व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भूतविद्येत गैर काय?

भूतविद्येत गैर काय?

भूतविद्येत गैर काय?

बारबाराला * तरुणपणापासूनच भास व्हायचे, वेगवेगळे आवाज ऐकू यायचे आणि तिला खातरी होती की तिच्या मृत नातेवाईकांशी ती संपर्क साधते. ती आणि तिचे पती, योआचिम यांनी भूतविद्येवरील पुस्तके वाचली व ते टॅरोट पत्ते पाहून भविष्य सांगण्यात सराईत झाले. हे पत्ते वाचून त्यांना कळाले की ते खूप पैसा कमावणार आहेत आणि बिझनेसमध्ये त्यांनी तो कमावलाही. एके दिवशी पत्ते वाचून त्यांना कळाले की त्यांच्या घरी काही दुष्ट लोक येणार आहेत आणि त्यांच्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे हेही त्यांना या पत्त्यांवरून कळाले.

आजच्या काळात भूतविद्या जरी अप्रचलित वाटत असली, तरी बरेच लोक अलौकिक शक्‍तीवर भरवसा ठेवतात. जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी लोक ताईत, वीजा बोर्डचा वापर करतात आणि भविष्य पाहण्यासाठी किंवा स्वतःच्या संरक्षणासाठी आत्म्यांशी संवाद साधतात. जर्मनीतील फोकस नावाच्या मासिकातील, “लॅपटॉप ॲन्ड लुसीफर” या लेखात असे सांगण्यात आले होते: “इंटरनेट लोकांच्या मनात जादूटोण्याविषयी रुची जागृत करत आहे.”

बायबलमध्ये भूतविद्येचा उल्लेख करण्यात आला आहे हे तुम्हाला माहीत आहे का? या विषयावर बायबल जे सांगते ते वाचून तुम्हाला कदाचित धक्का बसेल.

भूतविद्येविषयी बायबल काय सांगते?

देवाने प्राचीन इस्राएली लोकांना जे नियमशास्त्र दिले होते त्यात असे म्हटले होते: “चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छाछू करणारा, अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. कारण जो कोणी असली कृत्ये करितो त्याचा परमेश्‍वराला वीट आहे.” (अनुवाद १८:१०-१२) भूतविद्येबद्दल देवाचा नियम इतका कडक का होता?

लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या उदाहरणानुसार, जिवंत व्यक्‍ती मृत व्यक्‍तीशी संवाद साधू शकते आणि भूतविद्या केल्याने मिळालेली माहिती मृतांकडून असते या गोष्टीवर बरेच लोक विश्‍वास ठेवतात. हा विश्‍वास बऱ्‍याच धर्मांमध्ये शिकवल्या जाणाऱ्‍या शिकवणीवर, म्हणजेच मृत्यूनंतर एका व्यक्‍तीचा आत्मा जिवंत राहतो, यावर आधारित असतो. पण या शिकवणीच्या अगदी उलट बायबल स्पष्टपणे असे शिकवते: “मृतांस तर काहीच कळत नाही.” (उपदेशक ९:५) बायबल मृत्यूची तुलना गाढ झोपेशी करते. ज्याप्रमाणे गाढ झोपेत असलेल्या व्यक्‍तीला कशाचेच भान नसते तसेच एका मृत व्यक्‍तीला त्याच्या आजूबाजूला होणाऱ्‍या गोष्टींची काहीच कल्पना नसते. * (मत्तय ९:१८, २४; योहान ११:११-१४) पण तुमच्या मनात कदाचित शंका येईल की, लोकांना अलौकिक शक्‍तीचे दर्शन होते ते कसे? त्यांच्याशी संवाद साधणारे खरे तर कोण असतात?

आत्मिक जगाशी संवाद

शुभवर्तमानातील अहवालानुसार पृथ्वीवर असताना येशूने आत्म्यांशी संवाद साधला. मार्क १:२३, २४ मध्ये आपण वाचतो की एक “अशुद्ध आत्मा” येशूला म्हणाला: “तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे.” आपणही कोण आहोत हे आत्म्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. पण तुम्ही त्यांना ओळखता का?

मनुष्याची निर्मिती करण्याआधी देवाने लाखो आत्मिक प्राण्यांची किंवा देवदूतांची निर्मिती केली. (ईयोब ३८:४-७) देवदूतांचे जीवन मानवांपेक्षा उच्च स्तराचे आहे. (इब्री लोकांस २:६, ७) ते खूप शक्‍तिशाली, बुद्धिमान आहेत आणि त्यांना देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी निर्माण करण्यात आले होते. स्तोत्रकर्त्याने असे भजन गायिले: “परमेश्‍वराच्या दुतांनो, जे तुम्ही बलसंपन्‍न आहा आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा.”—स्तोत्र १०३:२०.

बायबल सांगते की कालांतराने काही देवदूतांनी देवाच्या इच्छेविरुद्ध मानवांशी संवाद साधला. तो कशासाठी? असे करणाऱ्‍या पहिल्या देवदूताने लबाडी करून पहिल्या स्त्रीपुरुषाला, आदाम आणि हव्वेला त्यांच्या सृष्टीकर्त्यापासून, देवापासून दूर नेले. असे करण्याद्वारे त्याने स्वतःला दियाबल सैतान बनवून घेतले, जो लबाडी करणारा व देवाचा विरोधी आहे.—उत्पत्ति ३:१-६.

नंतर, इतर “देवदूतांनी आपले अधिकारपद न राखता” स्वर्गातील “आपले वसतिस्थान सोडले,” आणि पृथ्वीवर मानवी शरीर घेऊन सुंदर स्त्रियांसोबत राहू लागले. (यहूदा ६; उत्पत्ति ६:१, २) या बंडखोर देवदूतांनी व त्यांच्या अनैसर्गिक संततीने ज्यांना नेफिलीम असेही म्हणतात, यांनी लोकांना खूप त्रास दिला, इतका की पूर्ण पृथ्वी उपद्रवाने भरली होती. देवाने कशा प्रकारे नोहाच्या दिवसांत जलप्रलय आणून एका हिंसक व दुष्ट जगाचा नाश केला होता, या बायबलमधील अहवालाशी तुम्ही कदाचित परिचित असाल.—उत्पत्ति ६:३, ४, ११-१३.

जलप्रलयामुळे या बंडखोर देवदूतांना त्यांचे मानवी शरीर सोडावे लागले आणि ते परत स्वर्गात गेले. पण सृष्टीकर्त्याने त्यांना परत त्यांच्या वस्तीस्थानात येऊ दिले नाही. त्याऐवजी त्यांना हिणकस स्थितीत कैद करून ठेवण्यात आले ज्याची तुलना “अंधकारमय खाड्यात” ठेवण्याशी करण्यात आली आहे. (२ पेत्र २:४, ५) बायबलमध्ये या बंडखोर देवदूतांना “दुरात्मे” म्हटले आहे. (याकोब २:१९, सुबोधभाषांतर) भूतविद्येमागे त्यांचाच हात आहे.

दुरात्म्यांचे ध्येय

लोकांशी संवाद साधणाऱ्‍या दुरात्म्यांचे पहिले ध्येय लोकांना खऱ्‍या देवाच्या, यहोवाच्या उपासनेपासून दूर नेणे हे आहे. भूतविद्या करणाऱ्‍यांजवळ असलेली अलौकिक शक्‍ती, खरेतर लोकांना देवाबद्दल खरे ज्ञान मिळवण्यापासून व त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्यापासून विचलित करण्यासाठी असते.

दुरात्म्यांचा पुढारी सैतान याने येशूची जी परीक्षा घेतली त्यावरून आपल्याला त्यांचे दुसरे ध्येय समजते. सैतानाने येशूला एका अटीवर “जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव” देण्याचे वचन दिले. सैतानाची अट काय होती? त्याने येशूला म्हटले: “तू पाया पडून मला नमन” कर. सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना लोकांची उपासना हवी आहे. पण येशूने सैतानाच्या या प्रस्तावाला धुडकावून लावले व तो देवाला आणि खऱ्‍या उपासनेला एकनिष्ठ राहिला.—मत्तय ४:८-१०.

आज दुरात्मे असे प्रत्यक्ष प्रस्ताव क्वचितच कोणासमोर मांडतात. त्याऐवजी ते बेसावध लोकांना गैर न वाटणाऱ्‍या मार्गांनी जसे की, काचेचा गोळा, टॅरोट पत्ते, संमोहन क्रिया आणि राशीभविष्य यांसारख्या गोष्टींनी फसवण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारांमध्ये फसू नका! या पद्धती आत्मिक जगाशी संपर्क साधण्याचे मार्ग नाहीत. यहोवाच्या उपासनेपासून लोकांना दूर नेण्यासाठी दुरात्मे भूतविद्येसोबतच लोकांवर मोहिनी करून त्यांना फसवतात. असे करूनही त्यांचे ध्येय साध्य न झाल्यास, त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांना ते त्रास देतात व इजा पोचवतात. तुमच्या बाबतीत जर असे घडले असेल, तर मग तुम्ही त्यांच्या तावडीतून सुटका मिळवण्यासाठी काय करू शकता?

भूतविद्येतून बाहेर कसे पडाल?

हे लक्षात असू द्या की मानवांसोबत जे आत्मे संवाद साधतात ते देवाचे शत्रू आहेत आणि त्यांना नाशासाठी राखून ठेवले आहे. (यहूदा ६) ते लबाड व फसवे आहेत व स्वतःला मेलेले असल्याचे भासवतात. तुमचा एक मित्र फसवा आहे व तुमचे नुकसान करू पाहतो हे समजल्यास तुम्हाला कसे वाटेल? इंटरनेटवर तुम्ही एका अनैतिक व्यक्‍तीशी मैत्री केली आहे जी तुमचा लैंगिक छळ करू इच्छिते, असे तुम्हाला समजल्यास तुमची प्रतिक्रिया काय असेल? दुरात्म्यांसोबत संपर्क ठेवणे त्याहीपेक्षा हानिकारक आहे. तुम्हाला त्यांच्या तावडीतून सुटण्याचा पूर्णपणे प्रयत्न करावा लागेल. तुम्ही काय करू शकता?

बायबल भूतविद्येविषयी काय सांगते हे समजल्यावर, प्राचीन इफिसमधील काही लोकांनी आपली भूतविद्येवरील पुस्तके नष्ट केली. या पुस्तकांची किंमत खूप जास्त होती तरी त्यांनी ती पुस्तके “सर्वांदेखत जाळून टाकली.” (प्रेषितांची कृत्ये १९:१९, २०) आज आपल्या काळात भूतविद्येशी संबंधित गोष्टींमध्ये फक्‍त पुस्तके, ताईत, वीजा बोर्ड आणि यांसारख्या गोष्टीच येत नाहीत तर टीव्ही, व्हिडिओ गेम्स, इंटरनेट यांसारख्या प्रसार माध्यमांचाही त्यात समावेश होतो. भूतविद्येशी संबंधित असलेल्या कोणत्याही गोष्टींपासून दूर राहा.

लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या जोडप्याचा विचार करा. टॅरोट पत्ते वाचून त्यांना समजले की त्यांच्या घरी काही दुष्ट लोक येणार आहेत, पण या दोघांनी त्यांचे काहीच ऐकू नये व त्यांच्याकडून काही घेऊही नये. नंतर जेव्हा यहोवाच्या साक्षीदारांपैकी कोनी आणि गुडरुन त्यांच्या घरी देवाची सुवार्ता सांगण्यासाठी गेले तेव्हा, योआचिम आणि बारबाराने त्यांचे ऐकले. बोलताना भूतविद्येचा विषय निघाला तेव्हा कोनी आणि गुडरुनने शास्त्रवचनांतून त्यांना योग्य माहिती सांगितली. त्यांनी एक नियमित बायबल अभ्यास सुरू केला.

लवकरच योआचिम आणि बारबाराने दुरात्म्यांशी पूर्णपणे संपर्क तोडण्याचा निर्धार केला. या निर्णयामुळे दुरात्मे नाखूश होतील असे यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांना सांगितले. आणि तसेच झाले, योआचिम आणि बारबाराला दुरात्म्यांनी खूप सतावले व त्यांचा छळ केला. काही दिवसांपर्यंत तर ते रोज रात्री घाबरतच झोपायचे, नंतर त्यांनी घर बदलल्यामुळे थोडा त्रास कमी झाला. पण या कठीण प्रसंगातून जात असताना या जोडप्याने फिलिप्पैकर ४:१३ मधील शब्दांवर भरवसा ठेवला: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.” त्यांच्या प्रयत्नांवर यहोवाने आशीर्वाद दिला आणि शेवटी दुरात्म्यांनी त्यांना त्रास द्यायचे सोडून दिले. आज योआचिम आणि बारबारा खरा देव, यहोवाची आनंदाने उपासना करत आहेत.

देवाचा आशीर्वाद मिळणाऱ्‍या सर्वांना बायबल असे आर्जवते: “देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.” (याकोब ४:७, ८) तुमची इच्छा असल्यास यहोवा देव दुरात्म्यांच्या तावडीतून सुटण्यास तुम्हाला नक्की मदत करेल. आज जेव्हा योआचिम आणि बारबारा मागे वळून पाहतात तेव्हा ते स्तोत्र १२१:२ मधील शब्द उद्‌गारतात: “परमेश्‍वर [यहोवा, NW] त्याच्यापासून मला साहाय्य येते.” (w१२-E ०३/०१)

[तळटीपा]

^ परि. 2 नावे बदलण्यात आली आहेत.

^ परि. 7 मृत लोक कोणत्या अवस्थेत आहेत या विषयावर सविस्तर माहितीसाठी, बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ६ पाहा. त्याचे शीर्षक आहे: “मृत कोठे आहेत?” हे पुस्तक यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केले आहे.

[२७ पानांवरील संक्षिप्त आशय]

भूतविद्या लोकांना देवासोबत एक चांगला नातेसंबंध जोडण्यापासून रोखते

[२८ पानांवरील संक्षिप्त आशय]

“देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.”—याकोब ४:८