मोशे अढळ विश्वास असलेला मनुष्य
विश्वास म्हणजे काय?
बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे “विश्वास” म्हणजे सबळ पुराव्यावर आधारित असलेली पक्की खातरी. देवावर विश्वास असलेल्या व्यक्तीला पूर्ण भरवसा असतो की देव आपले हरएक अभिवचन नक्कीच पूर्ण करेल.
मोशेने कशा प्रकारे विश्वास दाखवला?
मोशेने आपल्या जीवनात जे काही निर्णय घेतले, ज्या काही निवडी केल्या त्यांवरून त्याने दाखवून दिले की देवाच्या अभिवचनांवर त्याचा विश्वास होता. (उत्पत्ति २२:१५-१८) उदाहरणार्थ, इजिप्तमध्ये असताना जगाची सर्व सुखे त्याच्या पायाशी लोळण घेत होती; तो ऐशआरामाचे जीवन जगू शकला असता. पण, त्याने तसे केले नाही. उलट, “पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत” केले. (इब्री लोकांस ११:२५) मोशेने हा निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेतला होता का, ज्याचा पुढे त्याला पस्तावा होणार होता? मुळीच नाही. कारण बायबल म्हणते, की मोशे “पुढे पुढे चालतच राहिला जणू काही प्रत्यक्ष देव आपल्याबरोबर आहे असे त्याला दिसत होते.” (इब्री लोकांस ११:२७, सुबोध भाषांतर) मोशेने देवाच्या अभिवचनांवर आधारित ज्या काही निवडी केल्या त्यांचा त्याला कधीच पस्तावा झाला नाही.
मोशेने इतरांचाही विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, एकीकडे फारोचे सैन्य आणि दुसरीकडे तांबडा समुद्र अशा कोंडीत इस्राएल लोक सापडले तेव्हा काय घडले ते विचारात घ्या. आता आपल्यावर संकट कोसळणार या भीतीने इस्राएल लोकांची गाळण उडाली आणि त्यांनी मदतीसाठी यहोवाचा व मोशेचा धावा केला. त्या वेळी मोशेने काय केले?
देव तांबडा समुद्र दुभागून इस्राएल लोकांसाठी सुटकेचा मार्ग मोकळा करणार होता याची मोशेला कदाचित कल्पना नसावी. पण, आपल्या लोकांना वाचवण्यासाठी देव काहीतरी करेल याची त्याला पूर्ण खातरी होती. आणि हीच खातरी आपल्या इस्राएली बांधवांनाही असावी असे त्याला वाटत होते. बायबल म्हणते: “मोशे लोकांना म्हणाला, भिऊ नका स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पाहा.” (निर्गम १४:१३) मोशे आपल्या इस्राएली बांधवांचा विश्वास दृढ करू शकला का? नक्कीच, कारण बायबल केवळ मोशेविषयीच नव्हे, तर सर्व इस्राएलांविषयी म्हणते: “जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले.” (इब्री लोकांस ११:२९) मोशेच्या विश्वासाचा त्याला स्वतःलाच नव्हे, तर त्याच्यासारखा विश्वास दाखवणाऱ्या इतरांनाही फायदा झाला.
आपण काय शिकतो?
मोशेप्रमाणेच आपणही जीवनात जे काही निर्णय घेऊ, ज्या काही निवडी करू त्या देवाच्या अभिवचनांवर आधारित असल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, देव आपल्याला असे अभिवचन देतो, की आपण जीवनात त्याच्या उपासनेला प्राधान्य दिले तर तो आपल्या भौतिक गरजा पूर्ण करेल. (मत्तय ६:३३) हे खरे आहे, की आज जगात सर्रासपणे पाहायला मिळणारी चंगळवादी जीवनशैली टाळणे सोपे नाही. पण, आपण जर आपली जीवनशैली साधी ठेवली आणि यहोवाच्या उपासनेला प्राधान्य दिले तर आपल्या सर्व गरजा तो तृप्त करेल. तो आपल्याला आश्वासन देतो: “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.”—इब्री लोकांस १३:५.
तसेच, मोशेप्रमाणे आपण इतरांचा विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणार्थ, आपल्या मुलांवर देवाच्या वचनाचे संस्कार करण्याच्या अनंत संधी असतात याची सुज्ञ पालकांना जाणीव असते. मुले जसजशी मोठी होऊ लागतात तसतसे त्यांना हे समजणे खूप महत्त्वाचे आहे की एक देव आहे ज्याने आपल्याला बऱ्या-वाइटाचे स्तर घालून दिले आहेत आणि त्या स्तरांचे पालन केल्यानेच आपल्या जीवनाला दिशा मिळते, आपले जीवन अर्थपूर्ण बनते. (यशया ४८:१७, १८) पालक जेव्हा आपल्या मुलांना असा विश्वास बाळगण्यास मदत करतात की देव “आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे” तेव्हा ते त्यांना एक मौल्यवान देणगी देतात.—इब्री लोकांस ११:६. (w१३-E ०२/०१)