मुख्य विषय | धूम्रपानाबद्दल देवाचा दृष्टिकोन
धूम्रपानाबद्दल देवाचा दृष्टिकोन काय?
याआधीच्या लेखात नाओको नावाच्या ज्या स्त्रीचा उल्लेख करण्यात आला होता ती धूम्रपानाची सवय मोडण्यात यशस्वी ठरली. ती म्हणते: “देवाचे गुण आणि त्याचा उद्देश यांबद्दलचं सत्य शिकल्यामुळंच मी माझ्या जीवनात बदल करू शकले.” हे सत्य ती बायबलमधून शिकली. बायबलमध्ये तंबाखूचा एकदाही उल्लेख नसला, तरी धूम्रपानाबद्दल देवाचा दृष्टिकोन काय हे समजण्यास ते आपल्याला मदत करते. * देवाचा दृष्टिकोन काय हे समजून घेतल्यामुळेच अनेकांना ही सवय पूर्णपणे मोडून टाकण्याची प्रेरणा मिळाली. (२ तीमथ्य ३:१६, १७) आता आपण धूम्रपानाच्या तीन घातक परिणामांचा विचार करू या आणि त्यांबद्दल बायबल काय म्हणते ते पाहू या.
धूम्रपानाचे व्यसन जडते
तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा मादक घटक असतो. इतर कोणत्याही घटकापेक्षा निकोटीनमुळे जास्त व्यसन जडू शकते. निकोटीन उत्तेजक म्हणून कार्य करू शकते किंवा त्यामुळे एक व्यक्ती अतिउदासही होऊ शकते. धूम्रपान केल्याने काही क्षणातच निकोटीन मेंदूकडे प्रवास करते आणि असे वारंवार घडत राहते. धूम्रपानाच्या एका झुरक्यात निकोटीनचा एक डोस असतो. त्यामुळे एका दिवसात सिगारेटचे सरासरी एक पाकीट ओढणारा धूम्रपी निकोटीनचे जवळजवळ २०० डोस दररोज शरीरात घेत असतो. हे प्रमाण दुसऱ्या कोणत्याही औषधाच्या तुलनेत सगळ्यात जास्त आहे. अशा रीतीने निकोटीनचे वारंवार सेवन केल्यामुळे त्याचे व्यसन जडते. आणि एकदा का हे व्यसन जडले, की मग ते मिळाले नाही तर एक व्यक्ती चिडचिड करते, रागावते किंवा हिंस्र बनते.
“ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहा.”—रोमकर ६:१६.
तुम्हाला तंबाखूचे व्यसन जडले असेल, तर देवाच्या आज्ञांचे पालन करणे खरोखर शक्य आहे का?
धूम्रपानाबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगण्यास बायबल आपल्याला मदत करते. ते म्हणते: “आज्ञापालनाकरता ज्याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहा. . . . हे तुम्हाला ठाऊक नाही काय?” (रोमकर ६:१६) एका व्यक्तीच्या मनावर आणि शरीरावर तंबाखूच्या व्यसनाचा परिणाम होतो तेव्हा ती त्या वाईट सवयीची गुलाम बनते. पण, देव ज्याचे नाव यहोवा आहे (हिब्रू भाषेत “याव्हे”) त्याला असे वाटते की आपण फक्त शरीराला दूषित करणाऱ्या सवयींपासूनच नव्हे, तर मनाला दूषित करणाऱ्या सवयींपासूनही मुक्त व्हावे. (स्तोत्र ८३:१८, तळटीप; २ करिंथकर ७:१) त्यामुळे एक व्यक्ती यहोवाबद्दल शिकू लागते व त्याचा आदर करू लागते तेव्हा तिला याची जाणीव होते, की आपण पूर्ण मनाने यहोवाची उपासना केली पाहिजे. पण, आपण जर एखाद्या घातक सवयीचे गुलाम बनलो तर पूर्ण मनाने देवाची उपासना करणे आपल्याला शक्य होणार नाही. ही जाणीवच एका व्यक्तीला घातक इच्छा-अभिलाषांचा प्रतिकार करण्यास मदत करते.
जर्मनीत राहणारा ओलॉफ वयाच्या १२ व्या वर्षापासून धूम्रपान करू लागला. १६ वर्षांच्या व्यसनानंतर तो त्यातून मुक्त होऊ शकला. त्याने पहिल्यांदा सिगारेट ओढली तेव्हा त्याला खूप मजा वाटली; पण, काही काळातच तो तिचा गुलाम बनला. तो म्हणतो: “एकदा, सिगारेट न मिळाल्यामुळं मी इतका अस्वस्थ झालो की अॅशट्रेमध्ये ठेवलेल्या सिगारेटीचे तुकडे मी गोळा केले, त्यातली तंबाखू खरडून काढली, ती कागदात गुंडाळली आणि तिची सिगारेट बनवली. ते कृत्य किती लज्जास्पद होतं ते आज मला कळतं.” धूम्रपानाची ही वाईट सवय तो कशी मोडू शकला? तो म्हणतो: “यहोवाला खूश करण्याच्या इच्छेमुळंच मी हे करू शकलो. यहोवा मानवांवर किती प्रेम करतो आणि आपल्याला त्यानं किती सुंदर आशा दिली आहे हे जाणून घेतल्यामुळं मला या व्यसनातून मुक्त होण्याचं बळ मिळालं.”
धूम्रपानामुळे शरीरावर घातक परिणाम होतात
द टोबॅको अॅट्लस हे पुस्तक म्हणते: “विज्ञानाने सिद्ध केले आहे, की सिगारेट ओढल्यामुळे . . . शरीराच्या जवळजवळ प्रत्येक अवयवावर घातक परिणाम होतो; तसेच, त्यामुळे आजाराचे आणि मृत्यूचे प्रमाणही वाढते.” धूम्रपानामुळे कर्करोग, हृदयरोग आणि फुप्फुसाचा रोग यांसारखे असंसर्गजन्य रोग होतात हे बहुधा सगळ्यांनाच माहीत आहे. पण, जागतिक आरोग्य संघटनेच्या मते धूम्रपानामुळे क्षयरोगासारखे संसर्गजन्य रोगदेखील जडू शकतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होऊ शकतो.
“तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर.”—मत्तय २२:३७.
स्वतःला एखादी वाईट सवय लावून आपण देवाने दिलेले शरीर दूषित करत असू, तर देवाबद्दल आपल्याला प्रेम व आदर आहे असे म्हणता येईल का?
यहोवा देव त्याचे वचन बायबल यातून आपल्याला जीवनाबद्दल, शरीराबद्दल आणि आपल्या क्षमतांबद्दल उचित दृष्टिकोन बाळगण्यास मदत करतो. याविषयी देवाचा पुत्र येशू याने म्हटले: “तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर.” (मत्तय २२:३७) यावरून दिसून येते, की आपण आपल्या जीवनाचा आणि शरीराचा दुरुपयोग करू नये, तर त्यांचा आदर करावा. आपण जसजसे यहोवाबद्दल आणि त्याच्या अभिवचनांबद्दल शिकतो, तसतसे आपल्यासाठी त्याने जे काही केले आहे त्यांबद्दल आपल्याला प्रेम व कदर वाटू लागते. आणि यामुळेच शरीराला दूषित करणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून दूर राहण्याची प्रेरणा मिळते.
भारतातील जयवंथ नामक एक डॉक्टर ३८ वर्षांपासून धूम्रपान करत होते. ते म्हणतात: “धूम्रपानाच्या धोक्यांबद्दल वैद्यकीय मासिकांत मी बरंच काही वाचलं होतं. ते चुकीचं आहे हे मला माहीत होतं आणि मी माझ्या रुग्णांना ही सवय मोडण्याचा सल्लाही द्यायचो. पण, मी स्वतः मात्र ती सवय मोडू शकत नव्हतो; मी पाचसहा वेळा प्रयत्न करूनसुद्धा पाहिला, पण मला ते जमलं नाही.” मग कोणत्या गोष्टीमुळे शेवटी त्यांना धूम्रपान सोडणे शक्य झाले? ते म्हणतात: “बायबलचा अभ्यास केल्यामुळं मी धूम्रपान सोडू शकलो. यहोवाला खूश करण्याच्या मनस्वी इच्छेमुळं ही सवय लगेच मोडून टाकण्याची प्रेरणा मला मिळाली.”
धूम्रपानामुळे इतरांच्या जिवाला धोका होतो
धूम्रपींनी सोडलेला धूर आणि तंबाखू भाजल्यामुळे होणारा धूर विषारी असतो. त्याचा शरीरात शिरकाव झाल्याने कर्करोग व इतर रोग होतात. यामुळे दरवर्षी, प्रत्यक्षात धूम्रपान न करणारे सहा लाख लोक, खासकरून स्त्रिया व मुले दगावतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालात असा इशारा देण्यात आला की, “धूम्रपींनी सोडलेल्या धुराचे किंचित प्रमाणही धोकादायक आहे.”
“तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर.”—मत्तय २२:३९.
तुम्ही करत असलेल्या धूम्रपानामुळे तुमच्या कुटुंबाला व जवळच्या लोकांना अप्रत्यक्ष धूम्रपान करावे लागले, तर तुमचे त्यांच्यावर प्रेम आहे असे म्हणता येईल का?
येशूने म्हटले, की देवानंतर आपण आपल्या शेजाऱ्यांवर म्हणजे आपले कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि आपल्यासोबत वावरणारे लोक यांच्यावर प्रेम केले पाहिजे. त्याने म्हटले: “तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर.” (मत्तय २२:३९) आपल्या जवळच्या लोकांना त्रास होईल अशी एखादी सवय आपण स्वतःला लावून घेतली तर आपण आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करत नसू. त्यांच्यावर आपले खरे प्रेम असेल तर आपण बायबलचा पुढील सल्ला अनुसरू: “कोणीही आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्याचेही पाहावे.”—१ करिंथकर १०:२४.
आर्मीनियात राहणारा आरमन आपला अनुभव सांगतो: “धूम्रपान करण्याच्या माझ्या सवयीमुळं माझ्या कुटुंबाला खूप त्रास व्हायचा. मी ही सवय सोडून द्यावी म्हणून ते अक्षरशः माझ्याकडे गयावया करायचे. आपल्या या सवयीमुळं त्यांना त्रास होऊ शकतो ही गोष्टच मला मान्य नव्हती.” पण आरमनचा हा दृष्टिकोन बदलला. तो कसा? तो म्हणतो: “बायबलमध्ये असलेल्या ज्ञानामुळं आणि यहोवावरच्या माझ्या प्रेमामुळं मी धूम्रपान करण्याचं सोडू शकलो; इतकंच नाही तर या सवयीचा मला स्वतःला आणि माझ्यासोबत राहणाऱ्या लोकांनाही त्रास होऊ शकतो ही गोष्ट शेवटी मला पटली.”
लवकरच सिगारेट कायमची विझवली जाईल!
बायबलचे ज्ञान घेतल्यामुळे ओलॉफ, जयवंथ आणि आरमन या सर्वांना ही वाईट सवय मोडण्यास मदत मिळाली. कारण त्या सवयीचा त्यांना स्वतःला आणि इतरांनाही त्रास होत होता. पण, धूम्रपान करणे घातक आहे केवळ यामुळेच ते या वाईट सवयीवर मात करू शकले असे नाही. तर यहोवावरील प्रेमामुळे आणि त्याला खूश करण्याच्या मनस्वी इच्छेमुळे ते यावर मात करू शकले. प्रेम करणे म्हणजे नेमके काय हे १ योहान ५:३ यात सांगितले आहे. ते म्हणते: “देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” अर्थात, बायबलच्या तत्त्वांचे पालन करणे नेहमीच सोपे असेल असे नाही. पण, एका व्यक्तीच्या मनात देवाबद्दल गाढ प्रेम असेल, तर त्याच्या आज्ञांचे पालन करणे तिला मुळीच कठीण वाटणार नाही.
आज यहोवा देव एका जगव्याप्त शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे लक्षावधी लोकांना तंबाखूच्या व्यसनातून मुक्त होण्यास किंवा त्याच्या आहारी न जाण्यास मदत करत आहे. (१ तीमथ्य २:३, ४) आजवर, या जगाच्या व्यापारी यंत्रणेने लक्षावधी लोकांना तंबाखूचे गुलाम बनवले आहे. पण लवकरच यहोवा त्याच्या राज्याद्वारे, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शासनाखाली असलेल्या स्वर्गीय सरकारद्वारे या लोभिष्ट व्यापारी यंत्रणेचे नामोनिशाण मिटवून टाकेल. सर्व लोकांच्या भल्यासाठी तो धूम्रपानाची साथ कायमची नाहीशी करेल आणि आज्ञाधारक मानवांना मनाने आणि शरीराने परिपूर्ण स्थितीत आणेल.—यशया ३३:२४; प्रकटीकरण १९:११, १५.
तुम्ही धूम्रपान सोडण्याचा जीवतोड प्रयत्न करत असाल तर मुळीच हार मानू नका. यहोवावर प्रेम करायला शिकल्याने आणि धूम्रपानाबद्दलचा त्याचा दृष्टिकोन स्वीकारल्याने तुम्हालाही या सवयीवर मात करण्याची प्रेरणा मिळू शकते. बायबलची तत्त्वे शिकण्यासाठी आणि ती लागू करण्यासाठी तुम्हाला वैयक्तिक व व्यावहारिक मदत पुरवण्यास यहोवाच्या साक्षीदारांना नक्कीच आनंद होईल. तंबाखूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती व बळ यहोवा तुम्हाला देईल याची खातरी तुम्ही बाळगू शकता.—फिलिप्पैकर ४:१३. ▪ (w14-E 06/01)
^ परि. 3 या ठिकाणी धूम्रपान असे जे म्हटले आहे ते सिगारेट, चिरूट, चुट्टा, चिलीम, विडी किंवा हुक्का यांद्वारे तंबाखूचा धूर आत घेण्याला सूचित करते. असे असले, तरी या लेखात चर्चा केलेली तत्त्वे तंबाखू चघळणे, तपकीर ओढणे, निकोटीन असलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटी आणि अशा इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे यांनाही लागू होतात.