सुखी कौटुंबिक जीवनासाठी . . .
तुमचे मूल अपंग असल्यास
कार्तिक: * “आमचा मुलगा अंकित हा मतिमंद आहे. त्याच्या या आजारपणामुळे आम्ही शारीरिक, मानसिक आणि भावनिक रीत्या पूर्णपणे गळून जातो. एका सुदृढ मुलाचं संगोपन करण्यात लागणाऱ्या शक्तीला शंभराने गुणा म्हणजे त्यावरून कळतं की ‘विशेष’ मुलांना सांभाळण्यात किती शक्ती लागते. यामुळे कधीकधी आम्हा दोघा पती-पत्नीत कुरबुरीही होतात.”
मानसी: “अंकितला अगदी साध्याशा गोष्टी समजावून सांगण्यासाठीसुद्धा प्रचंड सहनशीलता लागते. मी जेव्हा पार गळून जाते तेव्हा वैतागते आणि माझ्या नवऱ्यावर, कार्तिकवर सर्व राग काढते. कधीकधी आमच्यात एकमत होत नाही आणि मग यावरूनच आमच्यात भांडणं होतात.”
तुमचे मूल जन्माला आले तो दिवस तुम्हाला आठवतो का? तुमच्या चिमुकल्याला हातात घेण्यास तुम्ही किती आतुरतेने वाट पाहिली असेल. पण कार्तिक आणि मानसी या जोडप्याला जेव्हा सांगितले गेले की त्यांचे मूल अपंग आहे तेव्हा त्यांच्या मिश्र भावना होत्या; एकीकडे त्यांना आनंदही झाला होता पण दुसरीकडे त्यांना काळजीही वाटत होती.
तुमचे मूल अपंग आहे का? आपण त्याचा सांभाळ यशस्वी रीत्या करू शकू का असे कदाचित तुम्हाला वाटत असेल. तरीपण, निराश होऊ नका. तुमच्यासारख्या पालकांनी अशा समस्यांना यशस्वीपणे तोंड दिले आहे. तुम्हाला सर्वसाधारणपणे कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागेल आणि यांवर मात करण्यासाठी देवाचे वचन बायबल कसे मदत करू शकते याची चर्चा या लेखात आपण करू या.
समस्या १: तुम्हाला वस्तुस्थितीचा स्वीकार करणे कठीण जाते.
आपले मूल अपंग आहे असे जेव्हा पालकांना कळते तेव्हा त्यांच्या आशांचा पूर्णपणे चुराडा झाला असे त्यांना वाटते. मेक्सिकोतील
जुलियाना नावाची एक आई असे म्हणते: “डॉक्टरांनी मला जेव्हा सांगितलं की आमच्या मुलाला, सॅन्टीयागोला मेंदूचा आजार झाला आहे तेव्हा जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली. असं वाटलं की पूर्ण जगाचा भार माझ्याच डोक्यावर आला आहे.” इतर पालकांना इटलीमध्ये राहणाऱ्या विलाना नावाच्या आईप्रमाणे वाटेल. ती म्हणते: “माझ्या वयाच्या स्त्रीला बाळाला जन्म देणं धोकादायक होतं तरीही मी तो धोका पत्करला. आणि आता माझ्या मुलाला जेव्हा मानसिक आजाराचा त्रास होतो तेव्हा मला अपराध्यासारखं वाटतं.”तुम्हाला जर निराश किंवा अपराध्यासारखे वाटत असेल तर असे वाटणे साहजिकच आहे. आजारपण हा काही देवाचा मूळ हेतू नव्हता. (उत्पत्ति १:२७, २८) अस्वाभाविक गोष्टींचा पालकांनी सहजासहजी स्वीकार करावा या क्षमतेसह देवाने पालकांना बनवले नाही. तुमचे मूल अपंग आहे या वस्तुस्थितीमुळे तुम्ही निराश व्हाल. तुमच्यासमोर उद्भवलेली नवीन परिस्थिती स्वीकारून तिच्यानुसार जुळवून घेण्यास तुम्हाला वेळ लागेल.
तुमच्या मुलाच्या अपंगत्वासाठी तुम्ही जर स्वतःला जबाबदार ठरवत असाल तर काय? मुलाच्या तब्येतीवर आनुवंशिकता, वातावरण आणि इतर गोष्टींचा परिणाम कसा होतो हे कोणालाही समजत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरीकडे पाहता, तुमच्या जोडीदाराला जबाबदार ठरवण्याकडे तुमचा कल असेल. जेव्हाजेव्हा तुम्हाला असे वाटेल तेव्हातेव्हा लगेच तो विचार मनातून झटकून टाका. याऐवजी तुमच्या जोडीदाराला साथ द्या आणि तुमच्या अपंग मुलाची काळजी घेण्यावर लक्ष द्या.—उपदेशक ४:९, १०.
उपाय: तुमच्या मुलाची परिस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न करा. “सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते; समंजसपणाने ते मजबूत राहते.”—नीतिसूत्रे २४:३.
तुम्ही वैद्यकीय तज्ज्ञ आणि विश्वसनीय प्रकाशनांतून तुमच्या मुलाच्या आजारपणाबद्दल माहीत करून घेऊ शकता. तुमच्या मुलाच्या आजारपणाविषयी जाणून घेण्याची तुलना एखादी नवीन भाषा शिकण्याशी करता येईल. सुरुवातीला कठीण जाऊ शकते पण तुम्ही ती शिकू शकता.
सुरुवातीला उल्लेख केलेल्या कार्तिक आणि मानसी यांनी त्यांच्या डॉक्टरांकडून आणि ‘विशेष’ मुलांसाठी असलेल्या खास संघटनेकडून माहिती घेतली. ते सांगतात: “आम्हाला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागेल हे समजण्यास मदत मिळाली आणि त्याचबरोबर एक मतिमंद व्यक्ती काय करू शकते तेही कळलं. आमचा मुलगा पुष्कळ बाबतीत नॉर्मल जीवन जगू शकतो हे आम्हाला समजलं. यामुळे आम्हाला खूप हायसं वाटलं.”
हे करून पाहा: तुमचे मूल काय करू शकते यावर लक्ष केंद्रित करा. कुटुंब मिळून एकत्र काम करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मुलाने एखादे जरी काम योग्य रीत्या केले तर त्याला किंवा तिला शाबासकी द्या आणि त्याच्यासोबत आनंद करा.
समस्या २: तुम्हाला थकवा आणि एकटेपणा जाणवतो.
तुमच्या मुलाचा सांभाळ करण्यात तुमची सगळी शक्ती खर्च होत आहे असे तुम्हाला वाटेल. न्यूझीलंडची जेनी नावाची एक आई म्हणते: “माझ्या मुलाला मणक्याचा आजार झाला आहे हे कळल्यावर काही वर्षांपर्यंत, घरातल्या नेहमीच्या कामापेक्षा मी थोडं जरी जास्त काम केलं तरी मला थकल्यासारखं वाटायचं आणि लगेच रडू यायचं.”
आणखी एक समस्या म्हणजे तुम्हाला कदाचित एकाकीपणा जाणवत असेल. बाबू यांच्या मुलाला स्नायूंचा आजार आणि अस्पर्गर्स डिसऑर्डर (स्वमग्नता) आहे. ते सांगतात: “आमचं जीवन कसं चाललंय हे बहुतेक लोकांना समजत नाही.” तुम्हाला कोणाशी तरी बोलावेसे वाटते. पण तुमच्या बहुतेक मित्रांची मुले सुदृढ असल्यामुळे तुम्ही त्यांना तुमच्या मनातल्या भावना सांगण्यास कचरता.
उपाय: दुसऱ्यांकडे मदत मागा. आणि मदत मिळते तेव्हा ती स्वीकारा. आधी उल्लेखण्यात आलेली जुलियाना म्हणते: “कधीकधी मी आणि माझा नवरा इतरांना मदत मागण्यास लाजतो. पण याबाबतीत लाजून चालत नाही हे आम्ही शिकलो आहोत. इतर जण मदत करतात तेव्हा आम्हाला एकटं असल्यासारखं वाटत नाही.” एखाद्या कार्यक्रमात किंवा ख्रिस्ती सभेत, तुमचा एखादा जवळचा मित्र किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्या मुलाबरोबर बसू का असे विचारतो तेव्हा आनंदाने ती मदत स्वीकारा. बायबलचे एक नीतिसूत्र म्हणते: “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो, आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो.”—नीतिसूत्रे १७:१७.
स्वतःच्या तब्येतीचीही काळजी घ्या. ज्याप्रमाणे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोचवण्याचे काम सतत चालू ठेवण्यासाठी एखाद्या रुग्णवाहिकेत नियमित रीत्या पेट्रोल घालण्याची गरज असते, त्याचप्रमाणे योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप घेऊन तुम्ही तुमच्या मुलाची सतत काळजी घेण्यासाठी ताकद मिळवू शकाल. जयेश यांचा मुलगा पांगळा आहे. ते सांगतात: “माझा मुलगा चालू शकत नसल्यामुळे मलाच त्याला सगळीकडे घेऊन फिरावं लागतं. आणि म्हणून मी चांगलं खाल्लंपिल्लं पाहिजे असं मला वाटतं.”
तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी वेळ कसा काढू शकता? काही पालक त्यांच्या मुलांची काळजी आळीपाळीने घेतात, जेणेकरून एकाला आराम करता येतो किंवा इतर वैयक्तिक गरजा पूर्ण करता येतात. कधीकधी तुम्ही अनावश्यक गोष्टी टाळून त्यातून जो वेळ मिळेल त्याचा उपयोग तुमच्या वैयक्तिक कामात खर्च करू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला समतोल राखण्यास मदत मिळेल. भारतातील मयूरी नावाची आई म्हणते: “हळूहळू सर्व गोष्टी तुमच्या अंगवळणी पडतील.”
तुमच्या जवळच्या मित्राशी बोला. एखाद्या मित्राला अपंग मूल जरी नसले तरी तो तुमच्या भावना समजू शकतो आणि तुम्हाला सांत्वन देऊ शकतो. तुम्ही खरा देव यहोवा यालाही प्रार्थना करू शकता. स्तोत्र १४५:१८.
पण प्रार्थनेमुळे खरोखरच मदत मिळते का? यास्मीनच्या दोन्ही मुलांना गाठींचा आजार आहे, ती मान्य करते: “कधीकधी माझ्या मनावर इतकं ओझं असतं की त्या ओझ्याखालीच मी मरते की काय असं मला वाटतं. पण मी लगेच यहोवाला या ओझ्यातून सुटका मिळण्याची किंवा तो भार सहन करण्याची शक्ती मागते. मग मला असं वाटतं की मी ते ओझं सहज उचलू शकते.”—हे करून पाहा: तुम्ही कोणता आहार घेता, कधी व्यायाम करता आणि तुम्हाला किती झोप मिळते हे पडताळून पाहा. तुम्ही अनावश्यक गोष्टी करण्याचे टाळून स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यास वेळ कसा काढू शकता याचाही विचार करा. गरज असल्यास तुमच्या दैनंदिन कार्यक्रमात फेरबदल करत राहा.
समस्या ३: कुटुंबातील इतर सदस्यांपेक्षा तुम्ही तुमच्या अपंग मुलाला जास्त वेळ देता.
घरात अपंग मूल असते तेव्हा कुटुंबाच्या आहारावर, बाहेर जाण्यावर आणि पालक प्रत्येक मुलाबरोबर किती वेळ घालवतात यांवर परिणाम होऊ शकतो. यामुळे इतर मुलांना त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे असे वाटेल. त्याचबरोबर, पालक त्यांच्या अपंग मुलाचा सांभाळ करण्यात इतके व्यस्त होऊन जातील की ज्यामुळे त्यांच्या विवाहावर ताण येईल. लाइबीरियाचे लायोनेल नावाचे वडील म्हणतात: “कधीकधी माझी बायको म्हणते की मला एकटीलाच बहुतेक गोष्टी कराव्या लागतात व तुम्हाला मुलाची काळजीच नाही. खरंतर असं बोलून ती माझा अपमान करते असं मला वाटतं. मग मीही तिला उलटसुलट बोलतो.”
उपाय: तुमची सर्व मुले तुम्हाला तितकीच प्रिय आहेत हे दाखवण्यासाठी, त्यांना ज्या गोष्टी करायला आवडतात त्यांची योजना करा. आधी उल्लेखलेली जेनी म्हणते: “कधीकधी आम्ही आमच्या मोठ्या मुलासाठी काहीतरी विशेष करतो, जसे की त्याला त्याच्या आवडत्या हॉटेलमध्ये घेऊन जातो.”
तुमचे वैवाहिक नाते टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या जोडीदाराबरोबर बोला आणि त्याच्यासोबत यहोवाला प्रार्थना करा. भारतातील असीम नावाच्या वडिलांच्या मुलाला फिट्स येतात. ते सांगतात: “कधीकधी माझी बायको आणि मी खूप वैतागलेलो आणि चिडलेलो असलो तरीपण एकमेकांशी बोलायला, एकत्र मिळून देवाला प्रार्थना करायला वेळ काढतो. मुले उठण्याआधी दररोज सकाळी आम्ही बायबलमधील वचनांवर एकत्र मिळून चर्चा करतो.” काही जोडपी झोपण्याआधी एकमेकांसोबत बोलण्यासाठी वेळ काढतात. अशा खासगी गप्पा आणि मनापासून केलेल्या प्रार्थना यांमुळे तणावपूर्ण काळात तुमचा विवाह टिकून राहील. (नीतिसूत्रे १५:२२) एक जोडपे म्हणते: “सर्वात कठीण दिवसांत एकमेकांसोबत घालवलेले क्षण आमच्या जीवनातील गोड आठवणी आहेत.”
हे करून पाहा: तुमच्या अपंग मुलाला तुमची इतर मुले जेव्हा मदत करतात तेव्हा त्यांची प्रशंसा करा. तुमच्या मुलांवर आणि तुमच्या साथीदारावर तुम्ही प्रेम करता व त्यांची कदर करता हे वेळोवेळी त्यांना बोलून दाखवा.
आशावादी राहा
तरुणांवर आणि वृद्धांवर परिणाम करत असलेले सर्व प्रकारचे आजार व अपंगत्व देव लवकरच मुळासकट काढून टाकणार आहे असे अभिवचन बायबल आपल्याला देते. (प्रकटीकरण २१:३, ४) त्या वेळी, “मी रोगी आहे असे एकही रहिवासी म्हणणार नाही.” *—यशया ३३:२४.
पण असे होईपर्यंत, अपंग मुलाचे पालक यानात्याने तुम्ही येणाऱ्या समस्यांना यशस्वी रीत्या तोंड देऊ शकता. लेखाच्या सुरुवातीला उल्लेखलेले कार्तिक आणि मानसी असे सांगतात: “आपल्या मनासारखं काही होत नाही असं तुम्हाला वाटतं तेव्हा निराश होऊ नका. तुमचं मूल काय करू शकतं याचा विचार करा. कारण तुमच्यासारखे बरेच पालक आहेत.” ▪ (w१३-E ०२/०१)
^ या लेखातील नावे बदलण्यात आली आहेत.
^ निरोगी आरोग्याबद्दल बायबल आपल्याला काय अभिवचन देते हे जाणून घ्यायचे असेल तर यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ३ पाहा.
स्वतःला विचारा . . .
-
मी शारीरिक, मानसिक आणि भावनिक रीत्या सुदृढ राहण्यासाठी काय करू शकतो?
-
माझ्या इतर मुलांनी मला मदत केल्याबद्दल अलीकडे मी कधी त्यांची प्रशंसा केली का?