अध्याय २५
“मी कैसराकडे न्याय मागतो!”
आनंदाच्या संदेशाचं समर्थन करण्याबद्दल पौल चांगलं उदाहरण मांडतो
प्रे. कार्यं २५:१–२६:३२ वर आधारित
१, २. (क) पौलसमोर आता कोणती परिस्थिती आहे? (ख) पौलने कैसराकडे न्याय मागितला यावरून कोणता प्रश्न उभा राहतो?
पौल अजूनही कैसरीयात कडक पहाऱ्याखाली आहे. दोन वर्षांआधी जेव्हा तो यहूदीयाला परत आला होता, तेव्हा काही दिवसांतच यहुद्यांनी कमीतकमी तीनदा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. (प्रे. कार्यं २१:२७-३६; २३:१०, १२-१५, २७) अजूनतरी त्याच्या शत्रूंना यश आलेलं नाही, पण त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. आपण पुन्हा शत्रूंच्या हाती पडू शकतो हे लक्षात आल्यावर पौल रोमन राज्यपाल फेस्त याला म्हणतो: “मी कैसराकडे न्याय मागतो!”—प्रे. कार्यं २५:११.
२ रोमच्या सम्राटाकडे न्याय मागण्याच्या पौलच्या निर्णयाला यहोवाचा पाठिंबा होता का? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण, आज या शेवटल्या काळात आपणही देवाच्या राज्याबद्दल अगदी पूर्णपणे साक्ष देण्याचं काम करत आहोत. “आनंदाच्या संदेशाचं समर्थन करण्यात, तसंच त्याला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यात” पौलने मांडलेल्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?—फिलिप्पै. १:७.
“मी कैसराच्या न्यायासनासमोर उभा आहे” (प्रे. कार्यं २५:१-१२)
३, ४. (क) पौलला यरुशलेमला आणण्याची विनंती करण्यामागे यहुद्यांचा काय हेतू होता, आणि पौल मृत्यूच्या सापळ्यातून कसा वाचला? (ख) यहोवाने ज्या प्रकारे पौलला सांभाळलं त्याच प्रकारे तो आजच्या काळातल्या त्याच्या सेवकांना कसं सांभाळतो?
३ यहूदीयाचा नवीन रोमन राज्यपाल म्हणून नेमण्यात आल्यावर तीन दिवसांनी फेस्त यरुशलेमला गेला. a तिथे त्याने मुख्य याजकांनी आणि यहुद्यांच्या प्रमुख जनांनी पौलवर केलेले गंभीर आरोप ऐकले. आपल्यासोबत आणि सर्वच यहुद्यांसोबत शांतीचे संबंध टिकवून ठेवण्याचा या नवीन राज्यपालावर दबाव आहे हे त्या लोकांना माहीत होतं. म्हणूनच, पौलला यरुशलेमला आणून त्याची न्यायचौकशी केली जावी अशी त्यांनी फेस्तला विनंती केली. पण ही विनंती करण्यामागे एक दुष्ट हेतू होता. पौलला कैसरीयाहून यरुशलेमला आणलं जात असताना त्याला वाटेतच ठार मारण्याचा या शत्रूंनी कट केला होता. पण, फेस्तने त्यांची विनंती मान्य केली नाही. तो त्यांना म्हणाला: “त्या माणसाने खरंच काही अपराध केला असेल, तर तुमच्यातल्या अधिकाऱ्यांनी माझ्यासोबत [कैसरीयाला] येऊन त्याच्यावर तसा आरोप करावा.” (प्रे. कार्यं २५:५) अशा रितीने, पुन्हा एकदा पौल मृत्यूच्या सापळ्यातून वाचला.
४ पौलवर आलेल्या या सर्व संकटांत यहोवाने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्याला सांभाळलं. तुम्हाला आठवत असेल, की येशूने आपल्या या प्रेषिताला, “हिंमत धर!” असं सांगितलं होतं. (प्रे. कार्यं २३:११) आज देवाच्या लोकांनाही बऱ्याच समस्यांचा आणि धमक्यांचा सामना करावा लागतो. यहोवा प्रत्येक समस्येतून आपली सुटका करत नाही, पण त्या समस्येला धीराने तोंड देण्यासाठी तो आपल्याला बुद्धी आणि शक्ती देतो. देव आपल्याला अशा सर्व समस्यांचा सामना करण्यासाठी “असाधारण सामर्थ्य” देईल, ही खातरी आपण बाळगू शकतो.—२ करिंथ. ४:७.
५. फेस्तने पौलशी कशा प्रकारे व्यवहार केला?
५ काही दिवसांनी, फेस्त कैसरीयातल्या “न्यायासनावर बसला.” b त्याच्यासमोर पौल आणि त्याच्यावर आरोप लावणारे उभे होते. पौलने त्या लोकांच्या बिनबुडाच्या आरोपांना उत्तर देत म्हटलं: “मी यहुद्यांच्या नियमशास्त्राविरुद्ध, मंदिराविरुद्ध किंवा कैसराविरुद्ध कोणतंही पाप केलं नाही.” प्रेषित पौल निर्दोष होता आणि त्याची सुटका व्हायला हवी होती. पण, फेस्तने याबद्दल काय निर्णय घेतला? यहुदी लोकांची मर्जी मिळवण्यासाठी, त्याने पौलला विचारलं: “यरुशलेमला जाऊन या सगळ्या गोष्टींबद्दल माझ्यासमोर तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे का?” (प्रे. कार्यं २५:६-९) फेस्तच्या या बोलण्याला काहीच अर्थ नव्हता! पौलला यरुशलेमला परत पाठवण्यात आलं असतं, तर त्याच्यावर आरोप करणाऱ्यांनीच त्याचा न्याय केला असता आणि त्याला निश्चितच मृत्युदंड देण्यात आला असता. पण, फेस्त हा पौलला न्याय मिळवून देण्यापेक्षा आपल्या राजकीय फायद्याचा जास्त विचार करत होता. काही काळाआधी राज्यपाल असलेला पंतय पिलातही, एका आणखी महत्त्वाच्या कैद्याच्या बाबतीत असाच वागला होता. (योहा. १९:१२-१६) आजच्या काळातले न्यायाधीशही राजकीय दबावाला बळी पडू शकतात. म्हणून, कधीकधी न्यायालयांत, पुराव्यांकडे दुर्लक्ष करून देवाच्या लोकांच्या विरोधात निर्णय दिले जातात तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटायला नको.
६, ७. पौलने कैसराकडे न्याय का मागितला, आणि असं करून त्याने आजच्या काळातल्या ख्रिश्चनांसाठी उदाहरण कसं मांडलं?
६ फेस्तला यहुद्यांना खुश करायचं होतं. पण, यामुळे पौलच्या जिवाला धोका होता. म्हणून, पौलने रोमन नागरिक या नात्याने असलेल्या आपल्या हक्काचा वापर केला. तो फेस्तला म्हणाला: “मी कैसराच्या न्यायासनासमोर उभा आहे आणि इथेच माझा न्याय झाला पाहिजे. मी यहुद्यांचं काहीच वाईट केलं नाही आणि ही गोष्ट तुम्हालाही चांगली माहीत आहे . . . . मी कैसराकडे न्याय मागतो!” एखाद्याने अशी मागणी केल्यानंतर सहसा ती बदलली जाऊ शकत नव्हती. फेस्तने पुढे जे म्हटलं त्यावरून ही गोष्ट स्पष्ट झाली. तो म्हणाला: “तू कैसराकडे न्याय मागितला आहेस, म्हणून तू कैसराकडे जाशील.” (प्रे. कार्यं २५:१०-१२) न्याय करण्याचा आणखी मोठा अधिकार असलेल्या व्यक्तीकडे न्याय मागून पौलने आजच्या काळातल्या खऱ्या ख्रिश्चनांसाठी एक उदाहरण मांडलं. विरोधक जेव्हा “कायद्याच्या नावाखाली” यहोवाच्या साक्षीदारांसमोर अडचणी आणण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते आनंदाच्या संदेशाचं समर्थन करण्यासाठी कायद्याने केलेल्या तरतुदींचा वापर करतात. c—स्तो. ९४:२०.
७ अशा प्रकारे दोन वर्षांपेक्षा जास्त काळ, काहीही दोष नसताना तुरुंगवास भोगल्यानंतर पौलला रोममध्ये आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. पण रोमला जाण्याआधी आणखी एका शासकाला पौलला भेटण्याची इच्छा होती.
मी “विरोधात गेलो नाही” (प्रे. कार्यं २५:१३–२६:२३)
८, ९. अग्रिप्पा राजा कैसरीयाला का आला होता?
८ पौलने फेस्तसमोर कैसराकडे न्याय मागितला त्याच्या काही दिवसांनंतर, अग्रिप्पा राजा आणि त्याची बहीण बर्णीका, नवीन राज्यपालाची “भेट” घेण्यासाठी आले. d त्या काळात, नवीन नेमणूक झालेल्या राज्यपालांची भेट घेण्याची रोमन लोकांमध्ये रीत होती. राज्यपाल म्हणून नेमण्यात आल्याबद्दल फेस्तचं अभिनंदन करून अग्रिप्पा नक्कीच त्याच्यासोबत आपले राजकीय आणि वैयक्तिक संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करत असावा. याचा भविष्यात आपल्याला फायदा होईल असा विचार करून तो फेस्तला भेटायला आला असावा.—प्रे. कार्यं २५:१३.
९ फेस्तने राजाला पौलबद्दल माहिती दिली. तेव्हा अग्रिप्पाने पौलला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी पौलला त्या दोन शासकांसमोर हजर करण्यात आलं. ते दोघंही खूप प्रभावशाली आणि शक्तिशाली शासक होते. पण त्यांच्यासमोर असलेला कैदी आता जे शब्द बोलणार होता, त्यांपुढे त्यांच्या वैभवाचा दिखावा अगदी फिका पडला.—प्रे. कार्यं २५:२२-२७.
१०, ११. पौलने अग्रिप्पाला आदर कसा दाखवला, आणि आपल्या पूर्वीच्या जीवनाबद्दल त्याने कोणत्या गोष्टी राजाला सांगितल्या?
१० आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याबद्दल पौलने अग्रिप्पा राजाचे आदरपूर्वक आभार मानले. अग्रिप्पा हा यहुद्यांच्या सर्व रितीरिवाजांच्या आणि त्यांच्यातल्या वादांचा जाणकार होता हे त्याने मान्य केलं. यानंतर पौलने आपल्या पूर्वीच्या जीवनाबद्दल सांगितलं. तो म्हणाला: “मी एक परूशी होतो. आणि परूश्यांच्या उपासनेची पद्धत ही इतर यहुद्यांपेक्षा जास्त कडक असते.” (प्रे. कार्यं २६:५) परूशी या नात्याने, पौलही मसीहाच्या येण्याची आशा बाळगत होता. पण, आता ख्रिस्ती झाल्यानंतर, लोक ज्याची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते तो मसीहा येशूच असल्याचं तो सर्वांना निर्भयपणे सांगत होता. देवाने आमच्या पूर्वजांना दिलेल्या वचनाच्या आशेमुळे आज माझी न्यायचौकशी होत आहे, असं पौल म्हणाला. खरंतर, त्याच्यावर आरोप करणारेही त्याच्याप्रमाणे हीच आशा बाळगत होते. हे ऐकून, पौल पुढे काय सांगणार याबद्दल अग्रिप्पाला आणखीनच उत्सुकता वाटू लागली. e
११ पूर्वी आपण ख्रिश्चनांचा किती क्रूरतेने छळ केला याची आठवण करून पौल म्हणाला: “एकेकाळी मलाही असं वाटत होतं, की नासरेथकर येशूच्या नावाचा शक्य त्या मार्गाने विरोध करणं हे माझं कर्तव्यच आहे . . . . इतकंच काय, तर त्यांच्याविरुद्ध रागाने वेडापिसा होऊन मी इतर शहरांमध्येही जाऊन त्यांचा छळ केला.” (प्रे. कार्यं २६:९-११) पौल या गोष्टी वाढवून सांगत नव्हता. त्याने ख्रिश्चनांवर किती अत्याचार केले होते याबद्दल बऱ्याच लोकांना माहीत होतं. (गलती. १:१३, २३) मग, ‘हा माणूस कशामुळे बदलला असेल?’ असा विचार कदाचित अग्रिप्पाच्या मनात आला असावा.
१२, १३. (क) पौलने आपल्या परिवर्तनाचं वर्णन कसं केलं? (ख) पौल कशा प्रकारे “पराणीवर लाथा” मारत होता?
१२ या प्रश्नाचं उत्तर, पौलच्या पुढच्या शब्दांतून मिळालं: “मी मुख्य याजकांनी दिलेल्या अधिकाराने आणि परवानगीने दिमिष्कला चाललो होतो. हे राजा, रस्त्याने जात असताना आकाशातून सूर्याच्या प्रकाशापेक्षा तेजस्वी असा प्रकाश, भर दुपारी माझ्या आणि माझ्यासोबत प्रवास करणाऱ्यांभोवती चमकला. तेव्हा आम्ही सगळे जमिनीवर पडलो आणि मला एक आवाज ऐकू आला. तो इब्री भाषेत मला म्हणत होता: ‘शौल, शौल, तू मला का छळत आहेस? पराणीवर लाथा मारून तू स्वतःला त्रास करून घेत आहेस.’ पण मी म्हणालो: ‘प्रभू, तू कोण आहेस?’ तेव्हा प्रभू म्हणाला: ‘मी येशू आहे, ज्याला तू छळत आहेस.’” f—प्रे. कार्यं २६:१२-१५.
१३ हा चमत्कार होण्याआधी पौल लाक्षणिक अर्थाने “पराणीवर लाथा” मारत होता. ओझं वाहणाऱ्या प्राण्याला हाकताना सहसा पराणीचा, म्हणजेच एका टोकदार काठीचा वापर केला जायचा. या काठीला लाथा मारल्यामुळे प्राण्यालाच इजा होऊ शकत होती. त्याचप्रमाणे, देवाच्या इच्छेविरुद्ध वागून पौल आध्यात्मिक अर्थाने स्वतःचं नुकसान करून घेत होता. दिमिष्कला जाणाऱ्या रस्त्यावर पुनरुत्थान झालेल्या येशूने पौलला दृष्टान्त देऊन या प्रामाणिक मनाच्या, पण चुकीच्या मार्गावर चालत असलेल्या माणसाचा दृष्टिकोन बदलला.—योहा. १६:१, २.
१४, १५. पौलने आपल्या जीवनात जे बदल केले होते, त्यांविषयी तो काय म्हणाला?
१४ पौलने आपल्या जीवनात खूप मोठे बदल केले. तो अग्रिप्पाला म्हणाला: “मी या स्वर्गीय दृष्टान्ताच्या विरोधात गेलो नाही. तर मी आधी दिमिष्कमध्ये आणि मग यरुशलेममध्ये, तसंच, संपूर्ण यहूदीयाच्या प्रदेशात आणि इतर राष्ट्रांतही लोकांना हा संदेश घोषित करू लागलो, की त्यांनी पश्चात्ताप करावा आणि पश्चात्तापाला शोभतील अशी कामं करून देवाकडे वळावं.” (प्रे. कार्यं २६:१९, २०) दिमिष्कला जाणाऱ्या रस्त्यावर दिलेल्या दृष्टान्तात येशू ख्रिस्ताने पौलवर जे कार्य सोपवलं होतं, ते तो बऱ्याच वर्षांपासून करत होता. याचा काय परिणाम झाला? पौलने सांगितलेला आनंदाचा संदेश ज्यांनी स्वीकारला, त्यांनी आपली अनैतिक आणि अप्रामाणिक वागणूक सोडून देवाची उपासना करायला सुरुवात केली होती. यामुळे, हे लोक समाजात सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी केलेल्या कायद्यांचं प्रामाणिकपणे पालन करणारे चांगले नागरिक बनले होते.
१५ पण या चांगल्या परिणामांची पौलच्या यहुदी विरोधकांना मुळीच कदर नव्हती. पौल म्हणाला: “याच कारणामुळे यहुद्यांनी मंदिरात मला पकडून ठार मारायचा प्रयत्न केला. पण देवाच्या मदतीमुळेच मी आजपर्यंत लहानमोठ्या सगळ्यांना साक्ष देतोय.”—प्रे. कार्यं २६:२१, २२.
१६. न्यायाधीशांशी आणि अधिकाऱ्यांशी आपल्या विश्वासांबद्दल बोलताना आपण पौलचं अनुकरण कसं करू शकतो?
१६ खरे ख्रिस्ती या नात्याने, आपणही आपल्या विश्वासांबद्दल “उत्तर देण्यासाठी नेहमी तयार” असलं पाहिजे. (१ पेत्र ३:१५) न्यायाधीशांशी आणि अधिकाऱ्यांशी आपल्या विश्वासांबद्दल बोलताना, पौल ज्या पद्धतीने अग्रिप्पा आणि फेस्त यांच्याशी बोलला त्याचं आपण अनुकरण करू शकतो. बायबलच्या शिकवणींमुळे आपल्या स्वतःच्या आणि आपला संदेश स्वीकारणाऱ्या लोकांच्याही जीवनात जे चांगले बदल घडून आले आहेत, त्यांविषयी आपण त्यांना आदरपूर्वक सांगू शकतो. यामुळे कदाचित या अधिकाऱ्यांची आपल्याविषयी असलेली मनोवृत्ती बदलू शकेल.
प्रे. कार्यं २६:२४-३२)
“तू ख्रिस्ती बनण्यासाठी माझं मन वळवशील” (१७. पौलचं बोलणं ऐकून फेस्त काय म्हणाला, आणि आजही बरेच लोक कशा प्रकारे अशीच मनोवृत्ती दाखवतात?
१७ पौलच्या प्रभावी शब्दांनी त्या दोन्ही शासकांना विचार करायला भाग पाडलं. पुढे काय झालं याकडे लक्ष द्या: “पौल या गोष्टी आपल्या बचावात बोलत असताना फेस्त मोठ्याने म्हणाला: ‘पौल तू वेडा झाला आहेस! जास्त ज्ञानाने तुला वेडं केलंय!’” (प्रे. कार्यं २६:२४) फेस्तच्या या शब्दांतून, आजही बरेच लोक दाखवत असलेली मनोवृत्ती दिसून येते. बायबलच्या खऱ्या शिकवणी सांगणाऱ्यांना बरेच लोक धर्मवेडे म्हणतात. जगाच्या दृष्टीने ज्ञानी असलेल्यांना, मेलेल्या लोकांचं पुनरुत्थान होईल ही बायबलची शिकवण स्वीकारणं सहसा जड जातं.
१८. पौलने फेस्तला काय उत्तर दिलं, आणि यामुळे अग्रिप्पा त्याला काय म्हणाला?
१८ पौलने राज्यपाल फेस्तला उत्तर दिलं: “महाराज फेस्त, मी वेडा नाही, तर मी खऱ्या आणि योग्य अशाच गोष्टी बोलतोय. खरंतर, ज्या राजासमोर मी इतक्या मोकळेपणाने बोलतोय, त्याला स्वतःला या गोष्टींबद्दल चांगल्या प्रकारे माहीत आहे . . . . हे राजा अग्रिप्पा, संदेष्ट्यांच्या लिखाणांवर तुमचा विश्वास आहे का? मला माहीत आहे, की तुमचा विश्वास आहे.” पण अग्रिप्पा पौलला म्हणाला: “थोड्याच वेळात, तू ख्रिस्ती बनण्यासाठी माझं मन वळवशील.” (प्रे. कार्यं २६:२५-२८) हे शब्द तो प्रामाणिकपणे बोलला की नाही, हे आपल्याला माहीत नाही. पण पौलने दिलेल्या साक्षीचा त्या राजाच्या मनावर खूप प्रभाव पडला होता हे यावरून दिसून येतं.
१९. फेस्त आणि अग्रिप्पा यांनी पौलच्या बाबतीत कोणता निर्णय घेतला?
१९ यानंतर अग्रिप्पा आणि फेस्त उभे राहिले आणि ती सभा संपली असल्याचं सूचित केलं. “तिथून निघताना ते एकमेकांना म्हणू लागले: ‘मृत्युदंड देण्यासारखं किंवा तुरुंगात टाकण्यासारखं या माणसाने काहीच केलेलं नाही.’ मग अग्रिप्पा फेस्तला म्हणाला: ‘या माणसाने कैसराकडे न्याय मागितला नसता, तर याची सुटका करता आली असती.’” (प्रे. कार्यं २६:३१, ३२) त्यांच्यासमोर उभा राहिलेला माणूस निर्दोष आहे हे त्या दोघांनाही माहीत होतं. कदाचित, यापुढे ते ख्रिश्चनांकडे चांगल्या दृष्टीने पाहतील अशी शक्यता होती.
२०. पौलने उच्च अधिकाऱ्यांना साक्ष दिल्यामुळे कोणते परिणाम घडून आले?
२० या अहवालात उल्लेख केलेल्या दोन्ही शक्तिशाली शासकांनी देवाच्या राज्याविषयीचा आनंदाचा संदेश स्वीकारला नाही. मग, प्रेषित पौलने त्या दोघांपुढे साक्ष दिल्यामुळे खरंच काही चांगला परिणाम घडून आला का? हो नक्कीच. यहूदीयातल्या “राजांच्या आणि राज्यपालांच्या समोर” पौलला हजर करण्यात आल्यामुळे, रोमन सरकारातल्या अशा अनेक अधिकाऱ्यांना साक्ष मिळाली, ज्यांच्यापर्यंत पोहोचणं इतर कोणालाही शक्य झालं नसतं. (लूक २१:१२, १३) तसंच, संकटांना तोंड देताना पौलला आलेल्या अनुभवांमुळे आणि त्याच्या विश्वासू उदाहरणामुळे त्याच्या सर्व ख्रिस्ती भाऊबहिणींना प्रोत्साहन मिळालं.—फिलिप्पै. १:१२-१४.
२१. हिंमत न हारता राज्याचं काम करत राहिल्यामुळे कोणते चांगले परिणाम घडून येऊ शकतात?
२१ आजही हीच गोष्ट खरी आहे. संकटांचा आणि विरोधाचा सामना करावा लागला, तरीही हिंमत न हारता राज्याचं काम करत राहिल्यामुळे आपल्याला अनेक चांगले परिणाम दिसून येतील. उदाहरणार्थ, आपल्याला अशा अधिकाऱ्यांना साक्ष देण्याची संधी मिळेल, ज्यांच्यापर्यंत पोहोचणं सहसा कठीण असतं. आपण संकटांचा धीराने सामना केल्यामुळे आपल्या ख्रिस्ती भाऊबहिणींना आपल्या विश्वासू उदाहरणातून प्रोत्साहन मिळेल. आणि देवाच्या राज्याविषयी अगदी पूर्णपणे साक्ष देण्याचं कार्य आणखी धैर्याने करत राहण्याची त्यांनाही प्रेरणा मिळेल.
a “ रोमन राज्यपाल पुर्क्य फेस्त” ही चौकट पाहा.
b ‘न्यायासन’ हे एका उंच कट्ट्यावर ठेवलेलं आसन होतं. हे आसन अशा उंच ठिकाणी होतं, ज्यावरून न्यायाधीशाचा निर्णय अंतिम असून त्याचा आदर केला जावा असं सूचित व्हायचं. पिलातानेही अशाच न्यायासनावर बसून येशूच्या विरोधात करण्यात आलेले आरोप ऐकून घेतले होते.
c “ आधुनिक काळात खऱ्या उपासनेसाठी न्यायालयांत अपील” ही चौकट पाहा.
d “ राजा हेरोद अग्रिप्पा दुसरा” ही चौकट पाहा.
e ख्रिस्ती या नात्याने पौलने येशू हा मसीहा आहे हे स्वीकारलं होतं. पण यहुद्यांनी येशूला नाकारलं होतं, त्यामुळे ते पौलला धर्मत्यागी मानत होते.—प्रे. कार्यं २१:२१, २७, २८.
f पौलने आपण “भर दुपारी” प्रवास करत होतो असं जे म्हटलं, त्याविषयी बायबलच्या एका अभ्यासकाने असं लिहिलं: “खूपच महत्त्वाचं काम असल्याशिवाय सहसा कोणी दुपारी प्रवास करत नव्हतं. दुपारी कडक ऊन असल्यामुळे लोक सहसा यावेळी विश्रांती घ्यायचे. यावरून [ख्रिश्चनांचा] छळ करण्याचा पौल किती झटून प्रयत्न करत होता हे दिसून येतं.”