नियमन मंडळाकडून पत्र
प्रिय राज्य प्रचारक:
कल्पना करा, की जैतुनांच्या डोंगरावर उभ्या असलेल्या येशूच्या प्रेषितांपैकी तुम्ही एक आहात. येशू तुमच्यापुढे प्रकट होतो. तो स्वर्गात जाण्याआधी असं म्हणतो: “पवित्र शक्ती तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि तुम्ही यरुशलेममध्ये, संपूर्ण यहूदीयामध्ये आणि शोमरोनमध्ये, तसंच पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांपर्यंत माझ्याबद्दल साक्ष द्याल.” (प्रे. कार्ये १:८) आता तुमची काय प्रतिक्रिया असेल?
आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आली, असं कदाचित तुम्हाला वाटेल. तुमच्या मनात कदाचित असा विचार येईल, की ‘आम्ही फक्त इतकेच शिष्य, “पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांपर्यंत” कसे काय साक्ष देऊ शकणार?’ येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने जे म्हटलं ते कदाचित तुम्हाला आठवेल: “दास आपल्या मालकापेक्षा मोठा नसतो. जर त्यांनी माझा छळ केला, तर ते तुमचाही छळ करतील. जर त्यांनी माझ्या शिकवणी पाळल्या असतील, तर ते तुमच्याही शिकवणी पाळतील. पण माझ्या नावामुळे ते तुमच्याविरुद्ध या सगळ्या गोष्टी करतील, कारण ज्याने मला पाठवलं त्याला ते ओळखत नाहीत.” (योहा. १५:२०, २१) त्याच्या या शब्दांवर विचार करताना, तुम्ही कदाचित स्वतःला असा प्रश्न विचाराल, ‘तीव्र विरोध आणि छळ होत असतानाही मी पूर्णपणे साक्ष कशी देऊ शकेन?’
आज आपल्यासमोरही असेच प्रश्न आहेत. कारण यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपल्याला “पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांपर्यंत,” “सगळ्या राष्ट्रांच्या लोकांना” पूर्णपणे साक्ष द्यायची आहे. (मत्त. २८:१९, २०) येशूने आधीच सांगितल्याप्रमाणे आज आपल्याला विरोधाचा सामना करावा लागतो. मग असं असताना, हे काम आपल्याला कसं पूर्ण करता येईल?
इ.स. पहिल्या शतकातले प्रेषित आणि इतर ख्रिस्ती बांधव यहोवाच्या मदतीने त्यांचं सेवाकार्य कसं पूर्ण करू शकले, याचा रोमांचक अहवाल आपल्याला प्रेषितांची कार्यं पुस्तकात पाहायला मिळतो. तुम्ही आता जे पुस्तक वाचत आहात, ते तुम्हाला प्रेषितांची कार्यं पुस्तकातल्या अहवालांचं परीक्षण करायला मदत करेल. तसंच, वेगाने घडलेल्या घटनांचा रोमांचही तुम्हाला यात अनुभवायला मिळेल. देवाच्या पहिल्या शतकातल्या सेवकांमध्ये आणि त्याच्या आजच्या सेवकांमध्ये किती गोष्टी सारख्या आहेत, हे पाहून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. आपण जे काम करतो त्यातच फक्त हे साम्य नाही, तर ज्या प्रकारे ते काम करण्यासाठी आपण संघटित आहोत त्यातही हे साम्य दिसून येतं. जेव्हा तुम्ही समान असलेल्या या गोष्टींवर विचार कराल, तेव्हा यहोवा देव आजही आपल्या संघटनेच्या पृथ्वीवरच्या भागाचं मार्गदर्शन करत आहे, या गोष्टीवर तुमचा विश्वास नक्कीच वाढेल.
आमची हीच प्रार्थना आणि आशा आहे, की प्रेषितांची कार्यं पुस्तकाचं परीक्षण केल्यामुळे तुमचा यहोवावरचा विश्वास मजबूत होईल. तसंच, तो त्याच्या पवित्र शक्तीच्या सामर्थ्याने तुमचा सांभाळ करेल, यावरही तुमचा विश्वास मजबूत होईल. यामुळे तुम्हाला देवाच्या राज्याबद्दल “पूर्णपणे साक्ष” देत राहण्याचं आणि लोकांना तारणाच्या मार्गावर येण्यासाठी मदत करत राहण्याचं प्रोत्साहन मिळावं हीच आमची मनापासून इच्छा आहे.—प्रे. कार्ये २८:२३; १ तीम. ४:१६.
तुमचे बांधव,
यहोवाच्या साक्षीदारांचं नियमन मंडळ