देवाच्या जवळ या
यहोवा “पक्षपाती नाही”
तुमच्याशी कोणी भेदभाव केला आहे का? तुमचे म्हणणे कोणी ऐकून घेत नाही, तुम्हाला एखादे काम करण्यापासून रोखले जाते किंवा तुमच्या रंगामुळे, पार्श्वभूमीमुळे किंवा समाजात असणाऱ्या दर्जामुळे तुम्हाला तुच्छ लेखले गेले आहे का? जर हो, तर अशा परिस्थितीचा सामना तुम्ही एकटेच करत नाही. पण, आपल्यासाठी एक सांत्वनदायक गोष्ट आहे. ती म्हणजे, अशी अपमानास्पद वागणूक लोकांमध्ये सर्वसामान्य असली तरी देव मात्र आपल्याला तशी वागणूक देत नाही. म्हणूनच, ख्रिस्ती प्रेषित पेत्राने अगदी खातरीने म्हटले की, “देव पक्षपाती नाही.”—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५ वाचा.
अगदी अनपेक्षित वेळी—गैरयहूदी असणाऱ्या कर्नेल्यच्या घरी असताना पेत्र हे शब्द बोलला. पेत्र एक यहूदी होता, तो अशा काळात जगत होता जेथे यहूदी लोक, गैरयहूदी लोकांना अशुद्ध मानत असत आणि त्यामुळे ते त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवत नसत. तर मग, पेत्र कर्नेल्यच्या घरी काय करत होता? खरेतर, यहोवाने त्यांची भेट घडवून आणली होती. पेत्राला देवाकडून एक दृष्टान्त झाला ज्यात त्याला सांगण्यात आले: “देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको.” पेत्राला माहीत होण्याच्या एक दिवस आधी कर्नेल्यलासुद्धा एक दृष्टान्त होतो ज्यात त्याला स्वर्गदूत म्हणतो की त्याने पेत्राची भेट घ्यावी. (प्रेषितांची कृत्ये १०:१-१५) या सर्व गोष्टींत यहोवा सामील आहे याची जाणीव जेव्हा पेत्राला होते तेव्हा तो शांत बसू शकला नाही.
पेत्र म्हणाला: “देव पक्षपाती नाही, हे मला पक्के ठाऊक आहे.” (प्रेषितांची कृत्ये १०:३५) ग्रीक शब्द, “पक्षपाती” याचा अर्थ “तोंड पाहून माणसाशी वागणे” असा होतो. याबद्दल एक विद्वान म्हणतो: “हा वाक्यांश एका अशा न्यायाधीशाला सूचित करण्यात आला आहे जो माणसाचे तोंड पाहून न्याय करतो. त्याच्या गुन्ह्यासंबंधित असणारे पुरावे लक्षात न घेता, तो त्या माणसाचे बाह्यस्वरूप पाहून न्याय करतो.” पण देव, एखाद्या व्यक्तीच्या बाह्य स्वरूपाकडे पाहून म्हणजे तिची जात, राष्ट्र, समाजात तिचे स्थान किंवा इतर गोष्टी पाहून न्याय करत नाही.
उलट, यहोवा आपले अंतःकरण पाहतो. (१ शमुवेल १६:७; नीतिसूत्रे २१:२) पेत्राने नंतर म्हटले: “प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रेषितांची कृत्ये १०:३५) देवाची भीती बाळगणे म्हणजे, त्याचा आदर करणे, गौरव करणे, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणे आणि ज्या गोष्टी त्याला आवडत नाहीत त्या न करणे. नैतिकतेची कृत्ये करणे म्हणजे, देवाच्या नजरेत जे योग्य आहे ते मनापासून करणे. ज्या व्यक्तींच्या मनात यहोवाबद्दल आदरयुक्त भय असते ती व्यक्ती योग्य ते करण्यास प्रवृत्त होते. अशांवर यहोवा आपली पसंती दर्शवतो.—अनुवाद १०:१२, १३.
यहोवा जेव्हा स्वर्गातून खाली पाहतो तेव्हा तो फक्त एकच जात पाहतो ती म्हणजे मानवजात
तुमच्याबरोबर कोणी भेदभाव केला असेल किंवा तुम्हाला अपमानास्पद वागणूक दिली असेल तर पेत्र देवाबद्दल जे बोलला त्यावरून तुम्हाला सांत्वन मिळू शकते. यहोवा सर्व राष्ट्रातील लोकांना खऱ्या उपासनेकडे आकर्षित करतो. (योहान ६:४४; प्रेषितांची कृत्ये १७:२६, २७) तो त्याच्या उपासकांची जात, राष्ट्र, समाजातील त्यांचे स्थान या गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी त्यांची प्रार्थना ऐकतो आणि त्यांची उत्तरेही देतो. (१ राजे ८:४१-४३) आपण एक गोष्ट अगदी ठामपणे बोलू शकतो की यहोवा जेव्हा स्वर्गातून खाली पाहतो तेव्हा तो फक्त एकच जात पाहतो ती म्हणजे मानवजात. अशा निःपक्षपाती असणाऱ्या देवाबद्दल आणखी जाणून घेण्यास तुम्हाला आवडेल का?(w१३ -E ०६/०१)