मोशे एक विनम्र मनुष्य
नम्रता म्हणजे काय?
ज्याला उन्मत्तपणाचा किंवा गर्वाचा गंधही नसतो त्याला नम्रता म्हणतात. जी व्यक्ती नम्र असते ती कधीच इतरांना पाण्यात पाहत नाही. एक नम्र व्यक्ती कबूल करते की ती अपरिपूर्ण आहे. अशा व्यक्तीला आपल्या मर्यादांची जाणीव असते.
मोशेने कशा प्रकारे नम्रता दाखवली?
मोशेला अधिकार देण्यात आला तेव्हा तो गर्वाने फुगला नाही. सहसा, एखाद्या व्यक्तीजवळ थोडाफार अधिकार आला की ती नम्र आहे की गर्विष्ठ हे लगेच दिसून येते. एकोणिसाव्या शतकातील रॉबर्ट जी. इंगरसोल या लेखकाने म्हटले, “एक व्यक्ती नम्र आहे की घमेंडी हे पाहायचं असेल तर तिच्या हातात फक्त सत्ता द्या.” त्याअर्थी, नम्रता दाखवण्यात मोशेने एक अप्रतिम उदाहरण मांडले. ते कसे?
यहोवाने मोशेला इस्राएल राष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी निवडले होते; त्याअर्थी मोशेला अमाप अधिकार देण्यात आला होता. पण, त्याचे पाय नेहमी जमिनीवरच होते. उदाहरणार्थ, वारसा हक्कांसंबंधी एक प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्याने किती नम्रपणे तो कठीण प्रश्न हाताळला ते विचारात घ्या. (गणना २७:१-११) तो नक्कीच एक कळीचा प्रश्न होता असे म्हणता येईल, कारण त्या प्रश्नासंबंधी जो काही निर्णय घेतला जाणार होता तो येणाऱ्या पिढ्यांसाठी एक नमुना ठरणार होता.
त्या वेळी मोशेने काय केले? इस्राएल राष्ट्राचा पुढारी या नात्याने मीच या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावू शकतो, असा तर्क त्याने केला का? त्याने त्याच्या उपजत क्षमतांवर, अनेक वर्षांच्या त्याच्या अनुभवावर किंवा यहोवाच्या विचारसरणीबद्दल त्याला असलेल्या सखोल ज्ञानावर आधारित हा प्रश्न निकालात काढण्याचा प्रयत्न केला का?
मोशेच्या जागी एखादी घमेंडी व्यक्ती असती तर तिने नक्कीच तसे केले असते. पण, मोशेने तसे केले नाही. बायबलचा अहवाल आपल्याला सांगतो, की मोशेने “हे प्रकरण परमेश्वरापुढे मांडले.” (गणना २७:५) जरा विचार करा! मोशेने तब्बल ४० वर्षे इस्राएल राष्ट्राचे नेतृत्व केले होते. पण तरीसुद्धा तो स्वतःवर नव्हे, तर यहोवावर विसंबून राहिला. तर मग स्पष्टच आहे, की मोशे खरोखर एक नम्र मनुष्य होता.
मोशेने अधिकाराची सर्व सूत्रे स्वार्थीपणे आपल्या हातात ठेवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. उलट, यहोवाने इस्राएल राष्ट्रातील इतर काहींना संदेष्टे म्हणून नेमले तेव्हा त्याला आनंदच झाला. (गणना ११:२४-२९) तसेच, त्याच्या सासऱ्याने त्याला त्याचा कार्यभार इतरांना वाटण्याचा सल्ला दिला तेव्हा त्याने नम्रपणे तो स्वीकारला. (निर्गम १८:१३-२४) आणि आयुष्याच्या अखेरच्या काळात धडधाकट असूनही त्याने यहोवाला अशी विनंती केली की आपल्यानंतर इस्राएल राष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी त्याने एका व्यक्तीची निवड करावी. यहोवाने यहोशवाची निवड केली तेव्हा मोशेने त्या तरुणाला पूर्ण पाठिंबा दिला आणि लोकांना आर्जवले की प्रतिज्ञात देशात जाण्यासाठी त्यांनी यहोशवाचे मार्गदर्शन स्वीकारावे. (गणना २७:१५-१८; अनुवाद ३१:३-६; ३४:७) यहोवाच्या उपासनेत इस्राएल लोकांचे मार्गदर्शन करणे एक बहुमान आहे असे मोशेने मानले. पण, लोकांच्या हितापुढे त्याने आपल्या अधिकाराला कधीच महत्त्व दिले नाही.
आपण काय शिकतो?
आपल्याजवळ सत्ता असली, अधिकार असला किंवा काही उपजत क्षमता असल्या तरी आपले पाय नेहमी जमिनीवर असले पाहिजेत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा: सर्वोत्तम मार्गाने यहोवाची सेवा करण्यासाठी क्षमतांपेक्षा नम्र असणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. (१ शमुवेल १५:१७) आपण खरोखर नम्र असलो, तर आपण बायबलमधील पुढील सुज्ञ सल्ल्याचे पालन करण्याचा प्रयत्न करत राहू: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको.”—नीतिसूत्रे ३:५, ६.
मोशेच्या उदाहरणावरून आपण हेदेखील शिकतो की आपण आपल्या हुद्द्याला किंवा अधिकाराला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देऊ नये.
नम्रतेच्या बाबतीत मोशेने घालून दिलेल्या उदाहरणाचा आपल्याला काही फायदा होतो का? नक्कीच होतो! आपण खरी नम्रता दाखवतो तेव्हा लोकांना आपल्या सहवासात आनंद मिळतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, यहोवाला आनंद होतो कारण तो स्वतः हा सुरेख गुण दाखवतो. (स्तोत्र १८:३५) बायबल म्हणते: “देव गर्विष्ठांचा विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.” (१ पेत्र ५:५) नम्रतेच्या बाबतीत मोशेने मांडलेल्या उदाहरणाचे अनुकरण करण्यासाठी यापेक्षा चांगले कारण असूच शकत नाही. (w१३-E ०२/०१)