व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय १

“जा आणि . . . शिष्य करा”

“जा आणि . . . शिष्य करा”

प्रेषितांची कार्यं या पुस्तकाचा सारांश आणि त्याचा आपल्या काळाशी संबंध

१-६. यहोवाचे साक्षीदार वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितींत प्रचार करतात हे दाखवणारा एखादा अनुभव सांगा.

 घाना या देशात, रिबेका नावाची एक यहोवाची साक्षीदार राहते. या मुलीने आपल्या शाळेलाच आपलं प्रचाराचं क्षेत्र बनवलं होतं. तिच्या दप्तरात ती नेहमी बायबल आधारित मासिकं आणि पत्रिका ठेवायची. जेवणाच्या सुटीत ती इतर मुलांना साक्ष देण्याची संधी शोधायची. रिबेकाने तिच्या वर्गातल्या बऱ्‍याच मुलींसोबत बायबल अभ्यास सुरू केला.

आफ्रिकेच्या पूर्वेकडे असलेल्या मादागास्कर या बेटावर राहणारे दोन पायनियर, नेहमी पायी चालत एका दूरच्या खेड्यात जायचे. या खेड्यात पोहोचण्यासाठी त्यांना अतिशय कडक उन्हात जवळजवळ २५ किलोमीटर चालावं लागायचं. तिथे सत्याबद्दल आवड दाखवणाऱ्‍या अनेक लोकांसोबत ते बायबल अभ्यास करायचे.

पॅराग्वे आणि पाराना या नद्यांच्या किनाऱ्‍यावर राहणाऱ्‍या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, पॅराग्वे देशात राहणाऱ्‍या साक्षीदारांनी इतर १५ देशांच्या स्वयंसेवकांसोबत मिळून एक बोट तयार केली. ४५ टन सामान वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या बोटीत १२ जणांच्या राहण्याची सोय आहे. या ‘तरंगत्या घराचा’ वापर करून इथले आवेशी राज्य प्रचारक अशा दूरदूरच्या क्षेत्रांत जाऊन प्रचार करतात, जिथे इतर मार्गांनी पोहोचणं अशक्य आहे.

उत्तर ध्रुवाजवळ असलेल्या अलास्का इथे उन्हाळ्यात जेव्हा थंडी थोडी कमी होते, तेव्हा मोठमोठ्या बोटी वेगवेगळ्या देशांच्या असंख्य पर्यटकांना घेऊन इथे येतात. या ठिकाणी राहणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांनी, प्रचाराच्या या खास संधीचा फायदा घेतला. बोटी जिथे येऊन थांबायच्या, तिथे साक्षीदार बऱ्‍याच भाषांमधलं बायबल आधारित साहित्य घेऊन या पर्यटकांचं स्वागत करायला उभे असायचे. याच भागात, साक्षीदारांनी दूरदूरच्या खेड्यांत जाण्यासाठी एका विमानाचा वापर केला; यामुळे त्यांना ॲल्यूट, ॲथाबास्कन, शिमशॅन आणि क्लिंकेट या वसत्यांमध्ये आनंदाच्या संदेशाचा प्रचार करणं शक्य झालं.

अमेरिकेतल्या टेक्सस राज्यात राहणारे लॅरी, यांचंही एक खास प्रचाराचं क्षेत्र होतं; ते म्हणजे ते राहत असलेलं नर्सिंग होम. एका अपघातामुळे लॅरी कायमचे व्हीलचेअरला खिळलेले असले, तरीही ते स्वतःला नेहमी व्यस्त ठेवायचे. ते इतरांना राज्याचा संदेश सांगायचे, आणि खासकरून देवाच्या राज्यात ते पुन्हा स्वतःच्या पायांवर चालू शकतील, या त्यांच्या बायबल आधारित आशेबद्दलही सांगायचे.​—यश. ३५:५, ६.

उत्तर म्यानमारमध्ये एका संमेलनाला जाण्यासाठी काही साक्षीदारांनी मांडले शहरापासून बोटीने तीन दिवसांचा प्रवास केला. आनंदाच्या संदेशाचा प्रचार करायला उत्सुक असल्यामुळे या बांधवांनी बायबल आधारित साहित्य सोबत नेलं आणि आपल्यासोबत प्रवास करणाऱ्‍या लोकांना ते दिलं. जेव्हा-जेव्हा बोट एखाद्या गावात किंवा खेड्यात थांबायची, तेव्हा-तेव्हा हे उत्साही प्रचारक लगेच बोटीतून उतरून भराभर जवळच्या वसत्यांमध्ये जायचे आणि लोकांना साहित्य द्यायचे. ते परत येईपर्यंत बोटीत नवीन प्रवासी चढल्यामुळे त्यांना पुन्हा “नवीन क्षेत्र” मिळायचं.

७. यहोवाचे उपासक कोणकोणत्या मार्गांनी देवाच्या राज्याबद्दल साक्ष देतात आणि त्यांचा उद्देश काय असतो?

भाऊबहिणींच्या या अनुभवांवरून दिसून येतं, की संपूर्ण जगातले यहोवाचे सेवक आवेशाने “देवाच्या राज्याबद्दल अगदी पूर्णपणे साक्ष” देत आहेत. (प्रे. कार्यं २८:२३) लोकांची भेट घेण्यासाठी ते घरोघर जातात, पत्रं लिहितात किंवा रस्त्यांवर, तसंच फोनवर लोकांशी बोलतात. ते बसने प्रवास करत असोत, पार्कमध्ये फेरफटका मारत असोत, किंवा कामाच्या ठिकाणी चहाचा ब्रेक घेत असोत; ते अगदी प्रत्येक वेळी, उत्सुकतेने देवाच्या राज्याबद्दल साक्ष देण्याची संधी शोधत असतात. प्रचार करण्याच्या त्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचा उद्देश एकच असतो, आणि तो म्हणजे, जिथे-जिथे लोक भेटतील तिथे-तिथे आनंदाचा संदेश सांगणं.​—मत्त. १०:११.

८, ९. (क) राज्य प्रचाराच्या कार्यात झालेली वाढ एखाद्या चमत्कारापेक्षा कमी का नाही? (ख) आपल्या मनात कोणता प्रश्‍न येऊ शकतो आणि त्याचं उत्तर मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल?

प्रिय वाचक, आज २३५ पेक्षा जास्त देशांमध्ये कार्य करत असलेल्या राज्य प्रचारकांच्या वाढत्या समुहात तुम्हीही आहात का? जर असाल, तर आज राज्य प्रचाराच्या कार्यात जी प्रचंड वाढ होत आहे, तिच्यात तुमचाही वाटा आहे! जगभरातल्या प्रचार क्षेत्रात आजवर जे साध्य करण्यात आलं आहे, ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही! खरंतर, यहोवाच्या साक्षीदारांसमोर बरेच मोठमोठे अडथळे आणि आव्हानं आहेत. इतकंच काय, तर काही सरकारांनी त्यांच्या कार्यावर बंदी आणली आहे आणि काही देशांत त्यांचा छळही होत आहे. असं असूनही, ते सर्व देशांच्या लोकांना देवाच्या राज्याबद्दल अगदी पूर्णपणे साक्ष देत आहेत.

हे पाहून विचार करण्यासारखा एक प्रश्‍न मनात येतो: आजपर्यंत कोणताही अडथळा, इतकंच काय तर सैतानाकडून येणारा विरोधही राज्य प्रचाराच्या कार्याची प्रगती का थांबवू शकला नाही? या प्रश्‍नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला इ.स. पहिल्या शतकात घडलेल्या घटनांचं परीक्षण करावं लागेल. कारण आजच्या काळातले साक्षीदार, म्हणजेच आपण, जे कार्य करत आहोत त्याची सुरुवात पहिल्या शतकातच झाली होती.

एक फार मोठं कार्य!

१०. येशूने कोणत्या कार्यासाठी आपलं जीवन वाहून घेतलं आणि या कार्याबद्दल त्याला काय माहीत होतं?

१० ख्रिस्ती मंडळीची सुरुवात करणाऱ्‍या येशू ख्रिस्ताने, देवाच्या राज्याविषयीचा आनंदाचा संदेश घोषित करण्याच्या कार्यासाठी आपलं संपूर्ण जीवन वाहून घेतलं होतं. याबद्दल सांगताना एकदा तो म्हणाला: “मला इतर शहरांतही देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश घोषित केला पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवण्यात आलंय.” (लूक ४:४३) येशूला माहीत होतं, की त्याने सुरू केलेलं हे कार्य तो एकट्यानेच पूर्ण करू शकणार नाही. त्याच्या मृत्यूच्या काही काळाआधी त्याने सांगितलं, की राज्याचा संदेश “सगळ्या राष्ट्रांत” घोषित केला जाईल. (मार्क १३:१०) पण हे कार्य कशा प्रकारे केलं जाणार होतं आणि ते कोण करणार होतं?

“जा आणि सगळ्या राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा.”​—मत्तय २८:१९

११. येशूने शिष्यांना कोणती महत्त्वाची आज्ञा दिली आणि ती पूर्ण करण्यासाठी त्यांना कोणती मदत मिळणार होती?

११ येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थान झाल्यावर तो आपल्या शिष्यांसमोर प्रकट झाला आणि त्याने त्यांना एक महत्त्वाचं कार्य करण्याची आज्ञा दिली. तो म्हणाला, “जा आणि सगळ्या राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा आणि त्यांना पित्याच्या, मुलाच्या आणि पवित्र शक्‍तीच्या नावाने बाप्तिस्मा द्या, आणि मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना पाळायला शिकवा. आणि पाहा! जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत मी नेहमी तुमच्यासोबत असेन.” (मत्त. २८:१९, २०) ‘मी तुमच्यासोबत असेन’ असं सांगून येशूने या प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कार्यात आपण शिष्यांना मदत करू असं आश्‍वासन दिलं. शिष्यांना येशूच्या मदतीची गरज नक्कीच पडणार होती, कारण “सगळी राष्ट्रं [त्यांचा] द्वेष करतील” हे येशूने आधीच सांगितलं होतं. (मत्त. २४:९) शिष्यांना आणखी एका गोष्टीमुळे मदत मिळणार होती. स्वर्गात परत जाण्याच्या थोड्याच वेळाआधी येशूने त्यांना सांगितलं होतं, की त्यांना पवित्र शक्‍तीकडून सामर्थ्य मिळेल आणि ते “पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत” येशूविषयी साक्ष देतील.​—प्रे. कार्यं १:८.

१२. आपल्यासमोर कोणते महत्त्वाचे प्रश्‍न उभे राहतात आणि त्यांची उत्तरं जाणून घेणं महत्त्वाचं का आहे?

१२ यावरून आपल्यासमोर काही महत्त्वाचे प्रश्‍न उभे राहतात: येशूच्या प्रेषितांनी आणि पहिल्या शतकातल्या इतर शिष्यांनी या आज्ञेचं मनापासून पालन केलं का? तीव्र छळ होऊनही, ख्रिस्ती स्त्रीपुरुषांच्या त्या लहानशा समुहाने देवाच्या राज्याबद्दल अगदी पूर्णपणे साक्ष दिली का? शिष्य बनवण्याच्या त्यांच्या कार्यात त्यांना यहोवाच्या पवित्र शक्‍तीकडून खरोखरच मदत आणि पाठिंबा मिळाला का? या आणि अशा इतर प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला बायबलमधल्या प्रेषितांची कार्यं या पुस्तकात सापडतात. ही उत्तरं जाणून घेणं महत्त्वाचं आहे. पण का? कारण येशूने असं सांगितलं होतं, की त्याने शिष्यांवर सोपवलेलं कार्य “जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत” चालेल. याचा अर्थ, ते कार्य करण्याची आज्ञा सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांना लागू होते. या शेवटल्या काळात राहत असलेल्यांना, म्हणजेच आपल्याही ती लागू होते. म्हणूनच, प्रेषितांची कार्यं या पुस्तकातल्या घटनांबद्दल जाणून घ्यायला आपण खूप उत्सुक आहोत.

प्रेषितांची कार्यं या पुस्तकावर एक नजर

१३, १४. (क) प्रेषितांची कार्यं हे पुस्तक कोणी लिहिलं, आणि या पुस्तकाच्या लेखकाला त्यातली माहिती कुठून मिळाली? (ख) प्रेषितांची कार्यं या पुस्तकात कोणती माहिती दिली आहे?

१३ प्रेषितांची कार्यं हे पुस्तक कोणी लिहिलं? या पुस्तकात लेखकाचं नाव दिलेलं नाही. पण, पुस्तकाच्या सुरुवातीच्या शब्दांवरून हे स्पष्ट होतं, की लूक याचा आनंदाचा संदेश लिहिणाऱ्‍या लेखकानेच प्रेषितांची कार्यं हे पुस्तकही लिहिलं. (लूक १:१-४; प्रे. कार्यं १:१, २) त्यामुळे, पूर्वीपासूनच असं मानलं जातं की “सगळ्यांचा लाडका वैद्य” आणि इतिहासाचा काळजीपूर्वक अभ्यास करणारा लेखक लूक, यानेच प्रेषितांची कार्यं हे पुस्तक लिहिलं. (कलस्सै. ४:१४) या पुस्तकात, इ.स. ३३ या वर्षी येशू स्वर्गात परत गेल्यापासून ते इ.स. ६१ मध्ये पौलचा तुरुंगवास संपेपर्यंतचा, २८ वर्षांचा इतिहास सापडतो. काही घटनांचं वर्णन करताना लूक त्यात स्वतःचाही समावेश करतो. यावरून हे दिसून येतं, की त्याने वर्णन केलेल्या बऱ्‍याच घटना घडताना तो स्वतःही तिथे हजर होता. (प्रे. कार्यं १६:८-१०; २०:५; २७:१) लूक हा काळजीपूर्वक संशोधन करणारा असल्यामुळे या पुस्तकात वेगवेगळ्या घटनांविषयी लिहिताना त्याने पौल, बर्णबा, फिलिप्प आणि इतरांकडून माहिती घेतली असेल, यात शंका नाही.

१४ प्रेषितांची कार्यं या पुस्तकात कोणती माहिती दिली आहे? आनंदाच्या संदेशाचं पुस्तक लिहिताना लूकने, येशूने बोललेल्या व केलेल्या गोष्टींबद्दल लिहिलं होतं. पण, प्रेषितांची कार्यं या पुस्तकात लूक येशूच्या शिष्यांनी बोललेल्या आणि केलेल्या गोष्टींबद्दल लिहितो. तेव्हा, प्रेषितांची कार्यं हे पुस्तक अशा लोकांविषयी आहे, ज्यांना “अशिक्षित आणि सर्वसाधारण” समजलं जात असलं, तरी त्यांनी एक अतिशय असाधारण असं कार्य केलं. (प्रे. कार्यं ४:१३) थोडक्यात, हा देवप्रेरित अहवाल आपल्याला ख्रिस्ती मंडळीची सुरुवात आणि तिची वाढ कशी झाली हे सांगतो. पहिल्या शतकातले ख्रिस्ती प्रचार कसा करायचे, म्हणजे ते कोणत्या पद्धतींचा वापर करायचे आणि त्यांची मनोवृत्ती कशी होती, हे आपल्याला प्रेषितांची कार्यं या पुस्तकातून समजतं. (प्रे. कार्यं ४:३१; ५:४२) तसंच, आनंदाचा संदेश सगळीकडे घोषित करण्यासाठी पवित्र शक्‍तीने कशा प्रकारे साहाय्य केलं, याकडे हे पुस्तक आपलं लक्ष वेधतं. (प्रे. कार्यं ८:२९, ३९, ४०; १३:१-३; १६:६; १८:२४, २५) हे पुस्तक बायबलच्या मुख्य विषयावर, म्हणजेच देवाच्या राज्याद्वारे यहोवाचं नाव पवित्र करण्यावर जोर देतं; त्या राज्याचा राजा येशू ख्रिस्त आहे. तसंच, तीव्र विरोध होत असूनही राज्याचा संदेश पसरवण्याचं कार्य यशस्वी रीत्या कशा प्रकारे करण्यात आलं, हेही ते दाखवतं.​—प्रे. कार्यं ८:१२; १९:८; २८:३०, ३१.

१५. प्रेषितांची कार्यं या पुस्तकाचं परीक्षण केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होईल?

१५ प्रेषितांची कार्यं या पुस्तकाचं परीक्षण करणं खूपच रोमांचकारी आहे आणि यामुळे नक्कीच आपला विश्‍वासही मजबूत होईल. ख्रिस्ताच्या सुरुवातीच्या शिष्यांनी किती धैर्याने आणि आवेशाने कार्य केलं, यावर आपण मनन केलं, तर त्या भाऊबहिणींचं उदाहरण नक्कीच आपल्या हृदयाला स्पर्श करेल. तसंच, यामुळे पहिल्या शतकातल्या आपल्या भाऊबहिणींच्या विश्‍वासाचं अनुकरण करण्याची प्रेरणाही आपल्याला मिळेल. “जा आणि . . . शिष्य करा” या आज्ञेचं आणखी चांगल्या प्रकारे पालन करण्यासाठी या पुस्तकातली माहिती आपल्याला मदत करेल यात शंका नाही. प्रेषितांची कार्यं या पुस्तकाचा तुम्हाला सखोल अभ्यास करता यावा, म्हणूनच हे प्रकाशन तयार करण्यात आलं आहे.

बायबल अभ्यासासाठी उपयोगी साधन

१६. हे पुस्तक तयार करण्यामागचे तीन उद्देश कोणते आहेत?

१६ मग, मुळात या प्रकाशनाचा उद्देश काय आहे? खरंतर, हे पुस्तक तयार करण्यामागे तीन उद्देश आहेत: (१) यहोवा त्याच्या पवित्र शक्‍तीद्वारे राज्य प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कार्याला आज पाठिंबा देत आहे, यावर आपला भरवसा वाढवणं; (२) येशूच्या पहिल्या शतकातल्या शिष्यांच्या उदाहरणाचं परीक्षण करून सेवाकार्याबद्दल आपला आवेश वाढवणं; आणि (३) यहोवाच्या संघटनेबद्दल, तसंच प्रचारकार्यात पुढाकार घेणाऱ्‍या आणि मंडळ्यांवर देखरेख करणाऱ्‍या भावांबद्दल आपला आदर वाढवणं.

१७, १८. या प्रकाशनातल्या माहितीची मांडणी कशा प्रकारे करण्यात आली आहे आणि पुस्तकाची कोणती वैशिष्ट्यं तुम्हाला वैयक्‍तिक बायबल अभ्यासात उपयोगी पडतील?

१७ या प्रकाशनातल्या माहितीची मांडणी कशा प्रकारे करण्यात आली आहे? तुम्ही कदाचित पाहिलं असेल, की या पुस्तकाची आठ भागांत विभागणी करण्यात आली आहे आणि प्रत्येक भागात प्रेषितांची कार्यं या पुस्तकातल्या एका भागावर चर्चा केली आहे. प्रत्येक अध्यायाचा उद्देश, प्रेषितांची कार्यं पुस्तकाच्या एकेका वचनावर चर्चा करणं हा नाही; तर, या पुस्तकात सांगितलेल्या घटनांवरून आपण काय शिकू शकतो आणि त्याचं आपल्या जीवनात पालन कसं करू शकतो, हे समजायला मदत करणं हा आहे. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला एक सारांश वाक्य दिलेलं आहे, ज्यात त्या अध्यायातला मुख्य मुद्दा काय आहे हे सांगण्यात आलं आहे. तसंच, त्या अध्यायात प्रेषितांची कार्यं पुस्तकातल्या ज्या वचनांवर चर्चा करण्यात आली आहे, त्यांचाही सुरुवातीला उल्लेख करण्यात आला आहे.

१८ या प्रकाशनाची आणखीही काही वैशिष्ट्यं आहेत, जी तुम्हाला बायबलचा वैयक्‍तिक अभ्यास करताना खूप उपयोगी पडतील. प्रेषितांची कार्यं पुस्तकातल्या रोमांचकारी घटनांचं वर्णन करणारी सुरेख चित्रं, तुम्हाला बायबलचा तो वृत्तान्त डोळ्यांपुढे उभा करायला मदत करतील. बऱ्‍याच अध्यायांत आणखी माहिती देणाऱ्‍या चौकटी आहेत. काही चौकटींत बायबलमधल्या अशा व्यक्‍तींबद्दल माहिती दिली आहे, ज्यांच्या विश्‍वासाचं आपण अनुकरण करू शकतो. तर काही चौकटींत ठरावीक ठिकाणं, घटना, त्या काळचे रितीरिवाज आणि प्रेषितांची कार्यं पुस्तकात उल्लेख केलेल्या इतर व्यक्‍तींबद्दल माहिती सापडते.

प्रचार कार्याचं महत्त्व ओळखून, नेमून दिलेल्या क्षेत्रात काम करा

१९. आपण वेळोवेळी स्वतःचं परीक्षण कशा प्रकारे केलं पाहिजे?

१९ हे पुस्तक तुम्हाला स्वतःचं प्रामाणिकपणे परीक्षण करायला मदत करेल. तुम्ही कितीही वर्षांपासून राज्य प्रचारक म्हणून सेवा करत असला, तरीसुद्धा आपण जीवनात कोणत्या गोष्टींना महत्त्व देत आहोत आणि ख्रिस्ती सेवाकार्याबद्दल आपली मनोवृत्ती काय आहे, याचं तुम्ही वेळोवेळी परीक्षण करणं चांगलं ठरेल. (२ करिंथ. १३:५) स्वतःला विचारा: ‘मी काळाचं महत्त्व ओळखून सेवाकार्य करत आहे का? (१ करिंथ. ७:२९-३१) मी पूर्ण विश्‍वासाने आणि आवेशाने आनंदाच्या संदेशाचा प्रचार करत आहे का? (१ थेस्सलनी. १:५, ६) मी प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कार्यात पुरेपूर सहभाग घेत आहे का?’​—कलस्सै. ३:२३.

२०, २१. आपल्याला दिलेली आज्ञा इतकी महत्त्वाची का आहे आणि आपण कोणता पक्का निश्‍चय केला पाहिजे?

२० आपल्याला एक अतिशय महत्त्वाचं कार्य करण्याची आज्ञा देण्यात आली आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. ते म्हणजे, प्रचार करण्याचं आणि शिष्य बनवण्याचं कार्य. एकेक दिवस सरतो, तसतसं या कामाचं महत्त्व वाढत चाललं आहे. कारण जगाचा अंत फार वेगाने जवळ येत आहे. हा असंख्य लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न आहे. योग्य मनोवृत्ती असलेले आणखी किती लोक आपल्या संदेशाचा स्वीकार करतील हे आपल्याला माहीत नाही. (प्रे. कार्यं १३:४८) पण, फार उशीर होण्याआधीच या लोकांना मदत करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.​—१ तीम. ४:१६.

२१ म्हणूनच, पहिल्या शतकातल्या आवेशी राज्य प्रचारकांच्या उदाहरणाचं आपण अनुकरण करणं आज फार महत्त्वाचं आहे. या पुस्तकाचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यामुळे तुम्हाला आणखी आवेशाने आणि धैर्याने प्रचार करण्याची प्रेरणा मिळावी, हीच आमची प्रार्थना आहे. तसंच, आम्ही ही आशा बाळगतो, की या अभ्यासामुळे, “देवाच्या राज्याबद्दल अगदी पूर्णपणे साक्ष” देण्याचा तुमचा निश्‍चय आणखी पक्का होईल.​—प्रे. कार्यं २८:२३.