बायबलनं बदललं जीवन!
शेवटी माझी आध्यात्मिक भूक भागली!
-
जन्म: १९८७
-
देश: आझरबाइजान
-
पार्श्वभूमी: वडील मुस्लिम, तर आई यहुदी
माझं आधीचं जीवन:
माझा जन्म आझरबाइजान देशाच्या बाकू शहरात झाला. आम्ही दोघी बहिणी, त्यातली मी धाकटी. वडील मुस्लिम होते, तर आई यहुदी. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. आंतरजातीय विवाह असला तरी एकमेकांच्या धार्मिक विश्वासाची ते कदर करायचे. वडील रमजानच्या वेळी रोजे ठेवायचे तेव्हा आईसुद्धा रोजे ठेवायची. आणि आईच्या यहुदी सण साजरा करण्याला वडिलांची काहीच हरकत नसायची. आमच्या घरात कुराण, तोरह आणि बायबल हे ग्रंथ असायचे.
मी स्वतःला मुस्लिम मानायचे. देव आहे याबद्दल माझ्या मनात कधीच शंका नव्हती. पण मनात अनेक प्रश्न यायचे. जसं की, ‘देवानं माणसाला का बनवलं? माणसानं आयुष्यभर दुःख सोसायचं आणि मेल्यावरही नरकात यातना भोगायच्या, असं का?’ लोकांच्या मते देवच कर्ता करवीता आहे; मग याचा अर्थ लोकांवर दुःख आणून तो फक्त मजा पाहत बसतो का?
१२ वर्षांची असताना मी नमाज पढू लागले. वडिलांनी आम्हा बहिणींना यहुदी शाळेत टाकलं होतं. शाळेत आम्हाला यहुदी प्रथा व हिब्रू भाषापण शिकवली जायची. वर्ग भरण्याआधी आम्ही यहुदी प्रार्थना करायचो. अशा प्रकारे मी घरी नमाज पढायचे, तर शाळेत यहुदी प्रार्थना म्हणायचे.
शाळेतल्या यहुदी धर्मगुरूंना मी नेहमी विचारायचे: “देवानं माणसाला का बनवलं? माझ्या मुस्लिम वडिलांबद्दल देवाला काय वाटतं?” या प्रश्नांची उत्तरं मिळाली खरी, पण ती मनाला पटणारी नव्हती. माझी बेचैनी काही केल्या संपत नव्हती. माझी आध्यात्मिक भूक अजूनही भागली नव्हती.
बायबलनं कसं जीवन बदललं?
२००२ साली देवावरचा माझा विश्वासच उडाला. आम्ही नुकतंच जर्मनीत राहायला आलो होतो. त्याच्या एकाच आठवड्यानंतर माझ्या वडिलांना पॅरालिसिसचा झटका आला आणि ते कोमात गेले. माझं कुटुंब नेहमी सुखरूप असावं म्हणून कितीतरी वर्षं मी देवाला प्रार्थना केली होती. जीवन-मरण देवाच्याच हातात असतं या विश्वासानं मी रोज देवाकडे वडिलांच्या जीवासाठी अक्षरशः भीक मागायचे. ‘एका लहान मुलीची इच्छा पूर्ण करणं ही देवासाठी खूप छोटीशी गोष्ट आहे,’
असं मला वाटलं होतं. त्यामुळं मला खातरी होती की देव माझं ऐकेल. पण, वडील वारले.‘देव इतका भावनाशून्य कसा?’ या विचारानं मी पार हादरून गेले. मला वाटलं, ‘एकतर प्रार्थना करायची माझी पद्धतच चुकीची असावी किंवा जगात देवच नसावा.’ मला इतका धक्का बसला होता की मी नमाजच पढू शकत नव्हते. आणि दुसऱ्या धर्मांत मला काही रस नव्हता. शेवटी, जगात देव नाही या मतावर मी आले.
सहा महिन्यानंतर, यहोवाचे साक्षीदार आमच्या घरी आले. खरंतर ख्रिस्ती धर्माबद्दल आमचं फारसं चांगलं मत नव्हतं. त्यामुळं मी आणि माझ्या बहिणीनं ठरवलं, की त्यांच्या शिकवणी चुकीच्या आहेत हे सभ्यपणे त्यांना दाखवून द्यायचं. म्हणून आम्ही त्यांना विचारलं: “दहा आज्ञांमध्ये तर सांगितलंय की मूर्तिपूजा करू नये; मग ख्रिश्चन लोक येशूची, क्रॉसची, मेरीची आणि इतर मूर्तींची उपासना का करतात?” पण आश्चर्य म्हणजे शास्त्रवचनांतून त्यांनी आम्हाला स्पष्टपणे दाखवून दिलं, की खरे ख्रिस्ती मूर्तिपूजा करत नाहीत; ते फक्त देवाला प्रार्थना करतात.
मग आम्ही विचारलं: “त्रैक्याबद्दल काय? येशू जर देव आहे तर मग तो पृथ्वीवर कसा राहू शकतो, लोक त्याला मारून कसं टाकू शकतात?” पुन्हा एकदा त्यांनी शास्त्रवचनांतून दाखवून दिलं की येशू ना देव आहे, ना देवाच्या बरोबरीचा; आणि म्हणून यहोवाचे साक्षीदार त्रैक्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांचं हे बोलणं ऐकून मी थक्क झाले आणि मनात म्हटलं: ‘हे जरा वेगळेच ख्रिश्चन दिसतात.’
पण मनात अजूनही प्रश्न होते, की लोक का मरतात? देव दुःख का देतो? या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी साक्षीदारांनी मला सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान, * हे पुस्तक दिलं; त्यात माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारे अख्खेच्या अख्खे धडे होते. त्यामुळं मी लगेच साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करू लागले.
बायबल अभ्यास करताना प्रत्येक वेळी मला माझ्या प्रश्नांची पटतील अशी उत्तरं मिळत गेली. मला समजलं, की देवाचं नाव यहोवा आहे. (स्तोत्र ८३:१८, तळटीप) तो आपल्यावर भरभरून प्रेम करतो. (१ योहान ४:८) आपल्याला जीवनाचा आनंद घेता यावा म्हणून त्यानं आपल्याला बनवलं. तो अन्यायाचा वीट करतो. आज जरी अन्याय होत असला तरी लवकरच तो अन्याय काढून टाकेल. मला हेसुद्धा समजलं, की आदाम आणि हव्वा यांनी देवाची आज्ञा मोडल्यामुळं आज आपल्याला अनेक दुःखद परिणाम भोगावे लागतात. (रोमकर ५:१२) त्यांपैकीच एक म्हणजे जवळच्या लोकांचा मृत्यू; जसं मी माझ्या वडिलांना मृत्यूत गमावलं. पण, येणाऱ्या नवीन जगात देव सर्व दुःखद परिणाम कायमचे नाहीसे करेल आणि मृत लोकांना पुन्हा जिवंत करेल.—प्रेषितांची कृत्ये २४:१५.
खरंच बायबलमुळंच माझी आध्यात्मिक भूक भागली. मी पुन्हा देवावर विश्वास ठेवू लागले. मी जसजसं यहोवाच्या साक्षीदारांना जवळून ओळखू लागले तसतसं मला जाणवलं की त्यांचा एक जागतिक समाज आहे. त्यांच्यातलं प्रेम आणि एकता पाहून मी खूप भारावून गेले. (योहान १३:३४, ३५) यहोवाबद्दल शिकल्यानंतर मला वाटलं की मी त्याचीच उपासना केली पाहिजे. म्हणून मी यहोवाची साक्षीदार बनण्याचं ठरवलं आणि ८ जानेवारी २००५ साली बाप्तिस्मा घेतला.
मला झालेला फायदा:
मनाला पटतील अशी उत्तरं बायबलमधून मिळाल्यामुळं मी नव्यानं जीवनाकडे पाहू लागले. त्यातल्या स्पष्ट माहितीमुळं माझ्या मनाची बेचैनी दूर झाली. नवीन जगात माझे वडील मला पुन्हा भेटतील या आशेमुळं मला खूप सांत्वन आणि आनंद मिळतो.—योहान ५:२८, २९.
गेल्या सहा वर्षांपासून मी आणि माझे पती जॉनाथन आनंदानं देवाची सेवा करत आहोत. आम्हा दोघांनाही समजलंय, की देवाबद्दलचं सत्य तर्काला पटणारं आणि सोपं आहे; इतकंच नव्हे, तर ते खूप मौल्यवानही आहे. त्यामुळंच देवाबद्दल आणि त्यानं दिलेल्या सुंदर आशेबद्दल आम्ही इतरांना सांगतो. आज मला कळून चुकलंय, की यहोवाचे साक्षीदार ‘वेगळे’ नाहीत, तर तेच खरे ख्रिस्ती आहेत. ▪ (w15-E 01/01)
^ परि. 15 यहोवाच्या साक्षीदारांचं हे प्रकाशन पूर्वी छापलं जायचं.