अध्याय ७
“येशूविषयीचा आनंदाचा संदेश” घोषित करण्यात आला
फिलिप्प प्रचारक म्हणून आवेशाने कार्य करतो
प्रे. कार्यं ८:४-४० वर आधारित
१, २. पहिल्या शतकात आनंदाच्या संदेशाची घोषणा बंद करण्याच्या प्रयत्नांमुळे उलट परिणाम कसा झाला?
ख्रिश्चनांविरुद्ध आता भयंकर छळाची लाट उसळली. शौल मंडळीला “सतावू” लागला. या ठिकाणी वापरलेल्या मूळ ग्रीक शब्दावरून, तो ख्रिश्चनांशी खूप क्रूरपणे वागत होता असा अर्थ सूचित होतो. (प्रे. कार्यं ८:३) या छळामुळे शिष्य यरुशलेममधून पळून गेले. त्यामुळे, ख्रिस्ती विश्वास समूळ नष्ट करण्याचा शौलचा इरादा पूर्ण होणार, असं काहींना वाटू लागलं. पण ख्रिस्ती लोक यरुशलेममधून वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यामुळे नेमकं याउलटच घडलं. पण असं काय घडलं?
२ वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेलेले ख्रिस्ती, त्या-त्या देशात “वचनाबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित” करू लागले. (प्रे. कार्यं ८:४) जरा विचार करा! छळामुळे आनंदाच्या संदेशाची घोषणा तर बंद झाली नाहीच, उलट संदेशाचा आणखी प्रसार व्हायला यामुळे मदतच झाली! शिष्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पळून जायला भाग पाडून त्यांचा छळ करणाऱ्यांनी नकळत राज्याचं प्रचारकार्य अगदी दूरदूरच्या क्षेत्रांत पोहोचवायला मदत केली. आजच्या काळातही असंच काहीतरी घडलं आहे, ज्याविषयी आपण पुढे पाहणार आहोत.
“जे विखुरले गेले होते” (प्रे. कार्यं ८:४-८)
३. (क) फिलिप्प कोण होता? (ख) शोमरोनमध्ये प्रचाराचं काम जास्त प्रमाणात करण्यात आलं नव्हतं असं का म्हणता येईल, पण येशूने या क्षेत्राबद्दल काय सांगितलं होतं?
३ “जे विखुरले गेले होते” त्यांच्यापैकी फिलिप्प हासुद्धा एक होता. a (प्रे. कार्यं ८:४; “ आवेशी ‘प्रचारक’ फिलिप्प” ही चौकट पाहा.) तो शोमरोनला गेला. या शहरात पूर्वी प्रचाराचं काम जास्त प्रमाणात करण्यात आलं नव्हतं; कारण येशूने एकदा आपल्या प्रेषितांना असं सांगितलं होतं, “कोणत्याही शोमरोनी शहरात जाऊ नका. फक्त इस्राएलच्या घराण्यातल्या हरवलेल्या मेंढरांकडेच जा.” (मत्त. १०:५, ६) पण, पुढे शोमरोनच्या लोकांना अगदी पूर्णपणे साक्ष दिली जाईल हे येशूला माहीत होतं. कारण, स्वर्गात परत जाण्याआधी तो म्हणाला, “पवित्र शक्ती तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि तुम्ही यरुशलेममध्ये, संपूर्ण यहूदीयामध्ये आणि शोमरोनमध्ये, तसंच पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांपर्यंत माझ्याबद्दल साक्ष द्याल.”—प्रे. कार्यं १:८.
४. शोमरोनी लोकांनी फिलिप्पच्या प्रचाराला कसा प्रतिसाद दिला, आणि यामागचं कारण काय असावं?
४ शोमरोनचं क्षेत्र “कापणीसाठी तयार” असल्याचं फिलिप्पला दिसून आलं. (योहा. ४:३५) तिथे राहणाऱ्या लोकांना त्याचा संदेश ऐकून खूप आनंद झाला. त्याचं कारणही तसंच होतं. यहुदी लोक शोमरोनी लोकांशी कोणतेही संबंध ठेवत नव्हते. त्यांच्यापैकी बरेच जण तर शोमरोन्यांना अगदी तुच्छ समजायचे. याउलट, फिलिप्पने सांगितलेला आनंदाचा संदेश हा सर्व वर्गांच्या लोकांसाठी होता. परूश्यांच्या भेदभाव करण्याच्या वृत्तीप्रमाणे या संदेशात उच्च-नीच असा भेदभाव नव्हता. शोमरोनी लोकांना आवेशाने प्रचार करून फिलिप्पने दाखवून दिलं, की त्यांना तुच्छ लेखणाऱ्या लोकांसारखा तो पक्षपाती नव्हता. म्हणूनच, जमलेल्या “सगळ्या लोकांनी” फिलिप्पने सांगितलेल्या गोष्टी मन लावून ऐकल्या.—प्रे. कार्यं ८:६.
५-७. ख्रिश्चनांना वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागल्यामुळे आनंदाच्या संदेशाचा प्रसार व्हायला कशा प्रकारे मदत मिळाली याची उदाहरणं सांगा.
५ पहिल्या शतकाप्रमाणे आजही, देवाच्या लोकांचा छळ करणाऱ्यांना त्यांचं प्रचारकार्य थांबवण्यात यश आलेलं नाही. बऱ्याचदा ख्रिश्चनांना तुरुंगात टाकण्यात आलं, किंवा दुसऱ्या ठिकाणी जायला भाग पाडलं गेलं. पण, यामुळे एका नवीन ठिकाणी राज्याचा संदेश सांगण्यासाठी त्यांना उलट मदतच झाली. उदाहरणार्थ, दुसऱ्या महायुद्धात यहोवाचे साक्षीदार नात्झींच्या छळ छावण्यांमध्ये कित्येक लोकांना साक्ष देऊ शकले. अशाच एका छळ छावणीत साक्षीदारांशी भेट झालेल्या एका ज्यूइश माणसाने म्हटलं, “यहोवाचे साक्षीदार असलेल्या कैद्यांचं धैर्य पाहून, त्यांचा विश्वास शास्त्रवचनांवर आधारित असल्याची मला खातरी पटली आणि त्यामुळे मीही एक साक्षीदार बनलो.”
६ कधीकधी तर छळ करणाऱ्यांनाही साक्ष देण्यात आली आणि त्यांनीही आनंदाचा संदेश स्वीकारला. उदाहरणार्थ, फ्रांत्झ डेश नावाच्या एका साक्षीदाराला ऑस्ट्रियामध्ये गुसेन छळ छावणीत पाठवण्यात आलं होतं. तेव्हा त्याला एका नात्झी अधिकाऱ्यासोबत बायबलचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. बऱ्याच वर्षांनी यहोवाच्या साक्षीदारांच्या एका अधिवेशनात त्या दोघांची पुन्हा भेट झाली, आणि आता ते दोघंही आनंदाच्या संदेशाचे प्रचारक होते! त्यांना किती आनंद झाला असेल याची कल्पना करा!
७ छळामुळे काही ख्रिस्ती बांधवांना एका देशातून दुसऱ्या देशात पळून जावं लागलं, तेव्हाही असंच घडलं. १९७० च्या दशकात, मलावीतल्या साक्षीदारांना मोझंबिकला पळून जावं लागलं, तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात प्रचारकार्य करण्यात आलं. नंतर विरोध सुरू झाला तेव्हाही मोझंबिकमध्ये प्रचाराचं कार्य सुरूच राहिलं. फ्रांसिस्को कोआना सांगतात, “प्रचार केल्यामुळे आमच्यापैकी काही जणांना बऱ्याच वेळा अटक करण्यात आली. पण अनेक लोकांनी राज्याच्या संदेशाला चांगला प्रतिसाद दिला, तेव्हा आम्हाला याची खातरी पटली की जशी पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांना देवाने मदत केली होती, तशीच तो आम्हालाही करत आहे.”
८. राजकीय आणि आर्थिक परिस्थितीत झालेल्या बदलांमुळे प्रचारकार्यावर कसा परिणाम झाला आहे?
८ पण, फक्त छळामुळेच नवीन क्षेत्रांत ख्रिस्ती विश्वासाचा प्रसार झाला, असं नाही. अलीकडच्या वर्षांत, काही देशांची राजकीय आणि आर्थिक परिस्थिती बदलल्यामुळे बऱ्याच भाषांच्या व देशांच्या लोकांना राज्याचा संदेश सांगण्याची संधी उपलब्ध झाली. युद्ध सुरू असलेल्या किंवा आर्थिक मंदी असलेल्या देशांतले अनेक लोक, चांगली परिस्थिती असलेल्या देशांत राहायला गेले आणि तिथे ते बायबलचा अभ्यास करू लागले. मोठ्या संख्येने दुसऱ्या देशात आश्रय घ्यायला आलेल्या लोकांमुळे परदेशी भाषांची नवीन क्षेत्रं निर्माण झाली. तुम्हीही तुमच्या क्षेत्रात “सर्व राष्ट्रं, वंश, लोक आणि भाषा यांतून” आलेल्या लोकांना साक्ष देण्याचा प्रयत्न करत आहात का?—प्रकटी. ७:९.
“मलाही हा अधिकार द्या” (प्रे. कार्यं ८:९-२५)
९. शिमोन कोण होता आणि तो कशामुळे प्रभावित झाला होता?
९ फिलिप्पने शोमरोनात बरेच चमत्कार केले. उदाहरणार्थ, त्याने आजारी लोकांना बरं केलं आणि दुष्ट स्वर्गदूतांनाही काढलं. (प्रे. कार्यं ८:६-८) फिलिप्पजवळ हे वेगवेगळे चमत्कार करण्याची देणगी आहे हे पाहून एक माणूस खूप प्रभावित झाला. त्याचं नाव शिमोन होतं आणि तो एक जादूगार होता. लोकांमध्ये त्याचं इतकं नाव होतं, की “हा माणूस म्हणजे देवाची महाशक्ती आहे” असं ते म्हणायचे. पण आता फिलिप्पच्या चमत्कारांतून शिमोन देवाच्या खऱ्या शक्तीचे परिणाम आपल्या डोळ्यांनी पाहत होता. त्यामुळे त्यानेही ख्रिस्ती विश्वास स्वीकारला. (प्रे. कार्यं ८:९-१३) पण नंतर, शिमोनच्या मनात खरं काय होतं ते उघड झालं. ते कसं काय?
१०. (क) पेत्र आणि योहान यांनी शोमरोनात काय केलं? (ख) पेत्र आणि योहानने हात ठेवल्यावर नवीन शिष्यांना पवित्र शक्ती मिळाल्याचं पाहून शिमोनने काय केलं?
१० शोमरोनात होत असलेल्या वाढीबद्दल प्रेषितांना कळलं, तेव्हा त्यांनी पेत्र आणि योहान यांना तिकडे पाठवलं. (“ पेत्र ‘राज्याच्या किल्ल्या’ वापरतो” ही चौकट पाहा.) शोमरोनला आल्यावर त्या प्रेषितांनी नव्या शिष्यांवर हात ठेवले तेव्हा त्यांच्यापैकी प्रत्येकाला पवित्र शक्ती मिळाली. b शिमोनने हे पाहिलं तेव्हा त्याला खूप आश्चर्य झालं. तो प्रेषितांना म्हणाला, “मलाही हा अधिकार द्या, म्हणजे ज्या कोणावर मी हात ठेवीन त्याला पवित्र शक्ती मिळेल.” इतकंच नाही, तर ही पवित्र देणगी मिळवण्यासाठी शिमोन त्यांना पैसेही द्यायला तयार झाला.—प्रे. कार्यं ८:१४-१९.
११. पेत्रने शिमोनला काय सांगितलं आणि तेव्हा शिमोनने काय केलं?
११ पेत्रने शिमोनला ठामपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, “तुझ्या चांदीचा तुझ्यासोबत नाश होवो, कारण देवाचं हे मोफत दान पैशांनी विकत घ्यायचा तू विचार केलास. या गोष्टीत तुझा कोणताही सहभाग किंवा वाटा नाही, कारण तुझं मन देवाच्या दृष्टीत सरळ नाही.” मग पेत्रने शिमोनला पश्चात्ताप करून क्षमा मिळण्यासाठी देवाला प्रार्थना करायला सांगितलं. तो म्हणाला, “यहोवाकडे याचना कर, म्हणजे तू आपल्या मनात ही दुष्ट कल्पना [“योजना,” न्यू जेरुसलेम बायबल] आणल्याबद्दल कदाचित तुला क्षमा मिळेल.” शिमोन मुळात वाईट नव्हता, त्याला योग्य तेच करण्याची इच्छा होती. पण, काही वेळासाठी तो चुकीचा विचार करू लागला होता. म्हणून त्याने प्रेषितांना विनंती केली, “तुम्ही सांगितलेल्या या कोणत्याही गोष्टी माझ्यावर येऊ नयेत, म्हणून माझ्यासाठी यहोवाकडे याचना करा.”—प्रे. कार्यं ८:२०-२४.
१२. ख्रिस्ती धर्मजगतात पद मिळवण्यासाठी लाचखोरी किती मोठ्या प्रमाणात चालते?
१२ पेत्रने शिमोनला कडक शब्दांत दिलेली ताकीद आजही ख्रिश्चनांना लागू होते. ख्रिश्चनांनी मंडळीत जबाबदाऱ्या मिळवण्यासाठी लाच देण्याचा कधीही प्रयत्न करू नये. खऱ्या उपासनेचा त्याग केलेल्या ख्रिस्ती धर्मजगतात, पद मिळवण्यासाठी केलेल्या लाचखोरीची असंख्य उदाहरणं आहेत. दी एन्सायक्लोपिडीया ब्रिटॅनिका (१८७८) या विश्वकोशात असं म्हटलं आहे, “नवीन पोपला निवडण्यासाठी होणाऱ्या सभांचा इतिहास पाहिला, तर ही खातरी पटते की पोपच्या पदासाठी होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत लाचखोरीचा प्रकार सर्रासपणे चालतो. बऱ्याचदा तर ही लाचखोरी अगदी खालच्या थराला जाऊन, निर्लज्जपणे आणि उघडउघड केली जाते.”
१३. ख्रिश्चनांनी कशा प्रकारे लाचखोरीपासून दूर राहिलं पाहिजे?
१३ ख्रिश्चनांनी लाचखोरीच्या पापापासून दूर राहिलं पाहिजे. उदाहरणार्थ, मंडळीत काही खास जबाबदाऱ्या देण्याचा ज्यांच्याजवळ अधिकार आहे असं वाटतं, त्यांना महागाच्या भेटवस्तू देऊन किंवा त्यांची नको तितकी प्रशंसा करून त्यांची मर्जी मिळवण्याचा प्रयत्न करू नये. तसंच, इतरांवर खास जबाबदाऱ्या सोपवण्याचा ज्यांच्याजवळ अधिकार आहे असं समजलं जातं, त्यांनीही श्रीमंत लोकांना खास वागणूक न देण्याची काळजी घेतली पाहिजे. हे दोन्ही लाचखोरीचेच प्रकार आहेत. खरंतर, देवाच्या सर्व सेवकांनी स्वतःला “इतरांपेक्षा लहान” समजलं पाहिजे. आणि हा भरवसा बाळगून धीराने वाट पाहिली पाहिजे की यहोवाच्या पवित्र शक्तीद्वारे योग्य वेळी मंडळीत जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. (लूक ९:४८) स्वतःला गौरव मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी यहोवाच्या संघटनेत कोणतंही स्थान नाही.—नीति. २५:२७.
“तुम्ही जे वाचताय ते तुम्हाला खरंच कळतंय का?” (प्रे. कार्यं ८:२६-४०)
१४, १५. (क) “कूशी षंढ” कोण होता आणि फिलिप्पची त्याच्याशी भेट कशी झाली? (ख) कूशी माणसाने फिलिप्पच्या संदेशाला कसा प्रतिसाद दिला आणि त्याचा बाप्तिस्मा हा भावनांच्या भरात येऊन घेतलेला नव्हता, असं आपण का म्हणू शकतो? (तळटीप पाहा.)
१४ यहोवाच्या दूताने आता फिलिप्पला यरुशलेमहून गज्जा इथे जाणाऱ्या रस्त्याने जायला सांगितलं. आपल्याला तिकडे जायला का सांगितलं असावं, असा प्रश्न कदाचित फिलिप्पच्या मनात आला असेल. पण लवकरच त्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालं. कारण काही वेळातच त्याची एका कूशी षंढाशी भेट झाली, जो “यशया संदेष्ट्याचं पुस्तक मोठ्याने वाचत होता.” (“ कोणत्या अर्थाने ‘षंढ’?” ही चौकट पाहा.) यहोवाच्या पवित्र शक्तीद्वारे फिलिप्पला त्या माणसाच्या रथाजवळ जाण्याची आज्ञा देण्यात आली. फिलिप्प रथासोबत धावू लागला आणि त्याने कूशी माणसाला विचारलं, “तुम्ही जे वाचताय ते तुम्हाला खरंच कळतंय का?” तेव्हा तो माणूस म्हणाला, “कोणी समजावून सांगितल्याशिवाय ते मला कसं कळेल?”—प्रे. कार्यं ८:२६-३१.
१५ कूशी माणसाने मग फिलिप्पला आपल्या रथात बसायला सांगितलं. त्या दोघांत नक्कीच खूप छान चर्चा झाली असेल! कारण, यशयाच्या भविष्यवाणीत ज्या ‘मेंढराबद्दल’ किंवा ‘सेवकाबद्दल’ सांगितलं होतं, तो कोण होता हे कित्येक शतकांपासून एक रहस्य होतं. (यश. ५३:१-१२) पण फिलिप्पने कूशी माणसाला समजावून सांगितलं, की ती भविष्यवाणी येशू ख्रिस्ताच्या बाबतीत पूर्ण झाली. इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी बाप्तिस्मा घेतलेल्यांप्रमाणेच या कूशी माणसानेही, आपण काय केलं पाहिजे हे लगेच ओळखलं. शिवाय, तो आधीच यहुदी धर्म स्वीकारलेल्यांपैकी होता. म्हणून तो फिलिप्पला म्हणाला, “पाहा! इथे पाणी आहे; मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे?” फिलिप्पने लगेच त्या माणसाला बाप्तिस्मा दिला! c (“ पाण्यातला बाप्तिस्मा” ही चौकट पाहा.) मग, फिलिप्पला एका नव्या कामगिरीसाठी अश्दोदला जायला सांगण्यात आलं आणि तिथे जाऊन तो आनंदाचा संदेश घोषित करत राहिला.—प्रे. कार्यं ८:३२-४०.
१६, १७. आज प्रचारकार्यात स्वर्गदूत कशा प्रकारे सहभागी आहेत?
१६ आज ख्रिश्चनांनाही फिलिप्पसारखंच कार्य करण्याचा खास सन्मान मिळाला आहे. ते दररोजच्या व्यवहारांत भेटणाऱ्या लोकांना, उदाहरणार्थ प्रवास करताना भेटणाऱ्यांना राज्याचा संदेश सांगतात. बऱ्याचदा, एखाद्या प्रामाणिक मनाच्या व्यक्तीशी त्यांची झालेली भेट हा फक्त एक योगायोग नसतो. याचं आपल्याला नवल वाटण्याचं कारण नाही, कारण बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की “प्रत्येक लोकसमूहाच्या, राष्ट्राच्या, वंशाच्या आणि भाषेच्या लोकांना” राज्याचा संदेश मिळावा, म्हणून आज स्वर्गदूत प्रचारकार्यात आपलं मार्गदर्शन करत आहेत. (प्रकटी. १४:६) येशूनेही सांगितलं होतं की प्रचारकार्यात स्वर्गदूत आपलं मार्गदर्शन करतील. गहू आणि जंगली गवताच्या दृष्टान्तात येशूने सांगितलं, की कापणीच्या वेळी म्हणजेच जगाच्या समाप्तीच्या काळात “कापणी करणारे” स्वर्गदूतच असतील. त्याने असंही सांगितलं की हे स्वर्गदूत “त्याच्या राज्यातून अडखळायला लावणाऱ्या सर्व गोष्टी आणि अनीतीने वागणाऱ्या लोकांना” नाश करण्यासाठी गोळा करतील. (मत्त. १३:३७-४१) त्याच वेळी, ते भविष्यात येशूसोबत स्वर्गात राज्य करणार असलेल्या त्याच्या सहवारसांनाही गोळा करतील. नंतर, ते दुसऱ्या मेंढरांच्या एका मोठ्या लोकसमुदायाला, म्हणजेच ज्यांना यहोवाला आपल्या संघटनेत आणायचं आहे अशांनाही गोळा करतील.—प्रकटी. ७:९; योहा. ६:४४, ६५; १०:१६.
१७ सेवाकार्य करताना भेटणारे काही लोक आपल्याला सांगतात, की ते नुकतेच देवाच्या मदतीसाठी प्रार्थना करत होते. असे लोक भेटतात तेव्हा आपल्याला याची खातरी पटते की स्वर्गदूत आज खरोखरच लोकांना गोळा करण्याचं काम करत आहेत. एका अनुभवाकडे लक्ष द्या. दोन साक्षीदार प्रचारकार्य करत होते. त्यांच्यासोबत एक लहान मुलगाही होता. दुपार होत आली तेव्हा त्यांनी प्रचारकार्य थांबवायचं ठरवलं. पण लहान मुलगा मात्र पुढच्या घरात जाण्याचा हट्ट करू लागला. इतकंच काय, तर तो एकटाच पुढे गेला आणि त्याने दार वाजवलं! एका तरुण स्त्रीने दार उघडलं, तेव्हा दोघं साक्षीदार तिच्याशी बोलले. त्या स्त्रीने जेव्हा त्यांना सांगितलं, की कोणीतरी येऊन आपल्याला बायबल समजून घ्यायला मदत करावी अशी ती आताच प्रार्थना करत होती, तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं. ती स्त्री लगेच बायबल अभ्यास करायलाही तयार झाली!
१८. प्रचारकार्य करण्याचा सन्मान किती मोठा आहे हे आपण का विसरू नये?
१८ आज पूर्वी कधीही झालं नव्हतं इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचाराचं काम केलं जात आहे. ख्रिस्ती मंडळीचा भाग म्हणून या कार्यात स्वर्गदूतांसोबत सहभाग घेण्याचा तुम्हालाही खास सन्मान मिळाला आहे! हा सन्मान किती मोठा आहे हे कधीही विसरू नका. कारण, जर तुम्ही धीर न सोडता हे कार्य करत राहिलात, तर “येशूविषयीचा आनंदाचा संदेश” सांगण्याच्या या कार्यातून तुम्हाला खूप समाधान मिळेल.—प्रे. कार्यं ८:३५.
a हा प्रेषित फिलिप्प नाही. तर या पुस्तकाच्या ५ व्या अध्यायात, यरुशलेममध्ये ग्रीक आणि हिब्रू विधवांना दररोज जेवणाचं वाटप करण्यासाठी “चांगलं नाव असलेल्या” ज्या “सात पुरुषांना” नेमण्यात आलं होतं, त्यांच्यापैकी तो होता.—प्रे. कार्यं ६:१-६.
b त्या काळात नव्या शिष्यांना सहसा त्यांच्या बाप्तिस्म्याच्या वेळी पवित्र शक्ती मिळायची, म्हणजेच त्यांना पवित्र शक्तीने अभिषिक्त केलं जायचं. यामुळे, त्यांना भविष्यात येशूसोबत स्वर्गात राजे आणि याजक म्हणून सेवा करण्याची आशा मिळायची. (२ करिंथ. १:२१, २२; प्रकटी. ५:९, १०; २०:६) पण या घटनेत, नवीन शिष्य त्यांच्या बाप्तिस्म्याच्या वेळी पवित्र शक्तीने अभिषिक्त झाले नव्हते. पेत्र आणि योहान यांनी अलीकडेच बाप्तिस्मा झालेल्या त्या शिष्यांवर हात ठेवले, तेव्हा त्यांना पवित्र शक्ती मिळाली आणि त्यासोबतच वेगवेगळे चमत्कार करण्याची देणगीही मिळाली.
c हे भावनांच्या भरात येऊन उचललेलं पाऊल नव्हतं. हा माणूस यहुदी धर्म स्वीकारलेल्यांपैकी असल्यामुळे त्याला आधीच शास्त्रवचनांचं बऱ्यापैकी ज्ञान होतं. तसंच, मसीहाबद्दलच्या भविष्यवाण्याही त्याला माहीत होत्या. शिवाय, आता त्याला देवाच्या संकल्पात येशूची भूमिका काय आहे, हेही समजलं होतं. त्यामुळे, त्याला लगेच बाप्तिस्मा घ्यायला काहीच हरकत नव्हती.