बायबल प्रश्नांची उत्तरं
तुम्ही चांगले पालक असल्याचं कसं दाखवू शकता?
आई-वडीलांमध्ये प्रेम आणि आदर असतो तेव्हा कुटुंबात चांगलं वातावरण तयार होतं. आणि यामुळं मुलांवर चांगला परिणाम होतो. (कलस्सैकर ३:१४, १९) यहोवा देवानं त्याच्या मुलाची, म्हणजे येशूची प्रशंसा केली, तसंच चांगले पालक आपल्या मुलांवर प्रेम करतात आणि त्यांची प्रशंसा करतात.—मत्तय ३:१७ वाचा.
आपला स्वर्गातील पिता यहोवा आपल्या सेवकांच्या प्रार्थना ऐकतो आणि त्यांच्या भावना समजून घेतो. तसंच, पालकांनीसुद्धा आपल्या मुलांचं बोलणं ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे. (याकोब १:१९) त्यांनी आपल्या मुलांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, अगदी नकारार्थी भावनासुद्धा.—गणना ११:११, १५ वाचा.
तुम्ही जबाबदार मुलं कशी घडवू शकता?
पालक या नात्यानं, मुलांना नियम देण्याचा तुम्हाला अधिकार आहे. (इफिसकर ६:१) या बाबतीत तुम्ही देवाकडून बरंच काही शिकू शकता. तो त्याच्या मुलांना स्पष्ट नियम देतो आणि ते न पाळल्यानं काय परिणाम होतील हेसुद्धा तो स्पष्टपणे सांगतो. यावरून तो आपलं प्रेम व्यक्त करतो. (उत्पत्ति ३:३) देव लोकांना त्याचे नियम पाळण्याची बळजबरी करत नाही तर ते पाळल्यानं त्यांना कसा फायदा होऊ शकतो हे तो शिकवतो.—यशया ४८:१८, १९ वाचा.
मुलांना देवावर प्रेम करायला, म्हणजे त्याच्या आज्ञा पाळायला मदत करा. असं केल्यानं, तुम्ही सोबत नसतानादेखील ते सुज्ञपणे वागतील. देव जसं स्वतःच्या उदाहरणावरून शिकवतो तसंच पालकांनीसुद्धा स्वतःच्या उदाहरणावरून मुलांना देवावर प्रेम करायला शिकवलं पाहिजे.—अनुवाद ६:५-७; इफिसकर ४:३२; ५:१ वाचा. (w15-E 06/01)