे थांबून तुमच्या मुलाला काय वाटते ते त्याला विचारा.