अध्याय २६
“तुमच्यापैकी एकाचाही जीव जाणार नाही”
पौलचं जहाज फुटतं, पण तो दृढ विश्वास आणि लोकांबद्दल प्रेम दाखवतो
प्रे. कार्यं २७:१–२८:१० वर आधारित
१, २. पौलचा प्रवास कसा असणार आहे, आणि त्याच्या मनात कोणते प्रश्न असावेत?
“तू कैसराकडे जाशील.” राज्यपाल फेस्तचे हे शब्द अजूनही पौलच्या मनात घोळत आहेत. कारण या शब्दांचा त्याच्या भविष्यावर फार मोठा प्रभाव पडणार आहे. पौलने दोन वर्षं तुरुंगात काढली आहेत. त्यामुळे, रोमला जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या लांबच्या प्रवासाच्या निमित्ताने आता त्याला बाहेर पडण्याची संधी मिळणार आहे. (प्रे. कार्यं २५:१२) यापूर्वी पौलने अनेक वेळा समुद्रप्रवास केला होता. पण, इतरांप्रमाणे त्याच्यासाठी समुद्रप्रवास म्हणजे फक्त थंडगार हवा आणि मोकळं आकाश इतकंच नव्हतं. कारण समुद्रप्रवासाच्या त्याच्या आठवणी इतक्या काही चांगल्या नव्हत्या. शिवाय, कैसरापुढे हजर होण्यासाठी तो हा प्रवास करत असल्यामुळे, त्याच्या मनात अनेक गंभीर प्रश्नही असतील.
२ पौलने अनेक वेळा “समुद्रावरची संकटं” सोसली होती. तीन वेळा त्याचं जहाज फुटलं आणि एकदा तर त्याला एक संपूर्ण रात्र आणि दिवस उघड्या समुद्रावर घालवावा लागला. (२ करिंथ. ११:२५, २६) शिवाय, हा प्रवास त्याने केलेल्या मिशनरी दौऱ्यांपेक्षा फार वेगळा असणार आहे. कारण तेव्हा तो स्वतंत्र होता. पण, आता तो एक कैदी म्हणून हा लांबचा प्रवास करणार आहे. कैसरीयापासून रोमपर्यंतचं अंतर जवळजवळ ३,००० किलोमीटर इतकं आहे. हा प्रवास तो सुखरूपपणे पूर्ण करू शकेल का? आणि जरी केला, तरी तिथे रोममध्ये मृत्यू त्याची वाट पाहत असेल का? कारण, शेवटी त्याचा न्याय, सैतानाच्या जगातल्या त्या काळाच्या सर्वात शक्तिशाली शासकाकडून केला जाणार आहे.
३. पौलने कोणता निश्चय केला होता, आणि या अध्यायात आपण काय पाहणार आहोत?
३ आतापर्यंत तुम्ही पौलबद्दल जे काही वाचलं आहे त्यावरून तुम्हाला काय वाटतं? त्याच्यासमोर असलेल्या कठीण परिस्थितीमुळे तो हताश किंवा निराश झाला असेल का? नक्कीच नाही! पुढे संकटं येतील हे त्याला माहीत आहे, पण नेमक्या कोणत्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागेल हे त्याला माहीत नाही. मग, ज्या गोष्टी त्याच्या हातात नव्हत्या त्यांबद्दल चिंता करत बसण्यात आणि आपल्या सेवेतला आनंद गमावून बसण्यात खरंच काही अर्थ होता का? (मत्त. ६:२७, ३४) पौलला माहीत होतं, की त्याने देवाच्या राज्याविषयीचा आनंदाचा संदेश घोषित करण्यासाठी प्रत्येक संधीचा उपयोग करावा, हीच यहोवाची इच्छा होती. (प्रे. कार्यं ९:१५) आणि कोणतीही कठीण परिस्थिती आली, तरी हे काम पूर्ण करण्याचा त्याने निश्चय केला होता. आपलाही हाच निश्चय नाही का? तर मग, आता आपण पौलसोबत त्याच्या या ऐतिहासिक समुद्रप्रवासाला जाऊ या. तसंच, त्याच्या अनुभवांतून आपल्याला काय शिकायला मिळतं तेही पाहू या.
प्रे. कार्यं २७:१-७क)
“वारा उलट दिशेने वाहत” होता (४. पौलने कशा प्रकारच्या जहाजाने प्रवास केला, आणि त्याच्यासोबत कोण होतं?
४ पौल आणि इतर काही कैद्यांना रोमला नेण्याची जबाबदारी यूल्य नावाच्या एका रोमन अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली होती. यूल्यने कैसरीयाला आलेल्या एका व्यापारी जहाजाने प्रवास करण्याचं ठरवलं. हे जहाज अद्रमुत्तीय बंदरातून आलं होतं. हे बंदर आशिया मायनरच्या पश्चिम किनाऱ्यावर, लेस्बॉस बेटावरच्या मितुलेने शहरासमोर होतं. रोमला जाताना हे जहाज आधी उत्तरेकडे आणि मग पश्चिम दिशेला प्रवास करणार होतं. वाटेत माल चढवण्यासाठी आणि उतरवण्यासाठी ते बऱ्याच ठिकाणी थांबणार होतं. सहसा अशा जहाजांत प्रवाशांसाठी काही विशेष सोयी नसायच्या. त्यामुळे कैद्यांच्या सोयीचा तर प्रश्नच येत नव्हता. (“ समुद्रप्रवास आणि व्यापारी मार्ग” ही चौकट पाहा.) पण त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे त्या कैद्यांमध्ये पौल हा एकटा ख्रिस्ती नव्हता. कमीतकमी दोन बांधव—अरिस्तार्ख आणि लूक हेही या प्रवासात त्याच्यासोबत होते. आणि लूकनेच हा अहवाल लिहिला. पौलच्या या दोन विश्वासू साथीदारांनी स्वतःच्या खर्चाने हा प्रवास केला, की त्यांना पौलचे सेवक म्हणून सोबत घेण्यात आलं हे आपल्याला माहीत नाही.—प्रे. कार्यं २७:१, २.
५. सिदोनमध्ये पौलला कोणाला भेटता आलं, आणि आपण यातून काय शिकतो?
५ उत्तरेकडे एका दिवसाचा प्रवास केल्यावर आणि साधारण ११० किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर, जहाज सीरियाच्या किनाऱ्यावर सिदोन या बंदरात थांबलं. यूल्य पौलशी इतर कैद्यांप्रमाणे व्यवहार करत नव्हता असं दिसतं. पौल रोमन नागरिक आहे आणि अजून त्याला दोषी ठरवण्यात आलेलं नाही हे माहीत असल्यामुळे कदाचित तो त्याच्याशी चांगलं वागला असेल. (प्रे. कार्यं २२:२७, २८; २६:३१, ३२) जहाज बंदरात थांबल्यावर यूल्यने पौलला तिथल्या ख्रिस्ती बांधवांना भेटायला जाण्याची परवानगी दिली. इतके दिवस तुरुंगात राहिलेल्या या प्रेषित बांधवाची काळजी घ्यायला त्या भाऊबहिणींना किती आनंद झाला असेल! तुम्हालाही आपल्या बांधवांचा अशाच प्रकारे प्रेमाने पाहुणचार करून त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळवता येईल का?—प्रे. कार्यं २७:३.
६-८. सिदोन ते कनिदापर्यंत पौलचा प्रवास कसा झाला, आणि त्याने कदाचित कोणत्या संधीचा फायदा घेतला असेल?
६ सिदोनहून निघाल्यावर जहाजाने किनाऱ्या-किनाऱ्याने प्रवास केला. किलिकिया प्रदेशासमोरचा समुद्र पार करत, ते पौलचं मूळ गाव असलेल्या तार्सजवळून पुढे गेलं. जहाज दुसऱ्या कोणत्या ठिकाणी थांबल्याचा उल्लेख लूकने केला नाही. पण “वारा उलट दिशेने वाहत” होता, ही येणाऱ्या संकटाची चाहूल देणारी माहिती तो आपल्याला देतो. (प्रे. कार्यं २७:४, ५) अशा परिस्थितीतही, आनंदाचा संदेश सांगण्याची एकही संधी पौलने नक्कीच सोडली नसेल. आपल्यासोबत प्रवास करत असलेल्या कैद्यांना आणि इतर लोकांना, जहाजावरच्या खलाशांना, सैनिकांना आणि जिथेजिथे जहाज थांबलं त्या प्रत्येक ठिकाणी भेटलेल्या लोकांना त्याने साक्ष दिली असेल. आपणही आज प्रचार करण्यासाठी मिळेल त्या संधीचा फायदा घेतो का?
७ काही काळाने, जहाज आशिया मायनरच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या मुर्या बंदरात पोहोचलं. इथे पौल आणि त्याच्यासोबतचे इतर प्रवासी दुसऱ्या एका जहाजावर चढले. हे जहाज त्यांना त्यांच्या शेवटल्या ठिकाणापर्यंत म्हणजेच रोमला पोहोचवणार होतं. (प्रे. कार्यं २७:६) त्या काळात, इजिप्तहून भरपूर धान्य रोमला नेलं जायचं आणि इजिप्तची धान्य नेणारी ही जहाजं मुर्या बंदरात थांबायची. यूल्यने असंच एक जहाज शोधून सैनिकांना आणि कैद्यांना त्याच्यावर चढवलं. हे जहाज आधीच्या जहाजापेक्षा बरंच मोठं असावं. कारण, या जहाजातून भरपूर प्रमाणात गहू नेला जात होता. तसंच खलाशी, सैनिक, कैदी आणि रोमला चाललेले इतर प्रवासी मिळून २७६ लोक त्यावर होते. जहाज बदलल्यामुळे आता पौलला आणखी काही लोकांना प्रचार करण्याची संधी मिळाली आणि त्याने नक्कीच या संधीचाही फायदा घेतला असेल.
८ यानंतर जहाज आशिया मायनरच्या दक्षिणपश्चिम दिशेला असलेल्या कनिदा बंदरात थांबलं. हवामान चांगलं असायचं तेव्हा हे अंतर एका दिवसात पार करता यायचं. पण लूक सांगतो, की “बरेच दिवस संथ गतीने प्रवास करून आमचं जहाज मोठ्या मुश्किलीने कनिदा इथे पोहोचलं.” (प्रे. कार्यं २७:७क) हवामान खूपच खराब झालं होतं. (“ भूमध्य समुद्रातले उलट दिशेने वाहणारे वारे” ही चौकट पाहा.) जोरदार वाऱ्यामुळे खवळलेल्या समुद्रात, हेलकावे खाणाऱ्या त्या जहाजाच्या प्रवाशांची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करा.
वादळामुळे “जहाज जोरदार हेलकावे” खाऊ लागलं (प्रे. कार्यं २७:७ख-२६)
९, १०. क्रेत बेटाजवळ कोणत्या समस्या निर्माण झाल्या?
९ जहाजाच्या कप्तानाने कनिदाहून पश्चिम दिशेने प्रवास करत राहण्याचा निर्णय घेतला. पण या घटनांचा प्रत्यक्ष साक्षीदार लूक म्हणतो, “वारा समोरचा असल्यामुळे आम्हाला पुढे जाता येईना.” (प्रे. कार्यं २७:७ख) किनाऱ्याजवळून जाताना पाण्याच्या प्रवाहामुळे जहाज योग्य दिशेने पुढे जात होतं. पण, किनाऱ्यापासून दूर जाताच उत्तरपश्चिमेकडून उलट दिशेच्या वाऱ्याने जहाजाला खूप वेगाने दक्षिणेकडे नेलं. याआधी कुप्र बेटाजवळून जाताना ज्याप्रमाणे जहाजाला उलट दिशेच्या वाऱ्यांपासून संरक्षण मिळालं होतं, त्याचप्रमाणे आता क्रेतच्या बेटामुळे मिळालं. जहाज क्रेत बेटाच्या पूर्वेकडच्या टोकावर असलेल्या सलमोनच्या कड्याजवळून पुढे गेल्यावर परिस्थिती थोडी सुधारली. का? कारण बेटाच्या दक्षिणेकडे गेल्यामुळे जहाजाला जोरदार वाऱ्यांपासून संरक्षण मिळालं. जहाजावरच्या सर्वांना किती हायसं वाटलं असेल याची कल्पना करा. पण, लवकरच त्यांना येणाऱ्या हिवाळ्याची चिंता सतावू लागली. हिवाळ्यात येणाऱ्या वादळांच्या धोक्याकडे खलाशी दुर्लक्ष करू शकत नव्हते.
१० लूक आपल्याला अचूक माहिती देतो: “[आम्ही] क्रेतच्या किनाऱ्या-किनाऱ्याने पुढे गेलो. आमचं जहाज कसंबसं . . . ‘सुरक्षित बंदर’ म्हटलेल्या ठिकाणी पोहोचलं.” बेटाचा आडोसा मिळूनही जहाजावर नियंत्रण करणं सोपं नव्हतं. पण शेवटी, नांगर टाकता येईल अशी एक लहानशी खाडी त्यांना सापडली. किनारा उत्तरेकडे वळतो त्या भागात ही खाडी असावी. तिथे ते किती काळ थांबले? लूक सांगतो “बरेच दिवस.” पण तरीही परिस्थिती सुधारण्याची चिन्हं दिसत नव्हती. कारण, सप्टेंबर-ऑक्टोबरचा हा काळ समुद्रप्रवासासाठी खूप धोक्याचा होता.—प्रे. कार्यं २७:७-९.
११. पौलने आपल्यासोबत प्रवास करणाऱ्यांना कोणता सल्ला दिला, तरी कोणता निर्णय घेण्यात आला?
११ पौलने यापूर्वी पुष्कळ वेळा भूमध्य सागरातून प्रवास केला असल्यामुळे काही प्रवाशांनी त्याचा सल्ला घेतला असावा. तेव्हा, पौलने त्यांना जहाज पुढे न नेण्याचा सल्ला दिला. कारण तसं केल्यामुळे खूप “हानी” होण्याचा आणि प्रवाशांचा जीव जाण्याचाही धोका होता. पण, कप्तानाला आणि जहाजाच्या मालकाला प्रवास थांबवायचा नव्हता. कदाचित लवकरात लवकर एखाद्या सुरक्षित ठिकाणी पोहोचावं असं त्यांना वाटत असेल. त्यांनी यूल्यला ही गोष्ट पटवून दिली. त्याच किनाऱ्यावरून पुढे काही अंतरावर असलेल्या फिनिक्स बंदरात पोहोचण्याचा प्रयत्न करावा, असं जहाजातल्या बहुतेक जणांचं मत होतं. कदाचित हे बंदर मोठं असल्यामुळे हिवाळा काढण्यासाठी ते जास्त सोयीचं असावं. त्यामुळे, दक्षिणेकडचा मंद वारा वाहू लागला तेव्हा आता प्रवासाला निघणं सुरक्षित आहे असं सर्वांना वाटलं आणि जहाज तिथून निघालं.—प्रे. कार्यं २७:१०-१३.
१२. क्रेतहून निघाल्यावर जहाज कोणत्या संकटांत सापडलं आणि खलाशांनी धोका टाळण्यासाठी काय केलं?
१२ पण, तिथून निघताच हवामान पुन्हा बिघडलं आणि उत्तरपूर्वेकडून “वादळी वारा” वाहू लागला. काही वेळासाठी त्यांना सुरक्षित बंदरापासून साधारण ६५ किलोमीटर दूर असलेल्या “कौदा नावाच्या एका लहान [बेटाचा]” आडोसा मिळाला. पण, जहाज दक्षिणेकडे वाहवत जाऊन आफ्रिकेच्या किनाऱ्यावरच्या एका उथळ ठिकाणी वाळूवर आदळण्याची शक्यता होती. कसंही करून हा धोका टाळण्यासाठी खलाशांनी जहाजाच्या मागच्या बाजूला बांधलेली होडी ओढून घेतली. पण त्यांना हे करणं फार कठीण गेलं कारण होडीत पाणी भरलं होतं. मग जहाजाच्या फळ्या तुटू नयेत म्हणून त्यांनी खूप मेहनत घेऊन त्या मोठ्या जहाजाला खालून-वरून दोरखंडांनी आणि साखळ्यांनी बांधलं. मग त्यांनी जहाजाचं शीड खाली उतरवलं आणि वादळ ओसरेपर्यंत जहाज वाऱ्याच्या दिशेने जाऊ दिलं. हा किती भयानक अनुभव असेल याची कल्पना करा! पण इतकं सर्व करूनही फारसा उपयोग झाला नाही, कारण वादळामुळे “जहाज जोरदार हेलकावे खात” राहिलं. तीन दिवसांनंतर, जहाजातलं वजन कमी करण्यासाठी त्यांनी काही सामान समुद्रात फेकून दिलं.—प्रे. कार्यं २७:१४-१९.
१३. वादळ सुरू असताना जहाजावर कशी परिस्थिती असावी?
१३ जहाजावर नक्कीच खूप भीतीचं वातावरण असेल. पण, पौल आणि त्याच्या साथीदारांना खातरी होती की ते या संकटातून सुखरूप वाचतील. कारण प्रभू येशूने याआधी पौलला सांगितलं होतं की तो रोममध्ये साक्ष देईल. नंतर एका स्वर्गदूतानेही पुन्हा पौलला हीच गोष्ट सांगितली. (प्रे. कार्यं १९:२१; २३:११) पण, दोन आठवड्यांपर्यंत रात्रंदिवस वादळ सुरू राहिलं. सततच्या पावसामुळे आणि ढगांमुळे सूर्य किंवा तारे दिसत नव्हते. त्यामुळे जहाज नेमकं कुठे आहे किंवा कोणत्या दिशेला चाललं आहे हे कप्तानाला कळत नव्हतं. थंडी, पाऊस, जहाजाच्या हेलकाव्यांमुळे होणारी मळमळ आणि भीती यांमुळे कोणाला खाण्यापिण्याचंही भान नव्हतं.
१४, १५. (क) जहाजातल्या लोकांशी बोलताना पौलने आधी त्यांना जे सांगितलं होतं, त्याचा उल्लेख का केला? (ख) पौलने सांगितलेल्या आशादायक संदेशातून आपण काय शिकू शकतो?
१४ मग पौल जहाजातल्या लोकांशी बोलण्यासाठी उभा राहिला. प्रवासाला निघणं धोकादायक आहे याविषयी त्याने जे सांगितलं होतं, त्या गोष्टीचा उल्लेख त्याने केला. पण ‘मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं,’ अशा अर्थाने नाही. तर, त्यांनी त्याचं म्हणणं ऐकायला हवं होतं असं तो म्हणत होता. मग त्याने म्हटलं: “हिंमत धरा. कारण तुमच्यापैकी एकाचाही जीव जाणार नाही. फक्त जहाज नष्ट होईल.” (प्रे. कार्यं २७:२१, २२) पौलच्या या शब्दांमुळे त्या लोकांना खरंच किती दिलासा मिळाला असेल! यहोवाने आपल्याला त्या लोकांना सांगण्यासाठी इतका चांगला संदेश दिला, याचं पौललाही समाधान वाटलं असेल. यहोवाला प्रत्येक माणसाच्या जिवाची काळजी आहे हे आपण आठवणीत ठेवलं पाहिजे. प्रत्येक व्यक्ती त्याच्यासाठी महत्त्वाची आहे. प्रेषित पेत्रने लिहिलं: “कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची [यहोवाची] इच्छा नाही, तर सगळ्यांनी पश्चात्ताप करावा असं त्याला वाटतं.” (२ पेत्र ३:९) म्हणूनच, यहोवाने आपल्याला दिलेला आशेचा संदेश आपण जास्तीत जास्त लोकांना सांगण्याचा प्रयत्न करणं किती महत्त्वाचं आहे! कारण, हा लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे आणि यहोवाच्या दृष्टीने प्रत्येकाचं जीवन मौल्यवान आहे.
१५ कदाचित पौलने जहाजावरच्या अनेकांना “देवाने . . . दिलेल्या वचनाच्या” आशेबद्दल साक्ष दिली असेल. (प्रे. कार्यं २६:६; कलस्सै. १:५) आता जहाज फुटण्याची सर्वांना भीती वाटत असताना, त्यातून वाचण्याची आशा असल्याचं एक खातरीलायक कारण त्याने त्यांना सांगितलं. तो म्हणाला: “[देवाचा] दूत काल रात्री माझ्याजवळ उभा राहून मला म्हणाला: ‘पौल, घाबरू नकोस. तू कैसरापुढे नक्की उभा राहशील. आणि पाहा! देव तुझ्यासोबत प्रवास करणाऱ्या सगळ्यांचा जीव वाचवेल.’ तेव्हा माणसांनो, हिंमत धरा. कारण स्वर्गदूताने मला जे सांगितलंय, ते देव नक्की करेल असा माझा विश्वास आहे. पण आपलं जहाज कोणत्यातरी बेटावर जाऊन फुटेल.”—प्रे. कार्यं २७:२३-२६.
प्रे. कार्यं २७:२७-४४)
“सगळे जण सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले” (१६, १७. (क) प्रार्थना करण्याच्या कोणत्या संधीचा पौलने उपयोग केला आणि त्यामुळे काय परिणाम झाला? (ख) पौलने जे सांगितलं होतं ते कसं खरं ठरलं?
१६ दोन आठवडे चाललेल्या त्या भीतीदायक वादळात जहाज जवळजवळ ८७० किलोमीटर वाहत गेलं. पण, त्यानंतर खलाशांना एक आशेचा किरण दिसला, कारण त्यांना जमिनीवर लाटा आदळत असल्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा, जहाज वाहत जाऊ नये आणि जहाजाची पुढची बाजू किनाऱ्याला लागावी म्हणून नाविकांनी जहाजाच्या मागच्या बाजूने समुद्रात नांगर टाकले. तेव्हा जहाजावरची काही माणसं जहाज सोडून जाण्याचा प्रयत्न करू लागली पण सैनिकांनी त्यांना अडवलं. पौलने सैन्याचा अधिकारी आणि सैनिक यांना सांगितलं: “ही माणसं जहाजात राहिली नाहीत, तर तुमचा बचाव होणं शक्य नाही.” जहाज थोडं स्थिर झाल्यानंतर पौलने सर्वांना जेवण्याची विनंती केली आणि पुन्हा एकदा सर्वांना आश्वासन दिलं ते सर्व वाचतील. मग पौलने “सगळ्यांच्या समोर देवाचे आभार मानले.” (प्रे. कार्यं २७:३१, ३५) ही धन्यवादाची प्रार्थना करून त्याने लूक आणि अरिस्तार्ख यांच्यासाठी, तसंच आजच्या काळातल्या सर्व ख्रिश्चनांसाठी चांगलं उदाहरण मांडलं. तुम्ही मंडळीत किंवा जमलेल्या बांधवांच्या वतीने प्रार्थना करता, तेव्हा तुमच्या प्रार्थनेतून सर्वांना प्रोत्साहन आणि सांत्वन मिळतं का?
१७ पौलने प्रार्थना केल्यानंतर, “सगळ्यांना धीर आला आणि तेही जेवू लागले.” (प्रे. कार्यं २७:३६) मग, जहाज हलकं व्हावं आणि किनाऱ्याला व्यवस्थित लागावं, म्हणून ते पुन्हा गहू समुद्रात फेकू लागले. दिवस उजाडल्यावर, जहाज जमिनीपर्यंत नेणं सोपं जावं म्हणून, नाविकांनी नांगर कापून जहाजाच्या मागच्या बाजूला असलेले वल्हे सोडले. मग त्यांनी जहाजाच्या पुढे असलेलं शीड उभं केलं. तेव्हा, जहाजाचा पुढचा भाग वाळूच्या बांधावर आदळून वाळूत रुतून बसला आणि लाटांच्या तडाख्यांमुळे जहाजाची मागची बाजू तुटू लागली. कैद्यांनी पळून जाऊ नये म्हणून सैनिकांनी त्यांना ठार मारायचं ठरवलं, पण यूल्यने त्यांना असं करू दिलं नाही. त्याने सर्वांना पोहून किनाऱ्यापर्यंत जायला सांगितलं. अशा रितीने पौलने जे सांगितलं होतं ते अगदी खरं ठरलं. जहाजातली सर्वच्या सर्व २७६ माणसं वाचली. “सगळे जण सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले.” पण ते नक्की कुठे पोहोचले होते?—प्रे. कार्यं २७:४४.
बेटावरचे लोक “खूप दयाळूपणे वागले” (प्रे. कार्यं २८:१-१०)
१८-२०. मिलिताचे लोक जहाजाच्या प्रवाशांशी “खूप दयाळूपणे” कसे वागले, आणि पौलकडून देवाने कोणता चमत्कार केला?
१८ जमिनीवर आल्यावर त्यांना कळलं की ते सिसिलीच्या दक्षिणेला असलेल्या मिलिता बेटावर पोहोचले होते. (“ मिलिता नेमकं कुठे होतं?” ही चौकट पाहा.) एक वेगळीच भाषा बोलणारे या बेटावरचे लोक त्यांच्याशी “खूप दयाळूपणे वागले.” (प्रे. कार्यं २८:२) किनाऱ्यावर पूर्ण भिजलेल्या अवस्थेत आलेल्या आणि थंडीने कुडकुडत असलेल्या अनोळखी लोकांसाठी त्यांनी शेकोटी पेटवली. खरंतर, खूप थंडी आणि पाऊसही होता, पण शेकोटीमुळे त्यांना ऊब मिळाली. पण यामुळे एक चमत्कारही झाला.
१९ मदत करण्याच्या हेतूने पौल काटक्या गोळा करून त्या शेकोटीत टाकू लागला. पण, तितक्यात एक विषारी साप बाहेर आला आणि त्याच्या हाताला विळखा घालून त्याला चावला. मिलिताच्या त्या लोकांना वाटलं, की पौलने नक्कीच काहीतरी पाप केलं असेल आणि त्यामुळे त्याला देवांकडून ही शिक्षा मिळाली होती. a
२० पौलला साप चावला हे पाहिल्यावर बेटावरच्या लोकांना वाटलं की आता त्याचं “शरीर सुजेल.” या ठिकाणी मूळ भाषेत एक वैद्यकीय शास्त्रातला शब्द वापरला आहे, असं एका संदर्भ ग्रंथात म्हटलं आहे. “सगळ्यांचा लाडका वैद्य लूक” याच्या मनात वैद्यकीय शास्त्रातला असा शब्द लगेच आला असेल यात काही नवल नाही. (प्रे. कार्यं २८:६; कलस्सै. ४:१४) काहीही असो, पौलने त्या सापाला हातावरून झटकलं आणि त्याला कोणतीच इजा झाली नाही.
२१. (क) लूकने त्याच्या अहवालात अचूक माहिती दिल्याची कोणती काही उदाहरणं आहेत? (ख) पौलने कोणते चमत्कार केले, आणि मिलिताच्या लोकांवर याचा काय परिणाम झाला?
२१ त्याच भागात पुब्ल्य हा श्रीमंत माणूस राहत होता आणि त्याच्या मालकीच्या जमिनी होत्या. कदाचित तो मिलिता बेटावर एक मोठा रोमन अधिकारी असावा. लूकने अहवालात त्याला “बेटाचा प्रमुख” म्हटलं आहे. माल्टा इथे सापडलेल्या दोन लेखांवरही अगदी हीच पदवी लिहिलेली आढळली आहे. पुब्ल्यने पौल आणि त्याच्या सोबत्यांचा तीन दिवस पाहुणचार केला. पण पुब्ल्यचे वडील आजारी होते. पुन्हा एकदा लूकने त्यांच्या आजाराविषयी अगदी अचूक वैद्यकीय माहिती आपल्याला दिली. त्याने लिहिलं की “पुब्ल्यचे वडील तापाने आणि जुलाबाने आजारी असल्यामुळे बिछान्यावर पडून होते.” तेव्हा पौलने प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले, आणि ते बरे झाले. हा चमत्कार पाहून बेटावरचे लोक खूप प्रभावित झाले. त्यांनी इतर आजारी लोकांनाही पौलकडे आणलं. तसंच, पौल आणि त्याच्या सोबत्यांसाठी गरजेच्या वस्तू भेट म्हणून आणल्या.—प्रे. कार्यं २८:७-१०.
२२. (क) लूकने लिहिलेल्या अहवालाची एका प्राध्यापकांनी कशी प्रशंसा केली आहे? (ख) पुढच्या अध्यायात आपण काय पाहणार आहोत?
२२ आतापर्यंत आपण पौलच्या प्रवासाचा जो भाग पाहिला त्यात दिलेली माहिती अगदी अचूक आणि खरी आहे. एका प्राध्यापकांनी याविषयी असं म्हटलं: “लूकचा अहवाल हा संपूर्ण बायबलमधला, बारीक-सारीक माहिती देणारा आणि सर्वात स्पष्ट वर्णन असलेला वृत्तान्त आहे. पहिल्या शतकातला समुद्रप्रवास, तेव्हाची जहाजं, तसंच भूमध्य सागराच्या पूर्वेकडच्या हवामानाबद्दल लूकने दिलेली माहिती इतकी अचूक आहे,” की ती एखाद्या डायरीत लिहून ठेवलेल्या माहितीवर आधारित असेल असं वाटतं. प्रेषित पौलसोबत प्रवास करताना कदाचित लूक सर्व घटना लिहून ठेवत असावा. आता प्रवासाच्या पुढच्या भागात, लिहून ठेवण्यासारख्या आणखी बऱ्याच गोष्टी घडणार होत्या. पौल शेवटी रोमला पोहोचल्यावर तिथे काय घडलं? त्याविषयी पुढच्या अध्यायात पाहू या.
a लोकांना अशा विषारी सापांबद्दल माहीत होतं, यावरून मिलिता बेटावर त्या काळी असे विषारी साप असतील असं वाटतं. आज माल्टामध्ये (पूर्वीचं मिलिता) असे विषारी साप आढळत नाहीत. कदाचित अनेक शतकांदरम्यान वातावरणात झालेल्या बदलांमुळे हा फरक झाला असेल. किंवा बेटावर लोकसंख्या वाढल्यामुळे हे विषारी साप नाहीसे झाले असतील.