व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय ११

“आनंदाने आणि पवित्र शक्‍तीने भरून गेले”

“आनंदाने आणि पवित्र शक्‍तीने भरून गेले”

विरोध करणाऱ्‍या आणि आवड न दाखवणाऱ्‍या लोकांशी कसं वागायचं या बाबतीत पौलने मांडलेलं उदाहरण

प्रे. कार्यं १३:१-५२ वर आधारित

१, २. बर्णबा आणि शौल यांचा प्रवास वेगळा कसा आहे, आणि त्यांच्या कार्यामुळे प्रेषितांची कार्यं १:८ मधले शब्द पूर्ण व्हायला कशी मदत होणार होती?

 अंत्युखिया मंडळीसाठी आज आनंदाचा दिवस आहे. तिथे असलेले सर्व संदेष्टे आणि शिक्षक यांच्यापैकी पौल आणि बर्णबा यांना, पवित्र शक्‍तीद्वारे आनंदाचा संदेश दूरदूरच्या क्षेत्रांत पोहोचवण्यासाठी निवडण्यात आलं आहे. a (प्रे. कार्यं १३:१, २) ही गोष्ट खरी आहे, की योग्य माणसांना याआधीही असंच पाठवण्यात आलं होतं. पण आधीचे मिशनरी अशा ठिकाणी गेले होते जिथे ख्रिस्ती विश्‍वास पूर्वीच रुजला होता. (प्रे. कार्यं ८:१४; ११:२२) पण यावेळी मात्र बर्णबा व शौल, आणि त्यांच्यासोबत सेवक म्हणून निघालेला योहान मार्क, या सर्वांना अशा क्षेत्रांत पाठवलं जाणार आहे, जिथे बहुतेक लोकांनी आनंदाचा संदेश ऐकलेलाच नाही.

सुमारे १४ वर्षांपूर्वी, येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला होता, “तुम्ही यरुशलेममध्ये, संपूर्ण यहूदीयामध्ये आणि शोमरोनमध्ये, तसंच पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत माझ्याबद्दल साक्ष द्याल.” (प्रे. कार्यं १:८) बर्णबा आणि शौल यांना मिशनरी म्हणून सेवा करण्यासाठी नियुक्‍त करण्यात आल्यामुळे, येशूने आधीच सांगितलेली ही गोष्ट पूर्ण व्हायला आता आणखी मदत होणार आहे. b

“कार्यासाठी” वेगळं करण्यात आलं (प्रे. कार्यं १३:१-१२)

३. पहिल्या शतकात लांबचा प्रवास करणं कठीण का होतं?

आजच्या काळात, कार आणि विमानं यांचा शोध लागल्यामुळे लोक एकदोन तासांत अनेक मैलांचा प्रवास सहज करू शकतात. पण इ.स. पहिल्या शतकात परिस्थिती वेगळी होती. त्या काळी एखाद्याला प्रवास करायचा असेल तर त्याला सहसा कच्च्या रस्त्यांवरून चालत जावं लागायचं. एका दिवसात जास्तीत जास्त ३० किलोमीटर प्रवास करता यायचा आणि त्यामुळे माणसं खूप थकून जायची. c तेव्हा बर्णबा आणि शौल हे आपली सेवा सुरू करायला आतुर असले, तरी त्यांना या गोष्टीची कल्पना होती की त्यांना खूप कष्ट आणि त्याग करावे लागतील.​—मत्त. १६:२४.

४. (क) बर्णबा आणि शौल यांना कसं निवडण्यात आलं, आणि त्यांच्या नेमणुकीला इतर बांधवांनी कशी प्रतिक्रिया दाखवली? (ख) ज्यांना मंडळीत जबाबदारी दिली जाते त्यांना आपण पाठिंबा कसा देऊ शकतो?

पण बर्णबा आणि शौल यांनाच या “कार्यासाठी” वेगळं करण्यात यावं, असं मार्गदर्शन पवित्र शक्‍तीद्वारे का देण्यात आलं? (प्रे. कार्यं १३:२) बायबलमध्ये याबद्दल काही सांगितलेलं नाही. पण आपल्याला हे पक्कं माहीत आहे, की पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनानेच त्यांना निवडण्यात आलं. या निर्णयाला अंत्युखियातल्या संदेष्ट्यांनी आणि शिक्षकांनी विरोध केला, असा कोणताच उल्लेख नाही. उलट त्यांनी या नेमणुकीला पूर्ण पाठिंबा दिला. बर्णबा आणि शौल यांच्या ख्रिस्ती बांधवांनी, त्यांचा हेवा करण्याऐवजी, “उपास आणि प्रार्थना केल्यानंतर . . . त्या दोघांवर हात ठेवले आणि त्यांना पाठवून दिलं.” (प्रे. कार्यं १३:३) यामुळे बर्णबा आणि शौल यांना किती आनंद झाला असेल याचा विचार करा! आज जेव्हा ख्रिस्ती मंडळीत कोणाला एखादी जबाबदारी दिली जाते किंवा देखरेख करण्यासाठी नेमलं जातं, तेव्हा आपणही त्यांना पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे. ज्यांना असा बहुमान मिळतो त्यांचा हेवा करण्याऐवजी, आपण “ते करत असलेल्या कामाबद्दल प्रेमळपणे त्यांची आणखी जास्त कदर” केली पाहिजे.​—१ थेस्सलनी. ५:१३.

५. कुप्र बेटावर प्रचार करण्यासाठी बर्णबा आणि शौल यांना कसा प्रवास करावा लागला?

अंत्युखियाजवळ असलेल्या सलुकीयाच्या बंदरापर्यंत चालत गेल्यावर, बर्णबा आणि शौल जहाजाने कुप्र बेटावर जायला निघाले. हा प्रवास जवळजवळ २०० किलोमीटरचा होता. d बर्णबा हा मूळचा कुप्रचाच असल्यामुळे, साहजिकच तिथल्या लोकांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी तो उत्सुक असावा. त्या बेटावर पूर्वेकडे असलेल्या सलमीना शहरात पोहोचल्यावर त्यांनी लगेच “यहुद्यांच्या सभास्थानांत देवाच्या वचनाची घोषणा” करायला सुरुवात केली. e (प्रे. कार्यं १३:५) बर्णबा आणि शौल यांनी कुप्रच्या एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत प्रवास करत, तिथल्या मुख्य शहरांमध्ये प्रचारकार्य केलं. ते ज्या मार्गाने गेले त्यावरून असं दिसतं, की ते जवळजवळ १६० किलोमीटर चालले असावेत!

६, ७. (क) सिर्ग्य पौल कोण होता आणि बर्येशू त्याला आनंदाचा संदेश ऐकण्यापासून का रोखत होता? (ख) बर्येशू विरोध करत असल्यामुळे शौलने काय केलं?

पहिल्या शतकात, कुप्र बेट खोट्या उपासनेने भरलं होतं. बर्णबा आणि शौल बेटाच्या पश्‍चिमेकडे असलेल्या पफे शहरात पोहोचल्यावर त्यांना या गोष्टीची स्पष्टपणे जाणीव झाली. तिथे त्यांना “बर्येशू नावाचा एक यहुदी माणूस भेटला. तो एक जादूगार आणि खोटा संदेष्टा होता. तो त्या प्रांताचा राज्यपाल सिर्ग्य पौल याच्याकडे काम करायचा. सिर्ग्य पौल हा एक बुद्धिमान माणूस होता.” पहिल्या शतकामध्ये सुशिक्षित रोमन लोकही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी जादूगारांकडे आणि ज्योतिष्यांकडे जायचे. सिर्ग्य पौलसारखा ‘बुद्धिमान माणूससुद्धा’ अशा लोकांपैकी होता. तरीही सिर्ग्य पौल याला राज्याचा संदेश आवडला आणि त्याने “देवाचं वचन ऐकायची उत्सुकता” दाखवली. बर्येशू, ज्याला त्याच्या व्यवसायामुळे अलीम म्हणजेच “जादूगार” या नावानेही ओळखलं जायचं, त्याला ही गोष्ट आवडली नाही.​—प्रे. कार्यं १३:६-८.

बर्येशू हा राज्याच्या संदेशाचा विरोधक होता. याचं कारण म्हणजे, तो राज्यपाल सिर्ग्य पौल याचा सल्लागार होता आणि त्याचा हा मोठा हुद्दा टिकवून ठेवण्याचा फक्‍त एकच मार्ग होता. तो म्हणजे, सिर्ग्य पौल याला “प्रभूवर विश्‍वास” ठेवण्यापासून रोखणं. (प्रे. कार्यं १३:८) म्हणून तो सिर्ग्य पौल याचं राज्याच्या संदेशावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत होता. पण शौलही शांत बसणार नव्हता. मग त्याने काय केलं? अहवालात म्हटलं आहे, “शौल ज्याला पौल असंही म्हटलं जातं, तो पवित्र शक्‍तीने भरून गेला. त्याने अलीम जादूगाराकडे रोखून पाहिलं आणि तो म्हणाला: ‘अरे सर्व प्रकारच्या कपटाने आणि सर्व प्रकारच्या लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या मुला, सर्व नीतिमत्त्वाच्या वैऱ्‍या, तू यहोवाच्या सरळ मार्गांचा विरोध करायचं सोडून देणार नाहीस का? पाहा! यहोवाचा हात तुझ्याविरुद्ध उठलाय. तू आंधळा होशील आणि काही काळापर्यंत तुला सूर्यप्रकाश दिसणार नाही.’ इतक्यात त्याच्या डोळ्यांसमोर दाट धुकं आणि अंधार पसरला आणि कोणीतरी आपल्याला हात धरून न्यावं म्हणून तो चाचपडत फिरू लागला.” f या चमत्काराचा परिणाम काय झाला? “जे काही घडलं होतं ते पाहून राज्यपालाने प्रभूवर विश्‍वास ठेवला. कारण यहोवाबद्दलच्या शिकवणीने तो थक्क झाला होता.”​—प्रे. कार्यं १३:९-१२.

विरोधाचा सामना करताना, आपणही पौलप्रमाणेच सत्याबद्दल निर्भयपणे सांगत राहतो

८. आज आपण पौलच्या धैर्याचं अनुकरण कसं करू शकतो?

पौल बर्येशूला घाबरला नाही. विरोधक राज्याच्या संदेशात आवड दाखवणाऱ्‍यांचा विश्‍वास कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आपण घाबरून जाण्याचं कारण नाही. त्यांना उत्तर देताना आपलं बोलणं, “नेहमी प्रेमळ, मिठाने रुचकर केल्यासारखं असावं.” (कलस्सै. ४:६) पण फक्‍त वाद टाळण्यासाठी, आपण एखाद्या आवड दाखवणाऱ्‍या व्यक्‍तीला मदत करण्यापासून माघार घेणार नाही. तसंच, खोट्या धर्माचं खरं रूप लोकांना दाखवण्याची आपल्याला भीती वाटून चालणार नाही. कारण आजही खोटा धर्म बर्येशूप्रमाणेच “यहोवाच्या सरळ मार्गांचा विरोध” करत आहे. (प्रे. कार्यं १३:१०) पौलप्रमाणे आपणही प्रामाणिक मनाच्या लोकांना धैर्याने सत्य सांगितलं पाहिजे. या घटनेत देवाने पौलला कशी मदत केली हे स्पष्टपणे दिसतं. पण तो आपल्याला करत असलेली मदत कदाचित इतक्या स्पष्टपणे दिसणार नाही. तरीही, आपण या गोष्टीची खातरी बाळगू शकतो की यहोवा त्याच्या पवित्र शक्‍तीद्वारे योग्य मनोवृत्तीच्या लोकांना सत्याकडे आणेल.​—योहा. ६:४४.

“प्रोत्साहन मिळेल असं काही” सांगा (प्रे. कार्यं १३:१३-४३)

९. मंडळीत पुढाकार घेणाऱ्‍यांसाठी पौल आणि बर्णबा यांनी खूप चांगलं उदाहरण मांडलं असं का म्हणता येईल?

हे लोक जेव्हा पफे सोडून पिर्गा इथे जायला निघाले तेव्हा परिस्थिती बदलली. पफेपासून पिर्गा २५० किलोमीटर दूर आशिया मायनरच्या किनाऱ्‍यावर होतं. प्रेषितांची कार्यं १३:१३ इथे आपण या लोकांचा, “पौल आणि त्याचे साथीदार” असा उल्लेख वाचतो. या शब्दांवरून कळतं, की हे बांधव करत असलेल्या कार्यात आता पौल पुढाकार घेत होता. पण यामुळे बर्णबाला त्याचा हेवा वाटू लागला असं कुठेही दिसत नाही. याउलट, हे दोघं देवाची इच्छा पूर्ण करण्याकरता पुढेही एकत्र काम करत राहिले. पौल आणि बर्णबा यांनी आज मंडळीत पुढाकार घेणाऱ्‍यांसाठी खूप चांगलं उदाहरण मांडलं आहे. मोठेपणा मिळवण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा, ख्रिश्‍चनांनी येशूचे हे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत: “तुम्ही सगळे भाऊ आहात.” तो असंही म्हणाला होता, “जो स्वतःचा गौरव करतो त्याला नमवलं जाईल आणि जो स्वतःला नम्र करतो त्याचा गौरव केला जाईल.”​—मत्त. २३:८, १२.

१०. पिर्गा इथून पिसिदियाच्या अंत्युखियापर्यंतच्या प्रवासाचं वर्णन करा.

१० पिर्गा इथे पोहोचल्यावर, योहान मार्क हा पौल आणि बर्णबाला सोडून यरुशलेमला परत निघून गेला. तो असा अचानक का निघून गेला याचं कारण दिलेलं नाही. पौल आणि बर्णबा पिर्गा इथून पिसिदियाच्या अंत्युखियाला गेले. हे गलतीया प्रांतातलं एक शहर असून, तिथे जाण्याचा रस्ता सोपा नव्हता. कारण हे शहर समुद्रसपाटीपासून सुमारे ३,६०० फूट उंचीवर आहे. तिथे पोहोचण्यासाठी डोंगरांमधून जाणारा रस्ता धोकादायक होता. तसंच, त्या रस्त्यावर लुटारूही असायचे. त्यातल्या त्यात, तिथे जाताना पौलची तब्येतही बरी नव्हती. g

११, १२. पिसिदियाच्या अंत्युखियातल्या सभास्थानात बोलताना पौलने आपल्या श्रोत्यांचं लक्ष कसं वेधलं?

११ पिसिदियाच्या अंत्युखियात, पौल आणि बर्णबा शब्बाथाच्या दिवशी सभास्थानात गेले. अहवालात असं म्हटलं आहे, “नियमशास्त्राचं आणि संदेष्ट्यांच्या लिखाणांचं वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्‍यांनी त्यांना असा निरोप पाठवला: ‘माणसांनो, भावांनो, लोकांना प्रोत्साहन मिळेल असं काही तुम्हाला सांगायचं असेल, तर सांगा.’” (प्रे. कार्यं १३:१५) तेव्हा पौल बोलण्यासाठी उभा राहिला.

१२ पौल आपल्या श्रोत्यांना उद्देशून म्हणाला, “इस्राएलच्या लोकांनो आणि देवाची भीती बाळगणाऱ्‍या इतर लोकांनो, ऐका.” (प्रे. कार्यं १३:१६) पौलच्या समोर यहुदी आणि यहुदी धर्म स्वीकारलेले लोक बसलेले होते. मग, देवाच्या संकल्पात येशूची भूमिका नाकारणाऱ्‍या या लोकांचं लक्ष त्याने कसं वेधलं? पहिल्यांदा पौलने यहुदी राष्ट्राच्या इतिहासावर थोडक्यात चर्चा केली. त्याने समजावून सांगितलं की, “ते इजिप्त देशात परके म्हणून राहत होते, तेव्हा त्याने [यहोवाने] त्यांना एक शक्‍तिशाली राष्ट्र बनवलं.” तसंच, त्यांना गुलामीतून सोडवल्यानंतर “सुमारे ४० वर्षांपर्यंत त्याने ओसाड रानात त्यांना सहन केलं.” इस्राएली लोकांनी वचन दिलेल्या देशात जाण्याआधी आपल्या शत्रूंवर विजय कसा मिळवला आणि यहोवाने “तो देश त्यांना वारसा म्हणून” कसा दिला, हेही पौलने सांगितलं. (प्रे. कार्यं १३:१७-१९) काही जाणकारांचं असं म्हणणं आहे, की कदाचित पौल थोड्याच वेळाआधी वाचण्यात आलेल्या शास्त्रवचनांतल्या अहवालांचा उल्लेख करत असावा. यहुदी लोकांच्या प्रथेनुसार शब्बाथाच्या दिवशी या अहवालांचं वाचन केलं जायचं. जर पौलने खरोखरच त्या अहवालांचा उल्लेख केला असेल, तर “सर्व लोकांसाठी सर्वकाही” कसं व्हायचं याचं पौलने आणखी एक चांगलं उदाहरण दिलं होतं.​—१ करिंथ. ९:२२.

१३. आपण ऐकणाऱ्‍यांच्या हृदयापर्यंत कसं पोहोचू शकतो?

१३ आपण ज्यांना प्रचार करतो, त्यांचं लक्ष आपल्या संदेशाकडे वेधण्याचा आपणही प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणार्थ, आपण जर एखाद्या व्यक्‍तीचा धार्मिक विश्‍वास जाणून घेतला, तर तिला आवडणाऱ्‍या विषयावर आपल्याला तिच्याशी बोलता येईल. तसंच, जर त्या व्यक्‍तीला बायबलमधल्या अहवालांची माहिती असेल, तर आपल्याला त्या अहवालांवर तिच्याशी चर्चा करता येईल. त्या व्यक्‍तीकडे जर बायबल असेल तर आपण तिला तिच्याच बायबलमधून वचनं वाचायला सांगू शकतो. असं केल्याने तिच्यावर चांगला प्रभाव पडेल. आपल्या ऐकणाऱ्‍यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण वेगवेगळे मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

१४. (क) पौलने येशूबद्दलचा आनंदाचा संदेश सांगायला कशी सुरुवात केली, आणि त्याने कोणती ताकीद दिली? (ख) पौलच्या भाषणाचा लोकांवर काय परिणाम झाला?

१४ त्यानंतर, इस्राएली राजांच्या वंशातून, “एक तारणकर्ता” “म्हणजे येशू” कसा आला; तसंच बाप्तिस्मा देणारा योहान हा येशूसाठी मार्ग तयार करणारा कसा होता, यावर पौलने चर्चा केली. मग, येशूला कसं मारण्यात आलं आणि त्याचं पुनरुत्थान कसं झालं, हेही पौलने सांगितलं. (प्रे. कार्यं १३:२०-३७) शेवटी तो त्यांना म्हणाला, “तेव्हा भावांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा, की याच्याचद्वारे पापांची क्षमा मिळू शकते आणि हा संदेश आम्ही तुम्हाला घोषित करत आहोत. . . . विश्‍वास ठेवणारा प्रत्येक जण याच्याचद्वारे निर्दोष ठरवला जातो.” त्यानंतर पौलने त्यांना अशी ताकीद दिली: “संदेष्ट्यांच्या लिखाणांत जे म्हटलंय ते तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून सांभाळा: ‘अरे धिक्कार करणाऱ्‍यांनो, पाहा, आश्‍चर्य करा आणि नाहीसे व्हा. कारण मी तुमच्या दिवसांत एक असं कार्य करणार आहे, ज्याबद्दल कोणी तुम्हाला सविस्तर सांगितलं तरी तुम्ही विश्‍वास ठेवणार नाही.’” पौलच्या या भाषणाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अहवालात पुढे म्हटलं आहे, “पुढच्या शब्बाथाच्या दिवशी या गोष्टींबद्दल पुन्हा बोलायची लोक त्यांना विनंती करू लागले.” तसंच, सभा संपल्यानंतर, “देवाची उपासना करणारे यहुदी आणि यहुदी धर्म स्वीकारलेले बरेच जण, पौल आणि बर्णबा यांच्या मागे गेले.”​—प्रे. कार्यं १३:३८-४३.

“आम्ही विदेश्‍यांकडे जातोय” (प्रे. कार्यं १३:४४-५२)

१५. शब्बाथाच्या दिवशी पौलच्या भाषणानंतर काय घडलं?

१५ पुढच्या शब्बाथाला, “शहरातले जवळजवळ सगळेच लोक” पौलचं भाषण ऐकायला जमले. हे पाहून काही यहुद्यांना राग आला आणि “पौल ज्या गोष्टी सांगत होता त्यांचा विरोध करून ते देवाची निंदा करू लागले.” तेव्हा पौल आणि बर्णबा यांनी त्यांना बेधडकपणे सांगितलं, “देवाचं वचन आधी तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. पण तुम्ही ते नाकारलं आणि असं करून सर्वकाळाचं जीवन मिळवायला आपण योग्य नाही हे दाखवून दिलं. म्हणून आता आम्ही विदेश्‍यांकडे जातोय. कारण यहोवाने आम्हाला अशी आज्ञा दिली: ‘तू पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांत तारणाचा संदेश घोषित करावा म्हणून मी तुला राष्ट्रांसाठी प्रकाश असं नेमलंय.’”​—प्रे. कार्यं १३:४४-४७; यश. ४९:६.

“पौल आणि बर्णबा यांचा छळ करण्यात आला . . . आणि शिष्य आनंदाने आणि पवित्र शक्‍तीने भरून गेले.”​—प्रे. कार्यं १३:५०-५२

१६. पौल आणि बर्णबा यांच्या कडक शब्दांमुळे यहुद्यांनी कशी प्रतिक्रिया दाखवली, आणि या विरोधाचा त्या दोघांनी कसा सामना केला?

१६ यहुदी धर्म स्वीकारलेल्या लोकांना हे ऐकून आनंद झाला आणि “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती असणाऱ्‍या सगळ्यांनी विश्‍वास स्वीकारला.” (प्रे. कार्यं १३:४८) यहोवाचं वचन लवकरच संपूर्ण देशात पसरलं. पण यहुद्यांची प्रतिक्रिया फार वेगळी होती. कारण पौल आणि बर्णबा यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं, की देवाचं वचन पहिल्यांदा त्यांना सांगण्यात आलं असूनही त्यांनी मसीहाला नाकारलं होतं. आणि यामुळे त्यांच्यावर देवाचा न्यायदंड येणार होता. तेव्हा, यहुद्यांनी शहरातल्या प्रतिष्ठित स्त्रियांना आणि प्रमुख पुरुषांना भडकवलं. “मग पौल आणि बर्णबा यांचा छळ करण्यात आला आणि त्यांना शहराबाहेर घालवून देण्यात आलं.” तेव्हा त्या दोघांनी काय केलं? “त्यांनी आपल्या पायांची धूळ झटकली आणि ते इकुन्याला गेले.” यामुळे पिसिदियाच्या अंत्युखियात ख्रिस्ती विश्‍वासाची वाढ तिथेच थांबली का? मुळीच नाही! पौल आणि बर्णबा गेल्यावरही तिथले शिष्य, “आनंदाने आणि पवित्र शक्‍तीने भरून गेले.”​—प्रे. कार्यं १३:५०-५२.

१७-१९. पौल आणि बर्णबा यांच्या चांगल्या उदाहरणाचं आपण कोणत्या मार्गांनी अनुकरण करू शकतो, आणि त्यामुळे आपला आनंद कसा टिकून राहील?

१७ या दोघा विश्‍वासू सेवकांनी ज्या प्रकारे विरोधाचा सामना केला, त्यावरून आपण एक महत्त्वाचा धडा शिकू शकतो. जगातले प्रतिष्ठित लोक आपला संदेश सांगण्यापासून आपल्याला अडवण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही आपण आपलं प्रचारकार्य सुरूच ठेवलं पाहिजे. आणखी एक गोष्ट म्हणजे, जेव्हा अंत्युखियाच्या लोकांनी पौल आणि बर्णबा यांचा संदेश स्वीकारला नाही, तेव्हा त्यांनी “आपल्या पायांची धूळ झटकली.” याचा असा अर्थ होत नाही, की त्यांना राग आला होता. तर असं करून ते हे दाखवत होते, की आता त्या लोकांसोबत जे होईल त्याला ते जबाबदार नाहीत. त्यांना या गोष्टीची जाणीव होती, की लोक त्यांच्या संदेशाला कसा प्रतिसाद देतील हे त्यांच्या हातात नाही. पण प्रचार करत राहणं मात्र नक्कीच त्यांच्या हातात होतं. आणि इकुन्या शहरात गेल्यावर त्यांनी अगदी तेच केलं. ते प्रचार करत राहिले.

१८ पण अंत्युखियातल्या त्या शिष्यांबद्दल काय? ही गोष्ट खरी आहे, की त्यांना प्रचार करताना विरोधाचा सामना करावा लागत होता. असं असलं, तरी त्यांचा आनंद लोकांच्या चांगल्या प्रतिसादावर अवलंबून नव्हता. येशू म्हणाला होता, “जे देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे वागतात तेच सुखी!” (लूक ११:२८) आणि अंत्युखियातल्या शिष्यांनी हेच करण्याचा निश्‍चय केला. ते प्रचार करण्याच्या आज्ञेचं पालन करत राहिले.

१९ पौल आणि बर्णबा यांच्याप्रमाणे आपणही आनंदाच्या संदेशाचा प्रचार करण्याची आपली जबाबदारी नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. संदेश ऐकायचा किंवा नाही हा निर्णय पूर्णपणे आपल्या ऐकणाऱ्‍यांचा आहे. जेव्हा लोक आपल्या प्रचारकार्याला चांगला प्रतिसाद देत नाहीत, तेव्हा आपण पहिल्या शतकातल्या शिष्यांचं अनुकरण करू शकतो. त्यांच्याप्रमाणेच आपणही सत्याबद्दल कदर दाखवून, पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनाचं नेहमी पालन करत राहू या. आपण असं केलं, तर विरोध होत असतानाही आपला आनंद टिकून राहील.​—गलती. ५:१८, २२.

b बर्णबा आणि शौल यांचा दौरा सुरू होण्याआधीच दूरदूरपर्यंत मंडळ्या स्थापन झाल्या होत्या. यरुशलेमच्या उत्तरेकडे जवळजवळ ५५० किलोमीटर दूर सीरियाच्या अंत्युखियामध्येही तेव्हा मंडळी होती.

c पहिल्या शतकातला प्रवास” ही चौकट पाहा.

d वारा योग्य दिशेने वाहत असेल तर, पहिल्या शतकातली जहाजं एका दिवसात जवळजवळ १५० किलोमीटर प्रवास करू शकत होती. पण हवामान ठीक नसलं तर या प्रवासाला आणखी बराच वेळ लागायचा.

f यापुढे शौल याचा पौल असा उल्लेख करण्यात आला आहे. काहींचं असं म्हणणं आहे, की त्याने सिर्ग्य पौल याचा सन्मान म्हणून पौल हे नाव स्वीकारलं. पण त्याने कुप्र सोडल्यावरही पौल हेच नाव वापरलं, यावरून असं दिसतं की यामागे वेगळं कारण असावं. आपल्याला “प्रेषित म्हणून विदेशी लोकांकडे पाठवण्यात” आलं आहे हे माहीत असल्यामुळे, त्याने पुढेही पौल हे रोमन नाव वापरण्याचं ठरवलं असेल. त्याने पौल हे नाव वापरण्यामागे आणखी एक कारण असावं. त्याच्या शौल या हिब्रू नावाचा ग्रीक उच्चार, वाईट अर्थ असलेल्या एका ग्रीक शब्दासारखा आहे.​—रोम. ११:१३.

g अनेक वर्षांनंतर पौलने गलतीयाच्या मंडळीला पत्र लिहिलं. त्या पत्रात पौलने असं लिहिलं, “माझ्या आजारामुळेच मला पहिल्यांदा तुम्हाला आनंदाचा संदेश घोषित करायची संधी मिळाली होती.”​—गलती. ४:१३.