वाचक विचारतात . . .
देवाला कोणी बनवले?
एक वडील आपल्या सात वर्षांच्या मुलाशी बोलत आहेत असे चित्र डोळ्यांसमोर उभे करा. वडील मुलाला म्हणतात, की “देवानं खूप, खूप आधी पृथ्वी बनवली आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी बनवल्या; त्यानंतर त्यानं सूर्य, चंद्र आणि तारे बनवले.” मुलगा क्षणभर विचार करतो आणि म्हणतो, “पण पप्पा, देवाला कुणी बनवलं?”
वडील म्हणतात, “देवाला कुणीही बनवलं नाही. तो आधीपासूनच होता.” या साध्याशा वाक्यामुळे मुलाचे तेवढ्यापुरते समाधान होते. पण जसजसा तो मोठा होत जातो, तसतसा तो प्रश्न त्याला आणखी सतावू लागतो. सुरुवात असल्याशिवाय एखादी गोष्ट अस्तित्वात कशी येऊ शकते हे समजणे त्याला कठीण जाते. शेवटी, विश्वालासुद्धा एक सुरुवात होती. तर मग, ‘देव आला कुठून?’ असा प्रश्न त्याला पडतो.
या प्रश्नाचे उत्तर बायबल काय देते? वरील उदाहरणात वडिलांनी ज्याप्रमाणे उत्तर दिले काहीसे त्याचप्रमाणे. बायबलमध्ये मोशे नावाच्या एका लेखकाने असे लिहिले: “हे प्रभू, . . . पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी, तू पृथ्वी व जग ही निर्माण केली त्यापूर्वीच अनादिकालापासून अनंतकालापर्यंत तू देव आहेस.” (स्तोत्र ९०:१, २) तसेच, यशया संदेष्ट्याने म्हटले: “तुला कळले नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर, दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्नकर्ता” आहे. (यशया ४०:२८) याशिवाय, यहूदाने जे पत्र लिहिले त्यात त्याने म्हटले, की देवाचे अस्तित्व ‘युगारंभापूर्वीचे’ आहे.—यहूदा २५.
वरील वचनांत म्हटल्याप्रमाणेच प्रेषित पौलानेदेखील म्हटले की देव “सनातन . . . राजा” आहे. (१ तीमथ्य १:१७) याचा अर्थ, आपण कितीही काळ मागे गेलो तरी हेच दिसून येईल की देव नेहमीच अस्तित्वात होता; आणि भविष्यातही तो नेहमी अस्तित्वात असेल. (प्रकटीकरण १:८) तेव्हा, सर्वशक्तिमान देवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचे सनातन अस्तित्व.
ही गोष्ट समजणे कठीण का आहे? आपले जीवन मर्यादित असल्यामुळे वेळेच्या बाबतीत आपण जसा विचार करतो तसा यहोवा करत नाही. देव सनातन असल्यामुळे त्याच्यासाठी “हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत.” (२ पेत्र ३:८) उदाहरणार्थ, जेमतेम ५० दिवसांचे आयुष्य असणारा नाकतोडा मनुष्याचे ७० किंवा ८० वर्षांचे आयुष्य समजू शकेल का? मुळीच नाही! बायबल म्हणते की आपल्या महान सृष्टिकर्त्याच्या तुलनेत आपण नाकतोड्यासारखे आहोत. तसेच, देवाच्या तुलनेत आपली तर्कशक्तीही खूप कमी आहे. (यशया ४०:२२; ५५:८, ९) त्यामुळे यहोवाच्या व्यक्तिमत्त्वातील काही पैलू मानव पूर्णपणे समजू शकत नाहीत याचे आश्चर्य वाटायला नको.
देव सनातन आहे ही गोष्ट समजणे कठीण असले, तरी त्यात तथ्य आहे असे म्हणता येईल. कोणा दुसऱ्या व्यक्तीने देवाला निर्माण केले असते तर ती व्यक्ती निर्माणकर्ता ठरली असती. पण, बायबल तर म्हणते की यहोवाने “सर्वकाही निर्माण केले.” (प्रकटीकरण ४:११) शिवाय, आपल्याला हेदेखील माहीत आहे की एकेकाळी हे विश्व अस्तित्वात नव्हते. (उत्पत्ति १:१, २) मग ते कोठून आले? ते अस्तित्वात येण्यासाठी आधी निर्माणकर्ता अस्तित्वात असणे आवश्यक होते. तसेच, इतर बुद्धिमान जीव, जसे की देवाचा एकुलता एक पुत्र व देवदूत अस्तित्वात येण्याआधी देव अस्तित्वात होता. (ईयोब ३८:४, ७; कलस्सैकर १:१५) तर मग, स्पष्टच आहे, की सर्वात आधी देव एकटाच अस्तित्वात होता. देवाला निर्माण करण्याचा प्रश्नच येत नाही; कारण त्याला निर्माण करण्यासाठी कोणीच अस्तित्वात नव्हते.
आपले स्वतःचे व या विश्वाचे अस्तित्व याचा पुरावा देते की एक सनातन देव अस्तित्वात आहे. ज्याने हे अफाट विश्व उभे केले, ते नियंत्रित करण्यासाठी नियम बनवले तो नेहमीच अस्तित्वात असला पाहिजे. नाहीतर इतर सर्व जीव अस्तित्वात आलेच कसे असते?—ईयोब ३३:४. ▪ (w14-E 08/01)