व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय ६

स्तेफन​—“देवाची कृपा आणि सामर्थ्य यांनी परिपूर्ण”

स्तेफन​—“देवाची कृपा आणि सामर्थ्य यांनी परिपूर्ण”

स्तेफनने न्यायसभेसमोर धैर्याने दिलेल्या साक्षीतून शिकण्यासारख्या गोष्टी

प्रे. कार्यं ६:८–८:३ वर आधारित

१-३. (क) स्तेफन कोणत्या भीतीदायक परिस्थितीत आहे, आणि तरीही तो कसा वागतो? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

 स्तेफन न्यायाधीशांसमोर उभा आहे. यरुशलेममध्ये मंदिराच्या जवळपास असलेल्या एका मोठ्या सभागृहात हे न्यायालय असावं. सभागृहात ७१ न्यायाधीश अर्धगोलाकारात बसले आहेत. हे न्यायालय, म्हणजेच यहुदी न्यायसभा आज खास स्तेफनचा न्याय करण्यासाठी एकत्र जमली आहे. यहुदी समाजात या न्यायाधीशांचा बराच दबदबा होता. पण, त्यांच्यापैकी बहुतेक जण येशूचा शिष्य असलेल्या स्तेफनकडे अगदी तुच्छतेने पाहतात. आजची सभा महायाजक कयफा याने बोलावली आहे. काही महिन्यांआधी जेव्हा न्यायसभेने येशूला मृत्युदंड सुनावला होता, तेव्हाही हाच कयफा न्यायसभेचा अध्यक्ष होता. या गोष्टीमुळे स्तेफन घाबरला आहे का?

मुळीच नाही! उलट, या क्षणी स्तेफनच्या चेहऱ्‍यावर एक वेगळाच भाव आहे. न्यायाधीश त्याच्याकडे पाहतात, तेव्हा “त्याचा चेहरा एखाद्या स्वर्गदूताच्या चेहऱ्‍यासारखा” दिसतो. (प्रे. कार्यं ६:१५) स्वर्गदूत यहोवा देवाचे संदेश पोहोचवण्याचं काम करत असल्यामुळे ते अगदी निर्भय आणि शांत असतात. स्तेफनलाही आज अगदी तसंच वाटत आहे. पण द्वेषाने पेटलेल्या त्या न्यायाधीशांसमोर तो इतका शांत कसा राहू शकला?

या प्रश्‍नाच्या उत्तरातून आजच्या काळातले ख्रिस्तीसुद्धा बरंच काही शिकू शकतात. तसंच, आपण हेही जाणून घेतलं पाहिजे की स्तेफनला या न्यायाधीशांसमोर नेमकं का आणलं गेलं? याअगोदर त्याने आपल्या विश्‍वासाचं कसं समर्थन केलं होतं? आणि आपण कोणत्या मार्गांनी त्याचं अनुकरण करू शकतो?

“त्यांनी लोकांना . . . भडकवलं” (प्रे. कार्यं ६:८-१५)

४, ५. (क) स्तेफन मंडळीसाठी मौल्यवान का होता? (ख) स्तेफन “देवाची कृपा आणि सामर्थ्य यांनी परिपूर्ण” होता याचा काय अर्थ होतो?

आपण याआधी पाहिल्याप्रमाणे, नवीनच स्थापन झालेल्या ख्रिस्ती मंडळीत स्तेफनचं चांगलं नाव होतं आणि तो मंडळीत चांगलं कामही करत होता. पाचव्या अध्यायात आपण पाहिलं, की प्रेषितांनी ज्या सात नम्र पुरुषांना आपली मदत करण्यासाठी निवडलं होतं, त्यांत स्तेफनही होता. देवाने स्तेफनला काही खास देणग्या दिल्या होत्या. प्रेषितांची कार्यं ६:८ यात असं सांगितलं आहे, की तो “बरीच अद्‌भुत कार्यं आणि चिन्हं करत होता.” इतकं असूनही स्तेफन नम्र होता ही खरोखरच एक विशेष गोष्ट आहे. त्याच्याबद्दल असंही म्हणण्यात आलं आहे, की तो “देवाची कृपा आणि सामर्थ्य यांनी परिपूर्ण” होता. याचा काय अर्थ होतो?

“देवाची कृपा” यासाठी असलेल्या ग्रीक शब्दाचं “दयाळूपणा” असंही भाषांतर केलं जाऊ शकतं. स्तेफन स्वभावाने फार प्रेमळ होता, त्यामुळे तो सहज लोकांचं मन जिंकून घ्यायचा. तो ज्या प्रकारे बोलायचा, त्यामुळे बऱ्‍याच लोकांना त्याचं बोलणं पटायचं. तो अगदी मनापासून बोलत आहे आणि तो सांगत असलेल्या गोष्टी आपल्या फायद्याच्याच आहेत, याची त्यांना खातरी वाटायची. तो सामर्थ्याने परिपूर्ण होता, कारण यहोवाची शक्‍ती त्याच्यावर कार्य करत होती आणि तो नम्रपणे त्या शक्‍तीच्या मार्गदर्शनानुसार वागायचा. देवाकडून मिळालेल्या देणग्यांमुळे आणि त्याच्याजवळ असलेल्या कौशल्यांमुळे तो गर्विष्ठ बनला नाही. उलट, नेहमी यहोवाचीच प्रशंसा होईल याकडे तो लक्ष द्यायचा आणि लोकांशी बोलताना त्यांच्याबद्दल काळजी व्यक्‍त करायचा. कदाचित यामुळेच त्याचे विरोधक त्याचा इतका द्वेष करत होते.

६-८. (क) स्तेफनच्या विरोधकांनी त्याच्यावर कोणते दोन आरोप लावले, आणि का? (ख) स्तेफनच्या उदाहरणामुळे आजच्या ख्रिश्‍चनांना कशी मदत होईल?

याआधी बऱ्‍याच लोकांनी स्तेफनशी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता. पण “तो बुद्धीने आणि पवित्र शक्‍तीच्या मदतीने बोलत असल्यामुळे त्याच्यापुढे त्यांचं काहीच चाललं नाही.” a यामुळे चिडून “त्यांनी गुपचूप काही माणसांना . . . चिथवलं” आणि ख्रिस्ताच्या या शिष्याची कोणतीही चूक नसताना त्याच्याविरुद्ध आरोप लावायला सांगितले. तसंच, त्यांनी लोकांना, वडील जनांना आणि शास्त्र्यांना “भडकवलं” आणि यामुळेच स्तेफनला न्यायसभेपुढे खेचून आणण्यात आलं. (प्रे. कार्यं ६:९-१२) विरोधकांनी त्याच्यावर दोन आरोप लावले. तो देवाची आणि मोशेचीही निंदा करत आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी हे आरोप का लावले?

स्तेफनवर खोटे आरोप लावणाऱ्‍यांनी म्हटलं, की तो यरुशलेममधल्या “पवित्र मंदिराच्या” विरोधात बोलत असल्यामुळे त्याने देवाची निंदा केली होती. (प्रे. कार्यं ६:१३) तसंच, त्याने मोशेचीही निंदा केली होती असं त्यांचं म्हणणं होतं, कारण तो मोशेच्या नियमशास्त्राच्या विरोधात बोलून मोशेच्या काळापासून चालत आलेल्या प्रथा बदलण्याचा प्रयत्न करत होता. हे आरोप फार गंभीर होते कारण त्या काळातले यहुदी लोक मंदिराला, मोशेच्या नियमशास्त्राला आणि त्या नियमशास्त्रात त्यांनी जोडलेल्या अनेक तोंडी नियमांना खूप महत्त्व द्यायचे. या आरोपांवरून ते विरोधक हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते, की स्तेफन गुन्हेगार असून त्याला मृत्युदंड दिला पाहिजे!

दुःखाची गोष्ट म्हणजे आजही धार्मिक कारणांमुळे देवाच्या सेवकांचा विरोध करणारे अशाच युक्त्यांचा वापर करून त्यांच्यावर अत्याचार करतात. त्या काळाप्रमाणेच आजही विरोधक कधीकधी यहोवाच्या साक्षीदारांचा छळ करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्‍यांना भडकवतात. मग, आपल्यावर असे खोटे आरोप लावले जातात तेव्हा आपण काय केलं पाहिजे? स्तेफनच्या उदाहरणातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळेल.

“गौरवशाली” देवाबद्दल धैर्याने साक्ष (प्रे. कार्यं ७:१-५३)

९, १०. न्यायसभेत स्तेफनने दिलेल्या भाषणाची काहींनी टीका का केली आहे, आणि आपण काय आठवणीत ठेवलं पाहिजे?

आता, स्तेफनला त्याच्याविरुद्ध असलेले आरोप सांगितले जातात. आपण अध्यायाच्या सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे, हे आरोप ऐकताना स्तेफनचा चेहरा एखाद्या स्वर्गदूतासारखा, अगदी शांत होता. मग, कयफाने त्याच्याकडे वळून त्याला विचारलं: “या सगळ्या गोष्टी खऱ्‍या आहेत का?” (प्रे. कार्यं ७:१) आता स्तेफनला बोलण्याची संधी होती आणि तो खरोखरच प्रभावीपणे बोलला!

१० स्तेफनने या प्रसंगी दिलेल्या भाषणाची काहींनी टीका केली आहे. ते म्हणतात की स्तेफनचं भाषण खूप लांबलचक होतं आणि त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना त्याने या भाषणात उत्तरही दिलं नाही. पण खरं पाहिलं, तर आनंदाच्या संदेशाबद्दल विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर कसं द्यायचं, याविषयी स्तेफनचं भाषण एक अप्रतिम उदाहरण आहे. (१ पेत्र ३:१५) या भाषणाचं परीक्षण करताना स्तेफनवर कोणते दोन आरोप लावण्यात आले होते, हे आपण आठवणीत ठेवलं पाहिजे. त्याच्यावर मंदिराच्या विरोधात बोलून देवाची निंदा केल्याचा आणि नियमशास्त्राच्या विरोधात बोलून मोशेचीही निंदा केल्याचा आरोप लावण्यात आला होता. स्तेफनने त्याच्या उत्तरात इस्राएलच्या इतिहासातल्या तीन काळांचं वर्णन केलं आणि काही मुद्द्‌यांवर जाणूनबुजून जोर दिला. आता आपण त्या तीन काळांपैकी एकेका काळाकडे लक्ष देऊ या.

११, १२. (क) अब्राहामच्या उदाहरणाचा स्तेफनने प्रभावीपणे कसा उपयोग केला? (ख) स्तेफनने आपल्या भाषणात योसेफचा उल्लेख का केला?

११ कुलप्रमुखांचा काळ.  (प्रे. कार्यं ७:१-१६) स्तेफनने अब्राहामपासून सुरुवात केली. अब्राहामच्या उल्लेखनीय विश्‍वासामुळे यहुद्यांच्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर होता. या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल यहुद्यांशी एकमत असल्यामुळे स्तेफनने याच मुद्द्‌यापासून सुरुवात केली; पण, “गौरवशाली देवाने” स्वतःला अब्राहामसमोर सर्वात आधी मेसोपटेम्यामध्ये प्रकट केलं होतं यावर स्तेफनने जोर दिला. (प्रे. कार्यं ७:२) खरंतर, वचन दिलेल्या देशातही अब्राहाम विदेश्‍यासारखा राहत होता. उपासनेसाठी अब्राहामकडे मंदिर किंवा मोशेचं नियमशास्त्र नव्हतं. तर मग, देवाची विश्‍वासूपणे सेवा करण्यासाठी या गोष्टींची गरज आहे असा हट्ट धरणं योग्य होतं का?

१२ स्तेफनचं भाषण ऐकणाऱ्‍यांच्या मनात, अब्राहामचा वंशज योसेफ याच्याबद्दलही खूप आदर होता. पण, स्तेफनने त्यांना याची आठवण करून दिली, की योसेफच्या स्वतःच्या भावांनी, म्हणजेच इस्राएलच्या वंशांच्या वाडवडिलांनीच त्या नीतिमान माणसाचा छळ करून त्याला इजिप्तमध्ये गुलाम म्हणून विकलं होतं. तरीसुद्धा देवाने इस्राएली लोकांना दुष्काळापासून वाचवण्यासाठी योसेफचा उपयोग केला. योसेफ आणि येशू यांच्यामध्ये किती साम्य आहे याची स्तेफनला नक्कीच जाणीव होती; पण, आपलं भाषण ऐकणाऱ्‍यांचं लक्ष जास्तीत जास्त वेळ खिळवून ठेवण्यासाठी त्याने मुद्दामहून त्या गोष्टीचा उल्लेख करण्याचं टाळलं.

१३. मोशेबद्दल माहिती देण्याद्वारे स्तेफनने त्याच्यावर लावलेल्या आरोपांचं उत्तर कसं दिलं, आणि या माहितीच्या मदतीने त्याने कोणता मुद्दा मांडला?

१३ मोशेचा काळ.  (प्रे. कार्यं ७:१७-४३) स्तेफन मोशेबद्दल बरंच काही बोलला आणि हे योग्यच होतं, कारण न्यायसभेतले बरेच जण सदूकी लोकांपैकी होते. हे लोक मोशेने लिहिलेली पुस्तकं सोडून बायबलची इतर कोणतीही पुस्तकं मानत नव्हते. तसंच, स्तेफनवर मोशेची निंदा केल्याचा आरोप होता, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे, स्तेफन मोशेबद्दल जे बोलला त्यावरून त्या आरोपाचं सरळसरळ उत्तर मिळालं. कारण, स्तेफनच्या शब्दांतून दिसून आलं की त्याला मोशेबद्दल आणि नियमशास्त्राबद्दल मनापासून आदर होता. (प्रे. कार्यं ७:३८) तसंच, स्तेफनने आणखी एका गोष्टीकडे त्यांचं लक्ष वेधलं. त्याने सांगितलं की योसेफप्रमाणेच मोशेही ज्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होता, त्या लोकांनी त्याला नाकारलं होतं. त्यांनी त्याला नाकारलं तेव्हा तो ४० वर्षांचा होता. याच्या आणखी ४० वर्षांनंतर जेव्हा तो इस्राएलचं नेतृत्व करू लागला, तेव्हाही त्यांनी कित्येक वेळा त्याचा अनादर केला. b अशा रितीने स्तेफनने एका महत्त्वाच्या मुद्द्‌यावर पुन्हापुन्हा भर दिला; तो म्हणजे, देवाने आपल्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी ज्या-ज्या व्यक्‍तींना नेमलं होतं, त्या-त्या व्यक्‍तींना इस्राएली लोकांनी वारंवार नाकारलं.

१४. मोशेच्या उदाहरणाचा उपयोग केल्यामुळे स्तेफनला कोणते मुद्दे मांडता आले?

१४ स्तेफनने आपलं भाषण ऐकणाऱ्‍यांना आठवण करून दिली, की मोशेने इस्राएलमधून आपल्यासारखा संदेष्टा येईल असं पूर्वीच सांगितलं होतं. तो संदेष्टा कोण होता आणि लोकांनी त्याच्याशी कसा व्यवहार केला? स्तेफनने लगेच या प्रश्‍नांची उत्तरं दिली नाहीत, तर ती भाषणाच्या शेवटी सांगण्यासाठी राखून ठेवली. त्याने मग आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. तो म्हणजे, जळणाऱ्‍या झुडपातून जेव्हा यहोवा मोशेशी बोलला तेव्हा त्या घटनेवरून मोशेला हे शिकायला मिळालं होतं, की यहोवा कोणत्याही जागेला पवित्र करू शकतो. मग, प्रश्‍न हा होता, की यहोवाची उपासना विशिष्ट ठिकाणी किंवा विशिष्ट इमारतीत, म्हणजे यरुशलेमच्या मंदिरातच केली पाहिजे का? पाहू या.

१५, १६. (क) स्तेफनने मांडलेल्या मुद्द्‌यासाठी उपासना मंडपाबद्दल सांगणं का महत्त्वाचं होतं? (ख) शलमोनच्या मंदिराबद्दल स्तेफनने उल्लेख का केला?

१५ उपासना मंडप आणि मंदिर.  (प्रे. कार्यं ७:४४-५०) स्तेफनने न्यायसभेला याची आठवण करून दिली, की जेव्हा यरुशलेममध्ये कोणतंही मंदिर नव्हतं, तेव्हा देवाने मोशेला एक उपासना मंडप तयार करायला सांगितलं होतं. तंबूसारखा असलेला हा मंडप उपासनेसाठी वापरायचा होता आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी नेला जाऊ शकत होता. स्वतः मोशेनेही या मंडपात उपासना केली होती; तर मग, तो उपासना मंडप मंदिरापेक्षा कमी दर्जाचा होता असं म्हणण्याचं खरंच कोणी धाडस करू शकत होतं का?

१६ नंतर शलमोनने यरुशलेममध्ये मंदिर बांधलं, तेव्हा देवाच्या प्रेरणेने त्याने त्याच्या प्रार्थनेतून एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली. स्तेफनच्या शब्दांत सांगायचं तर ती गोष्ट म्हणजे, “सर्वसमर्थ देव हातांनी बनवलेल्या घरांत राहत नाही.” (प्रे. कार्यं ७:४८; २ इति. ६:१८) आपले संकल्प पूर्ण करण्यासाठी जरी यहोवाने मंदिराचा वापर केला असला, तरीही तो त्या मंदिरात राहतो असं म्हणता येणार नाही. मग, माणसांनी बांधलेल्या एखाद्या इमारतीतच खरी उपासना केली जाऊ शकते, असा विचार देवाच्या उपासकांनी का करावा? यशयाच्या पुस्तकातून घेतलेल्या या शब्दांनी स्तेफनने आपल्या तर्काचा दमदार शेवट केला: “यहोवा म्हणतो, स्वर्ग माझं राजासन आणि पृथ्वी माझ्या पायांसाठी आसन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचं घर बांधाल? माझ्यासाठी कोणत्या प्रकारचं विश्रांतीचं स्थान बांधाल? मी स्वतः या सगळ्या गोष्टी बनवल्या नाहीत का?”​—प्रे. कार्यं ७:४९, ५०; यश. ६६:१, २.

१७. स्तेफनने आपल्या भाषणातून कशा प्रकारे (क) आपलं भाषण ऐकणाऱ्‍यांचे चुकीचे दृष्टिकोन उजेडात आणले आणि (ख) आपल्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचं सिद्ध केलं?

१७ न्यायसभेपुढे दिलेल्या भाषणात आतापर्यंत स्तेफनने ज्या गोष्टी सांगितल्या, त्यांचं परीक्षण केलं तर काय दिसून येतं? हेच, की त्याच्यावर आरोप लावणाऱ्‍या लोकांचे चुकीचे दृष्टिकोन त्याने अगदी कुशलतेने उजेडात आणले. कारण स्तेफनने हे स्पष्ट केलं, की यहोवा कट्टर किंवा रूढी-परंपरांमध्ये अडकून पडणारा नाही; तर त्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी तो बदलत्या परिस्थितीनुसार जुळवून घ्यायला तयार असतो. याउलट, यहुद्यांना यरुशलेममध्ये असलेल्या सुंदर मंदिराबद्दल आणि मोशेच्या नियमशास्त्राशी संबंधित प्रथांबद्दल मनापासून आदर होता. पण ते त्यापलीकडे जाऊन विचार करायला तयार नव्हते. यावरून दिसून आलं, की त्या लोकांना नियमशास्त्राचा आणि मंदिराचा खरा अर्थच कळला नव्हता! एका अर्थाने स्तेफनने आपल्या भाषणातून हा महत्त्वाचा प्रश्‍न उभा केला: यहोवाच्या आज्ञांचं पालन करणं हाच खरंतर नियमशास्त्राचा आणि मंदिराचा आदर करण्याचा सर्वात चांगला मार्ग नाही का? खरोखर, स्तेफन जे काही बोलला त्यातून त्याने स्वतःच्या कार्यांचं खूप प्रभावीपणे समर्थन केलं, कारण त्याने यहोवाच्या आज्ञांचं पूर्णपणे पालन केलं होतं.

१८. आपण कोणकोणत्या मार्गांनी स्तेफनचं अनुकरण करू शकतो?

१८ स्तेफनच्या भाषणावरून आपण काय शिकू शकतो? त्याला शास्त्रवचनांचं चांगलं ज्ञान होतं. त्याचप्रमाणे, “सत्याच्या वचनाचा चांगल्या प्रकारे उपयोग” करायचा असेल, तर आपणही देवाच्या वचनाचा काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे. (२ तीम. २:१५) इतरांच्या भावना विचारात घेऊन त्यांच्याशी आदराने बोलण्याबद्दलही आपण स्तेफनकडून बरंच काही शिकू शकतो. खरंतर त्याचं भाषण ऐकणारे लोक त्याच्याविरुद्ध द्वेषाने पेटले होते. असं असूनही, शक्य तितका वेळ तो त्यांना पटणाऱ्‍या आणि त्यांना आदर वाटत असलेल्या गोष्टींबद्दल व व्यक्‍तींबद्दल त्यांच्याशी बोलला. तसंच, आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना “वडीलजनांनो” असं म्हणून, त्याने त्यांना आदर दाखवला. (प्रे. कार्यं ७:२) आपणही देवाच्या वचनताल्या सत्याबद्दल इतरांशी बोलताना, “सौम्यतेने आणि मनापासून आदर दाखवून” बोललं पाहिजे.​—१ पेत्र ३:१५.

१९. स्तेफनने न्यायसभेला यहोवाच्या न्यायाचा संदेश अगदी न घाबरता कसा सांगितला?

१९ पण लोकांच्या भावना दुखावतील या भीतीने आपण कधीही देवाच्या वचनातलं सत्य त्यांना सांगण्याचं टाळत नाही. तसंच, यहोवाच्या न्यायाचा संदेश स्पष्टपणे सांगायलाही आपण घाबरत नाही. स्तेफनच्या उदाहरणावरून आपल्याला हेच पाहायला मिळतं. न्यायसभेसमोर इतके पुरावे मांडूनही, त्या कठोर मनाच्या न्यायाधीशांवर कसलाच परिणाम होणार नाही हे स्तेफनने ओळखलं. म्हणून, पवित्र शक्‍तीच्या प्रेरणेने त्याने आपल्या भाषणाच्या शेवटी अगदी न घाबरता त्यांना हे सांगितलं की तेही योसेफ, मोशे आणि इतर सर्व संदेष्ट्यांना नाकारणाऱ्‍या त्यांच्या पूर्वजांसारखेच होते. (प्रे. कार्यं ७:५१-५३) इतकंच काय, तर मोशेने आणि सर्व संदेष्ट्यांनी ज्या मसीहाच्या येण्याबद्दल सांगितलं होतं, त्या मसीहाची या न्यायसभेच्या सदस्यांनी हत्या केली होती. आणि असं करून त्यांनी मोशेच्या नियमशास्त्राविरुद्ध सर्वात मोठा अपराध केला होता!

“प्रभू येशू, मी माझा जीव तुझ्या हाती सोपवतो” (प्रे. कार्यं ७:५४–८:३)

“या गोष्टी ऐकल्यावर ते संतापले आणि त्याच्यावर दातओठ खाऊ लागले.”​—प्रे. कार्यं ७:५४

२०, २१. स्तेफनच्या शब्दांचा न्यायाधीशांवर काय परिणाम झाला, आणि यहोवाने कशा प्रकारे स्तेफनला धैर्य दिलं?

२० स्तेफनचे शब्द खोटे ठरवता येत नसल्यामुळे आता त्या न्यायाधीशांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ते अक्षरशः त्याच्यावर दातओठ खाऊ लागले. स्तेफनला आता कळलं असेल, की जशी त्याच्या प्रभू येशूला दया दाखवण्यात आली नव्हती, तशी त्यालाही दाखवली जाणार नाही.

२१ पुढे जे घडणार होतं त्याचा सामना करण्यासाठी त्याला नक्कीच खूप धैर्याची गरज होती. यहोवाने त्याला त्या क्षणी प्रेमळपणे जो दृष्टान्त दाखवला, त्यामुळे त्याला किती प्रोत्साहन मिळालं असेल! दृष्टान्तात स्तेफनला देवाचं तेज दिसलं आणि यहोवाच्या उजव्या हाताला त्याने येशूला उभं असलेलं पाहिलं. स्तेफनने जेव्हा या दृष्टान्ताबद्दल न्यायाधीशांना सांगितलं तेव्हा त्यांनी आपल्या कानांवर हात ठेवले. त्यांनी असं का केलं? याआधी येशूनेही याच न्यायसभेला आपण मसीहा असल्याचं आणि लवकरच आपण पित्याच्या उजव्या हाताला असू, असं सांगितलं होतं. (मार्क १४:६२) स्तेफनला दिसलेल्या दृष्टान्तावरून येशूचे ते शब्द अगदी खरे असल्याचं सिद्ध झालं. त्या न्यायसभेने खरोखरच मसीहाचा विश्‍वासघात करून त्याला ठार मारलं होतं! राग अनावर होऊन ते सगळेच्या सगळे स्तेफनला दगडमार करून ठार मारण्यासाठी त्याच्यावर धावून गेले. c

२२, २३. स्तेफनचा मृत्यू कशा प्रकारे त्याच्या प्रभूच्या मृत्यूसारखाच होता, आणि आज ख्रिस्ती स्तेफनसारखंच धैर्य का दाखवू शकतात?

२२ स्तेफनही त्याच्या प्रभू येशूप्रमाणेच अगदी शांत मनाने मृत्यूला सामोरा गेला. त्याला यहोवावर पूर्ण भरवसा होता आणि आपली हत्या करणाऱ्‍यांना त्याने मनापासून क्षमा केली होती. तो म्हणाला, “प्रभू येशू, मी माझा जीव तुझ्या हाती सोपवतो.” कदाचित अजूनही दृष्टान्तात मनुष्याचा मुलगा यहोवासोबत त्याला दिसत असल्यामुळे तो असं म्हणाला असेल. शिवाय, “मेलेल्यांना उठवणारा आणि त्यांना जीवन देणारा मीच आहे” हे येशूचे दिलासा देणारे शब्द स्तेफनला नक्कीच माहीत असतील. (योहा. ११:२५) शेवटी, स्तेफनने मोठ्या आवाजात देवाला प्रार्थना करून म्हटलं, “हे यहोवा, या पापाबद्दल यांना दोषी ठरवू नकोस.” असं बोलून त्याने प्राण सोडला.​—प्रे. कार्यं ७:५९, ६०.

२३ अशा प्रकारे, ख्रिस्ताच्या शिष्यांपैकी आपल्या विश्‍वासासाठी शहीद होणारा स्तेफन पहिलाच ठरला. (“ ‘शहीद’ कोणत्या अर्थाने?” ही चौकट पाहा.) पण, दुःखाची गोष्ट म्हणजे तो शेवटचा असणार नव्हता. अगदी आज आपल्या काळापर्यंत, कट्टर धार्मिक किंवा राजकीय मतं असलेल्यांनी, तसंच इतर क्रूर विरोधकांनी यहोवाच्या विश्‍वासू सेवकांपैकी काहींची हत्या केली आहे. पण, असं असूनही आपणसुद्धा स्तेफनसारखंच धैर्य दाखवू शकतो. कारण, आज येशू स्वर्गात राजा म्हणून राज्य करत आहे आणि त्याच्या पित्याने त्याला दिलेल्या अफाट शक्‍तीचा तो वापर करत आहे. त्याच्या विश्‍वासू शिष्यांचं पुनरुत्थान करण्यापासून कोणतीही गोष्ट त्याला रोखू शकणार नाही.​—योहा. ५:२८, २९.

२४. स्तेफनला ठार मारण्यात शौलने कसा सहभाग घेतला, आणि देवाचा विश्‍वासू सेवक, स्तेफन याचा मृत्यू व्यर्थ ठरला नाही असं का म्हणता येईल?

२४ शौल नावाचा एक तरुण या सर्व घटना घडताना पाहत होता. स्तेफनची हत्या त्याला मान्य होती. इतकंच काय, तर त्याला दगडमार करणाऱ्‍यांच्या कपड्यांची तो राखण करत होता. याच्या थोड्याच काळानंतर, त्याने ख्रिस्ती लोकांचा भयंकर छळ करायला सुरुवात केली. पण स्तेफनचा मृत्यू व्यर्थ ठरला नाही! उलट, त्याच्या उदाहरणामुळे इतर अनेक ख्रिश्‍चनांना त्याच्याप्रमाणे आपल्या विश्‍वासाची लढाई लढण्याचं आणि ती जिंकण्याचं प्रोत्साहनच मिळालं. शिवाय, शौल ज्याला नंतर पौल म्हणण्यात आलं, त्यालाही स्तेफनला ठार मारण्यात सहभाग घेतल्याबद्दल मनापासून पश्‍चात्ताप झाला. (प्रे. कार्यं २२:२०) त्याने स्तेफनला ठार मारायला मदत केली होती, पण नंतर आपल्या चुकीची जाणीव झाल्यामुळे तो म्हणाला, “मी पूर्वी देवाची निंदा करणारा, त्याच्या लोकांचा छळ करणारा आणि एक उद्धट माणूस होतो.” (१ तीम. १:१३) नक्कीच, पौल स्तेफनला कधीच विसरला नाही. तसंच, त्या दिवशी स्तेफनने दिलेलं भाषणही त्याच्या कायम लक्षात राहिलं. खरंतर, स्तेफनने त्याच्या भाषणात सांगितलेल्या विषयांवर, पौलने आपल्या काही भाषणांत आणि पत्रांत आणखी खुलासा केला आहे. (प्रे. कार्यं ७:४८; १७:२४; इब्री ९:२४) पुढे जाऊन पौल, “देवाची कृपा आणि सामर्थ्य यांनी परिपूर्ण” असलेल्या स्तेफनच्या विश्‍वासाचं आणि धैर्याचं पूर्णपणे अनुकरण करायला शिकला. पण प्रश्‍न हा आहे, की आपणही असं करणार का?

a या विरोधकांपैकी काही जण “स्वतंत्र माणसांच्या सभास्थानाचे” सदस्य होते. एकेकाळी रोमन लोकांनी ज्यांना कैद करून नंतर स्वतंत्र केलं, त्यांच्यापैकी ते असावेत. किंवा कदाचित, ते स्वतंत्र करण्यात आलेले गुलाम असावेत, ज्यांनी नंतर यहुदी धर्म स्वीकारला. काही जण तार्सच्या शौलप्रमाणे किलिकिया इथले होते. स्तेफनपुढे ज्यांचं काहीच चाललं नाही त्या किलिकियाच्या लोकांमध्ये शौलही होता का? याबद्दल अहवालात सांगितलेलं नाही.

b स्तेफनच्या भाषणात आपल्याला अशी माहिती मिळते जी बायबलच्या इतर कोणत्याही पुस्तकात वाचायला मिळत नाही; जसं की, मोशेला इजिप्तमध्ये मिळालेलं शिक्षण, तो पहिल्यांदा इजिप्तमधून पळून जातो तेव्हाचं त्याचं वय आणि मिद्यानात तो किती काळ राहिला, याबद्दलची माहिती.

c रोमन कायद्यानुसार, न्यायसभेला मृत्युदंड सुनावण्याचा अधिकार होता का, हे सांगता येत नाही. (योहा. १८:३१) पण, काहीही असलं तरी स्तेफनचा मृत्यू हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेपेक्षा, एका संतापलेल्या जमावाने केलेली हत्या होती असं दिसतं.