देवाच्या जवळ या
“त्या तू बाळकांस प्रकट केल्या”
तुम्हाला देवाबद्दलचे सत्य जाणून घ्यायचे आहे का? जसे की, तो कोण आहे, त्याचे गुण काय आहेत आणि त्याची इच्छा काय आहे? देवाने आपले वचन बायबल यात स्वतःबद्दलचे संपूर्ण सत्य प्रकट केले आहे. पण कोणीही बायबलचे वाचन करून हे सत्य पूर्णपणे समजू शकतो असे नाही. का? कारण या आध्यात्मिक सत्याची समज प्राप्त करणे हा एक विशेषाधिकार आहे; प्रत्येकालाच तो मिळतो असे नाही. याबाबतीत येशूने काय म्हटले ते आपण विचारात घेऊ या.—मत्तय ११:२५ वाचा.
या वचनाची सुरुवात अशा प्रकारे होते: “त्या वेळी येशू असे बोलू लागला.” यावरून दिसून येते की येशू जे काही बोलणार होता ते कदाचित त्या वेळी घडलेल्या प्रसंगाचे प्रत्युत्तर होते. ज्या तीन गालील शहरांत त्याने पराक्रमी कृत्ये केली होती तेथील लोकांना त्याने नुकतेच खडसावले होते कारण त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. (मत्तय ११:२०-२४) तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल, की येशूने केलेले चमत्कार पाहूनसुद्धा त्या लोकांनी त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही? कारण ते हेकेखोर होते.—मत्तय १३:१०-१५.
येशूला माहीत होते की बायबलमध्ये दडलेले आध्यात्मिक सत्य जाणून घेण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची गरज आहे: देवाची मदत आणि योग्य मनोवृत्ती. येशूने म्हटले: “हे पित्या स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो; कारण ज्ञानी व विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकांस प्रकट केल्या.” यावरून, बायबलमध्ये दडलेले सत्य जाणून घेणे एक विशेषाधिकार का आहे हे तुम्हाला समजले का? यहोवा हा स्वर्गाचा आणि पृथ्वीचा प्रभू आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दलचे सत्य कोणाला प्रकट करायचे हे ठरवण्याचा अधिकार त्याला आहे. असे असले तरी तो पक्षपाती नाही कारण सत्य समजून घेण्याची संधी त्याने सर्वांना दिली आहे. देव काहींना बायबलचे सत्य प्रकट करतो आणि काहींना नाही हे कोणत्या आधारावर?
यहोवा गर्विष्ठ लोकांवर नाही तर नम्र लोकांवर कृपा करतो. (याकोब ४:६) तो “ज्ञानी व विचारवंत” लोकांपासून म्हणजे जगाच्या दृष्टीने जे बुद्धिमान, खूप शिकलेले पण गर्विष्ठ व आपल्याला कोणाच्याही मदतीची गरज नाही असे वागतात अशांपासून तो सत्य लपवतो. (१ करिंथकर १:१९-२१) पण तो “बाळकांस” म्हणजे जे बालकांसारखी नम्रता दाखवून स्वच्छ मनाने त्याच्या जवळ येतात अशांना तो सत्य प्रकट करतो. (मत्तय १८:१-४; १ करिंथकर १:२६-२८) असे दोन्ही प्रकारचे लोक देवाच्या पुत्राने, येशूने पाहिले होते. उच्च शिक्षण घेतलेल्या अनेक गर्विष्ठ धार्मिक पुढाऱ्यांना येशूच्या संदेशाचा अर्थ कळला नाही; पण तोच नम्र मनाच्या मासेमाऱ्यांना कळाला. (मत्तय ४:१८-२२; २३:१-५; प्रेषितांची कृत्ये ४:१३) पण त्याच वेळी, काही श्रीमंत आणि सुशिक्षित लोकांनी खरी नम्रता दाखवली आणि ते येशूचे अनुयायी बनले.—लूक १९:१, २, ८; प्रेषितांची कृत्ये २२:१-३.
आपण सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे वळू या: तुम्हाला देवाबद्दलचे सत्य जाणून घ्यायचे आहे का? असल्यास, तुम्हाला हे जाणून दिलासा मिळेल की जे जगाच्या दृष्टीने बुद्धिमान आहेत त्यांच्यावर देवाची कृपा नसते. याउलट, जगाच्या दृष्टीने ज्ञानी असलेले लोक ज्यांना कमी लेखतात अशांवर देव कृपा करतो. तुम्ही जर योग्य मनोवृत्ती ठेवून देवाच्या वचनाचा अभ्यास केला तर यहोवा तुम्हाला एक अनमोल वरदान देईल, ते म्हणजे त्याच्याबद्दलचे सत्य समजून घेण्याची संधी. हे सत्य समजून घेतल्यामुळे आत्ता तुमचे जीवन अर्थपूर्ण होईल आणि पुढे तुम्हाला “खरे जीवन” अर्थात लवकरच येणाऱ्या देवाच्या नीतिमान नवीन जगात अनंतकाळचे जीवन प्राप्त होईल. *—१ तीमथ्य ६:१२, १९; २ पेत्र ३:१३. ▪ (w१३-E ०१/०१)
बायबल वाचन
^ यहोवाचे साक्षीदार तुम्हाला देवाबद्दलचे सत्य आणि त्याच्या उद्देशांबद्दल जाणून घेण्यास मदत करतील. तुमची इच्छा असल्यास ते तुमच्याबरोबर, बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाद्वारे मोफत बायबल अभ्यास करतील.