व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही प्रलोभनाचा प्रतिकार करू शकता!

तुम्ही प्रलोभनाचा प्रतिकार करू शकता!

“पोर्नोग्राफी पाहण्याचं मी आधीच ठरवलं होतं असं नाही. मी इंटरनेट सुरू केलं आणि अचानक माझ्या कॉम्प्युटरवर एक जाहिरात आली. पण कोण जाणे का, मी क्लिक करून ती उघडली.”—चार्ल्स. *

“माझ्या कामाच्या ठिकाणी एक सुंदर मुलगी माझ्यामध्ये आवड दाखवू लागली. एके दिवशी ती मला म्हणाली, ‘हॉटेलमध्ये जाऊन थोडी मजा करू या.’ तिला नेमकं काय म्हणायचं होतं हे मला कळलं.”—डॅनी.

का ही जण वरवर प्रलोभनाचा प्रतिकार करत असले, तरी मनातल्या मनात त्यांना ते हवेहवेसे वाटते. इतर काही जण प्रलोभनाला आपला शत्रू समजतात आणि त्याचा प्रतिकार करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. तुम्हाला काय वाटते? तुमच्यासमोर एखादे प्रलोभन आले तर तुम्ही त्याला बळी पडणार की त्याचा प्रतिकार करणार?

अर्थात, सगळ्याच प्रलोभनांमुळे संकटे ओढवतात असे नाही. उदाहरणार्थ, वर्ज्य केलेला पदार्थ एखाद्या वेळेस खाल्ला तर फारसे काही बिघडणार नाही. पण इतर मोहांना, खासकरून अनैतिक कृत्ये करण्याच्या मोहांना बळी पडल्यास भयंकर परिणाम घडू शकतात. बायबल अशी ताकीद देते: “जारकर्म करणारा अक्कलशून्य आहे. जो आपल्या जिवाचा नाश करून घेऊ पाहतो तो असे करतो.”—नीतिसूत्रे ६:३२, ३३.

एखादे प्रलोभन अचानक तुमच्यासमोर आले तर तुम्ही काय केले पाहिजे? याचे उत्तर बायबल देते: “देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. . . . पवित्रतेने व अब्रूने तुम्हातील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे.” (१ थेस्सलनीकाकर ४:३-५) असे करण्याची इच्छाशक्ती तुम्ही कशी विकसित करू शकता? त्यासाठी पुढील तीन पावले तुम्हाला मदत करतील.

पहिले पाऊल: आपल्या डोळ्यांचे रक्षण करा

उत्तेजक चित्रे पाहत राहिल्यास अयोग्य इच्छांना आणखीनच चालना मिळते. पाहण्याचा आपल्या इच्छांशी किती जवळचा संबंध आहे याला दुजोरा देत येशूने अशी ताकीद दिली: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” पुढे एका अतिशयोक्तीचा वापर करून त्याने असे आर्जवले: “तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे.” (मत्तय ५:२८, २९) येशूच्या म्हणण्याचा काय अर्थ होतो? हेच, की प्रलोभनाचा प्रतिकार करण्यासाठी आपण निर्णायक पावले उचलून उत्तेजक चित्रे पाहण्याचे टाळले पाहिजे.

उत्तेजक दृश्ये डोळ्यांसमोर आल्यास लगेच नजर दुसरीकडे वळवा

उदाहरणार्थ अशी कल्पना करा, की अचानक तुमची नजर वेल्डिंगच्या चकाकणाऱ्या प्रकाशावर पडते. तुम्ही एकटक त्या प्रकाशाकडे पाहत राहाल का? मुळीच नाही! डोळे खराब होऊ नयेत म्हणून तुम्ही लगेच तुमची नजर दुसरीकडे वळवाल किंवा  तुमच्या डोळ्यांचे रक्षण कराल. त्याचप्रमाणे, उत्तेजक दृश्यांवर कधी तुमची नजर पडली तर लगेच आपले लक्ष दुसरीकडे वळवा; मग ती दृश्ये छापील स्वरूपात असोत, कॉम्प्युटरवर असोत किंवा प्रत्यक्षात असोत. त्यांमुळे आपले मन दूषित होऊ देऊ नका. जॉनचे उदाहरण विचारात घ्या. पूर्वी त्याला पोर्नोग्राफी पाहण्याचे व्यसन होते. तो म्हणतो: “एखादी आकर्षक स्त्री दिसली की तिला वारंवार पाहण्याचा मला सहसा मोह होतो. त्यामुळं मी माझी नजर दुसरीकडे वळवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो आणि स्वतःला म्हणतो: ‘यहोवाला प्रार्थना कर! तू आत्ताच प्रार्थना केली पाहिजे!’ प्रार्थना केल्यानंतर, तो मोह लगेच विरून जातो.”—मत्तय ६:९, १३; १ करिंथकर १०:१३.

ईयोब नावाच्या एका विश्वासू मनुष्याचादेखील विचार करा. त्याने म्हटले: “मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ?” (ईयोब ३१:१) तुम्हीसुद्धा असाच संकल्प करू शकता का?

हे करून पाहा: तुमच्या डोळ्यांसमोर उत्तेजक दृश्ये येतात तेव्हा लगेच आपली नजर दुसरीकडे वळवा. एका बायबल लेखकाने प्रार्थना केली: “निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळव.” तुम्ही या लेखकाचे अनुकरण करू शकता का?—स्तोत्र ११९:३७.

दुसरे पाऊल: आपल्या विचारांचे रक्षण करा

आपण सर्वच जण अपरिपूर्ण आहोत. त्यामुळे, अधूनमधून आपल्या सर्वांनाच अयोग्य इच्छांशी संघर्ष करावा लागतो. बायबल म्हणते: “प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते.” (याकोब १:१४, १५) तुम्ही या दलदलीत पडू नये म्हणून काय करू शकता?

मनात चुकीचे विचार आल्यास लगेच प्रार्थना करा

लक्षात असू द्या, की तुमच्या मनात अयोग्य इच्छा निर्माण होतात तेव्हा कसा प्रतिसाद द्यायचा हे तुम्ही ठरवू शकता. त्या इच्छांविरुद्ध संघर्ष करा. त्या आपल्या मनातून काढून टाका. अनैतिक गोष्टींचे स्वप्नरंजन करू नका. ट्रॉय नावाच्या एका माणसाला पूर्वी इंटरनेटवर पोर्नोग्राफी पाहण्याचे व्यसन जडले होते. तो म्हणतो: “वाईट विचार मनातून काढून टाकण्यासाठी मी चांगल्या गोष्टींबद्दल विचार करण्याचा प्रयत्न केला. हे तितकं सोपं नव्हतं. कित्येकदा मी अपयशी ठरलो. पण, कालांतराने मला आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवणं शक्य झालं.” किशोरवयात असताना एल्सा नावाच्या एका स्त्रीला अनैतिक प्रलोभनांविरुद्ध झुंजावे लागले होते. ती आठवून सांगते:  “नेहमी व्यस्त राहण्याद्वारे आणि यहोवाला प्रार्थना करण्याद्वारे मी वाईट विचारांवर मात करू शकले.”

हे करून पाहा: तुमच्या मनात वारंवार अनैतिक विचार येतात तेव्हा लगेच प्रार्थना करा. “जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती” यांवर नेहमी मनन करण्याद्वारे वाईट विचारांवर मात करण्याचा प्रयत्न करा.—फिलिप्पैकर ४:८.

तिसरे पाऊल: आपल्या पावलांचे रक्षण करा

अयोग्य इच्छा, प्रलोभन आणि संधी या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा एक व्यक्ती सहज संकटात सापडू शकते. (नीतिसूत्रे ७:६-२३) तुमच्यासोबत असे घडू नये म्हणून तुम्ही काय करू शकता?

“इतर जण आसपास असतात तेव्हाच मी इंटरनेटचा वापर करतो”

बायबल पुढील सुज्ञ सल्ला देते: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानी पावतात.” (नीतिसूत्रे २२:३) तेव्हा, आपल्या पावलांचे रक्षण करा. ज्या परिस्थितींमुळे समस्या निर्माण होऊ शकतात त्या ओळखा आणि टाळा. (नीतिसूत्रे ७:२५) फिलिप, ज्याने पोर्नोग्राफीच्या सवयीवर मात केली तो असे म्हणतो: “घरात सर्वांना दिसू शकेल अशा ठिकाणी मी कॉम्प्युटर ठेवला आहे; त्यात इंटरनेट फिल्टर सॉफ्टवेअरदेखील इंस्टॉल केलं आहे. शिवाय इतर जण आसपास असतात तेव्हाच मी इंटरनेटचा वापर करतो.” त्याच प्रकारे, याआधी ज्याचा उल्लेख करण्यात आला होता, तो ट्रॉय असे म्हणतो: “मी उत्तेजक चित्रपटं पाहण्याचं टाळतो आणि जे लोक लैंगिक संबंधांबद्दल अश्‍लीलपणे बोलतात अशांपासून दूर राहतो. मी स्वतःला कोणत्याही धोक्यात घालू इच्छित नाही.”

हे करून पाहा: तुमच्या दुर्बलतांचे प्रामाणिकपणे परीक्षण करा आणि ज्या प्रसंगांमुळे तुमच्यावर प्रलोभन येऊ शकते ते टाळण्यासाठी आधीपासूनच तयारी करा.—मत्तय ६:१३.

हार मानू नका!

हरतऱ्हेने प्रयत्न करूनही तुम्ही कमजोर होऊन एखाद्या प्रलोभनाला बळी पडलात तर काय? निराश होऊन प्रयत्न करण्याचे सोडून देऊ नका. बायबल म्हणते: “धार्मिक सात वेळा पडला तरी पुनः उठतो.” (नीतिसूत्रे २४:१६) आपला स्वर्गीय पिता आपल्याला पुन्हा उठण्याचे प्रोत्साहन देतो. तुम्ही त्याची प्रेमळ मदत स्वीकाराल का? त्यासाठी सतत प्रार्थना करा. देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याद्वारे आपला विश्वास मजबूत करा. ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याद्वारे आपला निर्धार आणखी बळकट करा. आणि देवाने दिलेल्या पुढील अभिवचनातून बळ मिळवत राहा: “मी तुला शक्ती देतो; मी तुझे साहाय्यही करतो.”—यशया ४१:१०.

या लेखाच्या सुरुवातीला ज्याचा उल्लेख करण्यात आला होता तो चार्ल्स म्हणतो: “पोर्नोग्राफी पाहण्याच्या माझ्या सवयीवर मात करण्यासाठी मला बरेच प्रयत्न करावे लागले. मी अनेकदा अपयशी झालो, पण देवाच्या मदतीनं शेवटी मी यशस्वी ठरलो.” डॅनी, ज्याचा याआधी उल्लेख करण्यात आला होता तोदेखील असे म्हणतो: “माझ्यासोबत काम करणाऱ्या मुलीशी मी सहज लैंगिक संबंध ठेवू शकलो असतो. पण, मी तिला ठामपणे ‘नाही’ म्हटलं. यामुळं एक शुद्ध विवेक बाळगल्याचं मला समाधान वाटतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मला माहीतंय यहोवाला माझा अभिमान वाटतो.”

तुम्ही ठाम राहून प्रलोभनाचा प्रतिकार करता तेव्हा देवाला तुमचाही अभिमान वाटेल अशी खातरी तुम्ही बाळगू शकता!—नीतिसूत्रे २७:११. ▪ (w14-E 04/01)

^ परि. 2 या लेखातील नावे बदलण्यात आली आहेत.