प्रार्थना ऐकणाऱ्या देवाच्या जवळ या
प्रार्थना ऐकणाऱ्या देवाच्या जवळ या
अनेक जण देवावर विश्वास ठेवतात, पण आपण देवावर विश्वास का ठेवतो याचे सबळ कारण ते देऊ शकत नाहीत. तसेच, धर्माच्या नावाखाली गैरकृत्ये का होतात किंवा देवाने अद्याप दुःखाचा अंत का केला नाही हेदेखील ते सांगू शकत नाहीत. ते फार तर प्रार्थना करू शकतात आणि तेही अशा एका देवाला ज्याला ते ओळखतसुद्धा नाहीत.
पण, तुम्ही त्याहून अधिक करू शकता. तुम्ही देवाच्या जवळ येऊ शकता. देवाला ओळखून त्याच्यावरील आपला विश्वास वाढवू शकता. परिणामस्वरूप, त्याच्यावर प्रेम करण्यास व त्याची मनापासून कदर करण्यास तुम्ही प्रवृत्त व्हाल. खरा विश्वास हा पुराव्यांवर आधारित असतो. (इब्री लोकांस ११:१) तुम्ही जर देवाबद्दलचे सत्य शिकून घेतले तर तुम्ही त्याला ओळखू शकाल व एका मित्राप्रमाणे त्याच्याशी बोलू शकाल. देव अस्तित्वात आहे की नाही अशी शंका असतानाही प्रार्थना करणाऱ्या काही व्यक्तींचे अनुभव विचारात घ्या.
◼ पहिल्या लेखात उल्लेखिलेली पॅट्रिशा. “एकदा मी माझ्या दहाबारा मित्रमैत्रिणींसोबत असताना आमच्यात धर्माच्या विषयावर गप्पा रंगल्या. मी त्यांना सांगितलं, की एकदा यहोवाच्या साक्षीदारामध्ये आणि नास्तिक असलेल्या माझ्या वडिलांमध्ये धर्माच्या विषयावर चर्चा सुरू असताना ती चर्चा टाळण्यासाठी मी तिथून निघून गेले होते. त्यावर माझा एक मित्र म्हणाला, ‘कदाचित यहोवाच्या साक्षीदारांच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असावं.’
“त्यावर माझी एक मैत्रीण म्हणाली, ‘आपण त्यांच्या सभांनाच जाऊन पाहू यात ना.’ म्हणून मग आम्ही त्यांच्या सभांना गेलो. आमच्या मनात बऱ्याच शंका होत्या तरीसुद्धा आम्ही काही जण साक्षीदारांच्या सभांना जात राहिलो कारण ते खूप प्रेमळ होते.
“पण, रविवारच्या दिवशी एकदा सभेत मी असं काही ऐकलं ज्यामुळे माझी विचारसरणीच बदलली. आज लोक इतके दुःखी का आहेत याचं कारण वक्त्यानं सांगितलं. मानवाला सुरुवातीला परिपूर्ण बनवण्यात आलं होतं, आणि केवळ एका मानवाद्वारे मानवी कुटुंबात पाप आणि मरण कसं आलं आणि कशा प्रकारे ते सर्व मानवजातीत पसरलं हे मी पहिल्यांदाच ऐकत होते. पहिल्या मानवानं जे काही गमावलं होतं ते पुन्हा मानवजातीला मिळवून देण्यासाठी येशूला मरण का सोसावं लागलं हेदेखील वक्त्यानं स्पष्ट केलं. * (रोमकर ५:१२, १८, १९) अचानक संपूर्ण चित्र स्पष्ट झालं. माझ्या लक्षात आलं, की खरंच आपली काळजी करणारा एक देव या जगात आहे. मी बायबलचा अभ्यास करत राहिले आणि आयुष्यात पहिल्यांदाच मला जाणवलं की मी एका खऱ्याखुऱ्या देवाला प्रार्थना करू शकते.”
◼ ॲलन, याचाही पहिल्या लेखात उल्लेख करण्यात आला आहे. “एकदा यहोवाचे साक्षीदार आमच्या घरी आले तेव्हा माझ्या पत्नीनं त्यांना घरात बोलावून घेतलं, कारण पृथ्वीवर सदासर्वकाळ
जीवन जगण्याविषयी ते जे काही सांगत होते ते तिला खूप आवडलं होतं. मला मात्र खूप राग आला. त्यामुळे मी माझ्या बायकोला किचनमध्ये घेऊन गेलो आणि तिला म्हणालो, ‘तू काय वेडी आहेस? ते काहीही सांगतील आणि तू विश्वास ठेवशील.’“त्यावर ती मला म्हणाली, ‘तसं असेल तर ते जे काही सांगतायत ते चुकीचं आहे हे त्यांना सिद्ध करून दाखव.’
“अर्थात, मी ते सिद्ध करू शकलो नाही. पण ते लोक खूप प्रेमळ होते आणि जीवनाची सुरुवात कशी झाली, निर्मितीने की उत्क्रांतीने याविषयावरील एक पुस्तक त्यांनी मला दिलं. त्या पुस्तकातील तर्कवाद इतका स्पष्ट आणि पुराव्यांवर आधारित होता की देवाविषयी अधिक जाणून घेण्याचं मी ठरवून टाकलं. मी यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागलो, आणि माझ्या लक्षात आलं की त्यात जे काही सांगितलं आहे आणि धर्माविषयी यापूर्वी मी जे काही मानत आलो होतो त्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. मी यहोवाविषयी शिकत गेलो तशा माझ्या प्रार्थना अधिक अर्थपूर्ण होऊ लागल्या. माझ्या स्वभावात काही दोष होते आणि ते दूर करण्यासाठी मी यहोवाला प्रार्थना केली. मी खातरीनं म्हणू शकतो, की यहोवानं नक्कीच माझ्या प्रार्थना ऐकल्या.”
◼ इंग्लंडमध्ये राहणारा ॲन्ड्रू. “माझी स्वतःची काही ठाम मतं होती आणि विज्ञानात मला रुची होती. पण, इतर जण उत्क्रांतिवादाची शिकवण मानायचे म्हणून मीही डोळे झाकून ती मानू
लागलो. जगात होणाऱ्या वाईट गोष्टी पाहून देवावरून माझा विश्वास उडाला होता.“पण, तरीसुद्धा काही वेळा मी विचार करायचो: ‘जगात जर कोणी देव असेल तर जगात इतके गुन्हे, इतके युद्ध का होतात हे मला जाणून घ्यायचंय.’ काही वेळा मी संकटात असताना मदतीसाठी प्रार्थनाही केली, पण मी कुणाला प्रार्थना करत होतो हे मला ठाऊक नव्हतं.
“कुणीतरी माझ्या पत्नीला यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेली एक पत्रिका दिली जिचं शीर्षक होतं, या जगाचा बचाव होईल का? नेमक्या याच प्रश्नाचा मी कितीतरी वेळा विचार केला होता. ती पत्रिका वाचून मी बायबलचा विचार करू लागलो, की ‘त्यात दिलेल्या उत्तरांनी माझ्या प्रश्नांचं समाधान होईल का?’ नंतर, एकदा मी सुट्टीला बाहेर गेलो तेव्हा कुणीतरी मला द बायबल—गॉड्स वर्ड ऑर मॅन्स? * हे पुस्तक दिलं. बायबलमधील गोष्टींना विज्ञान दुजोरा देत असल्याचं लक्षात आल्यावर बायबलविषयी अधिक जाणून घेण्यास मी उत्सुक झालो. त्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांनी माझ्यासोबत बायबल अभ्यास करण्याविषयी विचारलं तेव्हा मी लगेच तयार झालो. मी यहोवाच्या उद्देशांविषयी शिकत गेलो तसं मला जाणवू लागलं, की यहोवा एक खरी व्यक्ती आहे आणि आपण मनमोकळेपणे त्याच्याशी बोलू शकतो.”
◼ लंडनमध्ये राहणारी व प्रोटेस्टंट घरात वाढलेली जॅनेट. “धर्मातला ढोंगीपणा आणि जगातले दुःख पाहून धर्मावरून माझा विश्वासच उडाला. मी शिक्षण सोडून दिलं आणि पैशासाठी गिटार वाजवू लागले आणि गाणीही गाऊ लागले. त्याच वेळी पॅटशी माझी गाठ पडली. तो मुळात एक कॅथलिक होता, पण माझ्यासारखाच त्याचाही देवावर विश्वास राहिला नव्हता.
“माझ्यासारखंच शिक्षण सोडून दिलेल्या इतर काही जणांसोबत आम्ही एका पडक्या घरात राहू लागलो. त्यांना पूर्वेकडच्या देशांतल्या धर्मांत आस्था होती. जीवनाचा नेमका अर्थ काय यावर रात्र रात्र आम्ही चर्चा करायचो. माझा आणि पॅटचा देवावर विश्वास नसला तरी हे जग चालवणारी एक ‘शक्ती’ असली पाहिजे असं आम्हाला वाटायचं.
“पुढे नोकरीच्या शोधात आम्ही उत्तर इंग्लंडमध्ये राहायला गेलो तेव्हा आम्हाला एक मुलगा झाला. एकदा रात्री तो खूप आजारी पडला तेव्हा देवावर विश्वास नसतानाही मी कळकळून प्रार्थना करू लागले. काही दिवसांनंतर माझे आणि पॅटचे नातेसंबंध बिघडले आणि मी आमच्या बाळाला घेऊन घरातून निघून गेले. आपली प्रार्थना ऐकणारं कोणीतरी असेल असं समजून मी पुन्हा प्रार्थना केली. माझ्या नकळत पॅटसुद्धा तेच करत होता.
“त्याच दिवशी संध्याकाळी, दोन यहोवाचे साक्षीदार पॅटच्या घरी गेले आणि त्यांनी त्याला बायबलमधून काही उत्तम सल्ले दाखवले. पॅटनं लगेच मला फोन केला आणि आपण सोबत मिळून साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करायचा का, असं त्यानं मला विचारलं. बायबलच्या अभ्यासातून आम्ही शिकलो, की देवाला आनंदी करायचं असेल तर आम्हाला कायदेशीर लग्न करावं लागेल. पण, आमच्या नातेसंबंधात इतका दुरावा निर्माण झाला होता, की असं करणं अशक्य वाटत होतं.
“आम्हाला बायबलमधील भविष्यवाण्यांच्या पूर्णतेविषयी, तसंच मानवाच्या दुःखाचं कारण काय, देवाचं राज्य म्हणजे काय यांबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा होती. हळूहळू आम्हाला याची जाणीव होऊ लागली की देवाला आमची काळजी आहे, त्यामुळे आम्हाला त्याला आनंदी करायचं होतं. म्हणून आम्ही कायदेशीर रीत्या लग्न केलं. देवाच्या वचनातील उत्तम मार्गदर्शनामुळे आम्ही आमच्या तीन मुलांचं चांगलं संगोपन करू शकलो. आम्ही खातरीनं म्हणू शकतो की देवानं आमच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं.”
पुराव्याचे स्वतः परीक्षण करा
इतर लाखो लोकांप्रमाणेच, या लेखात उल्लेखिलेल्या लोकांनीही खोट्या धर्माला स्वतःची फसवणूक करू दिली नाही, तर त्यांनी पुराव्यांचे स्वतः परीक्षण केले आणि देवाने अद्याप दुःखाचा अंत का केला नाही याचे उत्तर त्यांना मिळाले. तुमच्या लक्षात आले असेल की वर उल्लेखिलेल्या प्रत्येक व्यक्तीने बायबलचे अचूक ज्ञान घेतले आणि त्यावरून यहोवा खरोखर आपल्या प्रार्थना ऐकतो याबद्दल त्यांची खातरी पटली.
देव अस्तित्वात आहे याबद्दलच्या पुराव्यांचे तुम्हालाही परीक्षण करायचे आहे का? असल्यास, यहोवाबद्दलचे सत्य आणि त्याच्याजवळ कसे यावे हे शिकण्यास यहोवाचे साक्षीदार तुम्हाला मदत करायला केव्हाही तयार असतील.—स्तोत्र ६५:२. (w१२-E ०७/०१)
[तळटीपा]
^ परि. 6 येशूच्या मृत्यूमुळे कशा प्रकारे मानवांना खंडणी मिळाली यावरील अधिक माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ५ पाहा.
^ परि. 12 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.
[१० पानांवरील संक्षिप्त आशय]
“मी यहोवाच्या उद्देशांविषयी शिकत गेलो तसं मला जाणवू लागलं, की यहोवा एक खरी व्यक्ती आहे आणि आपण मनमोकळेपणे त्याच्याशी बोलू शकतो”
[९ पानांवरील चित्र]
खरा विश्वास हा पुराव्यांवर आणि देवाबद्दलचे सत्य जाणून घेण्याच्या आपल्या मनस्वी इच्छेवर आधारित असतो