मुख्य विषय | मृत्यूमुळे सगळेच संपते का?
मृत्यूविरुद्ध मानवांची झुंज
मृत्यू हा आपला सर्वात भयानक शत्रू आहे. आपण पूर्ण शक्तीने त्याच्याविरुद्ध लढतो. मृत्यूमुळे आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गमावतो तेव्हा वस्तुस्थिती स्वीकारणे आपल्याला कठीण जाते. किंवा तरुण असताना आपण कदाचित असा विचार करू की या शत्रूच्या तावडीत आपण कधीच सापडणार नाही. आणि अशा प्रकारे शक्य असेल तोपर्यंत आपण असा फसवा विचार करत राहतो.
सदासर्वकाळ जिवंत राहण्याविषयी इजिप्तच्या फारोंसारखा विचार खूप कमी लोकांनी केला असेल. मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी त्यांनी स्वतःचे जीवन वाहून घेतले, शिवाय कित्येक कामगारांनीही त्यांचे आयुष्य पणाला लावले. त्यांनी बांधलेल्या पिरॅमिड्सवरून हे दिसून येते की मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी त्यांनी काय काय केले. पण त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत.
चीनच्या सम्राटांनीदेखील सदासर्वकाळ जिवंत राहण्यासाठी प्रयत्न केले होते. पण, त्यांची पद्धत वेगळी होती. ती म्हणजे सदासर्वकाळ जिवंत राहण्यासाठी एक जीवनदायी पेय पिणे. मृत्यूपासून चार हात दूर राहण्यासाठी सम्राट किन शी व्हांग यांनी आपल्या किमयागारांना एक जादुई पेय तयार करण्यास सांगितले. पण त्यांनी बनवलेल्या पेयपदार्थांमध्ये पाऱ्याचा समावेश होता. आणि त्यांपैकीच एखाद्या पेयामुळे बहुधा सम्राटाचा मृत्यू झाला असावा.
इ.स. १६ व्या शतकात, तारुण्याच्या झऱ्याच्या शोधात स्पॅनिश संशोधक ख्वान पोन्से दे लेओन हे प्वेर्टो रीको येथून समुद्र प्रवासास निघाले. प्रवासादरम्यान त्यांना अमेरिकेतील फ्लोरिडा या शहराचा शोध लागला. पण याच्या काही वर्षांनंतर तेथील मूळ रहिवाशांसोबत झालेल्या चकमकीत त्यांचा मृत्यू झाला. आणि अशा प्रकारे आजपर्यंत तारुण्याच्या झऱ्याचा शोध लागलेला नाही.
फारो, सम्राट आणि संशोधक या सर्वांनी मृत्यूवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. मृत्यूवर विजय मिळवण्याच्या त्यांच्या पद्धती आपल्याला जरी पटत नसल्या, तरी त्यांच्या ध्येयांना आपण कमी लेखणार नाही. कारण आपल्या सर्वांनाच मनापासून वाटते की आपण नेहमी जिवंत राहावे.
मृत्यूवर विजय मिळवणे शक्य आहे का?
आपल्याला मृत्यू नको-नकोसा का वाटतो? बायबल याचे उत्तर देते. आपला निर्माणकर्ता, यहोवा देव * याच्याविषयी बायबल म्हणते: “हरएक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे; त्याने मनुष्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे.” (उपदेशक ३:११) आपण केवळ ७० किंवा ८० वर्षांपर्यंतच नव्हे, तर सदासर्वकाळ या पृथ्वीवरील सुंदर गोष्टींचा आनंद घेत राहावा असे आपल्याला वाटते. (स्तोत्र ९०:१०) हीच आपली मनस्वी इच्छा आहे.
आपण सदासर्वकाळ जगावे अशी इच्छा देवाने आपल्या मनात का घातली? आपल्याला निराश करण्यासाठी का? देव असे मुळीच करू शकत नाही. उलट, देवाने आपल्याला असे अभिवचन दिले आहे की लवकरच तो मृत्यूवर विजय मिळवेल. बायबलमध्ये अनेक वेळा सांगण्यात आले आहे की देव मृत्यूला कायमचे नाहीसे करेल; शिवाय, त्यात देवाच्या या अभिवचनाविषयीसुद्धा सांगण्यात आले आहे की तो मानवांना सदासर्वकाळचे जीवन देईल.— “मृत्यूवर विजय” या शीर्षकाची चौकट पाहा.
येशू ख्रिस्ताने स्पष्टपणे म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) तर मग, मृत्यूविरुद्धची लढाई नक्कीच जिंकली जाऊ शकते. पण येशूने सांगितल्याप्रमाणे, केवळ देवच आपल्याकरता ती लढाई जिंकू शकतो. (w14-E 01/01)
^ परि. 9 बायबलमध्ये देवाचे नाव यहोवा असे दिले आहे.