लवकरच सर्व दुःखांना पूर्णविराम!
कल्पना करा की तुम्ही अशा एका जगात जगत आहात ज्यात दुःखाचे नावही नाही. असे जग ज्यात गुन्हे, युद्धे, आजार व नैसर्गिक आपत्ती यांचा लवलेशही नाही. रोज सकाळी कोणत्याही चिंतेविना तुम्ही झोपेतून उठता; ना पैशाची चिंता, ना जातिभेदाची, ना अत्याचाराची. पण, या गोष्टींची आपण फक्त कल्पनाच करू शकतो असे तुम्हाला वाटते का? हे खरे आहे, की आजवर कोणत्याही मानवाने किंवा मानवी संघटनेने असे काहीही केलेले नाही. पण, देवाने दुःखाची सर्व कारणे नाहीशी करण्याचे अभिवचन आपल्याला दिले आहे. याआधीच्या लेखात आपण ज्या कारणांची चर्चा केली तीदेखील तो लवकरच नाहिशी करेल. देवाचे वचन, बायबल आपल्याला कोणती अभिवचने देते त्यांकडे लक्ष द्या:
एक चांगले सरकार असेल
“स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—दानीएल २:४४.
देवाचे राज्य म्हणजे एक स्वर्गीय सरकार. त्याचा निवडलेला शासक, येशू ख्रिस्त आहे. ते सरकार, सर्व मानवी शासकांची जागा घेईल आणि देवाची इच्छा केवळ स्वर्गातच नव्हे, तर पृथ्वीवरही पूर्ण होईल याची खातरी करेल. (मत्तय ६:९, १०) ते स्वर्गीय सरकार, मानवांचा तारणकर्ता येशू याचे “सार्वकालिक” राज्य असल्यामुळे कोणतेही मानवी सरकार कधीच त्याची जागा घेऊ शकणार नाही. त्या शासनाखाली पृथ्वीवर कायम शांती असेल याची आपण खातरी बाळगू शकतो.—२ पेत्र १:११.
खोट्या धर्माचे नामोनिशाण नसेल
सैतान “स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. म्हणून त्याच्या सेवकांनीही नीतिमत्त्वाच्या सेवकांचे सोंग घेतले तर ती मोठीशी गोष्ट नाही; त्यांचा शेवट त्यांच्या कर्मांप्रमाणे होईल.”—२ करिंथकर ११:१४, १५.
लवकरच खोट्या धर्माचा पर्दाफाश केला जाईल आणि पृथ्वीवरून त्याचे नामोनिशाण मिटवले जाईल. मग, धर्मवेड राहणार नाही की धर्माच्या नावाखाली होणाऱ्या रक्तरंजित लढाया लढल्या जाणार नाहीत. त्यामुळे, “जिवंत व सत्य” देवावर प्रेम करणाऱ्या सर्वांचा “विश्वास एकच” असेल आणि त्यांना “आत्म्याने व खरेपणाने” त्याची उपासना करणे शक्य होईल. परिणामस्वरूप, सर्वत्र शांती व एकता नांदेल.—१ थेस्सलनीकाकर १:९; इफिसकर ४:५; योहान ४:२३.
मानवी अपरिपूर्णता नसेल
“देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल; यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:३, ४.
यहोवा देव हे कसे करेल? ज्याने संपूर्ण मानवजातीसाठी आपले जीवन बलिदान केले त्या आपल्या पुत्राद्वारे अर्थात येशूद्वारे तो हे करेल. (योहान ३:१६) येशूच्या मार्गदर्शनाखाली सर्व मानव परिपूर्ण स्थितीला आणले जातील. दुःखाला पूर्णविराम मिळालेला असेल, कारण देव स्वतः “त्यांच्याबरोबर राहील” आणि “त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल.” मानवी अपरिपूर्णता आणि दुःख या गोष्टी इतिहासजमा होतील; आणि “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.”—स्तोत्र ३७:२९.
दुष्ट आत्म्यांचा नाश होईल
“त्याने [येशू ख्रिस्ताने] ‘दियाबल,’ व ‘सैतान’ म्हटलेला जुनाट ‘साप’ म्हणजे तो अजगर यास धरले, आणि त्याने एक हजार वर्षांपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले; . . . त्याने राष्ट्रांस आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला.”—प्रकटीकरण २०:२, ३.
सैतान आणि त्याचे दुरात्मे यांना “अथांग डोहात” टाकून दिल्यानंतर म्हणजे त्यांना पूर्णपणे निष्क्रिय केल्यानंतर मानवांवर त्यांचा प्रभाव राहणार नाही. मानवी घडामोडीवर त्यांचे दुष्ट वर्चस्व उरणार नाही. सैतान आणि त्याचे दुरात्मे यांच्या दुष्ट प्रभावापासून मुक्त असलेल्या जगात राहणे खरेच किती दिलासादायक असेल!
शेवटला काळ संपेल
येशूने, एक “मोठे संकट” येईल असे सांगितले होते. त्या मोठ्या संकटात “शेवटल्या” काळाचा अंत होईल. येशूने पुढे म्हटले: “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल.”—मत्तय २४:२१.
त्या संकटाला ‘मोठे संकट’ म्हटले आहे ते यासाठी की पूर्वी कधी घडली नाहीत व पुढेही कधी घडणार नाहीत अशी संकटे त्या वेळी येतील. पुढे ही संकटे वाढत वाढत जातील व “सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या” लढाईत ती टोकाला पोहचतील. या लढाईला “हर्मगिदोन” किंवा “आर्मगेडन” असे म्हटले आहे.—प्रकटीकरण १६:१४, १६.
सत्यावर प्रेम करणारे लोक या दुष्ट जगाच्या अंताची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा लोकांना देवाच्या राज्यात असंख्य आशीर्वाद मिळतील; त्यांपैकी काहींची आता आपण चर्चा करू या.
देव आपल्यासाठी खूप काही करेल!
एक “मोठा लोकसमुदाय” नवीन जगात बचावून जाईल: देवाचे वचन आपल्याला सांगते, की कोणालाही मोजता येणार नाही असा एक “मोठा लोकसमुदाय” “मोठ्या संकटातून” वाचेल व नीतिमान नवीन जगात प्रवेश करेल. (प्रकटीकरण ७:९, १०, १४; २ पेत्र ३:१३) बचावलेले हे लोक आपल्या तारणाचे श्रेय, “जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा,” अर्थात येशू ख्रिस्त याला देतील.—योहान १:२९.
देवाच्या शिक्षणामुळे असंख्य लाभ होतील: नवीन जग येईल तेव्हा “परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” (यशया ११:९) सर्वांशी मिळूनमिसळून कसे राहायचे व निसर्गाचे रक्षण कसे करायचे याबद्दलचे शिक्षण दिले जाईल. देव असे अभिवचन देतो: “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.”—यशया ४८:१७.
मृत लोकांना जिवंत केले जाईल: पृथ्वीवर असताना येशूने आपला मित्र लाजर याला मृत्यूतून जिवंत केले होते. (योहान ११:१, ५, ३८-४४) त्यावरून त्याने दाखवून दिले की देवाच्या राज्यात तो यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात मृत लोकांना जिवंत करेल.—योहान ५:२८, २९.
शांती व नीतिमत्ता सदैव नांदेल: ख्रिस्ताच्या शासनाखाली अनाचाराला थारा नसेल. असे का म्हणता येईल? कारण येशूजवळ लोकांची मने वाचण्याची विलक्षण क्षमता आहे. या क्षमतेचा उपयोग करून तो नीतिमान-अनीतिमान लोकांचा न्याय करेल. जे आपल्या चुकीच्या मार्गापासून फिरण्यास तयार नसतील अशांना देवाच्या नवीन जगात प्रवेश मिळणार नाही.—स्तोत्र ३७:९, १०; यशया ११:३, ४; ६५:२०; मत्तय ९:४.
पुढे येणाऱ्या या सुकाळाविषयी बायबलमध्ये ज्या अनेक भविष्यवाण्या दिल्या आहेत त्यांपैकी केवळ काहींचीच आतापर्यंत आपण चर्चा केली आहे. देवाचे राज्य पृथ्वीवर शासन करू लागेल तेव्हा “उदंड” शांती असेल; त्या शांतीचा कधीच अंत होणार नाही. (स्तोत्र ३७:११, २९) आजवर ज्या दुःखांनी व वेदनांनी मानवजातीला पिडले आहे त्यांना पूर्णविराम मिळालेला असेल! याची पक्की खातरी आपण बाळगू शकतो कारण खुद्द देव त्याच्या वचनात असे म्हणतो: “पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो. . . . ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत.”—प्रकटीकरण २१:५. ▪ (w१३-E ०९/०१)